Thursday 24 March 2016

सीरियातील माघारीतही रशियाची खेळी

        'आयसीस'चा बिमोड करण्याच्या रणनीतीने सीरियामध्ये हवाई हल्ले करणाऱ्या रशियाने सुमारे सहा महिन्यांनंतर आपलं सैन्य सीरीयातून माघारी बोलवत असल्याचे जाहीर केले. झटपट निर्णय आणि राजकीय धोरणांची कुठेही वाच्यता न करणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे अश्या कावेबाज हालचालींच्या समयसूचकतेसाठी प्रसिद्ध आहेत. 

गेली पाच वर्ष सीरीयामधल्या अस्थिर वातावरणात, पुतिन यांनी सप्टेंबर २०१५ पासून सुरु केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे तणाव वाढला. मात्र तब्बल २० वर्षांनतर आखतात पाय ठेवणाऱ्या रशियाने जागतिक स्तरावर याची काय प्रतिक्रिया उमटेल याचा जास्त विचार न करता आपली भूमिका मांडायची ही संधी दडवली नाही. सीरीयामध्ये सैन्य धाडायचा अथवा माघारी बोलवायचा रशियाचा हा निर्णय जरी वरकरणी घाईत घेतलेला वाटत असला तरी तो अविवेकी नक्कीच नाही. अमेरिकेच्या तालावर आणि भूमिकेवर टांगून राहिलेल्या सीरियाच्या प्रकरणात पुतिन यांनी आपल महत्त्व सिद्ध केलंय.
Syrian President Bashar al-Assad (L) &
Russian President Vladimir Putin (R)
 at The Kremiln, Moscow, Russia in 2015.
Image credit - Google
अगदी ऑगस्ट २०१५ पर्येंत विरोधी फौजांविरुद्ध लढत असताना नाकी नऊ आलेल बशर अल-असद यांच प्रशासन, पुतिन यांच्या थेट पाठींब्यावर आता विरोधकांना पुन्हा एकदा लढाईत मात देत आहे.  सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात 'फ्री सीरियन आर्मी'च्या रुपात एकवटलेले हत्यारबंध विरोधक, त्यांना रसद पुरवणारा अमेरिकी गट, 'अल-कायदा'ला समर्थन करणारी सीरीयामधील 'जब्हत अल-नुस्रा' आणि 'आयसीस' हे या भांडणातले चार महत्वाचे घटक असताना केवळ ६ महिन्यांच्या थेट लढाईत भाग घेऊन पुतिन यांनी या सर्व घटकांना पिछाडीवर फेकले आहे. 'आयसीस'ला ठेचत असतानाच, त्यांनी असद यांच्या विरोधकांवर जोरदार हवाई हल्ले करत त्यांच्या विरोधाची धार बोथट केली आहे. हे करत असताना त्यांनी असद यांच्या मागे भक्कमपणे उभे राहत सीरियाच्या हवाई आणि नाविक तळांवर आपल्या सैन्याचा तळ ठोकला. बराक ओबामांची सीरियाच्या बाबतीतली भूमिका संशयास्पद, मिळमिळीत, आणि वेळकाढू राहिली आहे. पुतिन यांच्या मध्यस्थिने ओबामा प्रशासन या प्रश्नाच्या मध्य-बिंदूवरून  बाजूला सरकले गेल्याचे चित्र आत्ता दिसत आहे. 


