Sunday 9 August 2015

तालिबानमधील तणाव...

                         तालिबानचा मोहरक्या आणि आद्य-संस्थापक मुल्लाह उमर याचा मृत्यू सुमारे २-३ वर्षांपूर्वी झाला अशा आशयाच्या बातम्या येत होत्या पण या बातम्यांना अधिकृत दुजोरा न अफगाण सरकार देत होतं न तालिबान. 
दहशतवादी साम्राज्यात अत्यंत मोठं आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व समजलं जाणाऱ्या मुल्लाह उमरचा ठावठिकाणा हा कायमचं वादाचा मुद्दा राहिला आहे. जबरदस्त कट्टरपंथी आणि अफगाणिस्तानवर आपलं सर्वस्वी वर्चस्व हवं असलेला उमर पाकिस्तानात होत असलेल्या तालिबान-अफगाण सरकारच्या शांतता प्रक्रियेला कसा पाठींबा देतो ही बाब अभ्यासकांना पचत नव्हती आणि याच शांततेच्या बोलणीच्या दुसऱ्या फेरीआधी त्याचा मृत्यू २ वर्षांपूर्वी झाला असे सांगून अफगाणिस्तानचे राष्ट्रप्रमुख अश्रफ घनी यांनी एकंच खळभळ उडवून दिली. कराची पाकिस्तान येथे वृद्धापकाळाने किंवा क्षयरोगाने त्याचा अंत झाला हे तर्क पुढे येत असतांनाच, गेल्या २ वर्षात त्याच्या गैरहजेरीत इतकी अवाढव्य संघटना कोण हाकत होतं हा मूळ प्रश्न उपस्थित होतो. गेली अनेक वर्ष मुल्लाह उमर एक विशिष्ठ कार्यपद्धत तालिबानमध्ये राबवत होता. इतक्या मोठ्या संघटनेचा स्वामी असूनसुद्धा त्याने स्वतःला प्रसारमाध्यमाच्या तंत्रापासून लांब ठेवलं होतं. अमेरीकेवरच्या २००१च्या हल्ल्यानंतर मोठ्या दहशतवादी नेत्यांभोवती फास आवळताना मुल्लाह उमरची अगदी कमी माहिती हाती लागली होती. अत्यंत जुजबी गोष्टी आणि फक्त २ छायाचित्र प्रसिध्द असलेला मुल्लाह उमर वर्षातून केवळ दोनवेळा आपल्या समर्थकांना आदेश वजा पत्र  लिहित असे. एक रमझानच्या शेवटी आणि दुसरे हज यात्रेच्या शेवटी. या पत्रांच्यादेखील खरेपणावर संशय व्यक्त होत आहे. त्याची एकही अधिकृत चित्रफित प्रसिद्ध नाहीये. त्यामुळेच त्याच्या भोवतीचं रहस्य विस्मयकारकरित्या गूढ आहे आणि त्यात अफवांना भरपूर जागा आहे. 

