Friday, 20 October 2017

सौदी - रशिया मैत्रीने नवे समीकरण

      सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ इब्न सौद यांनी मागील आठवड्यात रशियाला भेट दिली. रशियाला भेट देणारे राजे सलमान हे पहिले सौदी राजे आहेत. जागतिक पातळीवर आणि खासकरून पश्चिम आशियातील घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचे हे दोन देश असल्यामुळे या भेटीचा अन्वयार्थ समजावून घेणे गरजेचे आहे. या भेटीत रशियन बनावटीच्या शस्त्रांची खरेदी आणि संयुक्त गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले. मात्र, या उभय देशांमधील कागदोपत्री करारांपेक्षा त्यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या राजकारणाकडे अधिक लक्ष दिले पाहिजे.

तेलाच्या हव्यासापोटी अमेरिकेने सौदीला कधीच आपला चमू सोडू दिला नाही. सौदीची पश्चिम आशियातील मनमानी, कट्टर धर्मवाद, मानवी हक्कांची गळचेपी, दहशतवादाचा पुरस्कार याकडे अमेरिकेने तेलाच्या बदल्यात कायम दुर्लक्ष केले. या प्रदेशात निरंकुश सत्ता गाजवायचे सौदीचे स्वप्नदेखील मुबलक शस्त्रे देऊन अमेरिकेने पूर्ण केले. सौदी आणि रशिया हे तसे जुने वैरी. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत फौजांना धूळ चारण्यासाठी अफगाण बंडखोरांना सौदीनेच पैसे पुरवले. तेव्हापासून ते २०११साली सुरु झालेल्या सीरियाच्या यादवीपर्येंत सौदी आणि रशिया यांनी परस्परविरोधी भूमिका घेतली आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांना खुर्चीवरून बाजूला सारण्यासाठी अमेरिका आणि इतर आखाती देशांच्या मदतीने सौदीने असद विरोधकांना रसद पुरवली. हे विरोधक असद यांना जड जात आहेत असे वाटत असतानाच रशियाच्या वायू हल्ल्यांमध्ये या विरोधकांची भंबेरी उडाली आणि असद यांनी आपली खुर्ची राखली. सीरियाच्या या गोंधळात असद गटाचे पारडे आता नक्कीच जड आहे. सौदीने देखील हे वास्तव गुमान मान्य करीत, असद-हटवा मोहीम आवरली आहे. एकूण सीरियाच्या प्रकरणातून अंग काढून घेत आता असद विरोधकांना मदत करायचा कार्यक्रम अमेरिकेने गुंडाळला आहे. यामुळे रशियाच्या भूमिकेला पश्चिम आशियात वजन आले आहे. बराक ओबामांचे दुर्लक्षित पश्चिम आशियाई धोरण आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरचा उत्तर कोरियाचा प्रश्न पाहता या प्रदेशातील राजकीय पोकळी व्लादिमिर पुतीन भरून काढू पाहत आहेत. सीरियात ते म्हणतील ती पूर्व दिशा ठरत आहेच. त्याचबरोबर, इजिप्त, तुर्कस्तान, जॉर्डन, इराण, इराक सरकार, लेबेनॉन, हेजबोल्लाह अश्या घटकांसोबत ते चर्चा करून पेच सोडवू पाहत आहेत. त्यामुळेच या प्रदेशातील अत्यंत क्लिष्ट असलेल्या प्रश्न आणि विविध घटकांमध्ये पुतीन मध्यस्थी करून अमेरिकेचा दबदबा कमी करत, आपले महत्त्व वाढवत आहेत.  

