Sunday 11 November 2012

हज़ारों ख्वाहिशें ऐसी...



बराक ओबामा या व्यक्तिमत्वातच एक विलक्षण गूढ आहे. २००४ पर्येंत अमेरिकेच्या राष्ट्रीय पातळीवर फारसा माहित नसलेला नेता एकदम २००८ सालच्या राष्ट्रपतीपदासाठी आपली उमेदवारी जाहीर करतो काय आणि राष्ट्राध्यक्ष होतो काय. त्यांच्या आयुष्याचा जर संपूर्ण प्रवास पाहिला तर तो प्रवास थक्क करणारा आहे इतकच आपण बोलू शकतो. 







पण, २००८ ची निवडणूक जिंकून इतिहास घडवणाऱ्या ओबामांना २०१०च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये सपाटून मार खावा लागला. ओबामा काय करणार, कोणती धोरणं राबवणार याचा अंदाज कोणालाच नव्हता आणि ओबामांना अमेरिकेच्या ताकदीविषयी काही माहिती तरी आहे का अशी शंका बहुतेक लोक घेऊ लागले. आणि अगदी त्याच नंतर ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात जाऊन मारून ओबामांनी मोठा पराक्रम केला आणि त्यांच्या कार्यकाळातली सर्वात मोठी कामगिरी पूर्ण केली. तसं पाहिला गेलं तर अमेरिकेत राष्ट्रपती फक्त पहिली ३वर्ष काम करतो, कारण चौथं वर्ष हे निवडणूक आणि त्याच्या तयारीत जातं  पण आर्थिक मंदी आणि बेरोजगारी यांनी जगातल्या सर्वात सामर्थ्यशाली माणसाला जेरीस आणलं आणि मिट रोम्नी नावाचं एक संकट ओबमांपुढे उभं राहिलं. राष्ट्रप्रेम जागृत करून, लोकांच्या भावनेला हात घालून भाषणे करणे नेहमीच सोपे असते आणि तेच रोम्नी यांनी केलं. त्यांची बेताल भाषा आणि त्यच्या जोडीला अफाट पैसा यामुळे त्यांचा गाडा पुढे रेटत गेला आणि बघता-बघता त्यांनी ओबामांना कडवं आव्हान दिलं. 




ओबामांनी त्यांची राष्ट्रपतीपदाची दुसरी आणि शेवटची निवडणूक जिंकली आणि पुन्हा एकदा इतिहास घडवला. मिट रोम्नींचा सपाटून पराभव करताना ओबामांनी ३३२ जागा आणि ओहायो, फ्लोरिडा यांचासारखी महत्वाची राज्येसुद्धा आपल्या खिशात घातली. ह्या निवडणुकीमध्ये रोम्नींना २०६ जागा जिंकता आल्या.

ओबामा यांनी कायमच इतिहास आपल्या बाजूने वळवला आहे. ओबामा हे इतिहासात अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून गणले जाणार आहेत. त्याच बरोबर राष्ट्रपतीपदाची निवडणूक पुन्हा जिंकणारे कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणूनसुद्धा त्यांनी इतिहास घडवला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत ज्यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदान न करता आधी मतदान केलं(early voting). बेरोजगारीचा दर हा ओबामांच्या कार्यकाळात सलग ४२ महिने ७.५% च्या वर राहिला, आणि १९३६ नंतर म्हणजेच राष्ट्राध्यक्ष फ्रान्क्लीन रोस्वेल्ट यांच्या नंतर ७.२% पेक्षा जास्त बेरोजगारीचा दर असताना पुन्हा निवडणूक जिंकलेले ओबामा हे पहिले राष्ट्राध्यक्ष. त्याचबरोबर ६ नोव्हेंबर ही तारीख, इतिहासात याआधी ६ वेळा निवडणुका या ६ नोव्हेंबरला झाल्या आणि सहाही वेळा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले पण सातव्या म्हणजेच या वेळी रिपब्लिकन पक्षाच्या मिट रोम्निना हरवून ओबामांनी इतिहासाला कलाटणी दिली.ही निवडणूक इतिहासात सर्वात खर्चिक निवडणूक म्हणूनसुद्धा गणली जाणार आहे. जवळपास ६ बिलियन डॉलरचा(सुमारे ३०००० कोटी रुपये) या निवडणुकीत चुराडा झाला. 'फोर मोअर इयर्स' हा त्यांचा ट्विटर मेसेज जवळपास ३२ लाख लोकांनी पुन्हा पाठवला.


इतिहास असं सांगतो की निवडणुकीच्या दरम्यान ऑक्टोबर महिन्यात अशी काही गोष्ट घडते किंवा घडवली जाते की ज्याने निवडणुकीचं गणितच बदलून जातं . ह्यालाच 'ऑक्टोबर सरप्राईज' म्हणून संबोधलं  जातं. या वेळी ऑक्टोबर महिन्याअखेर पर्येंत काहीच विशेष न घडलेल्या अमेरिकेत 'स्यांडी' वादळ आलं आणि निवडणुकीचा नूरच बदलून गेला. ओबामांनी आपला प्रचार सोडून 'फेमा' बरोबर काम केलं आणि वादळाचा तडाखा बसलेल्या ठिकाणी मदत केली. त्यांनी पटकन घेतलेल्या अचूक निर्णयांची नंतर स्तुती ख्रिस ख्रिस्ती, आणि कॉलिन पॉवेल या रिपब्लिकन पक्षाच्या बड्या नेत्यांनीसुद्धा केली. याचा ओबामा यांना फायदाच झाला. 

मतांची आकडेवारी पाहता ओबामांना कृष्णवर्णीय, स्पानिश, हिस्पानिक, एशियायी जनतेने भरभरून मतदान केलं आहे. त्याचबरोबर महिला, तरुण मतदार यांनी आपली मतं ओबामांच्या पारड्यात टाकली. त्यांना मतदान करणारा मोठा वर्ग हा मध्यम-वर्ग आहे. रोम्निना रिपब्लिकन पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या वर्गाने मतदान केलं त्याच बरोबर ओबामा यांचा तिरस्कार करणारा एक कट्टर वर्ग आहे, त्यांनी आणि उच्चभ्रू लोकांनी रोम्नींना मतदान केलं आहे. ओबामा, ओहायो हे एक महत्वाचं राज्य जिंकू शकले कारण त्यांनी अमेरिकी गाड्या उत्पादन करणारे कारखाने वाचवले. अशा कारखान्यांमध्ये काम करणारे लोक ओहायो राज्यात जास्त आहेत. ह्याच निवडणुकीत ओबामांनी रोम्नी यांनी त्यांच्या जन्मभूमीत म्हणजेच मिशिगन आणि कर्मभूमीत 'Massachusetts' मध्ये धूळ चारली.

