'आयसीस'चा बिमोड करण्याच्या रणनीतीने सीरियामध्ये हवाई हल्ले करणाऱ्या रशियाने सुमारे सहा महिन्यांनंतर आपलं सैन्य सीरीयातून माघारी बोलवत असल्याचे जाहीर केले. झटपट निर्णय आणि राजकीय धोरणांची कुठेही वाच्यता न करणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे अश्या कावेबाज हालचालींच्या समयसूचकतेसाठी प्रसिद्ध आहेत.
गेली पाच वर्ष सीरीयामधल्या अस्थिर वातावरणात, पुतिन यांनी सप्टेंबर २०१५ पासून सुरु केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे तणाव वाढला. मात्र तब्बल २० वर्षांनतर आखतात पाय ठेवणाऱ्या रशियाने जागतिक स्तरावर याची काय प्रतिक्रिया उमटेल याचा जास्त विचार न करता आपली भूमिका मांडायची ही संधी दडवली नाही. सीरीयामध्ये सैन्य धाडायचा अथवा माघारी बोलवायचा रशियाचा हा निर्णय जरी वरकरणी घाईत घेतलेला वाटत असला तरी तो अविवेकी नक्कीच नाही. अमेरिकेच्या तालावर आणि भूमिकेवर टांगून राहिलेल्या सीरियाच्या प्रकरणात पुतिन यांनी आपल महत्त्व सिद्ध केलंय.
|
Syrian President Bashar al-Assad (L) &
Russian President Vladimir Putin (R)
at The Kremiln, Moscow, Russia in 2015.
Image credit - Google |
अगदी ऑगस्ट २०१५ पर्येंत विरोधी फौजांविरुद्ध लढत असताना नाकी नऊ आलेल बशर अल-असद यांच प्रशासन, पुतिन यांच्या थेट पाठींब्यावर आता विरोधकांना पुन्हा एकदा लढाईत मात देत आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात 'फ्री सीरियन आर्मी'च्या रुपात एकवटलेले हत्यारबंध विरोधक, त्यांना रसद पुरवणारा अमेरिकी गट, 'अल-कायदा'ला समर्थन करणारी सीरीयामधील 'जब्हत अल-नुस्रा' आणि 'आयसीस' हे या भांडणातले चार महत्वाचे घटक असताना केवळ ६ महिन्यांच्या थेट लढाईत भाग घेऊन पुतिन यांनी या सर्व घटकांना पिछाडीवर फेकले आहे. 'आयसीस'ला ठेचत असतानाच, त्यांनी असद यांच्या विरोधकांवर जोरदार हवाई हल्ले करत त्यांच्या विरोधाची धार बोथट केली आहे. हे करत असताना त्यांनी असद यांच्या मागे भक्कमपणे उभे राहत सीरियाच्या हवाई आणि नाविक तळांवर आपल्या सैन्याचा तळ ठोकला. बराक ओबामांची सीरियाच्या बाबतीतली भूमिका संशयास्पद, मिळमिळीत, आणि वेळकाढू राहिली आहे. पुतिन यांच्या मध्यस्थिने ओबामा प्रशासन या प्रश्नाच्या मध्य-बिंदूवरून बाजूला सरकले गेल्याचे चित्र आत्ता दिसत आहे.
सप्टेंबर २०१५ आधी रशियाचे युक्रेन आणि क्रिमियावरून अमेरिका आणि युरोपीय देशांसोबतचे संबंध ताणले गेले होते. रशियाचे अर्ध्याहून अधिक उत्पन्न हे या युरोपीय देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या तेलावर अवलंबून आहे. युक्रेन प्रश्नाचा आधार घेत अमेरिकेने निर्बंध घालत रशियाच्या या उत्पन्नाला नख लावल. सीरियाचे टारटस बंदर हे मध्य-पूर्व आशियामध्ये जाण्याचे कवाड आहे आणि म्हणून रशियन नाविक तळ असलेल्या त्या बंदराचे महत्त्व ओळखून असलेल्या पुतिन यांनी सीरीयामध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला. आखातात या नव्या युगातील लोकशाही स्थापन करू पाहणाऱ्या अमेरिकेने जर सीरियातील बशर अल-असद यांचे सरकार उलथवून लावले तर आपले आखतात स्थान राहणार नाही हा विचार देखील पुतिन यांनी करून या प्रश्नात उडी घेतली.