त्यामुळेच, रशिया इराणला आवरू शकेल अश्या आशेने सौदी पुतीन यांच्याशी जुळवून घेऊ पाहत आहे. राजकारण सोडून सौदी आणि रशियामध्ये गेल्या काही काळापासून तेलाच्याबाबत एकवाक्यता दिसत आहे. तेलोत्पादन करणाऱ्या संघटनेमध्ये (ओपेक) सौदीचे मानाचे स्थान आहे. तेलोत्पादक असलेला रशिया या संघटनेत सहभागी नाही. जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात तेल हे दोन देश पुरवतात. २०१४पासून तेलाचे भाव कोसळले आहेत. कमी भाव आणि भरघोस उत्पादनामुळे सौदी आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला नख लागले आहे. त्यावर तोडगा म्हणून तेलाचे उत्पादन नियंत्रित आणि मर्यादित ठेऊन भाव कसे वाढतील याबाबत रशिया आणि सौदीने सामंजस्य दाखवले आहे. रशियाचे या सामंज्यस्यात आर्थिक आणि राजकीय हित आहे. या सामंज्यसात सौदीचे तरुण युवराज मोहम्मद बिन सलमान यांचा पुढाकार आहे. बिन सलमान हे राजे सलमान यांचे सुपुत्र असून, ते सौदी सिंहासनापासून एक पाऊल लांब आहेत. त्यांनी सौदी प्रशासनावर आणि धोरणांवर आपली छाप पाडायला सुरुवात केली आहे. सौदीमध्ये प्रथमच महिलांना वाहन चालवायची मिळालेली परवानगी हे बिन सलमान यांच्या धोरणाचे एक ताजे उदाहरण असल्याचे बोलले जाते. त्यांच्या वैयक्तिक इच्छेमुळे अनपेक्षित असलेली सौदी-रशिया जवळीक आता नाट्यमयरित्या वेग घेत आहे.  

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या विदेश दौऱ्यात सौदीला भेट दिली होती. ट्रम्प यांचा सर्व रोख हा जरी इराणविरोधी असला तरी तो रोख त्यांच्याइतकाच बेभरवशी आहे याचे सौदीला भान आहे. इराणचे वाढलेले बळ आणि त्याला आवरण्यात ट्रम्प प्रशासनाला आलेले अपयश ही सौदीची अमेरिकेबाबत तक्रार आहे. राजकारणात मित्रत्व-शत्रुत्वाची व्याख्या बदलत्या घडामोडींना अनुसरून बदलली आणि ठरवली जाते. त्यात सोयीनुसार केले जाणारे राजकारण हे ओघाने आलेच. भूतकाळातील घटनांच्या नावाने गळा काढण्यापेक्षा भविष्याचा विचार करून घेतलेली व्यापक भूमिका अधिक फायदेशीर ठरते असे इतिहास सांगतो. असेच काहीसे राजकारण राजे सलमान यांच्या या रशिया दौऱ्यामुळे साधत आहे. सौदीचे तेल आणि पुतीन यांच्या शिष्टाईच्या वाढता प्रभाव ही आपापली बलस्थान ओळखून त्यांनी खेळलेली ही चाल, त्यांना अनुकूल असे फासे पडल्यास पश्चिम आशिया आणि जागतिक संदर्भांना वेगळे वळण लावू शकते. त्यामुळेच वरवर पाहता हा दौरा फक्त दोन देशांपुरता मर्यादित राहत नाही. त्याला आंतरराष्ट्रीय घडामोडींचे परिमाण आणि व्यावहारिकता असल्याचे स्पष्टपणे दिसते. २०१५ ला राजे सलमान सौदी गादीवर आल्यापासून त्यांनी नवा घरोबा करायला सुरुवात केली आहे. रशियासाठी अमेरिकेशी मैत्री तोडायला आणि सौदीसाठी इराणसारखा आखातातील ताकदवान मित्र गमवायला सौदी आणि रशिया तयार नाहीत, हे वास्तवाला धरून आहे. 'व्हाईट हाउस'चा पदर सोडून सौदीचे हत्ती उद्यापासून लगेच 'क्रेमलिन'च्या दरबारात झुलायला लागतील असे समजण्यात देखील कमालीचा मूर्खपणा आहे. मात्र, मुत्सद्दीपणा दाखवताना इतर देशांचे दरवाजे ठोठावून आणि नव्या दोस्तांशी गुफ्तगू करून आपल्याकडे राखीव पर्याय तयार ठेवावे लागतात. तसाच सूचक संदेश रियाधमधून वॉशिंग्टनला दिला जातोय. पश्चिम आशियातील नाती झपाट्याने बदलत असल्याचे हे आणखी एक द्योतक आहे. म्हणूनच, याच्याकडे दुर्लक्ष करणे अमेरिकेला परवडण्यासारखे नाही.

                                                                                                                                                वज़ीर

हा लेख, शुक्रवार दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ च्या 'सकाळ' च्या संपादकीय पानावर (पान १२) छापण्यात आला.

No comments:

Post a Comment