बिकट वेळीसुद्धा ओबामा निवडून आले या गोष्टीला बरेच पैलू आहेत. एक त्यांचाकडे निवडणुकीचं काम हाताळणारी चोख यंत्रणा आहे. अमेरिकी निवडणुकीत घरो-घरी प्रचारावर कमी भर आहे, सोशल मिडियाचा प्रचारात वापर करून घेण्यात ओबामा अग्रेसर आहेत असं राजकीय विश्लेषक म्हणतात. त्याच बरोबर त्यांचे विचार साधे आणि सोपे आहेत. त्यांचा कारभार पारदर्शी आहे. गेल्या ४ वर्षात त्यांनी एकसुद्धा बेताल वक्तव्य केलं नाही.  कुठल्याही आणि कसल्याही प्रकरणात त्यांचं नाव नाहीये. जागतिक आर्थिक महासत्ता आणि जगातलं सर्वात सामर्थ्यशाली लष्कर असताना त्याचा स्वामी युद्धाची खुमखुमी दाखवत नाही ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सामान्य जनतेशी आपली नाळ जोडून आहेत.

इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे बिल क्लिंटन यांनी ओबामांचा केलेला प्रचार. साधारण दीड महिन्याआधी, रिपब्लिकन पक्षाचे हल्ले थोपवत ओबामा आपला मार्ग चाचपडत असताना क्लिंटन हे ओबामांच्या मदतीसाठी धावले आणि ओबामा यांनी सरशी घेतली. वादळानंतरच्या मदतकार्यात ओबामा गुंतलेले असताना त्याची खिंड उप-राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांनी लढवली. पण, इतिहास असा सांगतो की क्लिंटन एखादी गोष्ट फायद्याशिवाय करत नाहीत. २००८ साली हिलरी क्लिंटन यांनासुद्धा डेमोक्राटिक पक्षाकडून निवडणूक लढवायची होती पण संधी ओबामांना मिळाली आणि क्लिंटन आणि ओबामा यांच्यामध्ये मोठा वाद झाला. पण आपल्या मंत्रीमंडळातलं सर्वात महत्वाचं खातं म्हणजेच पर-राष्ट्रीय धोरण खातं ओबामांनी हिलरी क्लिंटन यांना दिलं. बिल क्लिंटन यांनी ओबामांचा प्रचार केला यासाठी तीन महत्वाची कारण असू शकतात. एक, जर ओबामा निवडून आले तर २०१६ सालच्या निवडणुक हिलरी यांच्यासाठी सोपी असेल. दोन, ओबामांचा २००८ आणि २०१२ संपूर्ण प्रचार आणि त्यांच्या प्रचाराची यंत्रणा पाहता बर्याच लोकांना १९९२ सालच्या बिल क्लिंटन यांच्या प्रचाराची आठवण झाली. अगदी तसाच तरुण-वर्ग, महिला-वर्ग ओबामांच्या मागे उभा राहिला. क्लिंटन यांना आपलं हे गारुड कुठेही कमी होऊ द्यायचं नाहीये, खासकरून मोनिका लेविन्स्की प्रकरण त्यांना पुसून काढायचं, किंवा तिसरं म्हणजे त्यांना सक्रिय राजकारणाच्या चौकटीबाहेर राहून देशासाठी काहीतरी करून दाखवायचं.

भारताकडून मनमोहन सिंह आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ओबामांना अभिनंदनाचे फोन केले. त्याचा वेग पाहता त्यांना ओबामा आणि त्यांचा विजय आनंददायी आहे. रोम्नी यांनी आपला पराभव स्वीकारल्या-स्वीकारल्या भारताने ओबामांचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात ओबामा मनमोहन सिंह यांचा खूप आदर राखतात. एक ज्येष्ठ आणि अनुभवी सहकारी म्हणून ते डॉ.सिंह यांच्याकडे पाहतात. भारताच्या दृष्टीने ओबामा रोम्नी यांच्या पेक्षा कित्येक पटींनी विश्वासू आहेत. अर्थात अमेरिकेचं आंतरराष्ट्रीय राजकारण हे कायमच त्यांचच हित पाहत पुढे चालू आलं आहे. ओबामा आणि एकूणच अमेरिकेच्या दृष्टीने भारत एक बाजारपेठ आहे, इतकच. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान आपापसात सोडवून घेतील, अमेरिका त्यामध्ये पडणार नाही ही गोष्ट आधीच सांगून ओबामांनी सोयीस्करपणे या प्रश्नातून अंग काढून घेतलं आहे. 

ओबामांना आता आपली धोरणं राबवायची आहेत. त्यासाठी ते आता कंबर कसतील. २०१४ अखेर पर्येंत अमेरिकी सैन्य मागे येईल असं ओबामा सांगतात. लादेन जरी नसेल तरी दहशतवाद संपला नाहीये हे ओबामासुद्धा जाणून आहेत. सिरिया आणि त्याचे परिणाम ओबामा सावरतील असं भाकीत राजकीय पंडित  करत आहेत. अमेरिकेचा वचक कायम राखत, ओबामा इराण आणि इस्राईल यांचा प्रश्न युद्ध न करता सोडवू शकतील अशीसुद्धा अपेक्षा राजकीय विश्लेषक करत आहेत. कारण दहशतवादाचा उगम त्याच भागातून आहे. अमेरिकेला तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणार असा ओबामा सांगत आहेत. तसं काही प्रमाणात जरी झालं तरी मध्य-आशियाई राजकारण काही नवीन वळण घेईल का, हा प्रश्न महत्वाचा असेल. अमेरिकेतले शस्त्र परवाने, अंमली पदार्थ, जागतिक तापमानवाढ, त्याचे परिणाम आणि त्यावरचे उपाय यांवरची ओबामांची भूमिका खूप काही ठरवून जाईल. 'व्हाईट हाउस' मध्ये ओबामांच स्वागत अजून खालावलेली अर्थव्यवस्था करेल. सगळ्यात जास्त काम त्यांना ह्याच विषयावर करायचय, त्याच बरोबरीने चीनला पायबंद कसा घातला जाईल याचा विचार अमेरिकेचं भवितव्य ठरवेल. ओबामांकडून स्थलांतर, विसा आणि इतर गोष्टींबद्दल भरघोस कामगिरी अपेक्षित आहे. 'आउट-सोर्सिंग' बाबत ते काय भूमिका घेतात हा भारताच्या दृष्टीने चिंताजनक विषय आहे. भारत, अमेरिका आणि इराण वादापासून स्वतःला दूर ठेऊ इच्छितो कारण भारताचं तेल जास्त प्रमाणात इराणमधूनच येतं. त्यामुळेच नवी दिल्लीला हा वाद सामोपचाराने सोडवला जावा असच वाटत असणार. ओबामांचा विरोधी पक्ष म्हणजेच रिपब्लिकन पक्ष सध्यातरी फक्त जुन्या, बहुतेक गोर्या आणि श्रीमंत लोकांचा पक्ष इतकीच ओळख ठेऊन आहे. त्यांना आत्मचिंतनाची खूप गरज आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये त्यांची पार हवा निघून गेलीये.

