Tuesday 27 August 2013

बाणा स्वदेशी, वाटचाल विदेशी !!

२०१४ लोकसभेसाठी अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत आणि त्यासाठीच वातावरण तापवण्याचं काम आत्तापासूनच चालू झालं आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये शाब्दिक चकमकी झडायला केव्हाच सुरुवात झाली आहे. रोज बाहेर येणारे नवे आर्थिक घोटाळे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे यूपीए सरकारची पळता भुई थोडी झाली आहे. रोज उठून बेजाजाबदार वक्तव्य करणारे प्रवक्ते आणि नेत्यांमुळे थेट युवराजांच्या नाकी नऊ आले आहेत.  एकीकडे काँग्रेसप्रणीत यूपीएची ही अवस्था आहे तर दुसरीकडे भाजपप्रणीत एनडीएची अवस्था काही प्रमाणात सारखीच आहे. मोदींना भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख केल्यानंतर नितीशकुमारांनी भाजपपासून सोडचिठ्ठी घेतली आणि एकच खळबळ माजली. राजकीय जाणकार असे सांगतात की मोदींना त्यांच्या पक्षांतर्गत जितका विरोध आहे तितका विरोध त्यांना पक्षाबाहेरूनसुद्धा नाहीये. हिच   गोष्ट मोदींनासुद्धा चांगलीच ठाऊक आहे आणि म्हणूनच इतके दिवस किंबहुना इतके वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री असणाऱ्या नरेंद्र दामोदरदास मोदींनी राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर आपली वेगळीच खेळी सुरु केली आहे. 

मोदींची पंतप्रधानपदाची आकांक्षा आधीसुद्धा लपून राहिली नव्हती आणि आता तर त्यावर पडदा लावण्याचं काम मोदी अजिबातच करत नाहीयेत. भारताच्या राष्ट्रीय राजकारणाचा नूरच मोदींनी बदलून टाकला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेल्या पारंपारिक राजकारणाला मोदींनी छेद दिला आहे. आणि त्यांचा हाच होरा हेरून काँग्रेसची नेतेमंडळी त्यांना आपलं लक्ष्य करीत आहे.  पण मोदींनी हा डाव अत्यंत सावधपणे खेळला आहे यात वाद नाही. सभोवतीचं, पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचं राजकारण, चालून आलेली संधी, एकूण देशात असलेला काँग्रेसविरोधी वातावरण याचा पुरता अंदाज घेऊनच मोदी आपले फासे फेकत आहेत. 

भाजप, आणि त्याची नेतेमंडळी यांना कोणालाही टीकेचे धनी न करता काँग्रेसचे नेते फक्त मोदींवर टीका करत आहेत. मोदीसुद्धा चाणाक्षपणे या टीकेला उत्तर देण्याबरोबरच त्यामध्ये तेल ओतण्याचं काम करत आहेत. त्यामुळेच उच्चविद्याभूषित, आणि भारताचे परराष्ट्र मंत्री असलेले सलमान खुर्शिद यांच्यासारखे नेतेसुद्धा मोदींवर 'खलनायक', 'बेडूक' अश्या शेलक्या शब्दांमध्ये टीका करत आहेत. दोन बड्या आणि प्रतिभावंत नेत्यांमध्ये होणाऱ्या अश्या वादामुळे थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची आठवण येते. तिकडेसुद्धा शब्दांचं काहीच भान न ठेवता एकमेकांवर कडवट टीका केली जाते. मोदी यांनी अमेरिकेतली हीच पद्धत इकडे चालवण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. असा वाद होत असताना आपण प्रकाशझोतात राहू याची पुरेपूर काळजी मोदी घेत आहेत. त्याच बरोबरीने फक्त आपल्यावर टीका ओढवून घेऊन बेमालूमपणे मोदी भाजपमधला त्यांना असलेला अंतर्गत विरोध चेपत आहेतच त्याचबरोबर भाजपमध्ये फक्त आपणच पंतप्रधानपदाचे दावेदार आहोत ही गोष्ट खुबीने जनमानसात ठासवत आहेत. एका दगडात हे दोन पक्षी मारून, पंतप्रधानपदाच्या दावेदारीची माळ आपसूक आपल्या गळ्यात पाडून पहिली आणि महत्वाची पायरी काबीज करून, मोदींनी आपल्या 'वेगळ्या' राजकारणाची आणि मुत्सद्देगिरीची झलक दिली आहे.

इथे एक गोष्ट अजिबात विसरून चालणार नाही, ती म्हणजे सद्द:स्थितीला भारताच्या राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर सर्व प्रकारच्या प्रसार -माध्यमांना आपल्याला हवं तेव्हा आपल्या बाजूने वळवणारे आणि वेळ पडेल तेव्हा आपल्या फायद्यासाठी त्यांचा वापर करण्यात मोदींचा हात कोणीच धरू शकत नाहीत. मुरब्बी राजकारण्याकडे लागणारी बारीक नजर आणि अचूक 'मिडिया सेन्स' मोदींमध्ये ठासून भरला आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीशी अजून एक साम्य असणारी गोष्ट मोदींनी याच वर्षी पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यावर केली. निवडणूक जिंकल्यावर लगेच त्यांनी एक सभा घेऊन जनतेला मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी हिंदीतून केलेलं भाषण सूचक होतं. गेल्याच वर्षी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यावर बराक ओबामांनी 'अमेरिकेसाठी अजून सगळ्यात चांगल्या गोष्टी घडायच्या आहेत' अशी टिप्पणी केली होती. तीच गोष्ट निवडून आल्यानंतरच्या सभेत मोदींनी सांगितली आणि पाश्च्यात राजकारणाचा सूर आवळला होता.  

