(रविवार, ३ मार्च, २०१३ दुपारी १.०० पासून ते सोमवार, ४ मार्च, २०१३ पहाटे ३.०० वाजेपर्येन्त)
गुलमर्ग पाहिलं. गुलमर्ग अनुभवलं. लांबचं-लांब नजर संपेपर्येंत, खचाखच बर्फ भरला होता. क्षितिजाच्या पार टोकावरून, ओथंबून, उर भरून टाकणाऱ्या, सगळं निळं आकाश आपल्या कवेत घेणाऱ्या, घोंगावत वाहणाऱ्या वाऱ्याचा स्वच्छंदीपणा न बिघडवणाऱ्या, अंगावर येणाऱ्या आणि किंचित भीतीदायक वाटणाऱ्या बर्फाच्या त्या ढिगाऱ्यावरून सुर्य, निसर्गाच्या या महाकाय मयसभेत आपलं निस्तेज पण तितकचं सुखावणारं किरणांचं जाळं फेकत होता. बाराचा सुमार तर केव्हाच टळून गेला होता. या लक्ख पांढऱ्या प्रदेशात चिमुकल्यांचा आनंद घेत, बर्फात खेळणाऱ्या आमच्यासारख्या हजारोंचा वेळ भुरकन उडून जात होता. आमची निघायची वेळ झाली होती. पाचपर्येंत बोटहाउसवर जाऊन, भरलेलं सामान उचलून त्याच गाडीने जम्मूकडे कूच करायचं होतं. संध्याकाळी सातच्या आत जम्मूला जाणारा तो जवाहर बोगदा ओलांडून पलीकडच्या रस्त्याला लागायचं होतं. उद्या सकाळी वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायचं होतं. एकमेकांना बर्फ मारत, 'इकडे-तिकडे' बघत, बर्फातून वाट तुडवत, मध्येच बुटात गेलेला बर्फ काढत शेवटी गाडीपाशी पोहोचलो. गाडीचा चालक आणि आमचा वाटेकरी गाडी सोडून फरार. अवघ्या ५ मिनिटांमध्येच समजलं की गाड्या पुढच्या २-३ तास हालणार नाहीत. एव्हाना २ वाजून गेले होते. पोटात कावळ्यांनी ओरडून-ओरडून त्या अतिथंड वातावरणात आंदोलन सुरु केलं होतं. गाड्या न हलण्याचं कारण समजलं. जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला गुलमर्गमध्ये आले होते. त्यांचा ताफा गेल्याशिवाय गाडी एक इंचपण हलणार नाही असं सांगून सर्व चालक संघटनेनी आपलं अंग काढून घेतलं. जर आज श्रीनगर नाही सोडलं तर समोर दिसणारी थंडी, पुढचे फिसकटणारे सगळे बेत, होणारा जास्त खर्च हे सगळं पुढ्यात बघून, आम्हा ६ जणांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. २ तास गुलमर्गला जाऊन येऊ म्हणता-म्हणता अख्खा दिवस गेला होता. आता त्या जागेचं सगळं प्रेम वगैरे ओसरलं होतं, सगळं कौतुक संपलं होतं, कॅमेरे आत गेले होते, डोळ्यांवरचे गॉगल बाजूला ठेवले गेले होते, शर्टांच्या-स्वेटरच्या बाह्या वर सरसावल्या होत्या. चालक-वाटेकरी आले. काहीवेळ गाडीत बसून घालवला. तुम्हाला सांगतो डोकंचं खराब झालं होतं. आता चलबिचल वाढली होती. सगळे गाडीतून खाली उतरलो. अंदाज घेतला. काहीच हालचाल नाही दिसली. बाकीच्या गाड्यांमधून सगळे उतारू खाली उतरले. थोड्या वेळात सगळं पब्लिक रस्त्यावर उतरलं. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोकं घोळका करून थांबू लागले. काहीच हाती लागत नाही हे बघून समभाषिक उतारू एकत्र जमू लागले. आम्हीपण आमचा एक मराठी गट जमवला. मनसोक्त शिव्या दिल्या. जरा बरं वाटलं!
