जगभरात, गेल्या काही वर्षभरात व्लादिमीर पुतीन, शी जिनपिंग, किम जोंग उन, रेसेप तय्यप एर्दोगन, मोहम्मद बिन सलमान, बशर अल-असद या एककल्ली आणि निर्ढावलेल्या नेत्यांचा उदय झाला आहे. हे सर्व नेते आपापल्या देशांत लोकप्रिय आहेत. मुळची एकाधिकारशाही प्रवृत्ती आणि लोकप्रियता यांच्या जोरावर ते आपल्या वर्चस्वाचा खुंटा अधिक बळकट करताना दिसताहेत. पुतीन नुकतेच पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले असून 1999पासून ते रशियात राज्य करीत आहेत. म्हणजे जवळजवळ पाव शतक ते सत्तेवर असतील. हे सर्वच नेते देशाबाहेरील हालचाली, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्याप्तीचा परीघ बिनदिक्कतपणे वाढवत आहेत. त्यांची राजकीय भूक वाढत असताना वास्तविक अमेरिकेची जबाबदारी वाढते. परंतु खेदाची बाब अशी की, ट्रम्प यांनी अमेरिकेचे वेगळेपण जपले नाही. किंबहुना अमेरिकेच्या कचखाऊ धोरणामुळे या नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढताना स्पष्टपणे दिसते.
अमेरिकेचा दबदबा कमी होण्याचे एक कारण ट्रम्प यांची कार्यशैली आहेच. परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची त्यांनी ज्या पद्धतीने तडकाफडकी उचलबांगडी केली, ते याचे ताजे उदाहरण. ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडलेल्या अथवा ट्रम्प यांनी घरचा रस्ता दाखवलेल्या सहकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैचारिक मतभेद असणाऱ्या सहकाऱ्यांना बाजूला सारून, अत्यंत कमी विश्वासू सहकाऱ्यांसोबत अमेरिकेचा महाकाय गाडा हाकताना ट्रम्प यांची दमछाक होईल अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र, वरकरणी सगळे सुरळीत चालू असल्याचे ते दाखवित आहेत. हा त्यांचा दावा किती फोल आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
इराण, रशिया, उत्तर कोरिया आणि जेरुसलेम या संवेदनशील प्रश्नांवर ट्रम्प आणि टिलरसन यांनी कायमच परस्परविरोधी भूमिका घेतली आहे. टिलरसन यांचा पिंड राजकीय नसला तरी त्यांनी "एक्झॉन-मोबिल' या बलाढ्य तेल कंपनीचे अध्यक्षपद एक दशकभर सांभाळले आहे. त्यामुळे चर्चा आणि मुत्सद्दीपणाला ते अधिक प्राधान्य देत आले आहेत. इराणसोबतचा अणुकरार रद्द करून अधिक कडक निर्बंध लादावेत, उत्तर कोरियाचा प्रश्न सोडवताना चर्चेच्या फंदात न पडता लष्करी कारवाईचा मार्ग पत्करावा, जेरूसेलमसारखा स्फोटक प्रश्न हाताळताना त्याच्या परिणामांची काळजी करू नये, अशी ट्रम्प यांची कार्यशैली आहे. याच कार्यशैलीबाबत नाराजी दाखवत, सौम्यपण आणि मुत्सद्दीगिरीने हे प्रश्न हाताळले जाऊ शकतात, हे टिलरसन यांनी अनेकदा सांगितले होते. त्यामुळे त्यांचे आणि ट्रम्प यांचे वारंवार खटके उडाले होते. परिणामी त्यांची गच्छंती निश्चित मानली जात होती.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत (2016) रशियाने लुडबुड केल्याचे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनी मान्य केले आहे. या लुडबुडीचे आदेश पार क्रेमलिनमधून दिले गेल्याचे आता समोर येत आहे. ट्रम्प प्रशासनातील अनेक अधिकारी आणि त्यांच्या जवळच्या मंडळींनी प्रचारकाळात रशियाशी गुफ्तगू केल्याच्या आरोपाची विशेष तपासाधिकारी रॉबर्ट म्युलर चौकशी करीत आहेत. गेले एक वर्ष ट्रम्प लुडबुडीचा हा आरोप फेटाळत आहेत. मात्र, म्युलर यांनी ट्रम्प यांचा