सप्टेंबर २०१५ आधी रशियाचे युक्रेन आणि क्रिमियावरून अमेरिका आणि युरोपीय देशांसोबतचे संबंध ताणले गेले होते. रशियाचे अर्ध्याहून अधिक उत्पन्न हे या युरोपीय देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या तेलावर अवलंबून आहे. युक्रेन प्रश्नाचा आधार घेत अमेरिकेने निर्बंध घालत रशियाच्या या उत्पन्नाला नख लावल. सीरियाचे टारटस बंदर हे मध्य-पूर्व आशियामध्ये जाण्याचे कवाड आहे आणि म्हणून रशियन नाविक तळ असलेल्या त्या बंदराचे  महत्त्व ओळखून असलेल्या पुतिन यांनी सीरीयामध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला. आखातात या नव्या युगातील लोकशाही स्थापन करू पाहणाऱ्या अमेरिकेने जर सीरियातील बशर अल-असद यांचे सरकार उलथवून लावले तर आपले आखतात स्थान राहणार नाही हा विचार देखील पुतिन यांनी करून या प्रश्नात उडी घेतली.
U.S President Barack Obama (L) &
Russian President Vladimir Putin. (R)
Image credit - Google
सबंध युरोपला आता डोकेदुखी ठरू पाहणारे, मध्य-पुर्वेतले निर्वासितांचे लोंढे हे याच राळ उडवणाऱ्या सीरियन युद्धाचे परिणाम आहेत. 'आयसीस' आणि असद विरोधकांना आवरत असताना आपण सीरियात असद यांच्या मदतीने स्थैर्य निर्माण करू आणि युरोपकडे जाणारे हे निर्वासितांचे लोंढे थांबवू असा विश्वास या युरोपीय देशांना पुतिन यांनी दाखवला आहे. इतके दिवस अमेरिकी पर-राष्ट्र धोरणाची तळी उचलल्यामुळे काय परिणाम भोगावे लागतात हे आता 
युरोपच्या लक्षात पॅरिसवरील हल्ल्यानंतर अधिक प्रकर्षाने लक्षात येऊ लागले आहे. पॅरिस हल्ल्यानंतर देखील फ्रान्सच्या खांद्याला खांदा लावत 'आयसीस'च्या तळांवर केलेल्या हल्ल्यामुळे पुतिन यांनी आपली प्रतिमा या युरोपीय राष्ट्रांसमोर उंचावली आहे. येत्या काळात रशियन तेल या राष्ट्रांना विकायला त्यांना हिच प्रतिमा फायद्याची ठरणार आहे. विरोधकांना चेपण्यात असद यांनी देखील आपल्याला गृहीत धरू नये असा पुतिन यांचा होरा दिसतो. असा सर्वांगी विचार करतानाच, सीरियन प्रश्नावर जिनिव्हा येथे होणाऱ्या शांतता फेरीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी रशियन सैन्याची माघार जाहीर करत आपण या शांततेत मोलाचा वाटा उचलल्याचे दाखवून दिले आहे. एका दगडात अनेक पक्षी मारताना पुतीन यांनी इथून पुढे आखतात होणाऱ्या सर्व घडामोडींमध्ये आपला सहभाग बेमालूमपणे नोंदवला आहे. मध्य-पूर्वतील कोणताही निर्णय घेताना अमेरिका, युरोप आणि अरब राष्ट्रांना आता रशियाचा विचार करावा लागेल ही तजवीज करून ठेवत रशियाने काढता पाय घेतला आहे.

​​हे करत असतनाच रशिया आपल्या काही तुकड्या मागे ठेवेल हे सांगायला ते विसरले नाहीत. या तुकड्या त्या पट्ट्यावर एकूणच दबाव राखायला आणि वेळ पडल्यास पुन्हा युद्धभूमीत उतरवायला पुतिन मागेपुढे पाहणार नाहीत. टर्कीने पाडलेले रशियन लढाऊ विमान आणि टर्कीच्या दुटप्पी भूमिकेचा वचपा पुतिन काढतील असे स्पष्टपणे दिसते. मात्र 'नाटो'चा सदस्य असणाऱ्या टर्कीबाबत निर्णय घेताना आपली तिरकी चाल चुकणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. पुतिन यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या भोवती आता मध्यपूर्वेबाबत असलेल्या विचारांच्या प्रवादाने फेरा घातला आहे. धक्कातंत्राचा चोख वापर करून या वर्तमान समस्येच्या सर्व दिशांना स्पर्श करत, राजकीय समयसूचकता ही आपली खासियत असल्याचे पुतिन यांनी सिद्ध केले आहे.
Image credit - Google
 सीरियाचे रण तापलेले असताना येत्या काळात या पेटलेल्या मध्य-पूर्व आशियामध्ये नव्या अडचणींची आणि त्यांना अनुसरून जन्माला येणाऱ्या नव्या समीकरणांची शक्यता नाकारता येत नाही. नव्या अमेरिकी राष्ट्रप्रमुखाला देखील क्षितिजावर दिसणाऱ्या या प्रकरणाचा आणि पुतिन यांच्यासारख्या प्रस्थापित विरोधकाचा सामना करायचा आहे. तूर्तास मात्र, या:क्षणी तरी या प्रदेशातल्या सर्व प्रश्नांच्या मोळीची दोरी पुतिन यांनी आपल्या हातात ठेवत संबंधित राष्ट्रांना आपल्या स्वतंत्र राजकीय आकलनाचा आणि धोरणांचा गर्भित इशारा दिला आहे.  



                                                                                                                                                                                                                                                                                                                       वज़ीर

हा लेख मंगळवार, दिनांक २४ मार्च २०१६च्या 'सकाळ' मध्ये संपादकीय पानावर, 'दृष्टीकोन' सदरात (पान ६) छापण्यात आला.

