Saturday, 1 July 2017

The Qatar crisis - a disputed and disturbed Middle East

राजकीय महत्त्वाकांक्षेतून आखातात भडका


     शेजारील अरब देशांसोबत बंधुता रुजल्याचा भास आखातात नेहमीच होतो. त्याचा प्रत्यय नुकताच पुन्हा आला.कतार या लहानश्या देशासोबत सौदी अरेबियासकट नऊ देशांनी संबंध तोडले. बहारीनने कतारसोबतच्या सर्व व्यापारिक, राजकीय आणि दळण-वळणाच्या वाटा बंद केल्या. बहारीनचीच तळी मग सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्तने उचलली. वरकरणी एकाएकी वाटणाऱ्या या निर्णयाच्या आड खोलवर रुजलेले राजकारण आहे. 

आखातातून सगळ्यात जास्त तेल निर्यात करणारा देश म्हणून सौदीचा मान मोठा आहे. तसेच, सौदीत मक्का आणि मदिना ही दोन महत्त्वाची श्रद्धास्थळ आहेत आणि सौदी सुन्नीपंथीय देशांचा मेरुमणी असल्याने या प्रदेशातील सर्व सुन्नीबहुल देशांनी सौदीला अनुकूल असणारे धोरण राबविण्याचा सौदीचा आग्रह असतो.
(L-R) UAE Crown Prince Mohammad Bin Zayed and
Saudi Deputy Crown Prince Mohammad Bin Salman.
Image credit - Google
कतार, सौदीच्या या अपेक्षेला अपवाद ठरला आहे. कतारचे सध्याचे राजे तमीम बिन हमद अल-तहनी हे सौदीशी फटकून वागताना दिसतात. कतारकडे द्रवरूपातील नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत. याचमुळे लहान असूनसुद्धा कतार श्रीमंत देश गणला जातो. प्रतिडोई उत्पन्नाच्या बाबतीत अव्वल देशांच्या पंक्तीत कतारचे स्थान आहे. २०१३ साली गादी ताब्यात आलेले तमीम बिन हमद हे वास्तवाचे भान ठेवत कारभार हाकतात. सुन्नीबहुल असूनसुद्धा त्यांनी शियाबहुल इराणशी सलोख्याचे संबंध ठेवले आहेत. हे संबंध फक्त राजकीय नसून त्यांना अर्थकारणाची किनार आहे. सौदीला कतारच्या अशा स्वतंत्र धोरणाचा जाच वाटतो. इराणला खिंडीत गाठू पाहणाऱ्या सौदीला कतारचे इराणसोबत असलेले चांगले संबंध रुचत नाहीत. 
तीच गोष्ट संयुक्त अरब अमिरातीची. तसेच, कतार हा 'मुस्लिम ब्रदरहूड' संघटनेचा पाठीराखा आहे. वादग्रस्त इतिहास असलेली ही संघटना आपल्या सिंहासनाला नख लावेल अशी भीती सौदी आणि संयुक्त अमिरातीला आहे. त्यामुळेच या सर्व देशांनी दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे कारण पुढे करत कतारवर बहिष्कार घातला. रोज लागणाऱ्या जवळपस सर्व वस्तूंचीआयात कतार करतो. ते सगळ बहिष्कारामुळे थांबल्याने ऐन रमजान महिन्यात कतारमध्ये अन्नपुरवठा कमी पडत असल्याचे चित्र आहे. 

