अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने गेला आठवडा तुलनात्मकरीत्या तसा थंड गेला. अलास्का, हवाई आणि अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या वॉशिंग्टन या तीन राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाची प्राथमिक फेरी पार पडली. तुलनेने लहान असलेल्या या राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या बर्नी सॅनडर्स यांनी स्वपक्षीय हिलरी क्लिंटन यांच्यावर सपशेल बाजी मारली. या निवडणुकीचा एकंदरीत कल पाहता डेमोक्रॅटिक पक्षाच्या श्वेतवर्णीय मतदारांची पसंती सॅनडर्सना तर आफ्रिकी-अमेरिकी मतदारांची पसंती हिलरींना लाभत आहे. अमेरिकेत प्रतिनिधी निवडीतून अंतिमतः आपल्या पक्षाकडून अधिकृतरित्या राष्ट्राध्यक्षपदाकरिता उमेदवारी मिळते. रिपब्लिकन पक्षात अजूनही जॉन केसेक, टेड क्रुझ आणि डोनाल्ड ट्रम्प उमेदवारीसाठी आपला शड्डू ठोकून आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षात सुरु असलेल्या तिरंगी लढतीमुळे रिपब्लिकन मते विभागली गेली आहेत. प्राथमिक फेरीतून प्रतिनिधी आपल्याकडे खेचायची शर्यत आता जोमात सुरु आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीसाठी २३८३ प्रतिनिधींचे तर रिपब्लिकन पक्षाकडून १२३७ प्रतिनिधींचे बहुमत लागते.
(L-R) Donald Trump(R), Hillary Clinton(D), Ted Cruz(R) Bernie Sanders(D) Image credit - Google |
मात्र, आघाडीवर असणारे हिलरी आणि ट्रम्प आपली आघाडी टिकवत, प्रश्न मांडताना, एकमेकांशी तात्विक मुद्द्यांवर भांडताना, आपल्या भविष्यकालीन योजना ठासावताना अजिबत दिसत नाहीयेत. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकिचा भूतकाळ पाहता, तेथील प्रचार फेऱ्यांमध्ये एकमेकांवर केल्या जाणाऱ्या चिखलफेकीला सभ्य मर्यादा नसते. त्यामुळेच, इच्छुकांचा आणि उमेदवारांचा चिखलफेकीचा हा सूर थेट त्यांच्या आर्थिक लागेबंधात, प्रेमप्रकरणांमध्ये, परदेशी गुतंवणूक आणि इतर संवेदनशील वैयक्तिक मुद्द्यांचा आधार घेत प्रचाराची व्याप्ती आणि परिसीमा भलत्या दिशेला नेतो हे उभ्या इतिहासाने पहिले आहे. यंदासुद्धा अश्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. सतत माध्यमकेंद्री वक्तव्य करणाऱ्या ट्रम्प यांनी या गोष्टीचे नमन सुरु केले आहे. एकाही समस्येचे ठोस राजकीय आणि सामाजिक धोरण नसताना मतदारांना आकृष्ट करण्यासाठी वाचाळ आणि राष्ट्रभावनेला हात घालणारे मुद्दे फायद्याचे असतात हे ते पुन्हा एकदा सिद्ध करत आहेत. आणि दोन्ही पक्षातले सर्व उमेदवार हीच री ओढत आपल वेगळेपण जपण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. ब्रुसेल्स हल्ल्यानंतर मुस्लिमांवर बंदीची भाषा, गर्भपात आणि समलैंगिक विवाह कायदा या गोष्टी जणू इतर सर्व प्रश्नांपेक्षा अधिक महत्त्वाचे असल्याचे या सर्वांकडून भासवले जात आहे. उमेदवारीच्या अधिकृत घोषणेनंतर ही टीका अजून भयंकर टप्पा गाठेल असे स्पष्टपणे दिसत आहे.
Image credit - Google |
आणि म्हणूनच, हेकेखोर असणारे डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन हे त्यांची भूमिका आणि राजकीय इतिहास पाहता जागतिक राजकारणाच्या पटलावर भयावह चित्र निर्माण करू शकतात. जागतिक पातळीवरचे न सुटलेले प्रश्न अधिक जटील होत असताना आपल्या भावी धोरणांमुळे कमी, पण भूतकाळातल्या घटनांत अधिक न्हाऊन निघालेले हे दोघेही म्हणूनच सांप्रत काळातल्या अमेरिकेच्या धासळलेल्या प्रतिमेचे प्रतिक आहेत.
- वज़ीर
हा लेख रविवार, दिनांक ०३ एप्रिल २०१६च्या 'सकाळ' मध्ये चालू घडामोडी सदरात (पान १०) छापण्यात आला.
No comments:
Post a Comment