Saturday 12 March 2016

अमेरिकी निवडणुकीचे 'ट्रम्पेट'

          सामान्य अमेरिकी नागरिक तेथील राष्ट्राध्यक्षाची निवड दर चार वर्षांनी अप्रत्यक्षपणे करतात. म्हणजेच, अमेरिकी जनता राज्यांमधून 'हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह'चे सदस्य निवडते, त्या संख्येच्या प्राबल्यावर निर्वाचन समिती आणि त्यातील सदस्य नेमली जातात आणि मग हे सदस्य राष्ट्राध्यक्ष निवडून देतात. सामान्य नागरिक मतदान करतात त्या प्राथमिक फेरीला गेल्या महिन्यात सुरुवात झाली. यंदाच्या निवडणुकीच्या प्राथमिक टप्प्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस १ मार्च रोजी होता. कारण त्यादिवशी भौगोलिक दृष्ट्या काहीश्या लांब असलेल्या ११ राज्यांमध्ये प्राथमिक फेरी पार पडली. चुरस वाढलेल्या निवडणुकीच्या या टप्प्यात रिपब्लिकन ​अथवा डेमोक्रॅटिक या दोन प्रमुख पक्षांमधून कोण नेता राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असते. या आधी ४ राज्यांमध्ये प्राथमिक फेरी झाली, पण 'सुपर ट्यूसडे'च महत्त्व अनन्यसाधारण आहे कारण याच दिवशी अमेरिकेचा कल या पक्षांमधील कोणत्या नेत्याच्या पारड्यात झुकणार याचा अंदाज येतो.

Supporters at a rally of Bernie Sanders (D)
Image credit - Google
डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन आणि बर्नी ​सॅन​डर्स यांच्यात थेट लढत आहे तर, आधी १७ इच्छुकांची मांदियाळी मिरवणाऱ्या रिपब्लिकन पक्षाकडून आता फक्त ४ जण इच्छुक आहेत. त्यात खरी लढत डोनाल्ड ट्रम्प, टेड क्रुझ आणि मार्को रुबिओ यांच्यामध्ये आहे. चारपैकी उरलेले जॉन केसेक यांची २०१६साठीची मुळातच कमी असलेली लोकमान्यता आता ओहोटीला लागली आहे. सर्वेक्षणात डेमोक्रॅटिक पक्षातून आघाडीवर असणाऱ्या हिलरींनी 'सुपर ट्यूसडे'ला ११ पैकी ७ राज्य स्पष्ट आणि मोठ्या बहुमताने जिंकत ​सॅन​डर्सना हरवले आहे, तर सॅन​डर्सना ११ पैकी फक्त ४ छोटी राज्ये जिंकता आली आहेत. क्लिंटन घराणेशाही आणि 'वॉल स्ट्रीट'च्या अमेरिकी राजकारणात असलेल्या दबदब्याविरोधात सॅन​डर्स आवाज उठवत आहेत. तरुण मतदारांमध्ये सॅन​डर्स हिलारींपेक्षा लोकप्रिय आहेत. सामान्य जनतेच्या प्रमुख प्रश्नांना हात घालणाऱ्या सॅन​डर्स यांनी हिलरींविरुद्ध लढत सुरु राहील असे जाहीर केले आहे. काल कान्सास, नेब्रास्का, मेन या छोट्या राज्यांमध्ये सॅन​डर्स यांनी हिलरींना मात देत आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. मात्र, प्रस्थापित प्रचार यंत्रणा, आफ्रिकी-अमेरिकी मतदारांमध्ये असणारी पसंती, बिल क्लिंटन यांचा प्रचारात चपखल उपयोग आणि बक्कळ पैसा या हिलरींच्या जमेच्या बाजू आहेत. याच भांडवलावर त्या मोठ्या त्वेषात ही निवडणूक लढत आहेत. डोनाल्ड ट्रम्पना आव्हान देऊ शकणारा घटक म्हणून हिलारींकडे पाहिलं जातंय.
वॉशिंग्टनमध्ये त्यांच्या विरोधात जरी एक मोठा गट सक्रिय झाला असला तरी उमेदवारीची माळ हिलरींच्या गळ्यात पडेल असे दिसते. 'क्लिंटन मशीन' म्हणून समजल्या जाणाऱ्या या दाम्पत्याचा पराभव करणे सोपे नाही असे राजकीय जाणकार सांगतात. त्यांनी काल प्राथमिक फेरीत लुईझियाना हे महत्त्वाच राज्य आपल्या खिशात घातलं आहे. प्राथमिक  डेमोक्रॅटिक पक्षात लढत दुरंगी असल्यामुळे प्राथमिक फेरी ही रिपब्लिकन पक्षापेक्षा कमी किचकट पद्धतीने पार पडत आहे. रिपब्लिकन पक्षात चौरंगी लढतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी 'सुपर ट्यूसडे'ला ७, टेड क्रुझ यांनी ३ आणि मार्को रुबिओ यांनी फक्त १ राज्य जिंकल.
Republican Ted Cruz - Junior Senator of Texas (L)  &
Democrat Bernie Sanders - Junior Senator of Vermont (R)
Image credit - Google
ट्रम्प यांनी जरी कमी फरकाने ही राज्ये जिंकली असली तरी त्यांना संपूर्ण अमेरिकेतून मिळणारा भरघोस प्रतिसाद हा चमत्कारिक समजला जातो आहे. यंदाच्या निवडणुकीत आचरट विधाने करून ट्रम्प यांनी आधीच फार गदारोळ माजवून ठेवला आहे. 'मेक्सिको सीमेवर भिंत बांधू, मुसलमानांना अमेरिकेत बंदी घालू, सीरियातील निर्वासितांना अमेरिकेत येण्यास मज्जाव करू' असे बोलत त्यांनी बऱ्याच जणांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यांच्या भूमिकेमुळे ते या रणधुमाळीत मागे पडतील असा अंदाज साफ चुकवत ट्रम्प यांचा वारू सुसाट सुटला आहे.त्यांना आवरणं ही आत्ता रिपब्लिकन पक्षाची सर्वात मोठी डोकेदुखी आहे. ट्रम्प हे काही संपूर्णतः राजकारणी व्यक्तिमत्त्व नाही. त्यांचा राजकारणात असलेला सहभाग हा पक्ष निष्ठेशी बांधलेला नाही. त्यामुळे मुळातच पुराणमतवादी अशी प्रतिमा असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे आणि आघाडीमुळे सुरुंग लागतो आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्यास हिलरींचा विजयाचा मार्ग सुकर होईल आणि पक्ष मागे फेकला जाईल या भीतीने कट्टर पुराणमतवादी रिपब्लिकन नेत्यांची झोप उडाली आहे. 

