Sunday, 2 July 2017

The Saudi Game of Thrones!

सौदीचे 'गेम ऑफ थ्रोन्स'!

     संरक्षणमंत्र्यानेच पुढे खुर्चीवर हक्क सांगावा अशा उदाहरणांची कमी नाही. सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ इब्न सौद यांनी आपला मुलगा मोहम्मद बिन सलमान याची युवराजपदी नेमणूक करून अजून एका उदाहरणाची भर घातली आहे. असे करताना, राजे सलमान यांनी युवराज आणि आपला पुतण्या असलेल्या मोहम्मद बिन नाएफ यांची सर्व पदे काढून घेतली. वयोवृद्ध असणाऱ्या राजे सलमान यांच्यामार्फत मोठे निर्णय घेणाऱ्या बिन सलमान यांचे गेली दोन वर्ष महत्त्व वाढत होते. संरक्षणमंत्री आणि उपयुवराज म्हणून देखील त्यांनी काम पहिले आहे. ऐन रमजान ईदच्या तोंडावर त्यांची झालेली बढती अभिप्रेत आणि त्यांच्या गटासाठी आनंदनीय आहे. आता युवराज म्हणून जाहीर झालेल्या ३१ वार्षिय बिन सलमान यांच्या कार्यशैली आणि दूरदृष्टीबाबत अनेक प्रवाद आहेत. मात्र, ही नेमणूक त्यांच्या कामगिरीवर आधारलेली नसून, या नेमणुकीला सौदी राजघराण्यांतर्गत आणि प्रादेशिक राजकारणाची छटा आहे.

सौदी राजाची आणि अमेरिकेची मर्जी असल्यास, सौदी युवराजाला सिंहासन ताब्यात घ्यायला मदत होते. बिन सलमान हे उपयुवराज असताना त्यांनी याची विशेष काळजी घेत युवराज असणाऱ्या बिन नाएफ यांची राजकीय कोंडी केली. बिन नाएफ सौदीतील गुप्तचर विभाग आणि अंतर्गत कारभार पाहत होते. दहशतवादाला पायबंद घालणारे सौदी नेते म्हणून त्यांचे प्रस्थ मोठे आहे.
(L-R) Mohammad Bin Salman and Mohammad
Bin Nayef.
Image credit - Google
मुत्सद्देगिरीचा पिंड असणारे बिन नाएफ हे वॉशिंग्टनचे 'डार्लिंग' समजले जातात. पश्चिम आशियातील गुंतागुंतीच्या प्रश्नांबाबत ते सामंजस्य दाखवतात. मात्र आक्रमक असणारे बिन सलमान यांना इराणशी उघड आणि थेट वैर घेण्यात स्वारस्य आहे. येमेन, सीरिया आणि इराकमधील सौदीची भूमिका इराण विरोधी राहिली आहे. ट्रम्प सरकार इराणची कोंडी करू पाहत आहे. तसेच, संयुक्त अरब अमिरातीचे युवराज मोहम्मद बिन झाएद आणि बिन नाएफ यांचे सख्य नाही. या सर्वांना बिन नाएफ यांचा जाच वाटत होता. त्यांना पदावरून हटविण्यात बिन झाएद यांचा निर्णायक वाटा आहे. कारण, अमेरिकेत बिन सलमान नवखे समजले जातात. त्यांच्या पारड्यात 'व्हाईट हाऊस'चे वजन ओतण्यास बिन झाएद यांनी मदत केली. डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्या-आल्या तत्कालीन अध्यक्ष बाराक ओबामांना पत्ता न लागू देता बिन झाएद यांनी ट्रम्प यांच्या विश्वासू सहकाऱ्यांची वॉशिंग्टनमध्ये भेट घेऊन बिन सलमान यांच्या राजकीय बढतीची तजवीज केली. त्यानंतर झालेल्या सर्व चर्चांमध्ये बिन नाएफ यांना डावलण्यात आले होते. या निर्णयाने मोहम्मद बिन नाएफ यांची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे. त्यांच्या गटाच्या सर्व लोकांची महत्त्वाची पदे आता बिन सलमान गटाच्या ताब्यात आहेत. मागच्या महिन्यात, ट्रम्प यांनी सौदीला भेट देऊन बिन सलमान यांच्या युवराज म्हणून बढतीला जणू दुजोराच दिला. यामुळेच, बिन सलमान आणि बिन झाएद यांचा वारू चौफेर उधळू पाहतो आहे.


