Sunday, 22 June 2014

'अ'शांततेचा प्रहर...

या पृथ्वीवर काही देश असे आहेत ज्यांच्या नशिबी कायमचं अस्थिरतेचे काळे ढग दाटून आले आहेत. डोक्याला ताप देणारे शेजारी देश, बलाढ्य राष्ट्रांची कामापुरती पसंती, आंतरराष्ट्रीय देशांच्या पंक्तीत सावत्र वागणूक, त्यांच्याकडून होणारा पराकोटीचा दुस्वास आणि पुढारलेल्या राष्ट्रांच्या राजकारणाचं भांडवल हेच या देशांच्या पत्रिकेत मांडून ठेवलं आहे असं वाटण्याइतपत हलाखीचे दिवस हे देश काढत आहेत. मध्य-आशियाई देशांचा, तेथील भूगोलाचा, त्यांच्या व्यापारिक दृष्टिकोनाचा आणि क्षमतेचा, त्यांच्याकडील निसर्गसंपत्तीचा आणि त्यांच्या राहणीमानाचा विचार केल्यास या गोष्टी ठसठशीतपणे डोळ्यासमोर येतात.
एकमेकांना खेटून उभे राहिलेल्या बांबूच्या झाडांप्रमाणे खेटून अगदी चिकटून असलेल्या अफगाणिस्तान, इराण, इराक, सिरीया, सौदी अरेबिया, जॉर्डन, लेबेनॉन, सुएझ कालवा आणि इस्रायल वजाकरून असलेला इजिप्त आणि लिबिया या देशांच्या रांगेत, त्यांच्या जन्मापासून, आखणीपासून आणि त्यांवरच्या हक्काच्या दावेदारीपासूनचं पाचवीला करंटेपणचं पूजलयं. एका पाठोपाठ एक, अश्या असंख्य काळ-रात्रींनी या देशांच्या दुर्दैवात आणखीनचं भर घातली आहे. लोकशाहीच्या सांगाड्यात, एकमेकांचे गळे घोटत, नको तिथे दाखवलेला कट्टरपणा आणि एकूणचं जगाचं, आजू-बाजूच्या परिस्थितीचं अवलोकन न करू शकल्यामुळे हे असे दिवस त्यांच्यावर आले आहेत. या सगळ्यांमध्ये सडकून, तुंबळ युद्धांमध्ये बदडून निघालेला देश म्हणजे इराक.

