Monday 23 July 2018

रशियाचा राजकीय 'गोल'!

परवा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची फिनलँडची राजधानी हेलसिन्की येथे पहिली औपचारिक बैठक झाली. उभय नेत्यांत या आधी इतर परिषदांच्यावेळी दोन वेळी भेट झाली होती. शीतयुद्ध आणि सोव्हियत राष्ट्रसंघाच्या काळात फिनलँडमध्ये उभय देशांत ५ वेळा बैठक झाली होती. त्यामुळे इतिहासाचा विचार करता या बैठकीसाठी फिनलँडची निवड केली गेली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यशस्वी मुत्सद्देगिरीचा आव आणणाऱ्या ट्रम्प-पुतीन यांचा दावा किती फोल आहे हे समजावून घेणे गरजेचे आहे.

बैठकीआधी ट्रम्प यांनी 'नाटो'चे सदस्य असलेल्या देशांसोबत आणि नंतर ब्रिटनच्या दौऱ्यावर जात पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकांमध्ये त्यांनी 'नाटो' देशांवर आणि पंतप्रधान मे यांच्यावर टीकेची झोड उठवली. रशियाच्या वाढणाऱ्या भौगोलिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी जन्माला घातलेल्या 'नाटो' संघटनेच्या बैठकीत ट्रम्प इतर सदस्य देशांना निर्वाणीचा इशारा देताना दिसले. जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांना जाहीर विरोध करीत त्यांनी आधीच भांबावलेल्या युरोपीय समुदायात वादाची आणखी भर घातली आणि पुतीन यांना अपेक्षित असलेला वाद सुरु करून ट्रम्प फिनलँडमध्ये दाखल झाले. मागील महिन्यात झालेल्या 'जी-७' राष्ट्रांच्या परिषदेतसुद्धा ट्रम्प यांनी विचित्र भूमिका घेत सदस्य देशांना त्रास दिला होता. काही एक विचार करून प्रस्थापित केलेल्या संस्था, संघटनांमध्ये फूट कशी पडेल याचा काळजी ट्रम्प घेत असल्याचे दिसते. गेल्या दोन वर्षांतील त्यांचे परराष्ट्र्रीय धोरण बघितल्यास 'हातचे सोडून नसत्याच्या पाठीमागे' पळण्यात त्यांचा कल अधिक आहे याची प्रचिती येते. परवा त्यांनी हेच केले. युक्रेनचा घास गिळू पाहणाऱ्या, सीरियामध्ये अमेरिकेच्या विरोधी गटाला मदत करणाऱ्या, चीन, इराण, उत्तर कोरियाशी अत्यंत मोलाची जवळीक साधणाऱ्या आणि २०१६च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत लुडबुड करीत लोकशाहीला धक्का लावणाऱ्या व्लादिमिर पुतीन यांच्याबाबत ट्रम्प यांनी मात्र मिठाची गुळणी धरली. वरील एकाही विषयावर त्यांनी पुतीन यांना जाब विचारला नाही. उलट अमेरिका-रशियाचे संबंध मागील अध्यक्षांनी कसे बिघडवले याची यादी जाहीर करीत त्यांनी पुतीन यांच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न केला. हेच पुतीन यांना अभिप्रेत होते. आहे. पुढेही राहील.

अमेरिकेतील विशेष तपासाधिकारी रॉबर्ट म्युलर यांनी या भेटीच्या एक दिवस अगोदर रशियाच्या १२ गुप्तहेरांवर निवडणुकीत लुडबुडीचा ठपका ठेवला. याचा योग्य तो पाठपुरावा न करता, 'म्युलर यांचा तपास अमेरिकेला काळिमा कसा आहे', 'लुडबुडीचा आरोप म्हणजे शुद्ध गाढवपणा' असे बोलून ट्रम्प यांनी अमेरिकेची अब्रू चव्हाट्यावर आणली. अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी सादर केलेल्या पुराव्यांपेक्षा पुतीन यांनी नाकारलेला आरोप ट्रम्प यांनी पहिल्या दिवसापासून मान्य केला आहे. ठसठशीत पुरावे असलेल्या या एकाही आरोपाला भीक न घालता पुतीन असे काही करणार नाहीत असा दावा ट्रम्प यांनी केला. पुतीन यांच्याबाबत इतकी आपुलकी ट्रम्प का दाखवत आहेत याचे कोडे भल्याभल्यांना उलगडले नाही. ट्रम्प यांच्याबाबतीत काही संवेदनशील गोष्ट पुतीन यांच्या हाती असल्याची मोठा वंदता आहे. पुतीन अश्या चाली रचण्यात पारंगत आहेत. बैठकीला उशिरा येणे, वाक्यरचना, देहबोलीतून कमालीचा आक्रमकपणा दाखवत निर्दयीपणे बोलणी करण्याची पद्धत ते जगाला आता सुमारे १८वर्ष दाखवत आहेत. पूर्वाश्रमीचे गुप्तचर असणारे पुतीन त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतात. जर्मनीच्या अँगेला मर्केल या कुत्र्यांना घाबरतात. मागे त्यांच्यासोबतच्या अशाच एका बैठकीत पुतीन कुत्रं घेऊन हजर झाले होते. बोलणी सुरु करण्याआधीच बहुतेक वेळा पुतीन आपली बाजू भक्कम करून घेतात. कसलेल्या या राजकारण्याने छंद म्हणून राजकारण निवडलेल्या ट्रम्प यांना फासात गोवले आहे. पुतीन यांना अभिप्रेत असलेले सर्व काही ट्रम्प परवा बोलून गेले. ट्रम्प यांचे 'अमेरिका फर्स्ट' हे ब्रीद पुतीन यांच्यापुढे गळून पडले आहे. सहकारी राष्ट्र आणि मित्रदेशांना फाट्यावर मारत विरोधी गटात शिरण्याच्या ट्रम्प यांचा प्रयत्न त्यांना 'अमेरिका फर्स्ट' कडून 'अमेरिका एकाकी' या प्रवासावर नेतो आहे. पुतीन यांचा उंट तंबूत आपणहून घेऊन ट्रम्प पुढील प्रवास अजून अवघड करून घेत आहेत.

