Thursday 2 May 2019

सौदी अरेबियाचा 'येमेन राग'

सौदी अरेबियाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या येमेनमधील लढाईची रसद थांबवण्याचा ठराव अमेरिकी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाला. अमेरिकी संसदेकडून तो अमेरिकी अध्यक्षांच्या मंजुरीसाठी गेला असताना मागील आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले अध्यक्षीय अधिकार वापरत हा ठराव फेटाळून लावला. युद्धनीतीची तमा न बाळगता सौदी अरेबियाकडून बेदरकारपणे सुरु असलेल्या या लढाईला वेसण घालायची संधी ट्रम्प यांनी हा ठराव फेटाळत नाकारली. त्यांच्या या निर्णयाचे पडसाद उलगडून दाखवणे हे गरजेचे ठरते.

भूगोलाचा विचार करता येमेन हा सौदीच्या पायाशी असलेला देश. येमेनचे अंतर्गत राजकारण आपल्या वळचणीला ठेऊन येमेनच्या जवळून होणारी आंतरराष्ट्रीय बाजारातील तेल वाहतूक ताब्यात ठेवायची हा सौदीचा गेल्या कित्येक वर्षांचा डाव. २०११पासून बेरोजगारी, गरिबी आणि बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविरोधात येमेनमध्ये निदर्शन सुरु होती. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागून आता सुमारे चार वर्ष लोटली आहेत. इराण पुरस्कृत 'हौती' गट आणि सौदी पुरस्कृत कुडमुडे सरकार यांच्यात थेट चकमक सुरु आहे. पश्चिम आशियात इराण आणि सौदी यांचे वैर नवनवे युद्धक्षेत्र शोधत असताना हे उभय देश आपल्या पारंपरिक संघर्षाचा ताजा प्रयोग येमेनमध्ये आता रंगवत आहेत. बंडखोर 'हौती' गटाला इराण अर्थसहाय्य आणि हेजबोल्लाह युद्धतंत्र पुरवत आहे. तर दुसऱ्या बाजूला, सौदीने बहारीन, संयुक्त अरब अमिराती अशा समस्त अरब राष्ट्रांची मोट बांधत येमेनमध्ये इराणला चेपायचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सकडून सौदीला तांत्रिक मदत आणि अत्याधुनिक शस्त्रांचा पुरवठा सुरु आहे. इतके असून सुद्धा, रणनीतिक द्वंदात निर्भेळ यश हाती लागत नसल्याचा राग घरून सौदीचे युवराज मोहंमद बिन सलमान यांनी संपूर्ण येमेनवरून वरवंटा फिरवायचा चंग बांधल्याचे दिसत आहे. अत्यंत प्रतिष्ठेची लढत करीत बिन सलमान यांनी सुमारे एक कोटी येमेनी जनतेची उपासमार केली आहे. गेल्या चार वर्षात लाखोंची कत्तल झाली आहे. तसेच, सांप्रत काळातील सर्वात मोठ्या प्रमाणात 'कॉलेरा'चा उद्रेक येमेनमध्ये झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले आहे. अमेरिकेच्या मदतीशिवाय बिन सलमान इतका मोठा घास घेऊच शकणार नाहीत. सौदीचा हा 'येमेन राग' ट्रम्प यांच्या सुरावटीवर उभा आहे. चहुबाजूने टीका होत असताना, नैतिकता दाखवत, येमेन युद्धात वापरली जाणारी सौदीची ही रसद तोडायची नामी संधी ट्रम्प यांनी नकाराधिकार वापरत घालवली. बंडखोर पत्रकार जमाल खशोगी यांच्या रक्ताने बिन सलमान यांचे हात माखले आहेत. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा बिन सलमान यांना या हत्येसाठी दोषी ठरवत असताना ट्रम्प यांनी बिन सलमान यांची पाठराखण केली आहे. इराणच्या अणुकराराला दाखवलेली केराची टोपली, पॅलेस्टिनी शिष्टमंडळाचे वॉशिंग्टनमधील कार्यालय बंद पाडणे, इस्राईलमधील अमेरिकेचा दूतावास वादग्रस्त जेरुसलेम शहरात हलवणे, 'गोलान टापू' प्रदेशाला इस्राईलचा अविभाज्य भाग म्हणून घोषित करणे, इराणच्या लष्करी गटाला जागतिक दहशतवादी गट ठरवणे असे निर्णय ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले आहेत. हे सर्व निर्णय सौदी, इस्राईल आणि इराण-विरोधी गटाची भलामण करतात. इराणला ठेचायच्या दृष्टीने एक अभद्र युती ट्रम्प यांनी जन्मास घातली आहे. ती टिकण्यासाठी त्यांना बेंजामिन नेतान्याहू आणि बिन सलमान यांसारखे शिलेदार त्यांच्या देशात सत्तेवर हवे आहेत. म्हणून हा सगळा प्रपंच. नेतान्याहू अडचणीत असताना राष्ट्रवादाचे मुद्दे त्यांना पुरवत ट्रम्प यांनी नेतान्याहू परत निवडून येतील याची काळजी घेतली. तसेच, नेतान्याहू २०२०मध्ये याची परतफेड करीत ट्रम्प यांना निवडून आणतील अशी अपेक्षा ठेवत आपली 'सोय' लावली आहे.