इराक जन्माला आला तेव्हापासूनच या देशाची गणितं बिघडत गेली. कायम वादाचा मुद्दा असलेला हा देश म्हणजे शियाबहुल मुसलमानांना प्रिय असलेल्या देशांपैकी एक. बाथ पार्टीच्या नेत्यांपैकी एक असलेल्या सद्दाम हुसेन यांनी १९७० पासून आपल्या हाती ताकद एकवटून घ्यायला सुरुवात केली. त्यांनी बहुतौंशी इराकी तेल कंपन्यांचं राष्ट्रीयकरण करून टाकलं. इराण-इराक युद्ध आणि त्याचे परिणाम भोगत असताना अमेरिका देत असलेल्या आर्थिक मदतीचा आणि शस्त्रांचा योग्य वापर करून त्यांनी १९७९च्या सुमारास सत्ता काबीज केली. बक्कळ तेलसाठ्यांमुळे हातात खेळणारा मुबलक पैसा आणि सत्तेची नशा या दोन्ही गोष्टींच्या सांगाडीने त्यांनी सरकारी पदांवर, लष्करात आणि मोक्याच्या जागांवर त्यांच्या पंथाच्या म्हणजेच सुन्नी पंथाच्या लोकांची दणकून भरती केली. तोपर्येंत आणि अजूनसुद्धा इराकमध्ये सुन्नी पंथाची लोकसंख्या इराकच्या एक पंचमांश आहे. शिया आणि कुर्द पंथीयांची सगळी आंदोलनं, आणि त्यांचे सत्ता काबीज करण्याचे सगळे डाव सद्दाम यांनी धुडकावून लावले. त्यांनी उत्तरोतर या गटांचं शब्दश: शिरकाण केलं. या दोन्ही पंथांच जमेल तिथे खच्चीकरण सद्दाम करत राहिले आणि त्याच वेळी या चिरडल्या गेलेल्या गटामध्ये सद्दाम आणि सुन्नी विरोधाची ठिणगी पडली. तब्बल २४ वर्षांच्या राजवटीत, या ठिणग्या वाढत गेल्या, धुमसत गेल्या आणि शेवटी या सगळ्या अन्यायाचा उद्रेक होऊन इराकमध्ये वणवा पेटला. या सगळ्या वेळात अमेरिका नेहमीप्रमाणेच आपल्या सोयीचं राजकारण करत आली. थोरल्या जॉर्ज बुश यांच्या हातात इराक आणि सद्दाम आला असतानासुद्धा तेलाच्या सोयीसाठी सद्दामला सोडून देण्यात आलं.
याच गोष्टीमुळे सद्दामची मुजोरी वाढतच गेली. ९/११ च्या हल्ल्यानंतर खडबडून जागं झाल्यावर आणि इराकी जनतेच्या नाराजीचा फायदा घेत अमेरिकेच्या थोरल्या जॉर्ज बुश यांच्या मुलाने, इंग्लंडच्या टोनी ब्लेयर यांना सोबतीला घेऊन इराकवर २००३ साली हल्ले चालू केले. राजकीय जाणकार असं सांगतात की राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी जरी इराक आणि सद्दामवर रासायनिक, आण्विक, जैविक अस्त्रांचा आणि अल-कायदाशी संबंध असल्याचा ठपका ठेऊन हल्ले चालू केले होते तरी या हल्ल्यांमागे खरं कारण हे तेल होतं. १९६३ साली इराक सोबत करण्यात आलेल्या तेलाचा करार बरोब्बर ४० वर्षांनंतर २००३ साली संपणार होता, आणि म्हणूनच इराकवर यथेच्छ गोळीबार आणि बॉम्बवर्षाव करून इराकी तेल विहिरी आपल्या ताब्यात घेऊन आपली हुकुमत जगात पुन्हा सिद्ध करायची हाच प्रमुख उद्देश ठेऊन हे हल्ले करण्यात आले. 

सद्दाम राजवट मुळापासून उखडून टाकत आणि इराकी जनतेचं आयुष्य नामोहरम केल्यानंतर अमेरिकेने इराकमध्ये लोकशाही स्थापन करण्याचा डंका पिटत, सद्दाम हुसेनना शोधण्यासाठी जंग-जंग पछाडलं. डिसेंबर २००३ मध्ये सद्दामना पकडण्यात आलं आणि मे २००६ मध्ये अमेरिकेच्या पाठींब्यामुळे नुरी अल-मलिकी हे शिया पंथाचे प्रतिनिधित्व करणारे नेते, इराकच्या पंतप्रधानपदी निवडले गेले. सद्दामना डिसेंबर २००६ मध्ये फाशी देण्यात आली आणि एका पर्वाचा अंत होत असतानाच दुसरं, तितकंच संहारक पर्व दत्त म्हणून इराकच्या नशिबी उभं राहिलं. सत्तेवर आल्यानंतर मलिकी यांनी सद्दामचीच वाट अवलंबली आणि सरकारमध्ये, लष्करात शिया पंथाची वारेमाप भरती सुरु केली. इतके वर्ष सद्दाम आणि सुन्नी लोकांकडून झालेल्या जाचाला, अमानुष कत्तलीला वाट मिळाली आणि सुन्नी पंथाची एकच गळचेपी सुरु झाली. गेल्या वर्षापर्येंत इराकमध्ये ठाण मांडून बसलेल्या अमेरिकेने नवीन सरकारला आणि लष्कराला तयार करण्याच्या पुरता प्रयत्न केला. पण मेंदूत भिनलेल्या सुडाच्या दबावापोटी इराकमधली परिस्थिती अराजकाताच्या अस्थिर वाटेवर मुक्तपणे वावर करू लागली आणि इथेच, अगदी याच काळात अल-कायदा बाळसं धरून, गुटगुटीतपणे वाढून, बेधुंद तारुण्याची नशा अजमावू लागली. 'अल-दवलाह अल-इस्लामीयाह फि अल-इराक वा-अल-शम' किंवा इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (ISIS) हे याच अल-कायदाचं लहान, पण तितकंच प्रभावशाली, शक्तिशाली, श्रीमंत आणि क्रूर भावंड!