​​

२००१ च्या अमेरिकेच्या आक्रमणापर्येंत कंदहार हा तालिबानचा आणि मुल्लाह उमरचा बालेकिल्ला समजला जात असे. नंतर त्याने कंदहारमधून पळ काढून ७० मैलांवर असलेल्या पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला. पुढील सर्व वर्ष पाकिस्तानातून तालिबानचा कारभार चालवू पाहणाऱ्या या निर्विवादपणे सर्वात मोठा नेता असलेल्या उमरची युद्धभूमीवरची पकड ढिली पडत होती अशी निरीक्षणे नोंदवली गेली आहेत. हीच वेळ मुल्लाह मन्सूर आणि त्यांच्या नेतृत्वोदयाची असल्याचे अनेक पुरावे आहेत. मन्सूरसोबतचं जलालुद्दीन हक्कानी, मुल्लाह अब्दुल कय्युम झाकीर, गूल आगा इशक़जायी असे अनेक मोठे नेते सुमारे २५,००० तालिबानी सैनिकांची फौज मिरवतात. त्यांच्यात सामुहिक नेतृत्वाचा वाद आहे. उमर जिवंत आहे असे सांगून ते ही अंतर्गत दुफळी झाकत होते. त्याच्या मृत्युच्या अधिकृत बातमीनंतर तोंडावर पडावे अशी परिस्थिती झाल्यामुळे दुसऱ्याच दिवशी मुल्लाह उमर नंतरचा तालिबानचा अधिकारी अख्तर मुल्लाह मन्सूरने तालिबानवर आपला हक्क सांगितला आणि समर्थकांच्या जोरावर कारभार बघायला सुरुवात केली. उमर हयातीत असताना मन्सूर तालिबानचे सर्व निर्णय घेत होता.
पाकिस्तानच्या 'आयएसआय' त्याची चांगली सलगी आहे. मुल्लाह उमरची 'आयएसआय'शी गाठ त्यानेच घालून दिली असल्याचं बोललं जातं. १९९४ मध्ये तालिबान राजवटीत त्याला नागरी हवाई खात्याचं प्रमुखपद दिलं होतं. २००१मध्ये अमेरिकेच्या 'सीआयए'शी बोलणी करायला हाच मन्सूर उमरचं प्रतिनिधित्व करत होता. उत्तर वजीरिस्तानचे हक्कानी आणि बलुचिस्तानचे तालिबानी यांचातला समान दुवा म्हणून मन्सूर 'आयएसआय'चा लाडका आहे. मन्सूर आपलं वजन तालिबानमध्ये किती प्रस्थापित करतो याबद्दल दुमत आहे. तालिबानचा लष्करप्रमुख मुल्लाह अब्दुल कय्युम झाकीरचा मन्सूरला कडाडून विरोध आहे. मुल्लाह उमरचा सर्वात धाकटा मुलगा याकूब देखील नेतृत्वाच्या या लढाईत रस दाखवत असल्याचं बोललं असताना परवाच मन्सूरने त्याचा काटा काढला. मन्सूर समर्थक आणि विरोधी गटामध्ये लवकरचं राडा होणार असं दिसतंय. मुल्लाह मन्सूर देखील या शांतता प्रक्रियेला विरोध करतानाच आपलं शिष्टमंडळ चर्चेला पाठवतोय. या संभ्रमामुळेच तालिबानच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय. 



उमरनंतर पाकिस्तान ठरवेल तो नेता तालिबानवर आपली हुकुमत करणार हे निश्चित आहे. तालिबानच्या उभारणीत पाकिस्तानचा मोलाचा वाटा आहे. तालिबानच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारतला त्रास कसा होईल हाच विचार करून पाकिस्तान मुल्लाह उमरच्या मागे उभा राहिला हे इतिहास सांगतो. पण यामुळे तालिबानमध्ये फूट पडेल असं स्पष्ट मत राजकीय जाणकार व्यक्त करतात.
शांततेची बोलणी सुरु असताना यातले काही तालिबानी शांततेची कास धरतील ही शक्यता नाकारण्यात येत नाही. नेतृत्वपेचात अडकलेल्या संघटनेपेक्षा त्यातील बहुतौंशी सैनिकांना 'आयसीस'सारखी झपाट्याने वाढणारी तरुण, दमदार संघटना जी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सरकारला शिंगावर घेऊ शकते अधिक जवळची वाटेल यात शंका नाही. परिस्थिती हाताबाहेर जात असूनही भारताविरोधी कुरापती, बलुचिस्तानातलं बंड आणि कराचीमधील टोळीयुद्ध सावरण्यात पाकिस्तान लष्कराची सर्व शक्ती पणाला लागली असताना ते तालिबानचा बिमोड कसा करतील हा प्रश्न अनुत्तरीत राहतोच. गेल्याकाही वर्षात उच्छाद मांडलेल्या तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानला इसालामाबाद आता काय वागणूक देतं हे बघणं मजेशीर आहे. डळमळीत झालेल्या संघटनेमुळे आणि मुल्लाह उमरच्या जाण्यामुळे बक्कल फौज आपली वेगळी चूल मांडत आहे किंवा त्यातील सैनिक 'आयसीस' आणि अल-कायदाच्या मांडवात दाखल होत आहेत. पिछाडीवर गेलेली अल-कायदा आणि नव्या फौजेची प्रतीक्षा करणारी 'आयसीस' यांना ही कुमक हवीच आहे. या गोंधळात कट्टरपंथी या सगळ्यांना भारतीय उपखंडातल्या स्थिरावणाऱ्या लोकशाही विरुद्ध चिथावणार. त्यामुळेच या तीन देशांना आणि त्यांच्या नेत्यांना समंजसपणे यावर तोडगा काढावा लागेल. अमेरिका अफगाणिस्तानमधून पाय काढत असताना ही नाजूक वेळ हाताळताना विशेषकरून भारतीय नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. या सगळ्यामध्ये सिराजुद्दिन हक्कानी याला तालिबानचं दिलेलं क्रमांक दोनचं पद हा एक चिंतेचा विषय आहे. अमेरिकेची भूमिका यात आता औत्सुख्याचा विषय आहे. ओबामा प्रशासनाने २०१७पर्येंत दर वर्षी ४कोटी अमेरिकी डॉलर अफगाणिस्तानमध्ये गुंतवायचे ठरवलं आहे. 



