सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात २०११ साली सुरु झालेल्या निदर्शनांना आज जवळपास साडेपाच वर्ष लोटली आहेत. या काळात अहिंसक ते हिंसक आणि आता यादवीकडे असा या आंदोलनाचा प्रवास झाला आहे. सीरियन सरकार, १०००हुन अधिक दहशतवादी टोळ्या, अल-कायदा, जब्हत फतेह अल-शम, आयसिस, हेजबोल्लाह, इराण, तुर्कस्तान, रशिया आणि अमेरिका या सगळ्यांनी मिळून हा चिवडा केला आहे. आपापसातील समर्थन आणि विरोधाच्या जीवावर हा भडका सुरु आहे. यावर उपाय शोधण्यासाठी आपापल्या समर्थक गटांना रसद पुरवणारे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लावरोव यांनी आणि अर्थात त्यांच्या अध्यक्षांनी चर्चेचा बराच काथ्याकूट करून गेल्या महिन्यात ७ दिवसांची शस्त्रसंधी लागू केली. हा करार किती टिकणार याबद्दल शंका असतानाच, जेमतेम २ दिवस शांततेत घालवल्यावर सर्व घटकांनी पुन्हा हातात बंदुका घेऊन रोजची हाणामारी सुरु केली आहे.
एक-एक गाव, उपनगर आणि शहरावरून असद सरकार आणि त्यांच्या विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. राजधानी दमस्कससोबत होम्स आणि हमा ही दोन शहर असद सरकारकडे आहेत. सध्याच्या घडीला अलेप्पो या सीरियातील सर्वात मोठ्या आणि आर्थिक, व्यापारिक दृष्ट्या महत्वाच्या शहरासाठी रस्सीखेच सुरु आहे. अलेप्पोचा ताबा आत्ता असद विरोधकांकडे आहे. अलेप्पो आपल्या ताब्यात घेऊन विरोधी गटाला नमवता येऊ शकते. सीरियन प्रश्नाचा सवंगपणे अभ्यास करता, अलेप्पो शहर जो राखेल त्या गटाचे पारडे या प्रश्नात जड होईल असे स्पष्टपणे दिसते. अलेप्पोसाठीच या परस्पर विरोधी गटांचा आटापिटा सुरु आहे. यात अमेरिकी हवाई हल्ल्यात सीरियाचे ६९ जवान मारले गेल्यामुळे सीरियन सरकार आणि त्याला पाठिंबा देणारा रशिया यांनीही शस्त्रसंधी एकतर्फी धुडकावून लावली. हे करतानाच असद सरकारने अलेप्पोमध्ये अडकलेल्या सुमारे तीन लाख नागरिकांसाठी संयुंक्त राष्ट्रसंघाने पाठवलेल्या मदत-साहित्यावर हवाई हल्ला करून ते खाक केल. यात मदतकार्य करणारे २० जण दगावले आहेत.
Aleppo under heavy fire. Image credit - Google |
उशिरा का होईना पण सामंजस्याने हा पेच सोडवू पाहणारी अमेरिका आणि तिच्या प्रत्येक चालीला खो घालणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यातील संबंध जरा जास्तच ताणले गेले आहेत. अमेरिकेने रशियासोबत सीरियन प्रश्नावर आता बोलणी थांबवली आहे.
'The White Helmets' rescue the victims under the debris Image credit - Google |
Aleppo Image credit - Google |
सरतेशेवटी अमेरिका आणि रशियाला एकमेकांची गोत्र जुळवून घेऊन यावर तोडगा काढण्याशिवाय पर्याय नाही. आता हे दोघे चर्चेची कबड्डी खेळतात की आपल लष्करी सामर्थ्य छुप्या पद्धतीने लादतात हे बघणे जिकिरीचे ठरणार आहे. या दोघांच्या किंबहुना अमेरिकेच्या वेळकाढू आणि फसलेल्या धोरणामुळे संपूर्ण सीरियावर वरवंटा फिरतो आहे, ज्याबद्दल या दोन देशांनी काही संवेदना दाखवणे त्यांच्या तुच्छतावादात बसत नाही.
Aleppo Image credit - Google |
- वज़ीर
हा लेख मंगळवार, १८ ऑक्टोबर २०१६च्या 'सकाळ'च्या संपादकीय पानावर (पान ६) छापण्यात आला.
No comments:
Post a Comment