​​

२-३ वर्षांपासून सिरीयामध्ये सुरु असलेल्या युद्धाला तोंड देत, सिरियाच्या प्रमुख बशर अल-असाद यांच्या विरोधातल्या नाराजीचा फायदा घेत आणि सुन्नी पंथाचं भलं करण्याच्या दृष्टीने अल-कायदामधला ISIS गट कामाला लागला. ओसामा बिन लादेननंतर  अल-कायदाच्या नेतृत्वाशी तात्विक मतभेद झाल्यामुळे जून २०१३ मध्ये एक गट बाहेर पडला आणि 'आयएसआयएस'चा जन्म झाला. हा गट त्याआधी इराकमध्ये अल-कायदाचं काम बघायचा. अबू बकर अल-बगदादी या चाळीशीच्या टप्प्यात असलेल्या आणि फक्त दोन छायाचित्र प्रसिद्ध असलेल्या नेत्याच्या चिथावणीला बळी पडून 'आयएसआयएस' च्या दहशतवाद्यांनी सिरीयामध्ये रान पेटवलं. अमेरिका, सिरीया आणि 'आयएसआयएस' सारख्या धार्मिक मूलतत्त्ववाद्यांमुळे गेल्या २-३ वर्षांमध्ये आजपर्येंत सिरीयामध्ये सुमारे पाऊणे दोन लाख निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. इराकच्या डोक्यावर असणाऱ्या सिरियाच्या दमस्कस आणि आलेप्पो शहरांमध्ये हाहाकार माजवून 'आयएसआयएस'ने आपले रंग केव्हाच दाखवले होते. आणि तिकडूनच उत्तर इराकमध्ये घुसून सुन्नी प्राबल्य भाग झटपट आपल्या ताब्यात घेऊन ही संघटना गब्बर होत गेली. इतर दहशतवादी संघटनांपेक्षा जरा फटकून वागणारी, थोडी वेगळीच कार्यपद्धती असणारी, आत्ताच्याघडीची 'आयएसआयएस' ही एकमेव संघटना आहे. गेल्या २० दिवसांपासून 'आयएसआयएस'ने इराकमध्ये एकच गोंधळ माजवला आहे. मोसुलसारख्या महत्वाच्या आणि आकाराने दुसऱ्या क्रमांकाच्या शहराचा ताबा फक्त ३ दिवसांमध्ये घेत त्यांनी आपली ताकद स्पष्टपणे दाखवून दिली. त्याचबरोबर इराकी सरकारचं, लष्कराचं दुबळेपण आणि खचलेलं मनोधैर्य जगासमोर पुढे आणलं. सुन्नी लोकांचा उत्कर्ष हा जरी 'आयएसआयएस'चा हेतू असला तरी इराकमधील तेल हेच त्याचं प्रमुख लक्ष्य आहे. तब्बल १० हजार हून जास्त निर्ढावलेले, डोक्यावर भूत बसलेले, धार्मिकरित्या अंध झालेले राक्षशी प्रवृत्तीचे तरुण पोसायचे म्हणजे की खायचं काम नाही. त्यांचा सांभाळ करायला लागणारा पैसा हा तेलातूनच येणार हे ताडून  'आयएसआयएस'ने आपला मोर्चा तेलाच्या विहिरींवर आणि तेल शुद्धीकरण केंद्रांवर वळवला. जवळपास ३६ लाख तेलाचे बॅरल इराक रोज बाजारपेठेत आणू शकतं. जगातल्या मोठ्या तेलसाठा असलेल्या देशांमध्ये इराकचा पाचवा क्रमांक आहे आणि 'ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोरटिंग कंट्रीस' (OPEC) मध्ये तेल उत्पादन करणारा सौदी अरेबियानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या सगळ्या प्रकरणामुळे जगभरात तेलाचे भाव भडकले आहेत. बैजीची तेल शुद्धीकरण कंपनी  'आयएसआयएस'ने जवळपास ताब्यात घेतली आहे. आता त्यांचं लक्ष्य इराकची राजधानी बगदाद आहे. आजपर्येंत बगदादपासून केवळ ४ लहान शहरं लांब  'आयएसआयएस' येउन थडकलं आहे. इराकी लष्कराला आता सर्वात नेटाने प्रतिकार इथेच आणि दक्षिण इराकमध्ये करावा लागणार आहे. इराकचे सर्वात मोठे तेलसाठे त्याच भागात आहेत.  'आयएसआयएस'ने सद्दामची जन्मभूमी आणि दफनभूमी तिक्रीत आधीच आपल्या खिशात घातली आहे. मोसुलच्या धुमश्चक्रीमध्ये त्यांनी 'मोसुल सेन्ट्रल बँक' लुटून जवळपास ४० कोटी अमेरिकी डॉलर आणि सोन्याच्या तुंबड्या आपल्या दावणीला बांधले आणि म्हणूनच  'आयएसआयएस' आत्ता सगळ्यात श्रीमंत दहशतवादी संघटना आहे!! आपल्या पुढच्या हालचालींचा थांगपत्ता न लागू देता, मध्ये येईल त्याला अडवा करत आपला मार्गक्रमण करणे हेच  'आयएसआयएस' करत आली आहे. भरमसाठ शस्त्रास्त्रे, अत्यंत क्रूर पद्धत आणि त्याच्या जोडीला अत्यंत आधुनिक प्रचार-तंत्र  संघटनेने जोपासलय.
भरदिवसा इराकी लष्कराचा सामूहिक कत्ले-आम करताना, स्थानिक पोलिस अधिकारी आणि त्याच्या कुटुंबाचा खून करताना, तडतडत्या उन्हात, वाळवंटात एका बड्या लष्करी अधिकाऱ्याची आणि त्याच्या मुलाची कबर त्यांच्याकडूनच खोदून घेताना आणि त्यांचा गळा कापतानाचे छायाचित्र आणि छायाफिती ही संघटना मुक्तपणे इंटरनेटच्या माध्यमातून जगापुढे मांडत आहे. 'आयएसआयएस' दस्तैवज करण्यात अग्रेसर मानली जात आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे ही संघटना दर वर्षाला आपले अवहाल जाहीर करते. २०१३ मध्ये १० हजार चकमकी त्यांनी घडवून आणल्या ज्यात १०८३ लोकांचा बळी घेतला. खून, दरोडा, अपहरण, सामुहिक कत्तल अश्या १४ गटांमध्ये विभागणी केलेले गुन्हे आकड्यांच्या स्वरूपात त्यांनी जाहीर केले आहेत! त्यांचा नेता अल-बगदादी, ज्याला आता नवा बिन लादेन म्हणून लोक ओळखू लागले आहेत आणि ज्याच्या शिरावर अमेरिकेने एक कोटी अमेरिकी डॉलरचं बक्षीस ठेवलं आहे तो स्वतः जातीने नेतृत्व करतो असं लष्करी विश्लेषक सांगत आहेत. त्याचप्रमाणे या संघटनेची कार्यपद्धती लष्करापेक्षा सरस आणि शिस्तबद्ध आहे. मोसुल हेच आता त्यांचं शक्तिस्थान असेल यात वाद नाही. समविचारी सुन्नी कैदी आणि तरुण झपाट्याने  'आयएसआयएस'च्या मांडवात दाखल होत आहेत. त्यांना शिया आणि कुर्दविरोधी गटाकडून आणि सद्दाम हुसेन समर्थक गटाकडून रसद मिळत आहे हे अगदी उघड आहे.  



