Sunday 20 November 2016

सीरियाच्या पटावर अमेरिका-रशियाचा शह-काटशह

         सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात २०११ साली सुरु झालेल्या निदर्शनांना आज जवळपास साडेपाच वर्ष लोटली आहेत. या काळात अहिंसक ते हिंसक आणि आता यादवीकडे असा या आंदोलनाचा प्रवास झाला आहे. सीरियन सरकार, १०००हुन अधिक दहशतवादी टोळ्या, अल-कायदा, जब्हत फतेह अल-शम, आयसिस​, हेजबोल्लाह, इराण, तुर्कस्तान, रशिया आणि अमेरिका या सगळ्यांनी मिळून हा चिवडा केला आहे. आपापसातील समर्थन आणि विरोधाच्या जीवावर हा भडका सुरु आहे. यावर उपाय शोधण्यासाठी आपापल्या समर्थक गटांना रसद पुरवणारे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लावरोव यांनी आणि अर्थात त्यांच्या अध्यक्षांनी चर्चेचा बराच काथ्याकूट करून गेल्या महिन्यात ७ दिवसांची शस्त्रसंधी लागू केली. हा करार किती टिकणार याबद्दल शंका असतानाच, जेमतेम २ दिवस शांततेत घालवल्यावर सर्व घटकांनी पुन्हा हातात बंदुका घेऊन रोजची हाणामारी सुरु केली आहे.
Aleppo under heavy fire.
Image credit - Google
एक-एक गाव, उपनगर आणि शहरावरून असद सरकार आणि त्यांच्या विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. राजधानी दमस्कससोबत होम्स आणि हमा ही दोन शहर असद सरकारकडे आहेत. सध्याच्या घडीला अलेप्पो या सीरियातील सर्वात मोठ्या आणि आर्थिक, व्यापारिक दृष्ट्या महत्वाच्या शहरासाठी रस्सीखेच सुरु आहे. अलेप्पोचा ताबा आत्ता असद विरोधकांकडे आहे. अलेप्पो आपल्या ताब्यात घेऊन विरोधी गटाला नमवता येऊ शकते. सीरियन प्रश्नाचा सवंगपणे अभ्यास करता, अलेप्पो शहर जो राखेल त्या गटाचे पारडे या प्रश्नात जड होईल असे स्पष्टपणे दिसते. अलेप्पोसाठीच या परस्पर विरोधी गटांचा आटापिटा सुरु आहे. यात अमेरिकी हवाई हल्ल्यात सीरियाचे ६९ जवान मारले गेल्यामुळे सीरियन सरकार आणि त्याला पाठिंबा देणा​रा​ रशिया यांनी​ही शस्त्रसंधी 
एकतर्फी धुडकावून लाव​ली. हे करतानाच असद सरकारने अलेप्पोमध्ये अडकलेल्या सुमारे तीन लाख ​नागरिकांसाठी संयुंक्त राष्ट्रसंघाने पाठवलेल्या मदत-साहित्यावर हवाई हल्ला करून ते खाक केल. यात मदतकार्य करणारे २० जण दगावले आहेत.

