आज (११ सप्टेंबर) अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याला १४ वर्ष पूर्ण होत आहेत. ओसामा बिन लादेन आणि त्याच्या अल-कायदाचं नाव ज्याच्या त्याच्या तोंडी आणणाऱ्या या हल्ल्याची भीषणता आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला एकविसाव्या शतकाच्या नमनालाचं धक्का देणारी ही घटना येणाऱ्या कित्येक शतकांना दहशतीची चुणूक दाखवत राहील. पण कधीकाळी अल-कायदा या नावाने थरकाप उडवणाऱ्या त्या दहशतवादी संघटनेची आज दयनीय अवस्था झाली आहे. जवळपास २ तपं अन्य छोट्या-मोठ्या दहशतवादी संघटनांचं पेव फुटत असताना अल-कायदा मात्र या सर्वांमध्ये एखाद्या शिरोमणीप्रमाणे आपलं वेगळेपण जपत, आपलं बस्तान बसवत आली आहे. अल-कायदा म्हटलं की डोळ्यासमोर फक्त ओसामा बिन लादेन तरळतो पण, थोडा बारकाईने अभ्यास केल्यास बिन लादेन सोडून अनेक व्यक्तींनी या संघटनेच्या
उभारणीत आपलं भरीव योगदान दिलं हे विसरून चालणार नाही. प्रचंड मोठं जाळं आणि कट्टरता ठासून भरलेली ही संघटना आता वृद्धापकाळाकडे झुकत आहेत.
फ्रांसमधील 'शार्ली हेब्दो' या नियतीकालावर हल्ला केल्यानंतर तब्बल एका आठवड्याने त्याची जबाबदारी अरबी द्वीपकल्पातील अल-कायदाने (AQAP) स्वीकारली. ही गोष्ट जानेवारी २०१५ मधील. त्यानंतर अल-कायदा बातम्यांमधून गायब आहे. बिन लादेन जिवंत असेपर्येंत या संघटनेच्या हालचाली होत होत्या. प्रसिध्दीपत्रके, फतवे, चित्रफिती समर्थकांपर्येंत आणि जगासमोर आणली जात होती. संघटनकार्याची धोरणं आणि माहितीचा हा ओघ लादेनचा खात्मा केल्यानंतर एकदम थांबला. या गोष्टीला फक्त लादेन पैगंबरवासी होणे हेच कारण नाहीये तर इतर अनेक घटक अल-कायदाच्या या मंदावलेल्या हालचालीला कारणीभूत आहेत.
लादेननंतर सूत्र स्वतःकडे घेतलेल्या अयमान अल-जवाहिरी या ६४ वर्षीय नेत्यासमोर अनेक आव्हानं उभी आहेत. ओबामा प्रशासनाने अविरहित सुरु ठेवलेले ड्रोनहल्ले, या हल्ल्यांमुळे काही प्रमाणत 'दिसेल-तिथे-ठेचा' या भूमिकेने अमेरिकी यंत्रणांची होणारी आगेकूच यामुळे जवाहिरीसकट अल-कायदाचे प्रमुख सेनापती जणू भूमिगत झाले आहेत. धर्माच्या नावाखाली अल-कायदाची अभूतपूर्व आणि पद्धतशीरपणे मोहिनी घालून लाखो तरुणांची माथी जिहादसाठी भडकवणारा आणि यामुळे अनेक राष्ट्रांपुढील मोठं दुखणं असलेला अन्वर-अल-अवलाकी याला सप्टेंबर २००१मध्ये अमेरिकेने संपवलं.