आता शिया, सुन्नी आणि कुर्द भागांमध्ये इराकचे ३ तुकडे होऊ घातले असताना मलिकी आणि त्यांच्या सरकारने अमेरिकेचे पाय पुन्हा धरले आहेत. अमेरिकेकडे लष्करी आणि हवाई मदतीची मागणी करताना त्यांच्या अवघड स्थितीची जाणीव होते. ओबामांनी आपण कुठल्याही कारणासाठी आता इराकमध्ये लष्कर धाडणार नाही हे परवाच जगाला सुनावलं आहे. अमेरिकेत त्यांच्या पर-राष्ट्रीय धोरणात त्यांचीच गोची झाल्यानंतर हे असे मोठे निर्णय ओबामा सहजा-सहजी घेणार नाहीत.
ओबामा आता कात्रीत सापडले आहेत. त्यांनी लष्कर इराकमध्ये पाठवलं तर ते अमेरिकेत खपवून घेतलं जाणार नाही, आणि जर ते लष्कर 'आयएसआयएस' विरोधात इराक मध्ये उतरलंच तर सुन्नी समुदाय, ज्यांचं अमेरिकेवरून आधीच पित्त खवळलं आहे, ते शांत बसणार नाहीत. सध्यातरी ओबामा ३०० अमेरिकी लष्करी सल्लगार इराकमध्ये पाठवणार आहेत. हे इराक युद्द पूर्णपणे शांत व्हावं हाच त्यांचा कटाक्ष आहे. त्यांची हीच कामगिरी त्यांना होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये मिरवता येणार आहे. बाकी त्यांचं पर-राष्ट्रीय धोरण आता कुठे आणि कसं अडकलं आहे हा एका स्वतंत्र लेखनाचा विषय आहे! हे असेच लष्करी सल्लगार पाठवणं म्हणजे आगीशी खेळ असतो, या खेळाचं युद्धात रुपांतर व्हायला काडीमात्र वेळ लागत नाही. ही अशीच छोटी लष्करी सल्लामसलत कोरियामध्ये तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष तृमान यांच्या अंगाशी आली होती ज्यात तीन वर्ष, ३० हजार लोकांचा जीव आणि त्याचंच सरकार गेलं होतं. हीच गोष्ट व्हिएतनामच्या बाबतीत झाली. परमेश्वर करो आणि आपल्यावर ही वेळ न येवो हीच अपेक्षा ओबामा करत आहेत. 

