Sunday, 5 November 2017

'आयसिस'चा अर्धविराम!

       'आयसिस'ची स्वयंघोषित राजधानी असलेल सीरियातील रक्का शहर 'आयसिस'च्या ताब्यातून काढून घेण्यात सीरियन फौजांना यश आले आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ 'आयसिस'चा बालेकिल्ला राहिलेल्या या शहराने परवा मोकळा श्वास घेतला. 'इस्लामी खिलाफत'च्या संकल्पनेला भुलून जगभरातून जे माथेफिरू तरुण-तरुणी 'आयसिस'च्या वाटेने सीरियात दाखल झाले त्या सर्वांचा अड्डा रक्का शहर होत. या दहशतवादी गटाची आर्थिक आणि व्यावहारिक यंत्रणा रक्कामधून चालवली गेल्याचे बोलले जाते. जगात इतरत्र 'आयसिस'ने जे हल्ले केले त्या सर्वांची योजना आणि त्यासंबंधीची निर्णयप्रक्रिया रक्कामध्ये पार पडल्याचे आता निदर्शनास येत आहे. रक्कातील लाखो सामान्य नागरिकांना वेठीस धरून त्यांना कैद्याची वागणूक दिली जात होती. याच नागरिकांच्या आडून या गटाने लढाईच्या शेवटच्या टप्प्यात तग धरला. मात्र, ही लढाई जास्त चिघळत ठेवण्यात अर्थ नाही हे लक्षात येताच सीरियन फौजांनी अमेरिकी वायू हल्ल्यांच्या मदतीने जवळपास संपूर्ण शहर जमीनदोस्त केले आहे. इराकमधील मोसुल शहरसुद्धा 'आयसिस'च्या ताब्यातून परत घेताना हजारो निष्पाप नागरिकांची कत्तल उडाली होती. त्यापेक्षाही मोठा संहार रक्कामध्ये झाला आहे. रक्कामध्ये मारल्या गेलेल्या 'आयसिस'च्या दहशतवाद्यांचा आणि नागरिकांचा अधिकृत आकडा समजू शकला नाहीये. तो काही हजारांवर असण्याची शक्यता आहे. इथला विस्थापितांचा आकडा लाखांवर आहे.

२०११साली सीरियात अध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात निदर्शन सुरु झाली. सीरियातील अलेप्पो शहराच्या पूर्वेला असलेल्या रक्कामध्ये शिया, सुन्नी, अरब, ख्रिस्ती लोकांची वस्ती होती. रक्का शहरात सुरु झालेल्या निदर्शनांमध्ये सीरियातील इतर प्रांतांमधून आलेले असद विरोधक एकवटले आणि त्यांनी असद यांच्या नावाने शिमगा सुरु केला. या विखारी भावनेचा फायदा घेत 'आयसिस'ने रक्कामध्ये आपले पाय रोवले. २०१३मध्ये रक्का 'आयसिस'च्या ताब्यात आले. या गटाच्या विळख्यात येणारे हे पहिले मोठे शहर आहे. इसवी सन ७८६पासूनचा इतिहास रक्का शहरासोबत जडला आहे. याच रक्कामध्ये 'आयसिस'चा आता पार फन्ना उडाला आहे. हा विजय या गटाचे मनोधैर्य कमी करणारा आणि एक सांकेतिक विजय मानला जातो आहे. गेल्या तीन महिन्यांच्या काळात मोसूल आणि रक्का ही दोन मोठी शहर आणि आत्तापार्येंत सुमारे ८७% प्रदेश 'आयसिस'च्या ताब्यातून काढल्यामुळे या गटाचे कंबरडे मोडल्याचे सध्यातरी दिसत आहे. पश्चिम आशियातील भौगोलिक प्रदेशाचा विचार केल्यास आता सीरिया-इराक सीमेवरील एक छोटा प्रांत 'आयसिस'च्या ताब्यात आहे. एकेकाळी रोमवर राज्य करण्याची वल्गना करणाऱ्या आणि क्रूर, निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या या गटाची रक्कामध्ये दैना उडाली आहे. सुमारे ३०० 'आयसिस' हत्यारबंद समर्थकांनी रक्कामध्ये सपशेल शरणागती पत्करून त्यांची दयनीय स्थिती दर्शवली आहे.