थोडक्यात काय ओबामांसमोरचं ताट आव्हानांनी पूर्णपणे भरलं आहे. तरीसुद्धा २०१४च्या मध्यावधी निवडणुकीपर्येंत त्यांना फारसं काही करता येण्यासारखं नाहीये. त्यांनी आपली कामाची शैली नक्कीच बदलली आहे. अगदी कालच त्यांनी अर्थव्यवस्था आणि श्रीमंतांची करप्रणाली या गोष्टींना उद्देशून केलेलं वक्तव्य त्यांच्या पुढील कामगिरीची झलक देऊन गेलं आहे. आता कुठचही दडपण नसेलेले ओबामा कसं काम करतात हे बघणं मजेशीर असणार आहे. त्यांचा इतिहास पाहता ओबामा हाती आलेली संधी गमावतात असं दिसून येतं. जे त्यांनी २००८ साली निवडून आल्यावर केलं , किंवा २०१२च्या पहिल्या वादसभेत त्यांचा ज्या पद्धतीने पराभव झाला त्यावरून हे अगदी स्पष्ट होतं. पण, जाणकार सांगतात की ओबामांमधला नेता आता खऱ्या अर्थाने बाहेर येईल व ते आता अधिक निर्भीडपणे काम करतील. पण, तोपर्येंत एम्पायर स्टेट बिल्डींग असंख्य निळ्या दिव्यांनी उजळून जाणार आहे.


सारासार विचार करता पुढे येणारा काळच काय ते सांगून जाईल, ओबामा २.० आणि त्यांची कामगिरी बघण्यास सगळे आतुर आहेत. आधीच आपल्या पहिल्या विजयानंतर भल्या-भल्यांना अवाक करणाऱ्या ओबामांनी आपल्या दुसऱ्या विजयानंतर आपल्या भोवतीचं गूढ अजूनच विलक्षण, अदभूत करून एकच राळ उडवून दिली आहे, हे नक्की. पण, तूर्तास तरी अमेरिकी जनता, ओबामांचे पाठीराखे आणि त्यांचे कट्टर मतदार  तुफान जल्लोष करत आहेत आणि त्यांच्या तोंडी एकच वाक्य आहे...'फोर मोअर इयर्स..!!!' 

                                                                                                                      वज़ीर

Sunday 30 September 2012

गणेशोत्सवाचं आणखी एक वर्ष...

गणेशोत्सवाचं आणखी एक वर्ष...

मुक्काम पोस्ट: कुठचही सार्वजनिक गणपती मित्र मंडळ, महारष्ट्र राज्य.
साल २०१२-१३ चा गणेशोत्सव.

