Saturday 1 April 2017

Saudi Arabia's quest for new friends and the uncertain times.


अस्वस्थ सौदीचे नवे 'सौदे'

        सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ इब्न सौद यांनी एक महिन्याचा व्यापक असा आशिया दौरा हाती घेतला होता. मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई, जपान, चीन आणि मालदीव या देशांना ते भेट देणार होते. स्वाईन फ्लूच्या उद्रेकामुळे त्यांनी मालदीव वगळता इतर सर्व देशांचा दौरा केला. त्यांचा हा दौरा आर्थिक आणि राजकीयदृष्टीने महत्वाचा होता. जपान आणि चीनसोबत अब्जावधी डॉलरचे करार आणि व्यापारिक समझोता हे या दौऱ्याचे खास हेतू. मात्र, मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई आणि मालदीव हे सुन्नीबहुल देश असून त्यांची दौऱ्यासाठी निवड याचकरिता केली होती. मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई आणि मालदीव हे 'इस्लामिक सहकारी संघटने'चे सभासद देश असून या संघटनेचे मुख्यालय जेद्दाह, सौदी अरेबियात आहे. 
(L-R) Saudi Arabia's King Salman Bin Abdul
Aziz Ibn Saud with Japanese Prime Minister Shinzo Abe
Image credit - Google
मलेशियासोबत सौदीने सुमारे ७ अब्ज डॉलरचे करार केले आणि मलेशियाच्या यात्रेकरूंची हज यात्रेच्या कोट्यामध्ये वाढ करून दिली आहे. राजे फैझल यांच्यानंतर ४६ वर्षांनी सौदी राजाने इंडोनेशियाला भेट दिली आहे. या देशातसुद्धा सौदी राजघराण्याने मोठी गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. मलेशिया आणि इंडोनेशियात केलेली गुंतवणूक सौदीच्या गेल्या कित्येक वर्षांच्या धोरणांना अनुसरून आहे. इंडोनेशिया तर सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. तिथे सौदीने भूतकाळात तेल आणि व्यापाराच्या गुंतवणूकीसोबतच शेकडो मशिदी, मदरसे, विद्यापीठे, अरबी भाषा शिकवणारे शिक्षक, सौदीत उच्चशिक्षण घेण्यासाठी देऊ केलेली शिष्यवृत्ती, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधांची खैरात केली आहे. गुंतवणूकीच्या आडून आपला कायम वरचष्मा राहील आणि वाईट प्रसंगी फायदेशीर ठरू शकणाऱ्या सुन्नी देशांचा दबावगट तयार करण्यात सौदीला जास्त स्वारस्य आहे. पाश्चात्य देशांच्या सोबतीची अनिश्चितता हेरून आशियातील जपान आणि चीन या दोन महत्त्वाच्या देशांसोबत मैत्री वाढवायची चाल सौदीने खेळली आहे. जपान आणि चीनला मोठ्या प्रमाणावर तेलपुरवठा आणि त्याबदल्यात जपान आणि चीनची सौदीत भरघोस गुंतवणूक या उद्देशाने अब्जावधी डॉलरचे करार करण्यात आले.