​भारताच्या दृष्टीनेदेखील हे प्रकरण बरंच मोठं आहे. १० हजारहून अधिक भारतीय इराकमध्ये काम करतात आणि भारतात दरवर्षी येणारं २ कोटी टन तेल हे इराकमधून येत. हे आकडे आपल्या दृष्टीने पुरेसे बोलके आहेत. या आखाती देशांचा विचार केल्यास, जगातल्या बहुतेक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेच्या नाड्या आपल्या हाती असतानासुद्धा, केवळ या गोष्टीची जाणीव किंबहुना गांभीर्य नसल्यामुळे, प्रचंड ताकदवान असूनसुद्धा हे देश आज इतर देशांच्या हातातले खेळणे होऊन बसले आहेत. एका फटक्यात जगाचं नाक दाबून तोंड उघडण्याची करामत करू शकणारे हे देश, एकजुटीच्या अभावामुळे आज मागास देशांच्या गणतीत मोजू जाऊ लागले आहेत. वास्तवाकडे पाहता अर्ध्याहून अधिक इराकी जनतेने आपले संसार सुरक्षित स्थळी हलवायला सुरुवात केली आहे. त्यांची फरफट आणि पांगापांग तर केव्हापासूनचं चालू झाली आहे. गेल्या कित्येक पिढ्यांची आणि त्यांच्या आयुष्याची संपूर्णपणे वाताहत सुरु आहे. बेरोजगारी, रोजची युद्धजन्य वेळ, उपासमारी आणि भकास वातावरणात नव्या इराकी पिढीचा जीव आकसून गुदमरतोय. त्यांचं ऐकून घायला कोण तयार होणार हा आत्ता त्यांच्यासमोरचा यक्षप्रश्न आहे. अंधारलेल्या अवस्थेत रोज येईल तो दिवस ते मुकाट्याने ढकलत आहेत. एकाबाजूला विकासाचे उंचच-उंच मनोरे आपण बांधत असताना जगात या अश्या जनतेचा भरणा जास्त आहे ही बाब मनाला चुकचुकायला लावणारी आहे. या सगळ्या आखाती पट्ट्यावर ३ '' राज्य करतात असं म्हटलं जातं. पहिला 'अ' - ल्लाह, दुसरा - र्मी आणि तिसरा - मेरिका. पण या अश्या बिकटवेळी या तिघांपैकी कोणीच सामान्य प्रजेच्या मदतीला येत नाही हे पाहून चौथा, अधिक वेदनादायक, जास्त वेळ टिकणारा '' या लोकांपुढे एकच ब्रम्ह-पर्याय पुढे आला आहे...तो म्हणजे  ''शांततेचा प्रहर...

                                                                                                                                               वज़ीर 

Tuesday, 20 May 2014

कॅनव्हासिंग बाय पोएट्री, गव्हर्निंग बाय प्रोस!

