Thursday, 7 December 2017

सौदीत सबकुछ बिन सलमान!

      सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी भ्रष्टाचार, पैशांची अफरातफर, बनावट कंत्राट आणि बेहिशोबी मालमत्तेचा ठपका ठेवत ११ सौदी राजपुत्रांना, बड्या व्यवसायीकांना आणि माजी मंत्र्यांना अटक केली आहे. देशाला खड्ड्यात घालणाऱ्यांना सोडणार नसल्याचे बोलून दाखवत बिन सलमान यांनी आपल्या भाऊबंदांना ताब्यात घेऊन त्यांच्या सर्व अधिकारांना आणि संपत्तीला चाप लावला आहे. बिन सलमान यांची निर्विवाद सत्तेची हाव लपून राहिली नसताना भ्रष्टाचाराचा विरोध हा फक्त मुलामा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

बिन सलमान हे सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांचे पुत्र आहेत. कोणतीही ठोस राजकीय पार्श्वभूमी नसताना, आपल्या वाटेत येईल त्याला बाजूला करत त्यांनी युवराज पदापर्येंत मजल मारली आहे. मोहम्मद बिन नाएफ, अलवलीद बिन तलाल, मितेब बिन अब्दुल्लाह हे बिन सलमान यांच्यापेक्षा वयाने, अनुभवाने आणि वकूबाने मोठे राजपुत्र. या सर्वांना एक एक करीत लांब ठेवत बिन सलमान यांनी सौदी सत्ता आपल्या हाती आता एकवटवली आहे. सौदी संरक्षण, लष्कर, प्रशासन, प्रसार-माध्यम, आर्थिक समिती अशी सर्व ताकदवान खाती त्यांच्या ताब्यात आहेत. बिन सलमान वगळता हे सर्व राजपुत्र अमाप संपत्ती, वेगवेगळे व्यवसाय आणि जागतिक पातळीवरच्या बड्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध राखून आहेत. बिन सलमान यांना याचा जाच वाटतो. तो जाच आता त्यांनी दूर केला आहे. या अटकपर्वाच्या काही तास आधी येमेनच्या सीमेवर एका सौदी हेलिकॉप्टरचा अपघात येऊन त्यातील सर्व प्रवासी मरण पावले. त्यात २ सौदी राजपुत्रांचा समावेश होता!

इतर राजपुत्रांच्या संपत्तीविषयी शंका घेऊन त्यांना ताब्यात घेणारे बिन सलमान स्वतः डोळे दिपवणाऱ्या ऐश्वर्यात जगतात. मात्र, सौदीत, सध्यातरी 'सबकुछ बिन सलमान' आहे. सौदी सिंहासनापासून पाऊलभरच लांब असणारे बिन सलमान यांचा हा मोठा विजय मानला जातो आहे. २४ तासातल्या या सर्व घडामोडी त्यांची निर्दयी सत्ता राबविण्याची तयारी आणि मानसिकता दाखवते. सौदी आणि सौदी बाहेरील सर्व घटक या प्रकरणाची नोंद घेतील याची काळजी त्यांनी घेतली आहे. येमेनमध्ये सौदी आणि इराण हे परस्पर विरोधी गटांना मदत करीत आहेत. गेली तीन वर्ष सुरु असलेल्या या लढाईत सौदीला अपयश आले आहे. येमेनमध्ये इराणचे वर्चस्व कमी करायचे म्हणून बिन सलमान यांनी सौदी अर्थव्यवस्था नाजूक असतानासुद्धा युद्धाचा घाट घातला. तो आता त्यांच्या अंगाशी येतो आहे. इराणशी जवळीक साधली म्हणून कतारवर बंदी घालून त्याची कोंडी करण्याचा बिन सलमान यांचा प्रयत्न फसला आहे. सेनापती म्हणून येमेन आणि कतारचा प्रश्न बिन सलमान यांचा पराभव दर्शवतो. या अटकसत्रासोबत त्याच दिवशी बिन सलमान यांनी लेबेनॉनचे पंतप्रधान साद हरीरी यांना सौदीमध्ये पाचारण करून राजीनामा द्यायला भाग पाडले. सुन्नी असलेले हरीरी लेबेनॉनमध्ये शिया असलेल्या 'हेजबोल्लाह' गटासोबत सरकार चालवीत होते. जमेल तिथे शियाबहुल इराणला चेपायला असा चंग बिन सलमान यांनी बांधलेला दिसतो आहे. त्यामुळे, इराक, सीरिया आणि येमेननंतर आता नव्या युद्धक्षेत्रात, लेबेनॉनमध्ये सौदी-इराण झुंजतील असा कयास आहे. लेबेनॉन आणि सौदीमध्ये एकाच वेळी खळबळ माजवून बिन सलमान यांनी आपला इराणविरोधाचा सूर वरच्या टिपेला नेऊन ठेवला आहे. येमेन, कतारचा प्रश्न ते आता कसे हाताळतात हे बघावे लागेल. बिन सलमान आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जॅरेड खुशनर बऱ्याच प्रश्नांवर एकत्र येऊ पाहत आहेत. हे दोघे आपापल्या देशातील सत्ताकेंद्राच्या जवळचे आणि अत्यंत विश्वासू मानले जातात. या दोघा तरुणांची युती पश्चिम आशियाच्या आणि जागतिक राजकारणाला नवे वळण लावेल, असे राजकीय जाणकार सांगतात.

