Saturday, 17 September 2016

संभ्रमावस्था आणि वैचारिक दिवाळखोरीही

      अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीसाठी सुमारे २ महिने राहिले आहेत. या निवडणुकीचा विचार करता हे दोन महिने अटीतटीचे आणि महत्त्वाचे मानले जातात. सर्वसामान्य मतदार आस्थेवाईकपणे या निवडणुकीकडे याच सुमारास बघू लागतो. मतदारांना आपल्या पारड्यात ओढायच मोठ जिकिरीच काम याच काळात उरकल जात. यंदाची निवडणूकदेखील त्याला अपवाद नाही. रिपब्लिकन पक्षातून डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन यांची उमेदवारी अधिकृत झाल्यांनतर त्यांनी अनुक्रमे माईक पेन्स आणि टिम केन यांना उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे.
पारंपरिक राजकारणी न समजले जाणारे ट्रम्प आणि हिलरी, त्यांचा राजकीय आणि सामाजिक भूतकाळ, त्यांची गडगंज श्रीमंती आणि दोघांनी इथवर मारलेल्या जोरामुळे ही निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी ठरत आहे. 

गेल्या महिन्यापर्येंत हिलरींनी ट्रम्प यांच्यावर भरघोस आघाडी घेतली होती. प्रत्येक सर्वेक्षणागणिक ट्रम्प यांची होणारी पीछेहाट हिलरींचा उत्साह वाढवत होती. मात्र, हिलरींचा हा आनंद अल्पजीवी ठरला. अमेरिकेचे परराष्ट्र खाते सांभाळत असताना हिलरींनी वापर केलेल्या वैयक्तिक 'ई-मेल'मुळे त्यांची 'एफबीआय' चौकशी झाली. तपास यंत्रणांनी जरी हिलरींविरोधात गुन्हेगारी स्वरूपातील खटला दाखल केला नसला तरी त्यांच्या हलगर्जीपणावर कडक शब्दांत ताशेरे मारले आहेत. त्यांनी अत्यंत गुप्त माहिती असलेले वैयक्तिक 'ई-मेल' शेकडोंच्या संख्येत सर्रास पाठवल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. 'आपण असे काही केले नाही', 'आपल्याकडून अजाणतेपणी ही चूक झाली',  'मला ही गोष्ट माहित नव्हती' अशा आशयाची कारणे तपासयंत्रणांना देऊन हिलरींनी आपली लाज झाकायचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण जरा आटोक्यात येत असताना त्यांच्यामागे अजून एक प्रकरण लागल आहे. हिलरी आणि बिल क्लिंटन यांच्या 'क्लिंटन फाउंडेशन' या सामाजिक संस्थेतील देणगीदारांना हिलरींनी परराष्ट्र खात्याची गोपनीय माहिती, वरिष्ठ मंडळींच्या गाठीभेटी आणि अमेरिकी सरकारमार्फत वैयक्तिक कामे करून दिल्याचा आरोप आहे. आकडेवारीचे अध्ययन करता दीडेकशे देणगीदारांपैकी ऐंशी जणांची वैयक्तिक कामे तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन आणि त्यांची सहायक हुमा आबेदीन यांनी मार्गी लावल्याचे स्पष्टपणे दिसते. इतके प्रतिष्ठेचे खाते आणि त्याची माहिती सांभाळत असताना दाखवलेल्या बेपर्वाईमुळे त्यांना मतदारांचा आणि विरोधकांचा रोष पत्करावा लागला आणि त्यांच्या स्पष्ट आघाडीच बंबाळ वाजल. या दोन प्रकरणांच भूत त्यांच्यामागे आता आजन्म लागणार आहे. हिलरींचा एकूण कार्यस्वभाव पाहता नियम पायदळी तुडवून देण्याची वृत्ती आणि खासगी सोयीसाठी पदाचा व सत्तेचा वापर त्या करताना दिसतात.
त्या राष्ट्राध्यक्ष झाल्यास हुमा आबेदीन यांच्या गळ्यात 'चीफ ऑफ स्टाफ' हे 'व्हाईट हाऊस'च्या अनुषंगाने क्रमांक दोनच महत्वाच पद पडेल. वॉशिंग्टनमध्ये आबेदीनबाई भारत-विरोधी समजल्या जातात. 