इराकमध्ये अल-कायदा वृद्धिंगत करणारा आणि इंटरनेटमुळे ती फोफावणारा अबू मुसाब अल-जरवाकी याचा २००६ झालेला खात्मा, २०११मध्ये छापा घालून ठार केलेला ओसामा बिन लादेन. लादेननंतर वाढलेले ड्रोनहल्ले आणि जवाहिरीच्या थंडावलेल्या हालचालीमुळे मध्यंतरी संघटनेचे निर्णय येमेनमधील अल-कायदाचा संस्थापक नसीर अल-वूहायीशी घेत होता. १९९० ते २००१ पर्येंत बिन लादेनसोबत असणारा नसीर आणि जवाहिरीचे संबंध उत्तम होते. त्याच्याच पुढाकाराने सोमालियामध्ये स्थापन करण्यात आलेल्या 'अल-शबाब'ला जवाहिरीने पुढे अल-कायदाच्या पंखाखाली घेतले. जवाहिरीची युद्धप्रदेशामधील सर्वच बाबतीत जाणवणारी कमी नसीर भरून काढत होता. अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी आपली पहिली निष्ठा नसीरच्या चरणी वाहिली होती. नसीर आपलं नेतृत्व पणाला लावून अल-कायदा पुढे रेटतोय असे दिसत असतानाचं एका ड्रोनहल्ल्यात अमेरिकेने त्याला जून २०१५ मध्ये यमसदनी धाडले. अल-कायदा समर्थक संघटनांचा एक गट असलेल्या 'खोरासान' गटाचा नेता मुहसीन अल-फद्ली याचा जुलै २०१५ मध्ये झालेला मृत्यू असे एका पाठोपाठ एक मोठे धक्के आणि या परिणीतीमुळे अल-कायदा एकदम पिछाडीवर फेकली गेली. याच सुमारास अल-कायदा फोडून तयार झालेली आयसीस, तिची आश्चर्य वाटावी इतक्या कमी वेळात पसरलेली जबरदस्त दहशत आणि रसदीचा पुरवठा खुंटल्यामुळे होणारी कुचंबणा यात अल-कायदा अडकली. जवाहिरी सिरीयामध्ये पाठवलेल्या आपल्या साथीदारांना 'आयसीस' लक्ष्य करत आहे. अल-कायदाच्या वरिष्ठ नेत्यांना थेट बॉम्बहल्ल्यात हलाल केलं जात आहे. म्हणूनच पाकिस्तानात बसून इराकमधील सैनिकांशी तुटलेला संवाद, अनुभवी नेत्यांकडून न आखलेली रणनीती, साधन-सामुग्रीचा तुटवडा आणि प्रत्येक्ष देखरेख न करता हाती घेतलेल्या अल-कायदाच्या नव्या मोहिमांना अफगाणिस्तान, सिरीया, लिबिया, येमेन, इराक आणि या आखाती पट्ट्याच्या वादातीत देशांमधील राजकीय पोकळीचा लाभ न घेता आल्यामुळे अपयश येत आहे.
(L-R) Osama Bin Laden with his famous rifle, Ayman Al-Zawahiri. Image credit - Hamid Mir. |
अयमान अल-जवाहिरीचं स्थान अल-कायदामध्ये निसंशय उच्च आहे. इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मुहम्मद अन्वर अल सादात यांच्या हत्येचा ठपका असलेला, अल-कायदाच्या सुरुवातीच्या काळात जगातील सर्व इस्लामी देशांतून आलेल्या अफाट संख्येच्या तरुणांना एकत्र बांधण्यात, त्यांना पुढील १० वर्ष चोख कार्यक्रम हाती देण्यात, उत्तर वजिरीस्तानातील लढाईत तालिबानला मदत करून नंतर तालिबानमधील बहुतौंशी भरती अल-कायदाच्या विचारसरणीमध्ये मिळवणारा, थेट ओसामा बिन लादेनवर प्रचंड प्रभाव पाडलेला, जागतिक जिहादच्या पायाभरणीला सुरुवात करणारा मनुष्य म्हणून जवाहिरीचं महत्त्व अल-कायदाचं काय तर इतर सर्व दहशतवादी संघटनांमध्ये अनन्यसाधारणपणे अनभिषिक्त आहे.
