(शुक्रवार, १ मार्च, २०१३, दुपारी १.४० ते ५.०० वाजेपर्येंत)
मनाच्या एका कोपऱ्यात दिल्लीला बंदिस्त केलं. डिस्कवरी, 'टिएलसी' आणि तत्सम खाद्यवाहिन्या या दिल्ली नेहमीच दाखवतात . आमच्या ट्रीपच्या बेतात दिल्लीसुद्धा होती पण अगदी शेवटच्या क्षणी दिल्ली यादीतून बाहेर गेली. असो. श्रीनगरच्या विमानात बसलो. सडकून भूक लागली होती. दिल्लीपर्येंत आम्ही सगळ्यांनी 'सीसीडी' ची कॉफी घश्या खाली घातली होती. त्यानंतर अखंड आमरण प्रवास चालू केल्याप्रमाणे आम्ही एका विमानातून दुसऱ्या विमानात आलो होतो. दिल्लीचं ते विमानतळ आणि त्याचा थाट बघून पोटात अजूनचं मोठा खड्डा पडला होता. श्रीनगरच्या विमानात घुसलो आपापल्या जागा पकडल्या आणि जरा निवांत झालो. माझ्या दप्तरातून केक काढला. शनिवार, अंड्याचा केक वगैरे काही न बघता शुन्य मिनिटांत फक्त पिशव्या राहिल्या. आता जरा जीवात जीव आला. एव्हाना विमान चालू झालं होतं. आजूबाजूला, आसपास बहुसंख्य काश्मिरी बसले होते. त्यांच्या एकंदर पेहरावावरून आणि भाषेवरून आम्ही ते दोन मिनिटांत ताडलं. मंडईत जाऊन यावं इतक्या साध्या कपड्यात आणि तितक्याच सहजतेने हे सगळे प्रवासी गाडीत बसले होते. आम्ही मात्र आमच्या बघायच्या कार्यक्रमातपण इतके नटून नाही जाणार अश्या रुबाबात प्रवास चालू केला होता. बर्फाला तोड देता येईल इतके चकचकित गाल दाढी केल्यामुळे झाले होते. डझनभर कपडे, दाढीचं समान, अत्तरांचा खच अश्या तयारीत आम्ही निघालो होतो. जमलं असतं तर लग्न तिकडे झालं असतं इतपत तयारी होती. विमानात अजून काही लहान मुलंपण होती. त्यांची अखंड किर-किर चालूचं होती. पण ती मुलं तितकीचं गोड, सोज्वळ आणि सुंदर होती. त्यांचे गोंडस, गुलाबी गाल काश्मीरच्या निस्सीम सुंदरतेचं दर्शन घडवत होते.
सीटबेल्ट आवळले आणि विमान झेपावलं. हळू-हळू पुन्हा पुढे सरकू लागलं. मागच्या विमानाच्या तुलनेत हे विमान शांत होतं. को-कॅप्टन आणि इतर मंडळी जरा कमी बडबड करत होते. आधीच्या विमानातले कॅप्टन आणि को-कॅप्टन यांनी गुजरात, राजस्थान, दिल्लीची इतकी माहिती दिली होती की फक्त आता ती राज्ये विकायची बाकी होती. त्यामानाने ह्या विमानात सुख होतं. असाच काही वेळ बसलो आणि एकदम दूर क्षितिजावर बर्फाळलेल्या डोंगरांचं टोक दिसलं. एक सणसणीत संवेदना डोक्यात गेली. आत्तापर्येंत फक्त ऐकलेलं, क्वचित टीव्हीवर पाहिलेला तो बर्फ खुणावू लागला होता. तो नझाराचं अप्रतिम होता बाकी काही नाही. एक नंबर. श्रीनगर जवळ पोहोचत असल्याची वर्दी विमानातून मिळाली आणि आम्ही सगळे खिडक्यांना पुन्हा एकदा चिकटलो. आमचा हऱ्या तर धडाधड फोटो काढतचं सुटला. थोडी मेमरी असुदे बाकी ट्रीपसाठी असं मन्या त्याला बोलला. सोबत आम्हीपण शिव्या देऊन घेतल्या. मित्रांसोबत ट्रिपला दुसऱ्या राज्यात गेल्याचा हा फायदा असतो भरपूर शिव्या घालता येतात!
एव्हाना विमानाने पूर्णपणे काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. आमच्यासारखे काही निवडक नवखे खिडकीपाशी ठाण मांडून बसले होते. बाकी सगळे प्रवासी या सगळ्या गोष्टींना अंगवळणी पडल्यासारखे ढिम्म नजरेतून बघत होते. संपूर्ण दृश्य आता आवाक्यात आलं होतं. लांबच-लांब दाट ढगांची चादर पांघरली होती आणि गोधडीला वरून ठिगळं लावावीत अश्या पद्धतीने ते बर्फाचे टोक दिसत होते. विलक्षण अनुभव होता तो. विमान पुढे सरकताना मधेच ढग गायब झाले आणि हजारो वर्ष खड्या पारश्यासारखे पहारा देत उभे असलेले, संयत वाटणारे, भरमसाठ बर्फ अंगावर घेतलेले डोंगर आमच्या स्वागताला थांबले होते. हे सगळं इतकं क्षणार्धात घडलं की त्यामुळे आम्ही असं हे अशक्य काही बघून हरखलो, सपशेल हरखलो! काचा बाहेरून गार पडल्या होत्या. त्या गारठ्याने या काचांच्या माध्यमातून आमच्या देहामध्ये चंचूप्रवेश केला. जवळच दिसणारी विमानतळाची धावपट्टी आणि त्या बाजूचं निसर्गसौंदर्य बघून आम्ही तृप्त झालो. त्या सुंदरतेवरून नजर हटत नव्हती. अचानक लांब कुठेतरी आल्याचा, शहरापासून लांब, प्रदूषणापासून लांब, निवांत ठिकाणी आल्याचं समाधान सुखावत होतं. मन प्रसन्न झालं.
विमानातून बाहेर पडलो. २ डिग्री सेल्सिअस एसी खोलीत आल्यासारखं वाटलं. विमानतळ तसं बेताचंच. सुरक्षा रामभरोसे. माणसांची अखंड धावपळ चालू होती. १५ मिनिटांत सामान घेऊन बाहेर पडलो. गाड्यांजवळ आलो आणि आमच्या ड्रायव्हरला शोधू लागलो. एक घोळका दिसला. त्यांना 'आप में से मोहम्मद कौन है?' असं विचारल्याबरोबर ६-८ जण पुढे आले! आमचा चालक शोधला. सैफ अली खानला लाजवेल इतपत छान दिसायला. तितकाच गुलछबू. तवेरात बसलो. शुक्रवार होता. संध्याकाळी ५ची वेळ झाली होती. नमाजची बांग ऐकू आली. वेगळा प्रदेश मस्त वाटला. आमच्या हाउसबोटवर गेलो. समान टाकलं आणि निघालो श्रीनगरच्या बागा बघायला!
'काश्मीर की कली' मधला शम्मी कपूर आठवू लागला आणि रफीसाहेब मनापासून गाऊ लागले,
'तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया…'
- वज़ीर
- वज़ीर
No comments:
Post a Comment