एकीकडे हिलरींच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या अघोरी धोरणांबाबत भय आहे. या निवडणुकीचा एकूण कल पाहता स्वतःचे विचार आणि धोरण मांडण्याला प्राधान्य दिसत नाही. केवळ दुसऱ्याला कमी लेखण्यात व त्याच्यावर टीका करण्यात हे दोघे धन्यता मानत आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय सुरक्षेवर आमनेसामने आलेल्या या दोघांनी हास्यास्पद विधाने केली. मात्र, अंतिम टप्प्याचा विचार करता हिलरींची प्रचार यंत्रणा कामास लागल्याचे चित्र आहे. हिलरींचे स्वपक्षीय बराक ओबामांच्या कामावर सुमारे ५६% जनता समाधानी आहे. त्यांच्याच धोरणांची री पुढे ओढत हिलरी चाणाक्षपणे आपला फायदा साधू पाहत आहेत. पिछाडी भरून काढत आता जरा उशिरा, हळू पण सावधपणे ट्रम्प यांनीदेखील आपल्या प्रचाराचा गाडा हाकायला सुरुवात केली आहे. त्यांच्या चमूतील बऱ्याच जणांची अदलाबदल करत, काही जणांना नारळ देत ट्रम्प यांनी ही शर्यत अजून न सोडल्याचे निदर्शित केले आहे. त्यांना गृहीत धरणे हिलरींना महाग पडू शकते. या निवडणुकीतील नकारात्मकपणा आत्ता कुठे सुरु होतोय. या महिन्याअखेरपासून पुढे ३ वेळा हे दोघे वादसभेसाठी समोरासमोर येतील त्यावेळी ते काय बोलतात हे बघणं औत्सुख्याच ठरणार आहे. 


या रणसंग्रामाच्या पहिल्या घटकेपासूनच हिलरींच्या तब्येतीविषयी आणि अमेरिकी अध्यक्षाकडून अभिप्रेत असणाऱ्या शारीरिक तंदुरुस्तीविषयी ट्रम्प हिलरिंवर टीकेची झोड उठवत होते. परवा ९/११च्या पीडितांना श्रद्धांजली वाहताना न्यूयॉर्कमध्ये हिलरींना भोवळ आल्यामुळे तिकडून काढता पाय घ्यावा लागला. या प्रसंगामुळे हिलरींच्या तब्येतीविषयी ट्रम्प यांच्या टीकेला अधिक धार येईल असे स्पष्टपणे दिसते.
प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत ट्रम्प उत्तरोत्तर या टीकेचा सूर अधिक कडवट करतील. शारीरिक स्वास्थ्य, मानसिक संतुलन, भूतकाळातील प्रेमप्रकरण या आणि अश्या अनेक संदर्भहीन आणि शुल्लक गोष्टींचा मोठा बाऊ अमेरिकी निवडणुकीत केला जातो. प्रचाराचा माहोल तापत असताना या गोष्टींची गरज भासणे ही राजकारणातील स्वाभाविक बाब आहे. मात्र, 'मुद्द्यांच पळभर भांडवल' आणि 'संपूर्ण प्रचाराचा रोख त्याच मुद्द्यावर' या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या दोन गोष्टींमध्ये एक धूसर, अस्पष्ट रेष असते. अमेरिकी राजकारणी ही रेष हमखास ओलांडतात. यंदा तर ही रेष रेटून ओलांडायची स्पर्धा लागली आहे आणि शुल्लक गोष्टींच भांडवल करायच पीक आलय. अमेरिकेतील स्थानिक आणि जागतिक घडामोडी एका संक्रमणावस्थेतून आपली वाट चाचपडत असताना ओबामांनंतर त्याला पूरक असा सारासार विचार करणार उमद नेतृत्व नसल्यामुळे आणि अमेरिकी अध्यक्षीयपदाचा काटेरी मुकुट या दोघांपैकी एकाच्या शिरावर चढणार असल्याने चिंतेची ही बाब अधिक गडद होत जाणार आहे. प्राथमिक टप्प्यात आपल्या विचारांनी आणि धोरणांनी शोभा करणारे हे दोघे पुढील चार वर्षात अख्ख्या जगाला बिनदिक्कतपणे फरफटत नेऊ शकतात ही आजची परिस्थिती मात्र नक्की सांगते.

                                                                                                                                                    - वज़ीर

हा लेख शुक्रवार, १७ सप्टेंबर २०१६च्या 'सकाळ'च्या संपादकीय पानावर (पान ६) छापण्यात आला.

No comments:

Post a Comment