मुख्यमंत्री साहेबांचा ताफा गेला. त्यांच्या मागे आमच्या गाड्या निघाल्या. १२-१६ किलोमीटरचा अवघड,वळणा-वळणांचा, निसरडा, भरपूर दऱ्या असलेला घाट उतरून खाली आलो. गम-बूट परत केले. आमचा तवेराचा चालक मोहम्मद सिगारेट फुकत बसला होता. पटापट गाडीत बसलो आणि अब्दुल्लांच्या नावाने बोटं मोडत बोटहाउसच्या दिशेने निघालो. ७ वाजून गेले होते. जवाहर बोगदा आता जम्मूकडे जाण्यासाठी बंद झाला असणार हे एव्हाना कळून चुकलं होतं. ८च्या सुमारास बोटहाउसवर पोहोचलो. भराभर सामान उचललं. चाचा डबा घेऊन तयारच होता. चिकन ६५ आणि चिकन बिर्याणी सांगितली होती. त्यांचे पैसे दिले आणि मोहम्मदच्या सांगण्यावरून निघालो. 'आपली सेटिंग आहे, थोडासा जुगाड करून पटकन बोगद्याच्या पलीकडे जाऊ' असे त्याने गुलमर्गवरून परत येताना सांगितले होते. चाचा लोकांचा निरोप घेऊन निघालो. गेले २ दिवस, हाडं गोठवणाऱ्या पाण्यावरच्या ज्या तरंगत्या घरात आम्ही राहत होतो त्या घराची, संध्याकाळच्या इतर दिव्यांच्या अंधुक प्रकाशातली प्रतिकृती मनात साठवून गाडीत बसलो आणि मिशन जम्मू सुरु झालं. मोहम्मदने गाडी दामटायला सुरुवात केली. जवाहर बोगदा खुणावू लागला होता. अंधार दाटून आला होता. माणसाचा एखादा बेत फसल्यावर माणूस जसा हताशपणे बघत बसतो तशी आमची अवस्था झाली होती. मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात घरची आठवण दाटून आली होती आणि म्हणूनच की काय गाडीचा आवाज सोडला तर बाकी सगळे आवाज बंद झाले होते. थंडीने त्या रात्रीचे रंग दाखवायला सुरुवात तर केव्हाच केली होती. सगळ्या काचा वर करून आम्ही शांत बसलो होतो. फक्त मोहम्मदच्या बाजूची काच पूर्णपणे लागत नव्हती. त्या बारीक फटीतून येणारी वाऱ्याची गार झुळूक अंगावर शहारे आणत होती. त्या ओसाड रस्त्यावरून शहराच्या बाहेर झटकन पडलो. साधारण १ तासानंतर पोलिसांचा नाका लागला. अस्सल काश्मिरीत काहीतरी संभाषण झालं, आणि एकंदर पोलीसी खाक्या बघून असं लक्षात आलं की आज जम्मूला जाता नाही येणार. पायचं गळून गेले. आता काय करायचं? पोलिसांची हुज्जत घालण्याचा प्रश्नच नव्हता. गाडीने यू-टर्न घेतला. एका कोपऱ्यात गाडी दाबली आणि सगळ्यांनी एकदम आपली तोंडं उघडली. बराच काथ्याकूट झाला. शेवटी मोहम्मद बोलला. त्याला जवाहर बोगद्याकडे जाणारा दुसरा रस्ता माहित होता. रस्ता खराब होता असं तो म्हणत होता. तडक निघालो. वेळ पडली तर पुण्यात नातेवाईक वारले आहेत, लवकर जायचं आहे अशी थाप मारायची आणि सटकायचं असं ठरवलं. मन्या, हॅरी आणि आवी पोलिसांशी बोलतील असं ठरलं. पाउण तासानंतर त्या नाक्यावर पोहोचलो. गाड्यांची बरीच मोठी रंग आमच्या आधीपासून लागली होती. आम्ही काय ते समजून घेतलं पण एक प्रयत्न करू असं ठरलं. नाक्या जवळ गाडी घेतली आणि लक्षात आलं की ते पोलिस नसून आर्मीची माणसं होती. दोघंचं होती. सोबतीला एक ट्रक आणि फक्त दोन मोठ्या रायफल्स. बास! त्यांच्याजवळ गाडी घेतली, सोडा म्हणालो, थाप मारली, विनवणी केली. काहीच नाही. त्यातला एक साधा शिपाई होता, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर त्याचा वरिष्ठ साहेब अंगावर गुरखला. बंदुकीवर हात ठेऊन शिव्या घालू लागला. काय ते समजून आम्ही मागे फिरलो. 'गाडी बाजुको लगाओ, कल सुबह देखेंगे' असं म्हणून तो थांबला. आम्ही तवेरा रांगेत पहिली उभी केली, रस्त्याच्याकडेला. ११ वाजून गेले होते. थंडी मी म्हणत होती. गाडी बंद केली, गाडीतले सगळे दिवे बंद केले. भुकेने कळस गाठला होता. निमुटपणे कुठलाही आवाज न करता डबे काढले. गुमान खायला सुरुवात केली. चिकन ६५ च्या कोंबडीला बहुदा पोलिओ झाला असावा किंवा चाचाने फक्त हाडं दिली असावी असं वाटलं. बिर्याणी कसली, शुक्रवार पेठेतल्या एखाद्या लग्नातला व्हेज. पुलाव आणि त्यात ७-८ चिकन चे तुकडे घालावे अशी बिर्याणी होती. 'संकटं एकटी कधीच येत नाहीत, नेहमी चार-चौघांना सोबत घेऊन येतात' याचा प्रत्यय आला.