|
U.S President Barack Obama (L) &
Russian President Vladimir Putin. (R)
Image credit - Google |
सबंध युरोपला आता डोकेदुखी ठरू पाहणारे, मध्य-पुर्वेतले निर्वासितांचे लोंढे हे याच राळ उडवणाऱ्या सीरियन युद्धाचे परिणाम आहेत. 'आयसीस' आणि असद विरोधकांना आवरत असताना आपण सीरियात असद यांच्या मदतीने स्थैर्य निर्माण करू आणि युरोपकडे जाणारे हे निर्वासितांचे लोंढे थांबवू असा विश्वास या युरोपीय देशांना पुतिन यांनी दाखवला आहे. इतके दिवस अमेरिकी पर-राष्ट्र धोरणाची तळी उचलल्यामुळे काय परिणाम भोगावे लागतात हे आता युरोपच्या लक्षात पॅरिसवरील हल्ल्यानंतर अधिक प्रकर्षाने लक्षात येऊ लागले आहे. पॅरिस हल्ल्यानंतर देखील फ्रान्सच्या खांद्याला खांदा लावत 'आयसीस'च्या तळांवर केलेल्या हल्ल्यामुळे पुतिन यांनी आपली प्रतिमा या युरोपीय राष्ट्रांसमोर उंचावली आहे. येत्या काळात रशियन तेल या राष्ट्रांना विकायला त्यांना हिच प्रतिमा फायद्याची ठरणार आहे. विरोधकांना चेपण्यात असद यांनी देखील आपल्याला गृहीत धरू नये असा पुतिन यांचा होरा दिसतो. असा सर्वांगी विचार करतानाच, सीरियन प्रश्नावर जिनिव्हा येथे होणाऱ्या शांतता फेरीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी रशियन सैन्याची माघार जाहीर करत आपण या शांततेत मोलाचा वाटा उचलल्याचे दाखवून दिले आहे. एका दगडात अनेक पक्षी मारताना पुतीन यांनी इथून पुढे आखतात होणाऱ्या सर्व घडामोडींमध्ये आपला सहभाग बेमालूमपणे नोंदवला आहे. मध्य-पूर्वतील कोणताही निर्णय घेताना अमेरिका, युरोप आणि अरब राष्ट्रांना आता रशियाचा विचार करावा लागेल ही तजवीज करून ठेवत रशियाने काढता पाय घेतला आहे.
हे करत असतनाच रशिया आपल्या काही तुकड्या मागे ठेवेल हे सांगायला ते विसरले नाहीत. या तुकड्या त्या पट्ट्यावर एकूणच दबाव राखायला आणि वेळ पडल्यास पुन्हा युद्धभूमीत उतरवायला पुतिन मागेपुढे पाहणार नाहीत. टर्कीने पाडलेले रशियन लढाऊ विमान आणि टर्कीच्या दुटप्पी भूमिकेचा वचपा पुतिन काढतील असे स्पष्टपणे दिसते. मात्र 'नाटो'चा सदस्य असणाऱ्या टर्कीबाबत निर्णय घेताना आपली तिरकी चाल चुकणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. पुतिन यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या भोवती आता मध्यपूर्वेबाबत असलेल्या विचारांच्या प्रवादाने फेरा घातला आहे. धक्कातंत्राचा चो
ख वापर करून या वर्तमान समस्येच्या सर्व दिशांना स्पर्श करत, राजकीय समयसूचकता ही आपली खासियत असल्याचे पुतिन यांनी सिद्ध केले आहे.
|
Image credit - Google |
सीरियाचे रण तापलेले असताना येत्या काळात या पेटलेल्या मध्य-पूर्व आशियामध्ये नव्या अडचणींची आणि त्यांना अनुसरून जन्माला येणाऱ्या नव्या समीकरणांची शक्यता नाकारता येत नाही. नव्या अमेरिकी राष्ट्रप्रमुखाला देखील क्षितिजावर दिसणाऱ्या या प्रकरणाचा आणि पुतिन यांच्यासारख्या प्रस्थापित विरोधकाचा सामना करायचा आहे. तूर्तास मात्र, या:क्षणी तरी या प्रदेशातल्या सर्व प्रश्नांच्या मोळीची दोरी पुतिन यांनी आपल्या हातात ठेवत संबंधित राष्ट्रांना आपल्या स्वतंत्र राजकीय आकलनाचा आणि धोरणांचा गर्भित इशारा दिला आहे.
हा लेख मंगळवार, दिनांक २४ मार्च २०१६च्या 'सकाळ' मध्ये संपादकीय पानावर, 'दृष्टीकोन' सदरात (पान ६) छापण्यात आला.
No comments:
Post a Comment