गणेशोत्सव आता अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असतो... कारण गणपती प्रतिष्ठापनेला आता फक्त एक आठवडा बाकी असतो...मंडळात कार्यकर्त्यांची फौज कामाचा पाढा वाचून वाचून काम करत असते...बैठकांना आता अगदी जोर येत असतो...रात्रीचे कट्टे आता जरा जास्त वेळ गाजत असतात...आपण 'हे' करू 'ते' करू याच्या उजळण्या मग रात्र-रात्रभर चालतात...मंडळाचा आर्थिक गट मग गेल्या वर्षीचा हिशेब शोधण्यात आपले दिवस घालवत असतो...मग त्या हिशेबाची फेरतपासणी होते...चिठ्ठ्या-चपाठ्यांचा खच गोळा होतो...पावती-पुस्तक पुढून- मागून चाळली जातात...तपशील मांडला जातो...यंदाच्या खर्चाची ढोबळ रक्कम ठरवली जाते...त्यासाठी मग कोणाकडून किती वर्गणी घ्यायची याची चाचपणी होते...असं करत करत मंडळाचा गतवर्षीचा अहवाल छापला जातो...त्यात कार्यकर्त्यांची, वर्गणीधारांची नावे अनुक्रमाने छापली जातात...बाप्पाचे सुबक फोटोसुद्धा छापले जातात...आणि मग हीच फौज वर्गणी मागण्यासाठी रस्ते, जिने, उंबरे, दुकाने, आणि आपापल्या चपला झिजवते...काही कार्यकर्ते गणपती मूर्तीचं रंगकाम बघून येतात..अशा वेळी सुद्धा संपूर्ण अंगभर वेग-वेगळे रंग लागलेल्या रंगारी माणसाला काही बारकावे सांगितले जातात...तीच गोष्ट मंदिर रंगवणाऱ्याच्या बाबतीतसुद्धा घडते असते...एक-एक दिवस पुढे जात असतो...एव्हाना वर्गणी बर्यापैकी जमा झाली असते..कोणी किती वाढून दिली, कोणी किती रुपये कमी दिले याची मौखीख बातमी सगळे एकमेकांना देत असतात...पावती-पुस्तके संपत असतात...'कार्बन पेपर' अजून पाहिजे असतात...नवीन कार्यकर्ते ही सगळी पद्धत अचंबित चेहऱ्याने बघत असतात...एक दोन 'बोल बच्चन' मुकाटपणे वर्गणी मिळवून द्यायचं काम करत असतात...काही जण मग 'फ्लेक्स' तयारीसाठी धावतात...मंदिर आता चकाचक झालेलं असतं...रंगीत मांडव पडलेला असतो...एखादा राजा यावा व त्याचं स्वागत करावं तसं झुपकेदार झालरीचा मांडव मंडळाची शान वाढवत असतो...पोरं-टोरं मांडवाच्या खांबाभोवती गोल गोल फेर्या मारत असतात...त्यांची अखंड किल-किल चालूच असते...उन्हं उतरली की कार्यकर्ते ढोल-ताशे-झेंडे-टोल ऊरावर घेऊन एखादं मोकळं पटांगण घेऊन आपला 'आव्वाज' चालू करतात...गेला महिना-दोन-महिना हाच कार्यक्रम चालू असतो...ढोलाच्या चामड्यावर टिपरी पडून पडून मनगट सुजत असतं...बोटाची कातडी निघत असते...पण अंगातली रग आणि त्याला भरीस-भर वातावरण हा उत्साह टिकवून ठेवत असतो...काहींची वर्गणी अजून यायची असते...रात्री कट्ट्यावर मग त्याच्या आयला अमक्याच्या मायला केल्याशिवाय कार्यकर्त्यांचा पोट भरत नाही...स्थापनेचा आदला दिवस उजाडतो...मंडळात लगीनघाई चालू होते...उरली-सुरली कामे केली जातात...सगळी कामं संपूनसुद्धा आजची रात्र जागून काढावी लागणार हे एव्हाना पटलं असतं...मग रात्री आपापल्या घरी जेवण उरकून कार्यकर्ते जमतात...गणपतीचा गाडा सजवला जातो...ढोल सोडून, गोंद लावून पुन्हा आवळले जातात...मग एखादा बाप्या माणूस येऊन त्यांच्या 'टायमाला' काय काय मजा असायची हे उगाच सांगत असतो...त्याच्या हो-ला-हो करत कार्यकर्ते आपला काम सुमडीत उरकत असतात...मध्यरात्र तर केव्हाच उलटून गेली असते...मग कांदा चिरला जातो...इतका वेळ धुळीत माखलेले हात, तोंड भेळ खात असतात...हा ब्रेक झाला की मग 'फायनल टच' दिला जातो...टोल-गाडी रंगवली जाते...ताशाच्या पिना आवळल्या जातात...इतका वेळ गार वार्याची, झोपेची परवा न करणारे कार्यकर्ते आता थकलेले असतात...थंडी मी म्हणत असते..निद्रादेवी आपल्या पाशात एकेकाला ओढत असते...हा-हा म्हणता एक एक जण पडी टाकतो...पण शांत झोप येत नसते...मग गपचूप गाड्या काढून १०/१२ कार्यकर्ते एखादा चहाचा गाडा शोधतात...वन-बाय-टू कड्डक(मेंढी) चहा सांगितला जातो...सोबत क्रीमरोल, बिस्कीट असतातच...झोप तात्पुरती उडाली असते...आता पुन्हा घरी येऊन काही तासच झोपायचं असतं...मग घरचा गणपती बसवला जातो...मंडळात लग-बग अगदी शिगेला पोहचते...बाप्पा आणला जातो...तो गाड्यावर बसवला जातो...दिवा पेटवला जातो...धूप पेटवले जातात...ढोल-ताशावाले पांढर्या पारंपारिक वेषात जमलेले असतात...ढोल बांधले जातात...आणि ताशाची तार चालू होते...एक-एका ठोक्यागणिक एक-एक जण आपल्या घराबाहेर पडतो...मिरवणुकीला रंग चढलेला असतो...तिन्हीसांज झालेली असते...रात्री ९ च्या सुमारास मंडळाचा गणपती स्थानापन्न झालेला असतो...१० दिवसांच्या धुमशानाला अधिकृतपणे सुरुवात झालेली असते...एक एक दिवस कधी निघून जातो याचा कोणालाच थांग-पत्ता लागत नसतो...रोज आरती, विधिवत पूजा झाल्यावर कार्यक्रम घेतले जातात...लहान-मुलांचे खेळ घेतले जातात...अनंत-चतुर्दशीच्या आदल्या दिवशी सत्य-नारायणाची महापूजा घातली जाते...त्याच दिवशी बक्षीस समारंभ असतो...ते मिळाल्यावर लहानग्यांच्या चेहर्यावरचा आनंद काही वेगळाच असतो...म्हणता म्हणता विसर्जनाचा दिवस येतो...आदल्या रात्री पुन्हा तोच कार्यक्रम झालेला असतो...गाडा तयार असतो...भेळ खाऊन झाली असते...चहा प्यायलेला असतो...ढोल आवळले असतात...दुपार-सरल्यावर गर्दी जमा होते...पोरं-टोरं मांडवाच्या खांबाभोवती गोल गोल फेर्या मारतचं असतात...त्यांची अखंड किल-किल चालूच असते...आरती केली जाते...गणपती गाड्यावर ठेवला जातो...पुन्हा ताशाची तार चालू होते...टोलची ढण-ढण चालू झालेली असते...झेंडा उडवला जात असतो...कार्यकर्ते जीवाच्या आकांताने ढोल कुटत असतात...बेंबीच्या देठापासून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष चालू असतो...मिरवणूक साग्र-संगीतात पार पडत असते...फुलं उधळली जातात...नाचणारे जीव खाऊन नाचत असतात...बायकांनी फुगड्यांचा फेर धरलेला असतो...शांततेत चालू असलेल्या मिरवणुकीत ४/५ 'टाकेश' करायचा तो राडा करतातच...मिरवणूक आस्ते-कदम पुढे जात असते...आरती करून बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो...

पहाटे गणपती बघून कार्यकर्ते घरी परततात...मांडव रिकामा असतो...फुलं असताव्यस्त पडलेली असतात...उदबत्त्या, दिवे, समया विझल्या असतात...माळा बंद झाल्या असतात...कार्यकर्ते दमले असतात...पाय दुखत असतात...मन उदास असतं...बाप्पा गावी गेले असतात...आता बाप्पा मंदिरात एकटाच असतो...थोडा वेगळा वाटणारा शांत-शांतपणा त्यालापण सुखावणारा असतो...किल-किल नसते...रोज तीच-तीच गाणी ऐकून १० दिवस तोसुद्धा कंटाळला असतो...गोड गोड खाऊन त्याला सुद्धा आता नकोसं झालं असतं...उदबत्ती-धुपाचा धूर त्याच्या तर नाकात बसलेला असतो...अंगावर जाड-जुड हार नसतात...इतकाच काय जान्व्ह पण नसतं...दागिने पण नसतात...आता आपापल्या घरी कार्यकर्ते तोंडावर चादर घेऊन, आणि इतके दिवस अंगावर उपरणं असलेला बाप्पा तेच उपरणं तोंडावर घेऊन गर्दीपासून लांब, शांततेत पहुडलेले असतात...