मोठी कामगिरी नावावर असणाऱ्या
अल-कायदाकडून तिच्या समर्थकांच्या तशाच अपेक्षा आहेत. या सगळ्या सावळ्या गोंधळात, तिच्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. एक, थेट सिरीया आणि इराकमध्ये 'आयसीस'शी दोन हात करायचे. पण, कच खाल्लेल्या
अल-कायदाकडून आत्ता हे गोष्ट शक्य नाही हे वास्तव आहे. दोन, मोक्याच्या पाश्चिमात्य ठिकाणांवर हल्ले करायचे. किंवा तीन, अल-कायदा 'आयसीस'मध्ये विलीन करणे. जवाहिरी आणि अल-बगदादी यांचे संबंध बघता ही गोष्ट अजिबात शक्य नाही. अल-नूसरा आणि 'आयसीस'मध्ये झालेल्या तणावानंतर जून २०१३च्या सुमारास जवाहिरीने मुह्सीन अल-फद्लीला सिरीयामध्ये मध्यस्थी करायला पाठवलं होतं. हाच फद्ली पुढे फेब्रुवारी २०१४ मध्ये 'आयसीस' ला अल-कायदाच्या माहेर काढण्यात आघाडीवर होता! या अश्या काळात आणि पेचप्रसंगात त्याची, त्याच्या नेतृत्वाची आणि अल-कायदाची निश्चितपणे कसोटी लागली आहे यात वाद नाही. त्यालाही या गोष्टीची पूर्णपणे जाणीव आहे. पण स्वतःच्या वयाचा अडसर, स्थानबद्धपणा, विश्वासू आणि अनुभवी सहकाऱ्यांची रोडावलेली संख्या, विसंवाद, संघटनेने न आखून दिलेली धोरणे, चाणाक्ष नेत्यांच्या फळीची झालेली पडझड, 'आयसीस'सारख्या नव्या, आकर्षक आणि उमदी दहशतवादी संघटना तिचं तरुण नेतृत्व यामुळे अल-कायदा आज ही लांबवर पसरलेल्या या अस्थिर प्रदेशातील, विखुरलेल्या, समान कार्यक्रम-समान कृती नसलेल्या, छोट्या-छोट्या गटांची फक्त मोट बांधलेली संघटना आहे असे भासते. इतकी मोठी हानी होऊनसुद्धा अल-कायदा पुन्हा आपला हिसका दाखवणार नाही अशी शाश्वती नाही असं उभा इतिहास अगदी छातीठोकपणे सांगतो. चाचपडत असतानाच ही संघटना वर यायची एक संधी शोधत आहे असे राजकीय जाणकार सांगतात.
परवाच, अमेरिकेच्या 'सीआयए'चे माजी प्रमुख डेव्हिड पेट्राइउस यांनी 'आयसीस'चा बिमोड करण्यासाठी आपण अल-कायदाचा वापर करू हे मत जाहीररित्या व्यक्त केला. अर्थातच, वॉशिंग्टनमध्ये या पर्यायावर विचार सुरु आहे हे आता नक्की.
आंतरराष्ट्रीय राजकारणात फायदा-तोट्याचे पारडे वर-खाली होऊ लागले की आपल्या अश्या बाहुल्यांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करण्यात अमेरिकेचा हात परमेश्वर पण धरू शकत नाही. एकाची बंदूक घेऊन, दुसऱ्यावर नेम साधून तिसऱ्याचा बेमालूमपणे बळी घेणे हा अमेरिकेचा आवडता छंद. आता तो नाद एक पाऊल पुढे नेत अमेरिका चांगली अल-कायदा, वाईट अल-कायदा हा भेद सुरु करेल असे स्पष्टपणे दिसत आहे आणि याच धरसोडीच्या डावाचा नवा अध्याय जगातील एकमेव महासत्ता सुरु करत असताना म्हणूनचं एकेकाळी जागतिक दहशतवादाच्या पटलावर आपलं नाव अग्रस्थानी ठामपणे ठसवलेली आणि आता काहीशी दिशाहीन, अधांतरी झालेली, अस्ताकडे कललेली अल-कायदा या संघीचा फायदा घेणार की फक्त 'आयसीस'ची प्रसवती आई म्हणून ओळख राखून आपल्या सामरिक अस्तित्त्वासाठी धडपडतचं राहणार हे येणारा काळाचं ठरवेल, इतकचं!
- वज़ीर
या लेखाचा सारांश शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबर २०१५च्या 'सकाळ' मध्ये चालू घडामोडी सदरात (पान ७) छापण्यात आला.
या लेखाचा सारांश शुक्रवार, दिनांक ११ सप्टेंबर २०१५च्या 'सकाळ' मध्ये चालू घडामोडी सदरात (पान ७) छापण्यात आला.
No comments:
Post a Comment