आपापल्या देशाचे युवराज असणारे बिन झाएद आणि बिन सलमान यांच्या धोरणांना आता धार चढेल. येत्या काळात या दोघांनी धक्कादायक निर्णय घेतल्यास नवल वाटायला नको. हे करत असतानाच, आपला शत्रू असणाऱ्या इराणला खिंडीत कसे पकडता येईल याचे सर्व प्रयत्न ते करतील. त्यांच्या सुदैवाने, डोनाल्ड ट्रम्प हे इराण विरोधाची भाषा करीत आहेत. त्यामुळेच, ट्रम्प यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी बिन सलमान आणि बिन झाएद जुळवून घेत आहेत. पश्चिम आशियात वचक आणि वरचष्मा ठेवण्याच्या मनसुब्याने बिन सलमान आणि बिन झाएद यांना एकत्र आणले आहे.   त्यांची ही जोडगोळी पुढील काळात भीतीदायक ठरणार असल्याचे त्यांनी आपल्या प्राथमिक हालचालींमधून सूचित केले आहे. त्यांनी कतारसोबतचे सर्व संबंध तोडून या प्रदेशाला नव्या धोरणाचा पहिला झटका दिला. मात्र, दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा आरोपावरून कतारची कोंडी केल्यामुळे सौदीचे कौतुक करणाऱ्या अमेरिकेने मागील आठवड्यात कतारला १२ अब्ज डॉलरची लढाऊ विमाने विकून आपला नेहमीसारखा दुहेरी डाव दाखवून दिला आहे.
(L-R) King Salman and Mohammad Bin Salman.
Image credit - Google
सीरियातील बशर अल-असद राजवटीला सौदीचा विरोध असून, सौदीला असद यांना सत्तेवरून हटवायचे आहे. रशिया आणि इराणच्या पाठिंब्याच्या जोरावर खुर्ची शाबूत राखणाऱ्या असद यांना खाली खेचण्यासाठी आता बिन सलमान आणि बिन झाएद कोणते फासे फेकतात हे पाहणे गरजेचे आहे. भारतीय कामगार मोठ्या संख्येने या प्रदेशात काम करतात. त्यांना आणि ते मायदेशात पाठवत असलेल्या चलनाला या घडामोडींचा त्रास होणार नाही याची दक्षता मोदी सरकारला घ्यावी लागेल. तसेच, भारत याच देशांवर तेलासाठी अवलंबून असल्यामुळे, सर्व घटकांशी जुळवून घेत, कोणा एकाच्या गोटात न जाता, आपली भूमिका सावधपणे मांडताना दिसत आहे.आता कुठे 'आयसिस'विरोधी लढ्याला जरा आकार येत असताना, इराण विरोधात सौदी आणि अमिरातीचे कान भरत अमेरिका एकप्रकारे पश्चिम आशिया नव्याने पेटवू पाहत आहे. याच 'आयसिस'च्या वाढीसाठी अमेरिकेने आणि सौदीने बक्कळ पैसे ओतला आहे. कुर्दिश गटाला इराक, सीरिया आणि तुर्कस्तान सरकारशी दोन हात करण्यास मदत करून, स्वतंत्र कुर्दिस्तानच्या कुर्दिश गटाच्या मागणीला अमेरिकेचीच फूस आहे. परस्पर विरोधी गटांना झुंजत ठेवणाऱ्या अमेरिकेकडून शांततेची अपेक्षा ठेवण्यात शहाणपण नाही. अमेरिकेच्या याच भूमिकेचा आपल्याला फायदेशीर असलेले धोरण राबवणारे बिन सलमान आणि बिन झाएद डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.जेमतेम अडीच वर्षात राजकीय पटलावरचा नवखा खेळाडू, सौदी सारख्या महत्त्वाच्या देशाच्या सिंहासनाच्या एक पाऊल लांब येऊन ठेपतो ही दिसते तितकी सरळ बाब नाही. यासाठी मुत्सद्देगिरीचा मोठा कस लागला आहे. या नेमणुकीला संयुक्त अमिराती आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अनुकूलता आहे. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिकेच्या पश्चिम आशियातील ताज्या हालचाली या इराण विरोधात ते आखत असलेल्या डावाचे स्पष्टपणे संकेत देत आहेत. बिन सलमान यांची युवराजपदी झालेली नेमणूक याच डावाचा एक भाग आहे. ते सौदी अरेबियातील तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करतात. ते बोलून दाखवत असलेली नवी धोरण आणि विविध विषयांवरची मते आकर्षक जरी वाटत असली, त्यांच्या मतांना विचारांची आणि कृतीची पक्की मांड नाही.
Saudi Arabia's Crown Prince Mohammad Bin Salman.
Image credit - Google
येमेनमध्ये दोन वर्ष संघर्ष सुरु असूनसुद्धा, अजून आवाक्यात न आलेले राजकीय यश त्यांची सेनापती म्हणून असलेली मर्यादा उघडपणे दाखवतो. मात्र, त्यांचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, धोरणात्मक अंग आणि राजकीय आकलन पाहता ते आपल्या मर्यादांवर संयतपणे विचार करतील अशी अशा नाही. या तरुण नेत्याकडे आपले मनसुबे राबवायला आता भरपूर वेळ आणि बळ आहे. या बळाला अमिराती आणि अमेरिकेचा सर्वतोपरी पाठिंबा आहे. याचा उपयोग ते इराणला ठेचण्यासाठी करतील. तशी जाहीर भूमिका त्यांनी घेतलीच आहे. आक्रमक बिन सलमान पश्चिम आशियातील हिंसेला सढळ हातभार लावत या प्रदेशाच्या भविष्यकाळाला कठीण वळण देतील असा होरा आहे. प्रसंगी सौदी आणि इराण समोरासमोर येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. कतारला चेपण्यासाठी त्यांनी आधीच पाऊले उचलली आहेत. या सगळ्यासाठी त्यांना घरच्या आघाडीवर शांतता आणि हाती निरंकुश सत्ता असणे गरजेचे होते. तसे त्यांनी घडवून आणले. यामुळेच, राज्याभिषेकाची फक्त औपचारिकता बाकी ठेवत आणि मोहम्मद बिन नाएफ यांची राजकीय शिकार करीत, मोहम्मद बिन सलमान यांनी तूर्तास तरी या सौदीच्या 'गेम ऑफ थ्रोन्स' चा अथाध्याय जिंकलेला आहे.


                                                                              - वज़ीर 

हा लेख, रविवार दिनांक २५ जून २०१७च्या 'महाराष्ट्र टाइम्स'च्या पान १४वर छापण्यात आला. 

No comments:

Post a Comment