गणेशोत्सवाचं आणखी एक वर्ष संपलेलं असतं...
                                                                                                          वज़ीर

Wednesday 26 September 2012

सावधान, सावधान वणवा पेट घेत आहे...


रणकंदन पेटलयं, निकारीच्या लढाईसाठी युद्धभूमी जणू सज्ज झालीये आणि दोन्ही बाजूचे योद्धे आपलं सगळं अवसान, आपला सगळा पैसा, आपली सगळी ताकद आणि आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावून, मातीत घट्ट पाय रोवून उभे आहेत. हे वर्णन आहे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या सध्य-परिस्थितीचं. गेल्या महिन्याच्या तुलनेत सगळ्याच बाबतीत वेग घेतलेल्या या निवडणुकीने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे, आणि नुसता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष नाही तर अख्ख्या जगाचा नेता आता निवडला जाणार या विचाराने सगळी आंतरराष्ट्रीय प्रसार-माध्यमं आता एकाच दिवसाची चातका प्रमाणे वाट बघत आहेत. तो दिवस आहे मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२.

रिपब्लिकन आणि डेमोक्राटिक पक्षांचा उमेदवार जाहीर करण्याचा कार्यक्रम पार पडला आणि उमेदवारांना आता अधिकृतपणे पैसे खर्च करण्याची संधी मिळाली. रिपब्लिकन पक्षाकडून मिट रोम्नी आणि पॉल रायन यांना अनुक्रमे राष्ट्रपती आणि उप-राष्ट्रपती पदास उमेदवारी जाहीर झाली आहे तर डेमोक्राटिक पक्षाकडून विद्यमान राष्ट्रपती बराक ओबामा आणि उप-राष्ट्रपती जो बिडेन यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. 

या उमेदवारी जाहीर(कन्वेन्शन) करण्याच्या कार्यक्रमात झालेल्या आगपाखाडीने उच्चांक गाठला. करोडो लोकांनी जगभरातून पाहिलेला हा कार्यक्रम निवडणुकीला कलाटणी देतो असं इतिहास सांगतो, यंदाचे हे कार्यक्रमसुद्धा यागोष्टीला अपवाद नाहीत. २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान फ्लोरिडा मध्ये झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमात ख्रिस ख्रिस्ती, कॉन्डोलीझा राईस, एन रोम्नी, मार्को रुबिओ, पॉल रायन, मिट रोम्नी या दिग्गजांची भाषणे झाली. सर्वांचा रोख ओबामांवर होता, असणारच होता. चकाचक झालेल्या या कार्यक्रमात रोम्नी आपणच अमेरिकेचे आणि अमेरिकी जनतेचे कसे तारणहार आहोत हे पटवून देत होते. रोम्नी यांचा पत्नी यांनी केलेलं 'राजकीय' भाषण उल्लेखनीय म्हणावं लागेल. पण टीका करणे आणि नवा मार्ग सुचवणे, किंवा नवीन दिशा दाखवणे यात फरक असतो आणि इथेच रोम्नी मागे पडले. आम्ही अमेरिकी जनतेसाठी चांगली आरोग्यव्यवस्था आणू, रोजगार निर्मिती करू, देशाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा नीट बसवू असे सांगणारे रायन-रोम्नी हे सगळं करणार म्हणजे नक्की काय करणार हे सांगत नव्हते. त्यामुळेच आधीच 'आयझॅक' वादळामुळे संकटात सापडलेल्या या कार्यक्रमच्या माध्यमातून रोम्नी काही खास, विशेष असा कुठचाही 'मेसेज' पाठवण्यात, लोकांच्या मनामध्ये ठासविण्यात कमी पडले. नेमकी हीच गोष्ट रिपब्लिकन पक्षातील अनेकांना पटली नाही आणि मग गटबाजीचं पुढे जे काय होते तेच झालं. रोम्नी यांच्या विरोधात त्यांचाच पक्षातल्या लोकांनी कुरबुर करायला सुरुवात केली आहे.

या उलट पैसे गोळा करण्यात मागे असलेल्या ओबामा आणि डेमोक्राटिक पक्षाचा कार्यक्रम योजनाबद्ध वाटला. जुलियन कॅस्ट्रो, मिशेल ओबामा, जिल बिडेन, जो बिडेन, बिल क्लिंटन, बराक ओबामा अशा वक्त्यांची भाषणे झाली. जुलियन कॅस्ट्रो भाषण करत असताना बर्याच लोकांना २००४ सालचे, आवेशपूर्ण भाषण करणारे ओबामा आठवले. कॅस्ट्रो यांनी अमेरिकी राजकारणात यापुढे भर-भक्कम मजल मारल्यास नवल वाटायला नको. त्यांच्याकडे  २०१६ किंवा २०२० चा डेमोक्राटिक पक्षाचा उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. मिशेल ओबामा याचं भाषण वास्तवाला धरून होतं असं म्हणावं लागेल, कारण त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांनी जनतेची नस अचूकपणे पकडली होती यात वाद नाही. त्यांनी नेहमीप्रमाणेच ओबामांची बाजू लावून धरली आणि आपण 'व्हाईट हाऊस' मध्ये जाऊनसुद्धा सामान्य जनतेशी कसे जुळलेले आहोत हे पटवून दिलं. जो बिडेन याचं भाषण नेहमीप्रमाणेच साजेसं म्हणावं लागेल. एक गोष्टीचा इथे उल्लेख करावासा वाटतो की रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमात उच्चभ्रू, उच्च-मध्यमवर्गीय लोकांचा जास्त सहभाग होतं आणि त्याउलट डेमोक्राटिक पक्षाच्या कार्यक्रमात सर्व-सामान्य मध्यमवर्गीय लोकांचा जास्त भरणा होता, आणि हेच, अगदी हेच गणित हेरून ओबामा अन त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचाराचा प्रकाशझोत 'मिडल क्लास' साठी वळवला आणि रोम्नी गटाला फक्त उच्चभ्रू वर्गाचे प्रतिनिधी असा शिक्का मारून त्यांची गोची केली. त्यामुळे आधीच 'अर्थव्यवस्था' याच मुद्द्यावर अडलेल्या निवडणुकीत ओबामा गटाने त्यातसुद्धा आपला चाणाक्षपणा दाखवून दिला. ओबामांच भाषणसुद्धा आवेशपूर्ण झालं. त्यांनी मतदारांना साद घालत आपली बाजू मांडली. या कार्यक्रमाचा परोमोच्च बिंदू असलेलं त्यांचं भाषण काय परिणाम करू शकेल याची पूर्ण जाणीव असलेल्या ओबामांनी आपल्या छोटे-खाणी भाषणामध्ये अचूकता साधण्याचा प्रयत्न केला.