बिन सलमान यांनी केवळ तीन वर्षात सौदी गादीवर अप्रत्यक्षपणे टाकलेली मांड आणि त्यांनी आपल्या स्पर्धकांच्या घडवलेल्या राजकीय शिकारीचा वेग थक्क करणारा आहे. सत्ता शहाणपण शिकवते असे म्हणतात. घरच्या आघाडीवर निरंकुश सत्ता मिळवलेले सौदी युवराज राज्याभिषेकाचा औपचारिक सोपस्कार लवकरच पार पाडतील. महत्वाकांक्षा वाढलेले बिन सलमान नंतर पश्चिम आशियाच्या प्रादेशिक नेतृत्वाच्या तयारीला लागतील असे स्पष्टपणे दिसत आहे. त्यांच्या दिमतीला समस्त सुन्नीबहुल देश, साम्य विचारसरणी असलेले संयुंक्त अरब अमिरातीचे तरुण नेते मोहम्मद बिन झाएद आणि ट्रम्प प्रशासन आहे. त्यामुळेच बिन सलमान यांचा वारू चौफेर उधळला तर नवल वाटून घ्यायचे कारण नाही. त्या पट्ट्यावर नेतृत्व करण्याचे स्वप्न पडलेले बिन सलमान पहिले पुढारी नाहीत. इजिप्तचे गमाल नासर, अन्वर सादात आणि सीरियाचे विद्यमान अध्यक्ष बशर अल-असद यांचे वडील हाफिज अल-असद यांना देखील असेच स्वप्न पडले होते. याच स्वप्नाच्या मोहासाठी त्यांनी आपापल्या देशाची खुर्ची ताब्यात घेताना भ्रष्टाचार विरोधाच्या पदराखाली आपल्या विरोधकांचा काटा काढला होता. बिन सलमान तोच जुना प्रयोग नव्याने रंगवत आहेत. त्यामुळेच, सत्ता त्यांना शहाणपण शिकवत आहे असे म्हणता येणार नाही. ते शिकण्याच्या मनस्थितीत पण नाहीत. लयाला गेलेली सौदी राज्यकर्त्यांची जुनी पिढी आणि नव्या पिढीतील संपवलेली स्पर्धा बिन सलमान यांच्या पथ्यावर पडली आहे. इतर बड्या सौदी राजपुत्रांना मिळणारा खुराक बंद करून भविष्यात येणारे सर्व घबाड आपल्याकडे राहील याची तजवीज त्यांनी चोखपणे केली आहे. राजकीयदृष्ट्या धूर्त असलेले बिन सलमान असा 'फुलटॉस' सोडणार नव्हतेच. या अटकसत्रात त्यांनी हे सिद्धच केले आहे. मात्र, व्यवस्थेतील सर्व संस्था आणि यंत्रणा एका माणसापुढे लोटांगण घालत आहेत हे वास्तव पश्चिम आशियातील सर्वंगीण परिस्थिती आणि तिचे जागतिक परिणाम पाहता भयावह आहे.

                                                                                                                                                                                       - वज़ीर

हा लेख, बुधवार ०८ नोव्हेंबर २०१७ रोजी 'सकाळ'च्या संपादकीय पानावर (पान ६) छापण्यात आला. 

No comments:

Post a Comment