मागील महिन्यात डोनाल्ड ट्रम्प सौदी भेटीवर गेले असताना त्यांनी सौदीसोबत अमेरिकेचे ताणलेले संबंध पुन्हा जुळवायचा प्रयत्न केला. तसेच ५०हुन अधिक सुन्नी देशांची मोट बांधत इराण आणि दहशतवादाला आवरण्याचे आव्हान सर्वांना केले. त्यांच्या भूमिकेचा सोयीस्कर अर्थ लावत सौदीने आपल्या वाटेत आडव्या येणाऱ्या कतारची अडचण केली आहे. हे करताना सौदीला आपला पाईक असणाऱ्या बहारीनची मदत मिळाली. सौदीत राजे सलमान यांच्यामार्फत मोठे निर्णय घेणारे उपयुवराज मोहम्मद बिन सलमान आणि संयुक्त अमिरातीचे युवराज मोहम्मद बिन झाएद हे आपल्या विरोधकांचा काटा काढण्याच्या उद्देशाने आता एकत्र येऊ लागले आहेत. हे करतानाच त्यांनी ट्रम्प यांचे जावई जॅरेड खुशनेर यांच्याशी पदर जुळवून घेतला आहे. पश्चिम आशियातील अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ कतारमध्ये आहे. तो तळ संयुक्त अमिरातीत हलवण्याचा डाव बिन झाएद खेळत आहेत. या तळाचा आणि तिथे वास्तव्यास असलेल्या सुमरे अकरा हजार अमेरिकी सैनिकांचा विचार न करता कतारवर बहिष्कार घालून दहशतवादाला पायबंद घातला म्हणून ट्रम्प सौदीचे कौतुक करत आहेत. कतार हा अमेरिकेचा आखातातील जवळचा आणि विश्वासू साथीदार मानला जातो.
(L-R) Qatar's Emir Tamim Bin Hamad al-Thani and
U.S President Donald Trump.
Image credit - Google
सीरियातील 'आयसिस'च्या स्वयंघोषित राजधानी असलेल्या रक्कावर आता सुरु झालेल्या हल्ल्यात अमेरिकेला याच तळाची मदत होणार आहे. ट्रम्प मात्र याची पर्वा न करता कतारची अडचण वाढवू पाहत आहेत. असे करतानाच, ज्या सौदीच्या रसदीवर 'आयसिस'चा डोलारा उभा राहिला त्याच्याकडे ट्रम्प सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. दोन्ही गटांना समान अंतरावर न ठेवता एकाची बाजू घेऊन ट्रम्प सौदीच्या हिंसक राजकीय आकांक्षेला स्फुरण चढवत आहेत. कतारवरील बहिष्काराचा प्रश्न न सुटल्यास कतार आणि इराणचे संबंध अधिक वृद्धिंगत होण्याचा धोका ट्रम्प यांना पत्करावा लागेल. चीन आणि रशियासोबत देखील कतारचे चांगले संबंध आहेत. कतार आर्थिकदृष्ट्या भक्कम देश असून त्याची 'सिमेन्स', 'वोक्सवॅगन' आणि जगभरातील इतर नावाजलेल्या व्ययसायांमध्ये भरघोस गुंतवणूक आहे. ट्रम्प यांनी ५०हुन अधिक सुन्नीबहुल देशांच्या 'अरब नाटो'ला प्रारूप देऊन एक महिनादेखील उलटत नसताना कतारसारखा आर्थिक, भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा भिडू इराणच्या गोटात गेल्यास पश्चिम आशियाचा राजकीय समतोल बिघडण्याचा धोका नक्कीच वाढेल.  


वाढती राजकीय महत्त्वाकांक्षा हा सत्ताकारणाचा घटक आहे. निरंकुश सत्ता आणि नेतृत्वाचे वारे कानात शिरले असताना, सामरिक विचार करून धोरण राबवणे फार कमी नेत्यांना जमते. मोहम्मद बिन सलमान आणि मोहम्मद बिन झाएद हे आपापल्या देशांचे तरुण नेते कतारच्या तितक्याच तरुण तमीम बिन हमद यांना टक्कर देऊ पाहत आहेत. त्यांच्या या आक्रमक पवित्र्याला ट्रम्प यांच्या एकांगी दृष्टीकोनाच्या पाठिंब्याची जोड आहे. मात्र, असा लंगडा पाठिंबा म्हणजे अमेरिकेकडून मिळालेला कोरा 'चेक' असल्याच्या थाटात बिन सलमान आणि बिन झाएद आपले मनसुबे राबवू पाहत आहेत. अविश्वासार्ह अमेरिका आणि तितकेच बेभरवशी असलेले ट्रम्प यांच्या पदराच्या आडून आपला शेजार पेटत ठेवणे या दोघांच्या अंगाशी येऊ शकतो. सौदी आणि संयुक्त अरब अमिराती या दोन नावाजलेल्या देशांकडून संवेदनशील असलेल्या पश्चिम आशियात सलोखा प्रस्थापित करणे अभिप्रेत आहे. आधीच तापलेल्या पश्चिम आशियात वैर आणि नवे संबंध सत्यात उतरवत असताना, हे दोघे बदलत्या जागतिक संदर्भांची आणि घडामोडींची जाणीव ठेवत फक्त व्यावहारिक फायदा-तोटा पाहतील अशी अपेक्षा आहे. सांप्रत काळातील मात्र त्यांचा आवेग पाहता ते असे सामंजस्य दाखवणार नाहीत असे ठळकपणे दिसते. 



                                                                              - वज़ीर 

हा लेख, गुरुवार दिनांक १५ जून २०१७ च्या 'सकाळ'च्या संपादकीय पानावर छापण्यात आला. (पान ६)

No comments:

Post a Comment