बराक ओबामांनंतर या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या बिल क्लिंटन यांचं भाषण 'ए क्लास' म्हणावं लागेल. राजकीय विश्लेषक आणि पंडितांच्या निष्कर्षानुसार या दोन्ही  पक्षांच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या शेकडो भाषणांमध्ये बिल क्लिंटन यांचं भाषण सगळ्यात अप्रतिम झालं. ज्या काही भाषणांमुळे निवडणुकीस कलाटणी मिळू शकते अशा भाषणांमध्ये बिल क्लिंटन यांचं यावेळेसच भाषण सर्वात अव्वल स्थानी आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ओबामांचा जर विजय झाला तर 'हाच तो क्षण' या सदरात मोडेल असं भाषण क्लिंटन यांनी केलं. त्यांचं भाषण पाहणं म्हणजे उसेन बोल्टला पळताना पाहणं किंवा लिओनेल मेस्सीला फुटबॉल खेळताना पाहण्यासारखं आहे, आपल्याला माहित असतं की आपण इतिहास घडताना पाहतोय, त्यांनी जे केलं पाहिजे अगदी तेच त्यांनी केलं. क्लिंटन यांची भाषण-शैली, त्यांचं ओघवतं वक्तृत्व, त्यांची देहबोली, त्यांचा प्रसिद्ध 'क्लिंटन थंब', कडवट टीकेला सामोरे जाऊन सोप्या पण, सूचक शब्दांमध्ये विरोधकांना निरुत्तर करणे आणि हे करत असताना आपल्या 'पेटंट' स्मितहास्याने आपलं राजबिंड रूप खुलवणे या बाबतीत क्लिंटन अग्रेसर आहेत. फक्त अमेरिकी जनता नव्हे, तर संपूर्ण जगचं, क्लिंटन यांच्या रूपावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या गारुडावर किती आणि का फिदा आहे याचा प्रत्यय यावेळीसुद्धा आला.

याचा परिणाम काही दिवसांमध्येचं दिसला. सर्वेक्षणात ओबामांनी रोम्नी यांना मागे टाकून सरशी घेतली. ही सरशी ओहिओ, मिशिगन, व्हर्जिनिया, फ्लोरिडा, आयोवा, आणि कोलोराडो महत्वाच्या राज्यांमध्ये आहे, ज्यांनाच 'स्विंग स्टेट्स' म्हणून संबोधलं जातं. तसेच ओबामांनी ऑगस्ट मध्ये रोम्नी यांना मागे टाकून जास्त पैसा गोळा केला. 

निवडणुकीचं हे गणित थोडं ओबामांकडे झुकत असतानाच अल-कायदा पुरस्कृत कट्टर गटांनी ११ सप्टेंबरचा दिवस बरोब्बर साधून, 'इस्लाम-विरोधी' चित्रपटाचा निषेध म्हणून लिबिया मधल्या, बेंगाझी शहरातल्या अमेरिकी दुतावासावर हल्ला करून अमेरिकी राजदूत जे.ख्रिस्तोपर स्टीवन्स यांची हत्या केली आणि ओबामांवर टीकेची एकच आग ओकली गेली. त्यांनी लगेच दोन सुसज्ज युद्धनौका लिबियाच्या दिशेने पाठवून दिल्या, आणि तात्पुरती मलम-पट्टी केली. पण काय घटना घडली आहे हे कळायच्या आतच रोम्नी यांनी ओबामा प्रशासनावर कडवट टीका केली आणि राजकारण तापवायचा प्रयत्न केला, पण जस-जसा घटनेचा तपशील उलगडत गेला तसं रोम्नी यांनी आपणच केलेली वक्तव्य त्यांच्या अंगलट येऊ लागली. स्व-पक्षीय लोकच रोम्निना घरचा आहेर देऊ लागल्यावर ओबामा गटाचा जीव जरा भांड्यात पडला. पण अमेरिका-विरोध निषेधाचं लोण जवळपास सगळीकडेच पसरलं आणि इतके दिवस अर्थव्यवस्था-अर्थव्यवस्था च्या चिपळ्या घेतलेली निवडणूक एकदम राष्ट्रीय सुरक्षा, पर-राष्ट्रीय धोरण यांभोवती गुंफू लागली. ओबामांचा हा सर्वात शक्तिशाली मुद्दा, तर रोम्नी या विषयात अगदीच नवीन(अशी टीका खुद्द ओबमांनीच कन्वेन्शन मध्ये केली होती). त्यामुळे रोम्नी-रायन यांच्या पायाखालीची जमीनच जणू सरकली, आणि आपल्या प्रतिकूल परिस्तिथीमध्ये विरोधकांवर त्यांचाच डाव उलथवून लावून जनतेच्या नाड्या आपल्या हातात ठेवणे हे कवित्व ओबामांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.




पण वाटते तितकी निवडणूक अजूनसुद्धा सोपी नाही कारण, अस्थिरतेचे काळे ढग दाटले आहेत...निवडणूक बहु-आयामी, बहुरंगी, बहुढंगी होत आहे... येत्या ३ ऑक्टोबर रोजी रोम्नी-ओबामांमध्ये पहिली महाचर्चा(डिबेट) आहे...अश्या अजून दोन महाचर्चा ऑक्टोबर महिन्यात आहेत...या महाचर्चेमध्ये दोघांच्या सचोटीचा, प्रामाणिकपणाचा, आणि बुद्धीचा कस लागेल यात वाद नाही...ह्याच महाचर्चा निर्णायक ठरतात असं इतिहास सांगतो...रोम्नी गटाचा, ओबामा गटाचा, सर्व प्रसार-मध्यमं, सरतेशेवटी सर्व अमेरिकी जनतेचा आणि जगाचा ऊर भरून आलाय... कारण अमेरिकेच्या इतिहासाचं ताजं-ताजं पान आता लिहिलं जातंय...वणवा पेट घेतोय...आता फक्त त्या दोघांचा सावधपणाच  त्यांचं भवितव्य ठरवू शकतो...आणि म्हणूनच त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत असेल...सावधान...गड्यांनो...रात्र वैऱ्याची आहे...