एक-एक सहकारी टिपायला सुरवात केली आहे. येत्या काळात तपासाची ही धग थेट 'ओव्हल ऑफिस'पर्यंत पोचेल असे दिसते. यातून बोध घेत परवा ट्रम्प प्रशासनाने तब्बल 14 महिन्यांनंतर लुडबुडीचा ठपका ठेवत रशियावर निर्बंध लादले. याचा विशेष परिणाम रशियावर होणार नाही. ट्रम्पदेखील रशियावर टीका करायची वेळ आल्यावर मिठाची गुळणी धरून बसत असल्याचे दिसते. त्यांनी रशिया आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या चुकीच्या धोरणांवर टीका करायला नेहमीच नकार दिला आहे. उलट, ते अमेरिकेचे हित असणाऱ्या, पण पुतीन यांची वेगळी भूमिका असणाऱ्या सीरिया आणि इतर विषयांबाबत पुतीन यांच्याशी जुळवून घेऊ पाहत आहेत. पुतीन यांच्याशी ट्रम्प इतकी का सलगी दाखवत आहेत हा प्रश्न भल्याभल्या राजकीय जाणकारांना पडला आहे. ब्रिटनमध्ये रशियाचा माजी गुप्तहेर आणि त्याच्या कन्येवर विषप्रयोग झाल्याच्या आरोप ताजा आहे. रशियाच्या अशा कृत्याविरोधात अमेरिका ब्रिटनसोबत उभी राहील, अशी घोषणा टिलरसन यांनी केली आणि दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी "ट्विटर'वरून टिलरसन यांची हकालपट्टी केली. टिलरसन यांच्या जागी माईक पॉम्पिओ यांची नेमणूक करून ट्रम्प यांनी भविष्यातील आपल्या परराष्ट्र धोरणाची दिशा दाखवून दिली आहे. पॉम्पिओ यांची संवेदनशील प्रश्नांवर भूमिका आततायी आणि टोकाची राहिली आहे.
रशिया, सीरिया आणि चीनला नजरेआड करणारे ट्रम्प यांचे धोरण या देशांच्या नेत्यांच्या पथ्यावर पडत आहे. येमेनमध्ये अस्वस्थता निर्माण करून सौदी अरेबियाचे बळ वाढविण्यात अमेरिकेचा उघड हात आहे. पश्चिम आशियात कुर्द गटाला चेपताना तुर्कस्तान तर अप्रत्यक्षपणे अमेरिकेच्या विरोधात उतरला आहे. जागतिक पटलाचा विचार करता, ट्रम्प यांचे "अमेरिका फर्स्ट' हे धोरण राजकीय पोकळी निर्माण करीत आहे. याच पोकळीचा फायदा घेत, हे नेते पाश्चात्य देश आणि अमेरिकेला आव्हान देऊ पाहत आहेत. या वेगवेगळ्या घटकांना आवरायची अथवा गोंजारायची कला ट्रम्प यांच्या अमेरिकेला अजून साधलेली नाही. त्यांना आवाक्यात आणणारे काही धोरण ट्रम्प आखत असल्याची चिन्हेही दिसत नाहीत. मित्रराष्ट्रांसोबत वैचारिक मतभेद चर्चेच्या आड आणून ट्रम्प त्यांच्याशी फटकून वागताना दिसतात. याचबरोबर, महत्त्वाच्या प्रश्नांवर ट्रम्प प्रशासनामध्ये एकवाक्यता नाही. सध्या, प्रशासनातील घटकांना एका पातळीवर आणण्याची धडपड ट्रम्प करीत आहेत. त्यामुळेच, सत्तेवर येऊन सव्वा वर्षे उलटून गेल्यानंतरसुद्धा ट्रम्प प्रशासनात अंतर्गत आणि परराष्ट्र व्यवहारामध्ये स्थैर्य दिसत नाही. 'व्हाईट हाऊस'ला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि स्वभाव आहे. अध्यक्षीय निवडणुकीत खमका समजला जाणारा उमेदवारही कधीकधी अध्यक्ष झाल्यानंतर 'व्हाईट हाऊस'च्या सामर्थ्याच्या तडाख्याने गलितगात्र होतो, असे इतिहास सांगतो. लिंडन जॉन्सन, रिचर्ड निक्सन, बिल क्लिंटन यांना असाच हिसका बसला होता. जगभरातल्या घटकांवर परिणाम करणारे धोरण ठरवताना अभ्यासू आणि अनुभवी लोकांची गरज भासते. ट्रम्प या मूळ गाभ्यालाच धक्का लावू पाहत आहेत. नेमस्त सहकाऱ्यांना एकएक करून नारळ देत ट्रम्प 'व्हाईट हाऊस'मधील अडचणी वाढवून घेत आहेत. त्यामुळे आगामी संकटाच्या काळात त्यांना अत्यंत कमी सहकाऱ्यांनिशी लढावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment