Sunday 31 July 2016

पाकिस्तानकडून दहशतवाद्यांची भलामण

               पाकिस्तानचं भारताबद्दल असलेलं वैर डेविड हेडलीच्या साक्षीनंतर पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे. पाकिस्तान भारताविरोधी कारवायांसाठी दहशतवादाला खतपाणी घालत असतो हे तर आता उघड आहे. हेडलीची साक्ष आणि २६/११च्या हल्ल्यांबाबत अनेक ठोस पुरावे देऊन देखील पाकिस्तान कानावर हात ठेवत आलेला आहे.
Image credit - Google
रोज विदारक होणाऱ्या सामाजिक परिस्थितीत आणि 'आयसीस'सारखी दहशतवादी संघटना भारतात पाय पसरू पाहत असताना पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण हा सविस्तरपणे अभ्यास करण्याचा विषय आहे. अमेरिकेच्या कैदेत बसून हेडलीने बोट दाखवलेले इलियास काश्मिरी, मेजर हरून आशिक आणि इतर ही फक्त नावे नसून त्या नावांना मोठा इतिहास आहे.  

९/११च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणत पाकिस्तानला आपल्या 'दहशतवाद-प्रतिबंध' कार्यक्रमात सामील करून घेतले. अफगाणिस्तानमध्ये लढणाऱ्या अमेरिकी आणि 'नाटो'च्या फौजांना रसद पाकिस्तानमधून अफगाणिस्तानमध्ये जाणाऱ्या रस्त्यावरून केली गेली. रसदीचे मार्गक्रमण आणि गुप्त माहिती मिळवत अमेरिकेने पाकिस्तानला बक्कळ पैसा आणि शस्त्रे दिली आहेत. मात्र थेट दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्याचा अमेरिकी दबाव पाकिस्तानने कायम सबुरीने घेत त्यात उशीर केला आहे. उत्तर आणि दक्षिण वजिरीस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या दुर्गम भागात दहशतवादाचे मुक्तसाम्राज्य आहे. तिथे थेट हल्ला केल्यास पाकिस्तानला आणि पाश्चात्य ठिकाणांना या दहशतवादी संघटनांकडून हल्ल्यांना सामोरे जावे लागले. जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या हत्येचे प्रयत्न आणि अल-कायदाने केलेली बनझीर भुत्तोंची हत्या याच धोरणाचे परिणाम आहेत. २००७ पर्येंत कित्येक हल्ले या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये केले.
Image credit - Google
२००८ फेब्रुवारीपर्येंत तर इराकपेक्षा जास्त हे आत्मघातकी हल्ले पाकिस्तानमध्ये झाले आहेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय' (इंटर सर्व्हिस इंटेलिजेंस) ही भारतात २६/११च्या आधी काही छोटेखानी घातपात करण्याच्या विचारात होती. मात्र मोक्याच्या ठिकाणी मोठा हल्ला करून पाकिस्तान आणि भारतातील संबंध आणखी ताणत युद्धसदृश्य परिस्थिती उभी करायची, पाक लष्कराचे लक्ष दहशतवाद्यांवरील कारवाई वरून भारत-पाक सीमेवर हलवायचे, तसे करत असताना अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या साथीने अमेरिकी फौजांना धूळ चारायची अशी रणनीती इलियास काश्मिरीने आखत, अल-कायदाकडून मंजूर करून घेत, लष्करे तोयबाचा माजी अधिकारी मेजर हरून आशिकच्या ध्यानस आणून दिले. मेजर हरूनने मग लष्करे तोयबाच्या म्होरक्या झाकी-उर-रहमान लख्वीकडे हा कट सुपूर्द केला. त्याने आणि 'आयएसआय'ने मग २६/११ घडवले. इलियास काश्मिरी हा 'हरकत-उल-जिहाद अल-इस्लामी'चा (हुजी) म्होरक्या होता. नंतर काश्मीर प्रश्नावर लढण्यासाठी '३१३ ब्रिगेड' नावची छोटी पण जबरदस्त दहशत असलेली संघटना स्थापन करत २००५च्या सुमारास तो अल-कायदाच्या जागतिक जिहादच्या चळवळीत सामील झाला. उपजत लष्करी नेतृत्व आणि गनिमी कावा हाताशी धरत इलियास विलक्षणरित्या आपलं वजन वाढवत २००७ मध्ये अल-कायदाचे लष्करी निर्णय घेऊ लागला. इलियास सोडता अल-कायदाच्या 'शूरा समिती'त फक्त २ वर्षात दाखल झालेल्या एकही अरबेतर माणसाचं उदारहण इतिहासात नाहीये. २०१०च्या पुणे बॉम्बस्फोटातदेखील त्याच्या हात होता. २०११मध्ये दक्षिण वजिरीस्तानमध्ये एका ड्रोनहल्ल्यात अमेरिकेने इलियासचा काटा काढला. 

पाक लष्करात मेजर असलेल्या हरून आशिकने पाक लष्कराच्या जुनाट कारभाराचे नेहमीच उघडपणे वाभाडे काढले आहेत. अल-कायदाचा कट्टर समर्थक आणि सक्रिय सदस्य असणाऱ्या मेजर हरूनचे विचार ऐकून अनेक सैनिकांनी पाक लष्कराला रामराम ठोकत दहशतवाद्यांची भलामण केली आहे. पाक लष्कराची दहशतवादापोटी असणारी ही संवेदना त्यांच्या या अभेद्य युतीला पूरक ठरत आहे. ज्याप्रकारे पाक लष्कराचे अनेक अधिकारी आता दहशतवादी विचारांचा पुरस्कार करत आहेत, त्याचप्रकारे सद्दाम हुसेन यांच्या कार्यकाळातील अनेक लष्करी अधिकारी आज 'आयसीस'ची धुरा सांभाळत आहेत. अफगाणिस्तानमध्ये भडका उडाल्यासचं त्या परिसरावर आपलं महत्त्व आपण सिद्ध करू शकू या कारणास्तव पाक लष्कर तालिबानला मदत करतं. अशीच मदत पाकिस्तान 'लष्करे तोयबा'ला भारतविरोधी कारवायांसाठी करतं. पाकिस्तान सरकारने लोकशाहीच्या कितीही चिपळ्या वाजवल्या तरी, पाक लष्कर सांगेल तीच दिशा पाकिस्तानच्या 'वजीर-ए-आजमांना' पूर्व म्हणावी लागते हे आपण जाणून आहोत. लष्करी राजवट असणाऱ्या पाकिस्तानच्या भूतकाळाला लोकशाही आणि शासनव्यवस्था मान्य नाही.
Image credit - Google
ही बाब नवाझ शरीफ उमजून आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहील शरीफ हे आक्रमक समजले जातात. किंबहुना भारतद्वेष ही पाक लष्करात सामील व्हायची प्राथमिक पात्रता आहे असे म्हणावे लागेल. अल-कायदा आणि तालिबान या फक्त दहशतवादी संघटना न राहता त्याचं चळवळीत रुपांतर व्हयला पाकिस्तानने भरघोस मदत केली आहे. जगातील पहिल्या १० सामर्थ्यशाली लष्करांमध्ये पाक लष्कराचा समावेश होतो. अमेरिकी निधी हा पाकच्या लष्करवाढीला कारणीभूत आहे. अमेरिका पाकिस्तानला आपला 'ऑल वेदर फ्रेंड' समजते. त्याचबरोबर अणुबॉम्ब असलेला पाकिस्तान एकमेव इस्लमी देश आहे. पाकच्या याच अणूतंत्राद्यानाला पाय फुटून इराण, उत्तर कोरिया आणि लिबियामध्ये अणूप्रकल्प राबवले गेले आहेत. भारत आणि पाकिस्तानकडे असलेल्या अणुबॉम्बमुळेच काश्मीरवरून भारत-पाकमधील भांडण हे प्रकरण जागतिक पातळीवरच्या अत्यंत संवेदनशील प्रश्नांच्या यादीत वरच्या स्थानावर आहे. पाकिस्तानशी बोलणी करत असताना या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. पाकिस्तानमध्ये अराजकता माजल्यास ते भारताला धोकादायक आहे. 


डेविड हेडली आणि मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेच्या पुढे आलेले इलियास काश्मिरी किंवा मेजर हरून आशिक हे म्हणूनच पाकिस्तानच्या लष्कराची, सरकारची आणि डोकेदुखी ठरणाऱ्या अंतर्गत वास्तवातील ​त्रुटींची अधोगतीच्या दिशेने जाणारी प्रातिनिधिक उदारहणं आहेत. संपूर्ण भारतीय उपखंडावर प्रभाव पडणाऱ्या या घटकांची कमतरता पाकिस्तानकडे कधीच नव्हती. आजही नाहीये. 
Image credit - Google
स्फोटक आणि दुरोगामी परिणाम करणाऱ्या घटकांची आणि त्यांच्या निर्मितीची लक्षणं ध्यानात ठेवत वर्तमान आंतरराष्ट्रीय राजकारण, मध्य-पूर्व आशियातील दाहकता, त्यातील अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताच्या भूमिकेचा समग्रपणे अंदाज घेत भारताला आपलं पर-राष्ट्र धोरण आखावं लागेल. तसे केल्यासचं आपण या भारतीय उपखंडात असलेल्या राजकीय पोकळीला न्याय देत आपले अढळ नेतृत्व प्रस्थापित करू शकू. मात्र, तसे न केल्यास आपण अश्या घटकांच्या जाळ्यात गुरफटत जाणार हे देखील तितकेच खरे आहे याचे भान असावे. 

                                                       
                                                                                                                                                     - वज़ीर
हा लेख गुरुवार, २५ फेब्रुवारी २०१६च्या 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये छापण्यात आला.