Wednesday 9 October 2013

तत्व / पैसा / स्वप्न ???

बरोब्बर ३ महिन्यांपूर्वी (९  जून, २०१३ रोजी) नारायण मूर्ती इन्फोसिसमध्ये परतले. इन्फोसिस जात असलेल्या कठीण परिस्थितीतून कंपनीला बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांनी अंगावर घेतली आणि कंपनीचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून ते रुजू झाले. वरकरणी साधी, सरळ आणि सोपी वाटणारी ही घटना सांकेतिक भाषेत खूप काही सांगून गेली.  या क्षेत्रातल्या जाणकार मंडळींनी त्याचवेळी आपल्या भुवया उंचावल्या होत्या. किंचित अनोख्या आणि काहीश्या अनपेक्षित असणाऱ्या गोष्टीला जोडूनचं खूप गोष्टी घडवल्या गेल्या. 

ऑगस्ट २०११ मध्ये नारायण मूर्ती सेवेतून निवृत्त झाल्यापासूनचं कंपनीचं काय होणार याची चिंता बाजारपेठेतल्या भांडवलदारांना, गुंतवणूकदारांना आणि कंपनीच्या भागीदारांना भेडसावू लागली. आणि त्यांनी निवृत्ती स्वीकारल्यानंतर अस्थिर अशा वातावरणातून जात असलेली कंपनी अधिकचं गटांगळ्या खाऊ लागली.  मधल्या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, कॉग्निझंट, एचसीएल यांसारख्या अन्य कंपन्यांच्या तुलनेत इन्फोसिसच्या विकासाचा दर कमी झाला. बाजरपेठेत तुंबळ आर्थिक उलाढाल चालू असताना इन्फोसिस आर्थिक आघाडीवर झगडत होती. बाजारातील तिचा हिस्सा १०.४ टक्क्यांवरून थेट ६ टक्क्यांवर आला. काळोख दाटलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी काहीतरी उपाय योजणे आवश्यक होते, त्याची दखल घेत इन्फोसिसच्या चाणाक्ष वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नारायण मूर्तींना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी तो आनंदाने स्वीकारला! पुढील पाच वर्ष कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपण आणि आपले चिरंजीव रोहन वर्षाला १ रुपया वेतन स्वीकारू असं जाहीर करून मूर्तींनी आपली तत्त्वनिष्ठ म्हणून असलेली ओळख जपली पण आपल्याबरोबर आपले चिरंजीव रोहन मूर्ती आपले कार्यकारी सहाय्यक म्हणून काम बघतील म्हणून अट घातली. हे करतानाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी रोहन कुठलेही महत्वाचे निर्णय घेणार नाहीत, कंपनीचे नेतृत्व करणार नाही, इन्फोसिस आपल्या धोरणांनुसार काम करेल आणि रोहन यांची उपस्थिती आपल्याला वैयक्तिकरीत्या परिपूर्ण करेल, कंपनी समोरची आव्हानं पेलण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्ग समर्थ आहे असा विश्वास दाखवत मूर्तींनी इन्फोसिसमध्ये आपली दुसरी इनिंग चालू केली. 

मूर्ती परतणार म्हणून कंपनीचा शेअर १० टक्क्यांनी वाढला. असे पुनरागमन ‘अँपल’मध्ये स्टीव्ह जॉब्जचे झाले होते. आता नव्याने होत असलेले नारायण मूर्तींचे पुनरागमन काही मोठा चमत्कार घडवेल असा आशावाद बरेचं लोक बाळगू लागले. आर्थिक बाबतीत काहीशी प्रगती झाली असतानाचं सर्व आघाड्यांवर कंपनीची भरभराट काही पाहायला नाही मिळाली, इन्फोसिसच्या दोन बड्या, जाणकार, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी कंपनी सोडली आणि नारायण मूर्तींच्या नेत्तृत्वावरचं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. कंपनीच्या भागीदारांमध्ये घबराट पसरल्यामुळे इन्फोसिसचा शेअर आणखी घसरला. याचवेळी तीस वर्षीय, आणि हार्वर्डमधून पीएच.डी.रोहन मूर्ती कंपनीला काही नवी दिशा दाखवतील असं बऱ्याच लोकांना वाटू लागलं आणि जास्त काही समजण्याआधीचं रोहन मूर्तींना इन्फोसिसच्या उपाध्यक्षपदी बढती मिळाल्याच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या. नव्या दमाच्या, तरुण रक्ताकडे काळानुरूप वाढत जाणारे अधिकार ही खरं तर अभिमानास्पद बाब, पण जाणकार आणि तज्ञ मंडळीनी या नेमणुकीवर आपली नाकं मुरडली. त्याला कारण पण तसेच होते. नारायण मूर्तींनी इतके दिवस जीवापाड जपलेली आपली तत्त्वनिष्ठ ओळख.