ह्या लेखाचा सारांश दिनांक ४ ऑक्टोबर, २०१२ च्या 'सकाळ' च्या संपादकीय पानावर (पान ४) छापण्यात आला.
http://goo.gl/SH9Csi

                                                                                                                  - वज़ीर

Tuesday 4 September 2012

अस्तित्वाच्या लढाईची निर्णायक सुरुवात...

  

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता उणे-पुरे फक्त ७७ दिवस राहिले आहेत. दर चार वर्षांनी येणारी ही निवडणूक, प्रत्येकवेळी आपले वेगळेपण सिद्ध करते. यंदाची निवडणूकसुद्धा याला अपवाद नाही. गेल्या महिन्या - दोन महिन्यात इतक्या वेगवान घडामोडी घडताना बघून, कुरुक्षेत्रावरचं युद्ध यापेक्षा काही वेगळं असेल असा विचारसुद्धा करवत नाही. ऑलिम्पिक संपताच इतके दिवस काहीश्या पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टींना माध्यमांनी एकदम उचलून धरलंय. अमेरिकेच्या इतिहासातल्या सगळ्यात निर्णायक लढाईच्या उंबरठ्यावर अख्खं जग जणू आ-वासून उभं राहिलं आहे.

मिट रोम्नी आणि बराक ओबामा यांच्यातली ही लढाई पहिल्या दिवसापासूनच जिकिरीची लढाई म्हणून पाहिली जात आहे. एका बाजूला अफाट लोकप्रिय, फर्डा वक्ता, निःसंशय हजरजबाबी, जबरदस्त महत्वाकांक्षी, आणि अचाट बुद्धीमान बराक ओबामा तर दुसरीकडे ६४-वर्षीय, फूट इंच उंच, चौकोनी जबडा आणि काहीसे दगडी रंगाचे केस असलेले, श्रीमंत, 'व्हाईट कॉलर', अजब,  आणि बेरकी मिट रोम्नी.

अमेरिकेने २००८ च्या निवडणुकीनंतर बरेच बदल पाहिले आहेत, अनुभवले आहेत, त्यातले काही चांगले, काही वाईट, काही अपेक्षा पूर्ण करणारे तर काही अपेक्षाभंग करणारे. खालावत जाणारी अर्थव्यवस्था आणि अमेरिकी लोकांचं राहणीमान, त्याचबरोबर रोजगारनिर्मितीला मिळालेला फाटा यामुळे ओबामांच्या प्रसिद्धीचा आलेख झपाझप खालावू लागला आहे, आणि आता तर ओबामा आणि रोम्नी यांच्या निवडीबद्दलच्या सर्वेक्षणात ओबामा उणे-पुरे १०-१२% ने पुढे आहेत असे दिसत आहे. हे आकडे नुसते गंभीरच नसून राष्ट्रहित आणि त्याजोगे येणाऱ्या संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी मारक आहेत. कारण ओबामांचा जर पराभव झाला तर रोम्नी यांना आपली धोरण राबवायला आणखी वेळ लागणार आणि आधीच जागतिक अर्थव्यवस्थेला गिळंकृत करण्यासाठी सज्ज असलेला अजगर आपली पकड त्यावेळात आणखी घट्ट करणार यात वाद नाही. निवडणुकीच्या या घडीला म्हणूनच अर्थव्यवस्था आणि रोजगारनिर्मिती या मुद्द्यांना अनन्य-साधारण महत्वं प्राप्त झालं आहे.

गेल्या काही दिवसांच्या घटना पाहता ही लढाई पुढील काळात रान पेटवून देईल यात शंका नाही. या निवडणुकीमध्ये पैसा बोलतो आणि त्यासाठी म्हणूनच मतदार, समर्थक आणि पाठीराखे यांच्याकडून मिळणारे पैसे यांना खूप जास्त महत्वं असतं. गेल्या खेपेला ओबामांनी जवळपास ६७० मिलीयन डॉलर आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर आणि मातब्बर 'सेलीब्रिटी' यांच्या जीवावर गोळा केले होते, आणि त्यांनी त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी जॉन मेकेन यांना सपशेल धूळ चारली होती. पण तशी परिस्थिती यंदा दिसत नाहीये. मार्च-एप्रिल २०१२ पर्येंत पैशांच्या बाबतीत आघाडीवर असणारे ओबामा पुढे जाऊन मे, जून जुलै या तिन्ही महिन्यांमध्ये पिछाडीवर पडले. रोम्नी यांनी आपल्यातला आर्थिक विश्लेषेक जागा करून, खुबीने पैसे गोळा केले आहेत. एक गोष्ट इथे लक्षात घेण्याजोगी आहे की, अमेरिकेचं बहुतेक राजकारण दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एक तेल-निगडीत 'लॉबी' आणि दोन अफाट पैसा. रोम्नी हे गेल्या तिन्ही महिन्यांमध्ये ओबामांपेक्षा जवळपास ३० मिलियन डॉलर जास्त गोळा करत आहेत. रोम्नी आणि ओबामा यांची 'फंड' गोळा करण्याची पद्धत एकच आहे, ते दोघेही सामान्य आणि वैयक्तिक मतदारांवर लक्ष केंद्रित आहेत, फरक फक्त इतकाच आहे की रोम्नी असे छोटे-छोटे मतदार शोधत आहेत ज्यांचे खिसे 'मोठे' आणि 'खोल' आहेत. असे मतदार यावेळी ओबामांच्या गळाला कमी लागत आहेत. त्याचबरोबर रोम्नी यांचा वावर अमेरिकेतल्या उच्चपदस्थ आणि उच्चवर्गीय(तेल-निगडीत लॉबी) लोकांच्यात असतो, त्यांचे आणि अर्थकारण हा पेशा असलेल्या लोकांची उठ-बससुद्धा नेहमीची आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओबामा-बिडेन या जोडीला लक्ष्य करून रोम्नी आपला मार्ग सुकर करत आहेत. त्यामुळेच ज्या अमेरिकेत जर निवडणूक लढवायची असेल तर भरपूर पैसे लागतात, आणि पै-पै चा हिशेब द्यावा लागतो, या बाबतीत रोम्नी आरामात पुढे जात आहेत. तसेच गेले ४२ महिने बेरोजगारीचा दर हा % पेक्षा जास्तच राहिला आहे, आणि इतिहास असे सांगतो की साल १९७० पासून विद्यमान राष्ट्रपतींच्या काळात हा दर % पेक्षा जास्त राहिला तर तो राष्ट्रपती पराभूत होतो त्यामुळेच जर हा दर येत्या दोन महिन्यांमध्ये खालीच नाही गेला आणि जर पैसेच नाही जमले तर ओबामांचा टिकाव लागणे अ-व-घ-ड आहे.