Hillary Clinton (D) & Donald Trump (R)
Image credit - Google
ट्रम्प यांना रोखण्यासाठी म्हणूनच सर्व ट्रम्प-विरोधी गट आता एकत्र येत आहेत. तसे करण्यावाचून त्यांना पर्याय नाही कारण ट्रम्प हे अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्या ज्या काही मर्यादा आहेत त्याचा सारासार विचार न करता त्या भेदत प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय संबंध आणि प्रश्न अधिक जटील करून ठेवतील ही बाब या गटाच्या ध्यानात आली आहे. त्यांना पर्याय म्हणून पुराणमतवादी टेड क्रुझ यांना आता रसद पुरवण्यात येत आहे. आधी ही रसद रिपब्लिकन पक्षाच्या लाडक्या आणि तरुण मार्को रुबिओंना मिळत होती पण त्यांची कामगिरी आता फिकी पडत आहे. रुबिओंच्या फ्लोरिडा राज्यात आणि जॉन केसेक यांच्या ओहायो राज्यात १५ मार्चला प्राथमिक फेरी आहे.त्यादिवशी ट्रम्प जिंकल्यास रुबिओ आणि केसेक यांना पक्षातील दबावामुळे माघार घ्यावी लागेल. ट्रम्प यांना रोखायचे असल्यास दुरंगी लढत ठेवण्यातच शहाणपण आहे. हीच गोष्ट पुराणमतवादी नेते आणि मतदारांनी लक्षात घेत काल कान्सास आणि मेन या राज्यांमध्ये क्रुझ यांना विजयी केल. रिपब्लिकन पक्षात क्रुझ आणि ट्रम्प यांच्यात सरळ लढत होईल असे प्रतिनिधींचे आकडे सांगत आहेत. मात्र सर्व आघाड्यांवर पुढे असणारे ट्रम्प आणि हिलरी, आपापल्या पक्षाच्या इतर नेत्यांना धोबीपछाड करून एकमेकांत अंतिम लढत देतील ही शक्यता नाकारता येत नाही. वर्तमान जागतिक परिस्थितीचा अंदाज घेता हिलरींची भूमिका देखील वाजवी नाही.पण, ट्रम्प यांच्यापेक्षा किंचित उजवे म्हणून त्यांना अंतिमतः पसंती लाभू शकते. ट्रम्प आणि हिलरींच्या राजकीय जुगलबंदीचे अनेक प्रयोग येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला दिसतील. मात्र जागतिक प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हे एका संवेदनशील टप्प्यातून पुढे मार्गक्रमण करत असताना या प्रश्नांचा आवाका लक्षात घेत काम करू पाहणार, तितकच संवेदनशील नेतृत्व आत्ताच्या घडीला तरी अमेरिकेत नाही. त्यासाठी आज  किमान चार वर्षांची वाट तरी आपल्याला पाहावी लागेल.

                                                                                                                                               वज़ीर

हा लेख मंगळवार, दिनांक ०८ मार्च २०१६च्या 'सकाळ' मध्ये संपादकीय पानावर, 'दृष्टीकोन' सदरात (पान ६) छापण्यात आला.