खेळाची सुरुवात व्यवस्थित ठिकाणी केल्यावर मोदींनी पुढचं पाऊल उचललं. हैदराबाद येथे झालेलं भाषण आणि त्यातले बारकावे पाहता मोदी आपल्या विरोधकांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा अत्यंत विचारपूर्वक मांडलेला डाव आहे. हीच गोष्ट अजून काही महिने मोदी सगळ्यांसमोर मांडणार आणि विरोधकांना जवळ करण्याचा निकारीचा प्रयत्न करून आपली अंतिम घोडदौड चालू करणार. या खेळाचं सूत्र थेट जॉर्ज. डब्लू. बुश यांच्या 'आलात तर तुमच्याबरोबर नाही तर तुमच्याशिवाय' कार्यपद्धतीशी जुळणारं आहे. त्याचबरोबर मोदी ज्या तरुण वर्गाचे दाखले देत आहेत आणि ज्यांच्यावर आपल्या देशाची, देशाच्या विकासाची आणि प्रगतीची मदार आहे असे सांगत आहेत त्याच युवकांची आणि तरुण वर्गाची स्तुती ओबामांनी केली होती आणि 'येस वुई कॅन'चा मंत्र दिला होता. तीच घोषणा, तोच मंत्र परवाच्या हैदराबादच्या सभेत मोदींनी दिला आणि आपली अंतरराष्ट्रिय राजकारणाची मांड पण पक्की असल्याचं दाखवून दिलं.

आणि १५ ऑगस्ट रोजी मोदींनी तर कहर केला. देश दिल्लीच्या लाल किल्ल्याकडे डोळे लाऊन बसलेला असताना मोदी आपली चाल रचत होते. डॉ. मनमोहन सिंह यांचं भाषण संपताच मोदी भूजमध्ये झेंडावंदनासाठी गेले आणि त्यांनी स्वातंत्र्यदिनी थेट पंतप्रधानावर हल्ला चढवून एकच राळ उडवून दिली. भारताच्या इतिहासात ही गोष्ट प्रथमच घडत होती. पारंपारिक राजकारणाला पूर्णपणे छेद देत मोदी यांनी हा जाणीवपूर्वक डाव टाकला आणि अख्ख्या काँग्रेसलाच पेचात पाडलं. हे करतानाच त्यांनी सुट्टीच्या दिवशी सगळा प्रकाशझोत आपल्याकडे खेचून, आणि सामान्य जनतेला या दोघांच्या भाषणाची तुलना करायला भाग पाडून त्यांचा मनोमन कौल मागितला.
मर्मस्थळावर झालेल्या या हल्ल्यामुळे काँग्रेसमध्ये एकच खळबळ माजली आणि अमेरिकी पद्धतीप्रमाणे एखादं मोक्याचं सभेचं ठिकाण पटकावून, संपूर्ण प्रकाशझोत आपल्याकडे खेचून, नेमक्या दिवशी आपली राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करणे हा कोणालाही अपेक्षित नसणारा आणि तितकाच जिव्हारी लागणारा फासा मोदींनी टाकला आणि त्यात ते यशस्वी झाले. बाकी सगळ्यांना बाजूला करून थेट पंतप्रधानांना आखाड्यात ओढून मोदींनी काँग्रेसच्या दुखऱ्या नसेवरचं बोट ठेवलं आणि भाजपकडून हे युद्ध लढताना आपणच सरसेनापती आहोत हे दाखवून दिलं ! अमेरिकी राजकारणात 'टायमिंग'ला जबरदस्त महत्व आहे आणि तीच गोष्ट मोदी इथे लागू करत आहेत
आपल्या समर्थकांना गमवायचं नाही आणि दिवसेंदिवस त्यात भर घालायची हे पथ्य मोदी पाळत आहेत. चकाचक स्वप्न दाखवत आणि सर्व विषयांना, पैलूंना स्पर्श करत सामान्य माणसाची नस आपल्या कवेत घेणाऱ्या अमेरिकी राजकारण्यांप्रमाणेच मोदी खेळत आहेत. 

आता इतर कोणालाच आपल्यामध्ये न घेत पंतप्रधानांबरोबर सुरु केलेलं हे युद्ध मोदी पूर्ण ताकद लावून लढणार हे नक्की. त्यांचे विचार आणि बाणा स्वदेशी असला तरी डावपेच अगदी पाश्च्यात राजकारणाला मिळते-जुळते आहेत.
त्यांना मनमोहन सिंह कसे उत्तर देतात हे बघणं आता मजेशीर ठरणार आहे. याची पुढची पायरी म्हणून मोदी पंतप्रधानांना अमेरिकेतल्या वादसभेसारखं किंवा ज्वलंत आणि महत्वाच्या विषयांवरच्या महाचर्चेचं जाहीर आव्हान देणार हे सुर्यप्रकाशाइतकचं स्पष्ट आणि स्वच्छ आहे. उत्तरोत्तर मोदींच्या छुप्या पत्त्यांना आणि चपखल डावपेचांना धार चढत जाणार यात वाद नाही. पण, थेट पंतप्रधानपदासाठी लागणाऱ्या राजकारणाचा, मुरब्बीपणाचा, बुद्धीचा आणि सचोटीचा जुगाड करणाऱ्या या प्रतिष्ठेच्या लढाईत बेरकी, निष्णात योद्धाच विजयी होणार, हे नक्की!!!

                                           
                                                                                                                                   वज़ीर