ओबामांना आता जर आपली खुर्ची वाचवायची असेल तर त्यांना काहीही करून निवडणुकीचा प्रकाशझोत आर्थिक प्रश्नांवरून पर-राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय सुरक्षा, स्थलांतर आणि यासारख्या इतर प्रश्नांवर हलवावाच लागेल, पण रोम्नी ते करू देतील असे वाटत नाही. कारण या गोष्टींबाबत बोटचेपं धोरण असलेले रोम्नी तोंडात मिठाची गुळणी धरून आहेत. रोम्नी यांची रिपब्लिकन पक्षाकडून अधिकृत घोषणा झाल्यावर होणार्या तीन महाचर्चांमध्ये ओबामांना रोम्नींना इतर विषयांवर खिंडीत पकडायचा वाव आहे. तसेच रोम्नी यांनी पॉल रायन यांना रिपब्लिकन पक्षाकडून उप-राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून पसंती दिली आहे, तशी घोषणाही केली आहे. त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाचे समर्थक इतक्या दिवसांची मरगळ झटकून एकदम कामाला लागले आहेत, पण हीच गोष्ट २००८ साली सुद्धा झाली होती ज्यावेळी रिपब्लिकन पक्षाकडून साराह पालीन(Sarah Palin) यांच्या नावाची घोषणा उप-राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून केली गेली होती, त्यांच्या उमेदवारीमुळे तयार झालेली हवा काही दिवसातच हवेतच विरली आणि त्यांचा पराभव झाला! तीच गोष्ट यावेळी व्हावी असे ओबामा गटाला नक्की वाटत असणार. पण ज्या युवापिढीने ओबामांना व्हाईट हाउस मध्ये २००८ साली पाठवलं, तीच युवाशक्ती ४२ वर्षीय पॉल रायन यांच्या मागे उभी राहणार का, किंवा परत ओबामांना पाठींबा देणार का ? तसेच ओबामा यांच्याकडे त्यांचे समर्थन करणारा पण मतदान करणारा एक मोठा आणि शांत वर्ग आहे, ह्या वर्गाला ओबामा मतदानास उतरवून ह्या 'अंडरवॉटर करंट' चा तडाखा रोम्नींना देणार का ? याचं उत्तर पुढे येणारा काळच देईल.

ही निवडणूक इतकी जिकिरीची झाली आहे की आता ओबामा आणि रोम्नी यांनी त्यांची एक साधी चूक सुद्धा त्यांना खूप काही भोगायला लावू शकते. अर्थव्यवस्थेच्या या भूताने तर ओबामांची झोप उडवली आहे. पण तरीसुद्धा ह्या सगळ्या अंधकारमय परिस्थितीत ते आपली चोख यंत्रणा आटोकाटपणे राबवत आहेत.

राष्टाध्यक्ष निवडणुकींचा एकूण तपशील पाहता ही लढत सर्वात खर्चिक, प्रतिष्ठेची, अस्तित्वाची, संयमाची, मुरब्बीपणाची आणि सचोटीची लढत म्हणून गणली जात आहे. अगदी सुरुवातीपासूनच देशाचे विषय घेऊन निवडणूक लढवू, जहालपणा असलेल्या जाहिराती करणार नाही, वैयक्तिक चिखलफेक करणार नाही, अश्या आणा-भाका घेतलेले रोम्नी आणि ओबामा यांना या गोष्टींचा सोयीस्करपणे विसर पडला आणि गेल्या महिन्यात या जहाल जाहिरातींनी, वैयक्तिक मुद्द्यांनी आणि राष्ट्रहित नसलेल्या परस्पर विरोधी चिखलफेकीने कळस गाठला. इथून पुढचा काळ त्यापेक्षा जास्त शेरेबाजीचा, आणि कडवटपणाचा असेल यात संशय नाही. पण त्याचमुळे ही निवडणूक सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्यात कडवट, भंपक शेरेबाजीची, आणि तुफान वैयक्तिक चिखलफेकीची निवडणूक म्हणून सुद्धा गणली जात आहे.


या सगळ्याचा कानोसा घेतल्यानंतर एक गोष्ट विसरायला नको की रिपब्लिकन  पक्ष आपला उमेदवार जाहीर करण्याचा कार्यक्रम येत्या २७-३० ऑगस्टला फ्लोरिडामध्ये घेणार आहे, तर डेमोक्राटिक  पक्ष आपला उमेदवार जाहीर करण्याचा कार्यक्रम - सप्टेंबरला नॉर्थ कॅरोलायनामध्ये घेणार आहे




हा डोळे दिपवून टाकणारा कार्यक्रम पार पडताच निवडणूक अंतिम टप्प्याच्या दिशेने आणखी एक पाऊल घेईल आणि प्रचाराचा आणि संयमाचा एकच धुराळा हवेत उडेल.पण ही निवडणुकीची राळ उडवून दिल्यानंतर त्या सगळ्यात महत्वाच्या खुर्चीला कोण वेसण घालेलहाच प्रश्न महत्वाचा आहे.

म्हणूनच, मिट रोम्नी किंवा बराक ओबामा हे आता काय बोलतात आणि काय करतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.रोम्नी ओबामांना पराभूत करून नवा इतिहास रचणार की ओबामा रोम्नींचा फडशा पाडणार हे बघणं आता औत्सुख्याचं ठरणार आहे. उत्तरोत्तर ही स्पर्धा अधिक मजेशीर, अटीतटीची, उत्साहवर्धक, आणि रोमांचक होणार यात वाद नाही. पण, एकविसाव्या शतकातली ही यावेळ्ची सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक  आपल्या अनेक छटा आणि अनेक कंगोरे दाखवत तुल्यबळ होणार, हे नक्की !!!


                                                               - वज़ीर