दर चार वर्षांनी येणारी अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक आपल्या वेगळ्या पद्धतीमुळे आणि प्रचारामुळे प्रचलित आहे. सुमारे दोन वर्ष या प्रचारात खर्ची करत असताना, उमेदवारांचा जवळपास सर्वच विषयांवर आपली मत आणि धोरण मांडताना कस लागतो. जगातल्या सर्वात प्रतिष्ठित खुर्चीसाठी होणारी ही निवडणूक अनेकार्थांनी गाजते. अध्यक्ष होण्यासाठी करावा लागणारा खटाटोपदेखील तितकाच तापदायक आहे. पुढील चार वर्ष कशी असतील, अपेक्षांना साद घालत, नव्या-जुन्या अवघड प्रश्नांना आपण कसा हात घालणार या आणि इतर अनुषंगाच्या प्रश्नांची ओबड-धोबड उत्तरे या प्रचारात मिळतात. आंतरराष्ट्रीय माध्यम, रणनीतीकर, अभ्यासक आणि इतर राष्ट्रप्रमुख या निवडणुकीकडे बारीक लक्ष ठेऊन असतात ते यामुळेच.
इतकी मोठी निवडणूक आणि तिचा प्रचार सभ्य, सुसंस्कृतपणे चालत नाही हे गेल्या अनेक निवडणुकांनी सप्रमाण सिद्ध केल आहे. यंदा तर कहर आहे. डेमोक्रॅटिक हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्यात परवा झालेल्या वादसभेत ट्रम्प यांनी आपण निवडून आल्यास हिलरींना जेलमध्ये घालण्याची भाषा केली.
थेट भारतीय निवडणुकीतील प्रचाराची आठवण करून देणारी ही वादसभा अमेरिकी इतिहासातली सर्वात निरर्थक आणि संदर्भहीन चर्चा म्हणून गणली जात आहे. भारतीय प्रचाराशी तुलना करूनदेखील असभ्य ठरलेली अशीही यंदाची निवडणूक वैयक्तिक चिखलफेकीवर तापत आहे. स्थानिक नोकऱ्या व बेरोजगारी, स्थलांतरितांचा प्रश्न, अमेरिकी शहरांमध्ये वाढलेल्या वर्णद्वेषी हिंसक घटना, माथेफिरुंकडून होणार गोळीबार, समलैंगिकांचा प्रश्न, आरोग्यव्यवस्था, करप्रणाली, राष्ट्रीय सुरक्षा या स्थानिक आणि सामान्य अमेरिकी मतदारांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना नमनापुरते, थोडे तेल ओतून हिलरी आणि ट्रम्प एकमेकांच्या वैयक्तिक भानगडी बाहेर काढत आहेत. राजकारणाची संपूर्णपणे कोरी पाटी घेऊन आलेले, कुठल्याही सरकारीपदाचा अनुभव नसलेले ट्रम्प यांनी आपल्या बेताल बडबडीने रान पेटवलंय. मात्र, गेली ३० वर्ष सक्रिय राजकारणी असलेल्या हिलरींनी प्रचाराच्या खालावलेल्या या दर्जाला कुठेतरी अटकाव घालणे अपेक्षित असताना त्या ट्रम्प यांच्यामागे फरफटत जाताना दिसत आहेत. महिलांबाबतच्या हिणकस वक्तव्यांची जुने 'टेप' ट्रम्प यांच्या अंगाशी येऊन त्यांचा वदसभेत हिलरी फन्ना उडवतील असे वाटत असताना ट्रम्प यांनी तसे होऊ दिले नाही.
Image credit - Google |
स्थानिक प्रश्नांसोबतच, मध्य-पूर्व आशियात उडालेला भडका, 'आयसिस' या दहशतवादी टोळीची सीरिया आणि जगाला होणारी डोकेदुखी, जागतिक तापमानवाढ, व्यापारीकरण आदी आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर या दोघांनी मांडलेली मत चक्रावून सोडणारी आहेत. रशिया आणि व्लादिमिर पुतीन यांचा उल्लेख गेल्या वादसभेत जितक्यांदा झाला तितका बाकी स्थानिक प्रश्नांच्या उल्लेखांच्या बेरजेचासुद्धा झाला नाही. या अश्या सर्व विषयांवर हेकेखोर आणि युद्धखोर मत मांडणारे ट्रम्प आणि हिलरी अमेरिकेच्या कठीण भविष्यकाळचे संकेत देत आहेत. जागतिक महासत्तेचा होऊ पाहणारा स्वामी काय बोलतो यावर बरेच काही ताडता येते. परराष्ट्र खात्यात बराच अनुभव असलेल्या हिलरींनी 'आयसिस'चा बिमोड करण्यासाठी त्यांची ऑनलाईन माध्यमांतून अडचण करू असे सांगून तारे तोडले आहेत.
Image credit - Google |
Image credit - Google |
- वज़ीर
हा लेख रविवार, १६ ऑक्टोबर २०१६च्या 'सकाळ'च्या 'संडे स्पेशल' पानावर छापण्यात आला.
No comments:
Post a Comment