२०१४साली १०० डॉलरपेक्षा जास्त प्रति बॅरेल इतका दर असणारे तेल आज सुमारे ५०-५५ डॉलर प्रति बॅरेल भावात मुबलकरित्या उपलब्ध आहे. सौदी राजघराण्याचे साम्राज्य आणि त्याचा थाट हा तेलावर तरंगतो. गडगडलेल्या तेलाच्या भावामुळे गेली दोन वर्ष सौदी अरेबियाला जबर आर्थिक तुटीचा फटका बसला आहे. त्यात इराणवरील निर्बंध उठवून इराणचे तेल मुक्तबाजारपेठेत विक्रीस आल्यामुळे सौदी तेलेला तगडा स्पर्धक मिळाला आहे. तेलाच्या जीवावर अर्थकारणाची मोठी मदार असणाऱ्या सौदीसारख्या देशाला तेलाच्या कमी भावाची डोकेदुखी झाली आहे. त्यात पश्चिम आशियावर वचक ठेवण्याचे आणि नेतृत्वाचे वारे कानात शिरल्यामुळे अशा आर्थिक मंदीतदेखील सौदीने सीरिया आणि येमेनमध्ये आपल्या समर्थक सुन्नी गटाला शिया गटाविरोधात पैसे आणि शस्त्रांची रसद अविरहितपणे सुरु ठेवली आहे. 
(L-R) Saudi Arabia's King Salman Bin Abdul Aziz Ibn Saud
with President of the People's Republic of China Xi Jinping
Image credit - Google
आजदिमतीला ६ वर्ष सुरु असलेला सीरियाचा संघर्ष आणि दोन वर्ष सुरु असलेली येमेनमधील लढाई सौदी अर्थव्यवस्थेला तडे देत आहे. याचा चटका कमी बसावा म्हणून सौदी राजघराण्याचे उप-युवराज आणि राजे सलमान यांचे पुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी २०३०सालापर्येंत सौदी अर्थकारणात मोठे बदल करण्याचे महत्वाकांक्षी धोरण हाती घेतले आहे. अर्थव्यवस्थेतील तेलाचा भार कमी करणे तसेच तेलक्षेत्र सोडून इतर क्षेत्रात पर्यायी आणि सक्षम रोजगार उपलब्ध करून देणे त्यांच्या प्राधान्यक्रमावर आहे. त्याच अनुषंगाने आणि तूट भरून काढण्याच्या हेतूने त्यांनी कर वाढवले आहेत. त्याचबरोबर २०१८मध्ये 'अराम्को' या सौदी राजघराण्याच्या मालकीच्या तेलकंपनीचे ५ टक्के शेअर विकण्याचे मोहम्मद बिन सलमान यांनी ठरवले आहे. जपान आणि चीनच्या पाठिंब्याशिवाय त्यांचे 'व्हिजन २०३०' लांबणीवर पडेल. ओबामा प्रशासनाने इराणशी करार करून इराणवरील निर्बंध उठवले होते. यावरून सौदी आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले होते. आता अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या बाबतीत 'आपली भूमिका कडक असेल व आपण इराणसोबत केलेला अणुकरार रद्द करू' असे सांगितल्यामुळे साहजिकच सौदीला ट्रम्प जवळचे वाटू लागले आहेत. इराण, सीरिया, येमेन, 'आयसिस', तेल आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी गेल्या आठवड्यात मोहम्मद बिन सलमान यांनी ट्रम्प यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेतली. सौदी अमेरिकेची बक्कळ शस्त्रे आयात करतो. अमेरिकेकडून सौदीला शस्त्रे मिळत राहतील याची तजवीज बिन सलमान यांनी केल्याचे जाणकार सांगतात.
(L-R) Saudi Arabia's Deputy Crown Prince Mohammad Bin
Salman with U.S President Donald Trump
Image credit - Google
शपथविधी झाल्यापासून ट्रम्प यांची भेट घेणारे बिन सलमान हे पहिले उच्चपदस्थ मुस्लिम नेते आहेत. अवघ्या ३१ वर्षांचे बिन सलमान हे जगातील सर्वात तरुण संरक्षणमंत्री म्हणून गणले जातात. ते सौदीत महत्त्वाची खाती सांभाळतात आणि उप-युवराज आहेत. 
वडील असणारे राजे सलमान आणि युवराज मोहम्मद बिन नाएफ यांच्यानंतर सौदी सिंहासनासाठी ते रांगेत आहेत. दिवसेंदिवस महत्त्व वाढणाऱ्या आणि सिंहासनापासून अवघे दोन पावले लांब असणाऱ्या बिन सलमान यांच्यावर लक्ष ठेवणे त्यामुळेच क्रमप्राप्त आहे. 



पश्चिम आशियामध्ये मोक्याच्या प्रसंगांमध्ये आणि शिया-सुन्नी पंथीय मारामारीत सर्वत्र इराणचा जोर वाढीला लागलेला असताना आणि इराणला रशियासारख्या खंद्या पाठीराख्याची सोबत असताना सौदी अरेबियाची अस्वस्थता वाढली आहे. याचेच भान ठेऊन राजे सलमान यांनी आशिया आणि उपयुवराज मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकेचा दौरा हाती घेतला होता. अवघडलेल्या परिस्थितीत अमेरिकेची सोबत तसेच जुन्या-नव्या मित्रांशी दोस्ती आणि संबंध वृद्धिंगत करण्याची धडपड हे पिता-पुत्र करत आहेत. आशियाच्या दौऱ्याने त्यांच्या या प्रयत्नांना आर्थिक आकार आणि काहीसे यश दिले आहे. या दौऱ्याचे त्यांना अपेक्षित असलेले राजकीय फलित कितपत मिळते हे मात्र येणारा काळच ठरवेल.

                                                                                                                                            
- वज़ीर 
हा लेख मंगळवार २१ मार्च २०१७ च्या 'सकाळ'च्या संपादकीय पानावर छापण्यात आला.