अपार कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणा या भांडवलाच्या जोरावर इन्फोसिसला मूर्तींनी जगातील नामांकित आयटी कंपन्यांच्या यादीत नेऊन ठेवलं. त्यांनी घेतलेले अथक परिश्रम, वेळप्रसंगी केलेला त्याग, वाजवी आणि नेमकी धोरणं यांमुळेच इन्फोसिस भारतातली दुसरी सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी म्हणून ओळखली जाऊ लागली. ९५ रुपयांच्या भागीदारी पासून केलेली सुरुवात, २०११ साली मूर्ती जेव्हा निवृत्त झाले तेव्हा ती ३१२५४ कोटी रुपयांपर्येंत गेली. त्यांनी कंपनी व्यवहार कसा आणि किती पारदर्शी व चोख असू शकतो याचा उत्तम आणि बिनतोड आदर्श निर्माण केला. दर तीन महिन्यांनी लेखापरीक्षित आकडे अगदी प्रथम द्यायचा पायंडा त्यांनी पाडला. तिमाही लाभांश द्यायचा हा  नवा पायंडाही मूर्ती यांनी पाडला. बक्षीसभाग देण्यात तर त्यांनी विक्रम केला. भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जनक म्हणून मूर्तींची गणना होते. आज प्रचंड झळाळी लाभलेल्या या क्षेत्राच्या विकासात मूर्तींचा सिंहाचा वाटा आहे. एकवेळ नारायण मूर्तींच्यासकट त्यांचे जवळचे सर्व मदतनीस आणि कर्मचारी लक्षाधीश आहेत असं म्हटलं जायचं.

शिबुलाल, नंदन निलकेणी, मोहनदास पै हे मूर्तींचे अत्यंत विश्वासू शिलेदार. येत्या दोनहून कमी वर्षांमध्ये सध्या अध्यक्ष असलेले शिबुलाल निवृत्त होतील. गेल्या दोन महिन्यांमध्ये रोहन यांची कार्यपद्धती पाहता त्यांना मोक्याचं, मोठं पद मिळणार हे सूर्यप्रकाशाइतकंच स्वच्छ होतं. त्यांनी बेमालूमपणे सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत. रोहन दृष्टे आहेत असं मूर्ती सांगतात. त्यांचं भिन्न विषयांवरचं असलेलं वाचन आणि आकलन जबरदस्त आहे. कंपनीच्या कर्मचारी वर्गाबरोबर घेतलेलं जेवण, त्यांची बाजू आणि त्यांचे प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न, व्यापारासाठी नवे आराखडे, त्याची अंमलबजावणी, गुंतवणूकदारांचा विश्वास आणि त्यांची मोट परत बांधायला केलेली सुरुवात या गोष्टी रोहन यांची दूरदृष्टी दाखवत आहेत. पण ते सत्यात उतरवण्याची कुवत, क्षमता आणि त्यांचा आवाका आहे का यावर आत्ता मत मांडणं घाईचं होईल.


विप्रोच्या अजीम प्रेमजींचे पुत्र रिशद प्रेमजी यांची विप्रोमध्ये, रोशनी नदार मल्होत्रा यांची 'एचसीएल' मध्ये अशीच सावधगतीने, आस्ते कदम बढती झाली याला इतिहास साक्ष आहे. ही गोष्ट त्या कंपन्यांच्या प्रमुखांच्या दृष्टीने स्वाभाविकसुद्धा आहे. किंबहुना आपल्या खऱ्या वारसदारानांनाच आपली गादी चालवू द्यायची हा आजच्या घडीचा व्यावहारिक शहाणपणा असलेला अलिखित आणि तितकाच धाडसी नियम आहे. मात्र, आपल्या पुत्राला थेट इन्फोसिसमध्ये प्रवेश दिल्यामुळे प्रसारमाध्यमे व विश्लेषकांनी मात्र मूर्तींच्या पुनरागमनाबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. आणि आता तर रोहन यांची उपाध्यक्ष म्हणून झालेल्या नेमणुकीमुळे नारायण मूर्तींनी आपल्याच प्रतिमेला तडा दिल्याचं बोललं जात आहे. आपणच आखून दिलेल्या नियमांवर आपल्यालाच एक दिवस लाल फुली मारावी लागावी अशी वेळ कडक तत्त्व, अलौकिक साधेपणा आणि चपखल धोरण बाळगणाऱ्या नारायण मूर्तींवर आली आहे.
यामुळेच तज्ञ, अधिकारी, उद्योजक या चौकटी तोडून सामान्य जनतेपर्येंत पोहोचलेले, तरुणाईवर गारुड असणारे, आपल्या भाषणांनी, पुस्तकांनी देशातील होतकरूंना प्रगतीचा, तत्त्वज्ञानाचा मार्ग दाखवणारे, त्यांना आपल्या दैदिप्यमान कामगिरीने भुरळ घालणारे आणि प्रचंड मोठ्या वर्गात, समाजात थेट भारताच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी आपल्या नावाला पसंती मिळवणारे नारायण मूर्ती आता याच लोकांसमोर आपल्या प्रतिमेला गेलेला काहीसा तडा सावरत कसे सामोरे जातात हे बघणं जिकीरीचं ठरणार आहे. पण तूर्तास, त्यांनी वाऱ्याबरोबर वाहणेच सोयीस्कर ठरवल्याचं दिसत आहे असचं म्हणावं लागणार, अजून काय!!!



                                                            
                                                            - वज़ीर