 पश्चिम आशियातील प्रश्न असे सुटल्यानंतर नवे प्रश्न उभे राहत आहेत. कुर्द आणि अरब फौजांनी या लढाईत एकत्रितपणे 'आयसिस'चा सामना केला. आता मात्र रक्काच्या मालिकीवरून भिन्न विचारसरणी असलेल्या या गटांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. कुर्द लोकांची स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी आता लपून राहिली नाही. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इराकमधील कुर्द लोकांनी सार्वमतासाठी मतदान केले. इराकमधील कुर्द लोकांनी प्रदेश गिळायला सुरुवात केल्यास, बाजूलाच असेलल्या इराण, सीरिया आणि तुर्कस्थानातील कुर्द लोक आपापली वेगळी चूल मांडायची तयारी करतील अशी भीती या देशांना आहे. त्यामुळे या पट्ट्यातील स्थानिक प्रश्नांवर विविध भूमिका घेणारे इराक, इराण, सीरिया आणि तुर्कस्तान कुर्दांना दाबण्याच्या मनसुब्याने एकत्र आले. त्यांनी इराकी कुर्दिस्तानचे सार्वमत बेकायदेशीर ठरवत कुर्द लोकांच्या ताब्यातील प्रदेश इराक सरकारने आपल्याकडे जमा केला. 'आयसिस'च्या विरोधात लढणारा सर्वात प्रभावी घटक असणारे कुर्द लोक अमेरिकेच्या मध्यस्थीची वाट बघत बसले. वॉशिंग्टनने दोन्ही बाजूंना हा विषय सामोपचाराने मिटवण्याचा सल्ला दिला आहे. पश्चिम आशियात अमेरिकेने रसद पुरवलेले दोन गट एकमेकांसमोर उभे राहिल्याची ही पहिली वेळ नाही. शेवटची पण म्हणता येणार नाही. अमेरिकेच्या विश्वासावर असलेल्या कुर्द लोकांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. या पट्ट्यातील अमेरिकेसंबंधी असलेला अविश्वास आणखी वाढला आहे. इराकी कुर्द लोकांना पळवून लावताना इराकी सरकारला त्रास झाला नाही. यातून प्रभावित होत आता सीरियातील असद सरकार कुर्दांच्या मागण्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मोठ्या कष्टाने असद यांनी आपली सत्ता राखली आहे. वडिलोपार्जित आलेल्या सत्तेचा वाटा ते कोणासोबत वाटून घ्यायला अजिबात तयार नाहीत. सात वर्षांच्या सीरियातील यादवीत बरीच पांगापांग झाली आहे. त्यात अजून नव्या विभागणीची ब्याद नको हेच असद यांचे आत्ताचे ठाम धोरण आहे. सीरियातील कुर्द लोक जास्त जोर लावत आहे असे वाटताच, असद कुर्दांना चेपायला मागे-पुढे पाहणार नाहीत असे स्पष्टपणे दिसते.

रक्का शहर ताब्यातून गेल्यामुळे 'इस्लामी खिलाफत' या 'आयसिस'च्या संकल्पनेला मोठा तडा गेला आहे. धर्माचा आधार घेत उभी केलेली ही संकल्पना किती फोल होती याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. तूर्तास संपुष्टात आलेली 'खिलाफत' म्हणजे अभूतपूर्व यश असून 'आयसिस'चे अस्तित्त्वच संपले आहे असे समजण्यात ​कमालीचा मूर्खपणा आहे. २००७-०८ च्या सुमारास क्षुल्लक म्हणून समजल्या गेलेल्या या दहशतवादी गटाने २०११ नंतर इराक आणि सीरियामध्ये वाढीस पोषक वातावरण मिळाल्यानंतर मोठा हैदोस घातलेला आपण पहिला आहे. २०१४नंतर तर दहशतवादाची चर्चा 'आयसिस' भोवतीच फिरत आहे. पश्चिम आशिया सोडून इतरत्र आपली छाप पाडण्यास 'आयसिस'ला कमी वेळ लागला आहे. लिबिया, इजिप्त, फिलिपिन्स, पाश्चात्य देशांमध्ये या गटाचे 'स्लिपर सेल' असल्याचे समोर आले आहे. स्थानिक प्रदेश ताब्यातून गेल्यानंतर आता छुपाछुपीने आपले ध्येय कसे गाठता येईल या मनस्थितीत 'आयसिस'चे नेतृत्व असणार. या गटाची विचारसरणी, एकट्या-दुकट्याने, कमी भांडवलात, असंघटितपणे केलेल्या हल्ल्यांमुळे दहशतवादाला नवे परिमाण मिळाले आहे. त्यामुळेच, 'आयसिस'च्या ताब्यातील प्रदेश आकुंचन पावत असला तरी या गटाचे छोटे-मोठे हल्ले थंड पडतील याची शाश्वती नाही. दर २-४ वर्षांनी नवा दहशतवादी गट उभा राहत असताना त्याच्या वाढीच्या मुळाशी न जाता आणि प्राथमिक स्वरूपातील प्रश्न न सोडवता, नुसत्या कारवाईने या गटांचे आणि त्यांच्या यंत्रणांचे फक्त खच्चीकरण होत असून, या गटांचा बिमोड होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. झपाटल्यासारखी कारवाई करत, वायू हल्ल्यांत अख्खी शहर संपवून अमेरिकादी देश स्थानिक नाकारत्मकतेत भर घालत आहेत. अशा प्रक्रियेला आवरायचे असेल तर त्यासाठी व्यापक विचार करत, जिहादी विचारसरणीवर घाला घालत, पुन्हा असे गट बाळसे धरणार नाहीत, त्यासाठी तसे सामाजिक आणि राजकीय वातावरण तयार होणार नाही याची सक्त दक्षता अमेरिका, रशिया आणि पश्चिम आशियातील सर्व संबंधित घटकांना घ्यावी लागेल. तसे न केल्यास 'ये रे माझ्या मागल्या' या उक्तीप्रमाणे दहशतवादी गटांवरचे असे तात्पुरते विजय हे दीर्घकाळाचा विचार करता अर्धविराम ठरतील.

                                                                                                                                                    वज़ीर

हा लेख, रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०१७ च्या 'महाराष्ट्र टाईम्स' च्या पान १२वर छापण्यात आला.

No comments:

Post a Comment