मुल्लाह मन्सूरकडे तालिबानचं प्रचंड जबाबदारीचं पद असलं तरी तो मुल्लाह उमरच्या शिताफीने ते कितपत सांभाळेल आणि तालिबान स्थिर ठेवेल हा एक स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. उमरकडे असलेलं संघटनात्मक कौशल्य, त्याने अल-कायदाच्या पायाभरणीत दिलेलं आपलं योगदान, ओसामा बिन लादेन आणि तालिबानचे संबंध, २००१ नंतर बिन लादेनला अमेरिकेकडे न देण्याचा ठाम निर्णय आणि अश्या अनेक नेतृत्वाच्या छटा मन्सूर किंवा तालिबानमधील अजून दुसऱ्या कोणाकडे दिसत नाहीत. नव्या तालिबानी पिढीची उमरला न बघतासुद्धा त्याच्याप्रती असलेली निष्ठा आणि श्रद्धा मन्सूरच्या बाबतीत काही अंशीसुद्धा जाज्वल्यपणे जाणवत नाहीये. गेली दोन दशके नव्या आणि आकर्षक दहशतवादी संघटना आस-पास असताना फक्त उमरच्या करिष्म्यापोटी तालिबान तग धरू शकली. अमीर-उल-मोमीन किंवा निष्ठावंतांचा नेता हे बिरुद इतिहासाच्या पानांत त्यामुळेच फक्त उमरला शोभून दिसेल हे जणू त्या शापित प्रदेशाच्या वाट्याला आलेलं सत्यवचनचं आहे. 


बलाढ्य पाश्चिमात्य देश इराक आणि सिरीयामधील परिस्थितीकडे लक्ष ठेऊन असताना पाकिस्तानातील तालिबान, पाकिस्तानच्या 'आयएसआय'ने पुरस्कृत केलेल्या अनेक दहशतवादी संघटना, अल-कायदा आणि 'आयसीस' या सगळ्या स्फोटक पसाऱ्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारतीय सरकार आणि त्यांच्या देशवासीयांना गुदमरून ठेवण्याची आणि तो विळखा घट्ट करण्याची मजबूत ताकद आहे हे विसरून चालणार नाही. तूर्तास तरी संपूर्ण भारतीय उपखंडाला सर्वांगाने अस्थिर करणाऱ्या काही निवडक बाबींपैकी म्हणूनच तालिबानमधील हाच उफाळलेला आणि अनपेक्षितपणे ताणलेला तणाव कारणीभूत ठरेल असे दिसते आहे, इतकंच!

या लेखाचा सारांश मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०१५च्या 'सकाळ' मध्ये चालू घडामोडी सदरात (पान ७) छापण्यात आला.

                                                                                                                                                    वज़ीर 

No comments:

Post a Comment