भयाण शांतता पसरली होती, रस्त्यावर बिनदिक्कतपणे रांगेत लागलेल्या गाड्या आणि त्यात झोपलेलं चालक-प्रवासी सोडले तर आजूबाजूला एक चिटपाखरूपण नव्हतं. काळरात्र ह्याहून वेगळी नसावी. हात धुवायला बाहेर पडलो आणि बाहेर थंडीने हैदोस मांडला होता. हातावर पाणी पडलं आणि भूल दिल्यावर संपूर्ण हाताची संवेदना संपावी तशीच वेळ हातावर आली. 'नो सेन्सेशन'. मरण आठवलं आणि गाडीत येउन बसलो. बिर्याणीबरोबर असलेली
दह्याची कोशिंबीर डबाभरून राहिली होती ती रस्त्याच्याकडेला ओतून दिली. मुकाट्याने गाडीत बसलो. जरा तरतरी आली होती. मोहम्मदने त्या शिपायाला ३० रुपये दिले. शिपाई रात्री १.३० नंतर, त्याचा साहेब झोपला की गाडी सोडतो म्हणाला. हरीनाम जपत गप्प पडून राहिलो. मी झोपलो. अचानक आवाज ऐकून उठलो. शिपायाने गाडी सोडली होती. रस्त्यावर त्या दह्याच्या कोशिंबीरिचं आईस-क्रिम झालेलं मन्याने आवर्जून दाखवलं. बाकी पोरांनी गलका सुरु केला. पण हा आनंद काही काळचं टिकला. ३ किलोमीटरवर बोगदा होता. त्यालालागून गाड्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या बाजूने गाड्या जम्मूकडून श्रीनगरमध्ये येत होत्या. आमच्याबाजूच्या काही आगाऊ चालकांनी गाड्या आत घातल्या आणि दुसऱ्या क्षणाला जवानांनी २-५ गाड्यांच्या काचा 'ठाळ-ठुळ' करून फोडल्या. तुम्हाला सांगतो शून्य मिनिटांत सगळ्या गाड्या परतीच्या प्रवासाला निघाल्या.
आम्हीपण निघालो. पुन्हा तोच रस्ता धरला. पुन्हा जवळपास ५०-६० किलोमीटर कापायचे होते. रात्री २ वाजता मोहम्मदने चाचाला फोन केला आणि आम्ही परत येत असल्याची वर्दी दिली. आता सगळेच पर्याय संपले होते. त्या किर्र अंधारात आम्हाला आमचं मरण आठवलं. दुतर्फा ओसाड जमीन असणाऱ्या त्या एकांतवासातल्या रस्त्यावरून आम्ही गर्दीत भरकटल्यासारखे निघालो होतो. आता जणू सगळ्यांनी तोंडाला कुलूप लावलं होतं. मोहम्मदच्या बाजूला काचेवर लावलेलं कापड तेवढं फडफड करत होतं. त्याचा आवाज ती शांतता कापत, गार, बोचऱ्या वाऱ्यासकट आत शिरत होता. थंडी आणि भीती एकवटून आळीपाळीने आमच्या गाडीवर हल्ला करत होत्या. झोप मी म्हणत होती. झालं ते झालं, आता यातून कसं निस्तरायचं ते उद्या ठरवू, आता जाऊन निवांत पडू इतकंच डोक्यात होतं. दिवसभर बर्फात बागडून, नंतर चीड-चीड करून, जीवाच्या आकांताने गाडीतून केलेली ही पळपळ अंगावर आली होती. जरा विश्रांती हवी होती. भयाण रात्र होती. इथे आपलं काही बरं-वाईट झालं तर घरच्यांना समजायला ४ दिवस लागतील इतकी खोचक शाश्वती ती परिस्थिती दर सेकंदाला पटवून देत होती. आणि मेलो तरी बेहत्तर, चुकून जगलो आणि घरच्यांना हे जर समजलं तर १००% तुडवणार हे प्रत्येकालाच माहित होतं. 'कोणी सांगितलं होतं अश्या ठिकाणी जाऊन काशी करायला' हे तर पेटंट वाक्य सगळे ऐकणार होतो. बहुदा!
त्या काळरात्रीत मोहम्मद आम्हाला परमेश्वरासारखा भेटला. पहाटे ३ वाजता परत बोटहाउस वर आलो. चाचा उभाच होता. त्या तश्या वेळीपण त्यांचं आदरातिथ्य भावलं. मनापासून भावलं. बोटीत घुसलो. 'कल सुबह १० बजे तक आता हून' हे मोहम्मदचं वाक्य कानी पडलं. आपापले बेड पकडले आणि निद्रादेवीच्या आधीन गेलो.
तो दिवस अजून आम्हा सगळ्यांच्या खणखणीत लक्षात आहे. आमच्या संपूर्ण ट्रिपचा नूरच तिथून बदलून गेला. आत्तापर्येन्त मजा, सुख, धमाल दाखवणाऱ्या त्या काश्मीर खोऱ्याने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली होती. राग, भीती, साहस आणि प्रत्येक संवेदना जागवणाऱ्या थराराच्या अनेक कंगोऱ्यांची प्रचीती त्या रात्रीने दिली होती. ती रात्रचं वैऱ्याची होती...
क्रमश:
क्रमश:
- वज़ीर
No comments:
Post a Comment