येमेनचा 'सीरिया' होत असताना निर्वासितांचे तांडे युरोपमध्ये जाऊन तेथील त्रास वाढवत आहेत. संपूर्ण प्रदेश गेली दशक दोन दशके युद्धप्रवण काळात घालवत असताना त्याचे परिणाम तितकेच गंभीर होत आहेत. येमेनसारखा देश या पश्चिम आशियातील सर्वर गरीब देश समजला जातो. पार 'अल-कायदा'च्या सुरुवातीच्या काळापासून येमेनमधील बेरोजगार, अशिक्षित तरुणांची 'जिहाद' फौजच्या फौज उभी राहिल्याचे इतिहास सांगतो. ११९३मध्ये सोमालियामध्ये केलेली अमेरिकी सैनिकांची हत्या, ऑक्टोबर २००० मध्ये 'युएसएस कोल' या अमेरिकी जहाजावर केलेला हल्ला, २००२ मधील केनियातील यहुदी मालमत्तेवर केलेला हल्ला, २००३मधील सौदीतील हल्ले अशा सर्व घटनांच्या योजना येमेनमध्ये शिजल्या. त्यामुळे आपण सारासार विचार न करता फक्त राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थ बघताना विरोधी गटाच्या असंतोषाला आपण स्फुरण चढवत आहोत याचे ट्रम्प, नेतान्याहू आणि बिन सलमान यांना भान आहे असे वाटत नाही. तो अंगलट येणार नाही याची अजिबात शाश्वती नाही. उलटपक्षी तो येईलच अशी शक्यता जास्त आहे. सर्व बाजूने गळचेपी होत असताना इराण कट्टरवादाची कास धरणार हे उघड आहे. नेतान्याहू, बिन सलमान यांसारखे कट्टर राष्ट्रवादी नेते ट्रम्प यांच्या समर्थनाच्या जीवावर स्वतःचा मूळ रंग आपापल्या देशात दाखवत आहेत. नेतान्याहू यांची पॅलेस्टिनी लोकांची जमीन हडपण्याच्या वृत्तीत वाढ होणार हे आता सरळ आहे. जमाल खशोगी हत्येनंतर जागतिक पातळीवर उसळलेला आगडोंब पचवत आता बिन सलमान आपल्या बाकी टीकाकारांना शांत करीत आहेत. येत्या काळात हे सर्व जण एकत्र येऊन पश्चिम आशियात नव्याने थय्या घालतील असे स्पष्टपणे दिसत आहे.

एका बाजूने सुरु असलेला युद्धप्रपंच संपवायची भाषा करायची आणि मागल्या दाराने हुकूमशाही करू पाहणाऱ्या नेत्यांच्या शिडात हवा भरायची असा दुटप्पी उद्योग ट्रम्प करतात. मोहंमद बिन सलमान, मोहंमद बिन झाएद, व्लादिमिर पुतीन, किम जोंग उन, जाईर बोलसोनारो, बेंजामिन नेतान्याहू, अब्देल फतेह एल-सीसी अशी 'मी म्हणेल ते' म्हणणाऱ्या नेत्यांची तर रांग लागली आहे. या वादग्रस्त नेत्यांच्या मूळ प्रवृत्तीला ट्रम्प उघडपणे बळ देताना दिसतात. त्यांच्या या जाहीर पाठिंब्यामुळे या नेत्यांची आपापल्या देशाबाहेरील महत्त्वाकांक्षा तर वाढीस लागत आहेच त्याचबरोबर, देशांतर्गत विरोधकांना चेपण्याच्या त्यांच्या साहसालाही धार चढत आहे. अशावेळी, जगभर मानवी हक्कांच्या नावाने गळा काढणारी अमेरिका स्वार्थ असेल तिथे या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते हे पुन्हा एकदा दिसून येत आहे. राजकीय आणि वैयक्तिक स्वार्थासाठी ट्रम्प बिन सलमान आणि त्या पठडीतल्या नेत्यांशी चुंबाचुंबी करीत आहेत. या नेत्यांच्या वाम कृत्यांना म्हणूनच ट्रम्प यांना तितकेच जबाबदार धरण्याचे कार्य इतिहासाला करावे लागेल. सांप्रत काळाचा विचार करता बिन सलमान आणि सर्व तत्सम पुढाऱ्यांचा पापाचा अंश तर ट्रम्प यांच्यापर्येंत पोहोचतोच आहे. मात्र उद्याचा विचार करता या पापापेक्षा त्यांच्या कृत्यांचा त्रास जगाला जास्त होणार आहे. ट्रम्प यांचा नकाराधिकार अशाच अवघड उद्याची चाहूल देतो आहे.