पुतीन यांच्या राजकीय चाली जागतिक संदर्भांचा विचार करता अमेरिका आणि युरोपीय समुदायाच्या हिताला नख लावत आहेत. अमेरिकेत अंतर्गत आणि युरोपीय समुदायातील बेबनाव पाहणे ही पुतीन यांच्या दृष्टीने मोठी सुखाची गोष्ट आहे. पुतीन यांच्या या सर्व किळसवाण्या राजकारणाची लक्तरे जाहीरपणे वेशीवर टांगण्याची संधी ट्रम्प यांनी त्यांच्या भेटीत आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गमावली. बक्कळ पुरावे हाती असताना सोयीस्करपणे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, उलटपक्षी पुरावे देणाऱ्या गुप्तचर संस्थांना शब्दशः मूर्ख ठरवत पुतीनच कसे बरोबर आहेत याची केविलवाणी बाजू ट्रम्प यांनी मांडली. तपासनीस चोरीचा पुरावा देत असताना पोलीस अधिकारी स्वतः चोराची चूक नसल्याची ग्वाही जाहीरपणे देतो यासारखे दुर्दैव नाही. त्याने चोराची भीड चेपली जाते. अमेरिकेतील ट्रम्प यांचा विरोधी डेमोक्रॅट पक्ष, हिलरी क्लिंटन, अमेरिकेचे माजी अध्यक्ष, प्रसार-माध्यमे या ट्रम्प यांना चीड आणणाऱ्या मुद्द्यांना वैयक्तिक भेटीत स्पर्श करून पुतीन यांनी ट्रम्प यांना झुलवल्याचे चित्र दिसत आहे. असे करून ट्रम्प आपल्याला अडचणीत आणणाऱ्या विषयांना बगल कशी देतील ही संधी पुतीन साधू पाहत होते. ती त्यांनी साधली. वादग्रस्त नेत्यांना भेटून, त्यांच्यावरील कारवाईचा फास अधिक घट्ट न करता फक्त पत्रकार परिषद आणि एकत्र छायाचित्राचा दाखला देण्याला मुत्सद्देगिरी समजली जात नाही. जमेल तितक्या विषयांवर एकवाक्यता साधत, औपचारिकपणे एकमेकांच्या चुकांची मांडणी करत, वादाच्या मुद्द्यांवर सामंज्यसाची भूमिका एकत्रितपणे ठरवणे अशी ढोबळपणे मुत्सद्देगिरीची व्याख्या आहे. ती ट्रम्प यांच्या गावी नाही. याचा प्रत्यय गेल्या महिन्यातील उत्तर कोरियाच्या किम जोंग उन आणि परवाच्या पुतीन यांच्या सोबतच्या ट्रम्प भेटीत ठळकपणे जाणवला. या दोन्ही देशांच्या प्रमुखांना ऐकवायचे सोडून, झाल्या-गेल्या गोष्टी विसरून, ट्रम्प यांनी त्यांना एका फटक्यात अमेरिकेच्या बरोबरीचे स्थान देत चर्चेचे आवताण दिले. अशाने त्यांच्या मागील सर्व कृत्यांवर ओला बोळा फिरवला गेल्याचे चित्र आहे. मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने हा ट्रम्प यांचा सरळसरळ 'फाऊल' आहे. वेळ आणि प्रसंग उघडपणे आपल्या विरोधात जात असताना थेट अमेरिकेचा स्वामी आपली राखण करतो याचा आनंद वेगळाच आहे. ट्रम्प यांनी दाखवलेल्या हिरव्या कंदिलामुळे पुतीन यांच्या धूर्त चालींना आणखी बळ मिळेल असे स्पष्टपणे दिसते. न सुधारल्यास ही चूक अमेरिकेला महाग पडेल. रशियाचा विचार करता मात्र, २०१८च्या फुटबॉल विश्वचषकाच्या स्पर्धेचे आयोजन करतानाच, राजकीय पटावर पुतीन यांनी एक महत्त्वाचा 'गोल' नोंदवला आहे!