​उशिरा का होईना पण सामंजस्याने हा पेच सोडवू पाहणारी अमेरिका आणि तिच्या प्रत्येक चालीला खो घालणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन ​यांच्यातील संबंध जरा जास्तच ताणले गेले आहेत. अमेरिकेने रशियासोबत सीरियन प्रश्नावर आता बोलणी थांबवली आहे.
'The White Helmets' rescue the victims under the debris
Image credit - Google
तर रशियाने २००० साली अमेरिकेसोबत केलेल्या कराराला केराची टोपली दाखवली आहे. अमेरिका-रशिया आपल्याकडील प्रत्येकी ३४ टन प्लुटोनियम नष्ट करेल असा हा करार होता. ३४ टन म्हणजे सुमारे १७,००० अणुबॉम्ब तयार करण्यासाठी लागणारा दारुगोळा! त्यामुळे एकमेकांना अटकाव घालू पाहणारे अमेरिका-रशिया आता मुक्तपणे आपल धोरण सीरियात रेटत आहेत. या रेट्यात गेल्या काही दिवसांत हजारो नागरिक अलेप्पोत मरण पावले 
आहेत. लहान मुल आणि स्त्रियांची संख्या यात नजरेत भरणारी आहे. अलेप्पोत जाणारी सर्व मदत असद सरकारने रोखून वा खाक केल्यामुळे अलेप्पोत खाण्याचे हाल सुरु आहेत. उपासमारी, इमारतींचे सांगाडे, पाण्याची वानवा​, बॉम्बवर्षाव झालेल्या रुग्णालयात जमिनीवर सर्वदूर पसरलेल रक्त, बेवारस प्रेत आणि पसरणारी रोगराई याचे फेसबुक, ट्विटर आणि इतर माध्यमांतून बाहेर येणार चित्रण मन हेलकावुन सोडणार आहे. अलेप्पोनंतर हे देश इराकमधील मोसुल आणि त्यानंतर सीरियातील रक्का या 'आयसिस'च्या ताब्यातील  दोन मुख्य आणि महत्वाच्या शहरांकडे आपला मोर्चा वळवतील. किंचित अस्ताकडे कललेली 'आयसिस' या दोन शहरांसाठी आपली सर्व ताकद खर्ची करेल असे दिसते. त्यांच्याकडून रासायनिक हल्ला होण्याची भीती व्यक्त होत आहे. अलेप्पोपेक्षा जास्त रक्तपात आणि अडकलेल्या सामान्य नागरिकांची मनुष्यहानी मोसुल आणि रक्कामध्ये घडेल. साम-दाम-दंड-भेद वापरून आपल सिंहासन वाचवणारे असद आणि त्यांना खाली खेचु पाहणारे त्यांचे विरोधक यांच्यातील या हिंसक सुंदोपसंदीत सामान्य प्रजेच्या आयुष्याच्या अमानुषपणे बोऱ्या वाजला आहे.
Aleppo
Image credit - Google
संयुंक्त राष्ट्रसंघानेसुद्धा ही गोष्ट जाहीर व्यक्त केली आहे. विरोधकांमध्ये फूट पाडून आपली खुर्ची बळकट करणारे असद पुढील काळाचा विचार करता त्यांच्या राजकीय वाटेवर सुरुंग पेरत आहेत. या एका प्रश्नामुळे मध्य-पूर्वेतील सर्व राष्ट्रांचा, त्यांच्या राजकीय आणि सामाजिक धोरणांचा बाज बदलला आहे. त्याबरोबरच १९७०च्या दशकातील शीतयुद्ध संपवून आता छुप शीतयुद्ध घडवत असलेले अमेरिका आणि रशिया त्यांनीच पेटवलेल्या या आगीत ओढले गेले आहेत. बराक ओबामांची सीरियन प्रश्नावर झालेली सपशेल नामुष्की त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या मानगुटावर बसणार आहे. युद्धखोर समजले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन हे हा प्रसंग कसा हाताळतात यावर जागतिक शांतता आणि घडू-बिघडू पाहणारे आंतरराष्ट्रीय संबंध अवलंबून आहेत.  

​​
सरतेशेवटी अमेरिका आणि रशियाला एकमेकांची गोत्र जुळवून घेऊन ​यावर ​तोडगा काढण्याशिवाय पर्याय नाही. आता हे दोघे चर्चेची कबड्डी खेळतात की आपल लष्करी सामर्थ्य छुप्या पद्धतीने लादतात हे बघणे जिकिरीचे ठरणार आहे. या दोघांच्या किंबहुना अमेरिकेच्या वेळकाढू आणि फसलेल्या धोरणामुळे संपूर्ण सीरियावर वरवंटा फिरतो आहे​,​ ​ज्याबद्दल या दोन देशांनी काही संवेदना दाखवणे त्यांच्या तुच्छतावादात बसत नाही.
Aleppo
Image credit - Google
दुसऱ्याच्या मांडवात आणि तिसऱ्याच्या सारीपाटात अमेरिका आणि रशियाचा हा रुसण्या-फुगण्याचा संसार चालू आहे. या संसाराला प्रचंड अशा अर्थकारणाची गडद किनार लाभली आहे. चर्चा फसते तिथे भांडण आणि हिंसाचार सुरु होतो या राज्यशास्त्राच्या प्राथमिक तत्त्वाचे प्रत्यक्ष प्रयोग आपण सीरियन यादवीत बघतो आहे. सीरिया आणि 
​मध्य-पूर्वेच्या दुर्दैवाने आता या प्रयोगाची ​दिर्घांकाकडे वाट​​​चाल सुरु आहे​.​चर्चा करून हा वाद तात्पुरता मिटू​ही​ शकेल. राखेखाल​चा​ ​हा​ विस्तव मात्र पुढील ​बरीच वर्ष ​नक्की ​विझणार​ नाही​.


                                                                                                                                                                                                                       - वज़ीर


हा लेख मंगळवार, १८ ऑक्टोबर २०१६च्या 'सकाळ'च्या संपादकीय पानावर (पान ६) छापण्यात आला.