गेले चार महिने रात्रंदिवस एक करून अखंडपणे चालू असलेल्या रणधुमाळीचा शेवट १६ मे रोजी झाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या सगळ्यात जास्त मोठ्या, निर्विवादपणे निर्णायक असणाऱ्या, तितक्याच जहाल व विकसित प्रचाराच्या, अनन्यसाधारण महत्वपूर्ण, प्रचंड खर्चिक आणि निः संशय महत्वाकांक्षी निवडणुकीचा वारू, नरेंद्र मोदी हे त्या पंतप्रधानपदाच्या काटेरी खुर्चीत बसल्यावर शांत झाला.
गेली १० वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस आणि यूपीएच्या घटक पक्षांचा सपाटून पराभव करत भाजपप्रेरित एनडीएने देशभरात धुमाकूळ घालत, महत्वाच्या जागांवर आणि राज्यांमध्ये इतर पक्षांचा फज्जा उडवत हे अशक्य आव्हान शक्य करून दाखवलं. त्यांच्या या विजयाची कारण-मीमांसा येणाऱ्या कैक वर्षांना खाद्य पुरवत राहील हे या निवडणुकीचं विशेष! देशभरात असलेली कॉंग्रेस-विरोधी नाराजी, अत्यंत मौल्यवान, अत्याधुनिक प्रचारतंत्र, कमकुवत असतानासुद्धा विरोधी पक्षाला आलेले सुगीचे दिवस आणि मतदानाचा वाढलेला टक्का, हे या निवडणुकीचं फलित म्हणावं लागेल. वारेमाप प्रसिद्धी, बोकाळलेले नवे आणि जुने पक्ष, लोकसभा जागांच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त असलेले उमेदवार, आणि अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतींनी अख्खा देश ढवळून काढला. गल्लीपासून दिल्लीपर्येंत आणि चांध्यापासून बांध्यापर्येंत या निवडणुकीचाच बिगुल वाजत राहिला.  याच काळात अपेक्षेप्रमाणे अनेक अंतरराष्ट्रीय घडामोडींवरची भारताची पकड ढिली झाली. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात आपण आकंठ बुडालेले असताना अनेक महत्वाचे विषय मागे पडले, पण सरतेशेवटी देशात सत्तापालट झाला. सामान्य नागरिकाच्या दृष्टीने विचार केल्यास, हीच बहुसंख्य लोकांची इच्छा होती असं आता म्हणावयास हरकत नाही. 

​​या सगळ्या धामधुमित नरेंद्र मोदींचं नेतृत्व घेऊन, काही प्रमाणात ते मान्य करून भारतीय जनता पक्ष जीवानिशी लढला. त्यांच्या या विजयाला अनेक विषयांची किनार आहे. अनेक पैलू आणि वेळ साधून, अगदी मोक्याच्या क्षणी आखलेल्या अचूक खेळींमुळे हे यश साध्य झालं आहे. आधी लिहिलेल्या एका लेखामध्ये म्हणाल्याप्रमाणे मोदींनी त्यांचा संपूर्ण प्रचार विदेशी पद्धतीने पार पाडला. अमेरिकेत चालणाऱ्या खर्चिक आणि व्यवस्थित आखणी केलेल्या प्रचाराची अनुभूती भारताचे नागरिक यंदा प्रथमचं घेत होते आणि मोदी या सगळ्या लाटेवर स्वार होऊन आपल्या कलेने या प्रचाराचा अक्राळ-विक्राळ हत्ती झुलावताना त्यांना संपूर्ण जगाने पाहिलं. राजीव गांधी आणि काही प्रमाणत अटल बिहारी वाजपेयी या नेत्यांनंतर अंतरराष्ट्रीय प्रसार-माध्यमांनी आणि महत्वाच्या देशांनी दखल घेतले गेलेले मोदी आत्ताच्या घडीचे आपल्याकडील एकमेव नेते. या लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रकियेत मोदींचा वरचष्मा जाणवला. निवडणूक जाहीर होण्याआधी कित्येक महिने मोदींनी तयारी चालवली होती यात शंकाच नाही. या निवडणुकीचा संपूर्ण बाज मोदींनी बसवल्याचं राजकीय निरीक्षक आता आवर्जून सांगत आहेत. भाजप मधल्या नाराज नेत्यांना राजी करून त्यांची एकत्रितपणे मोट बांधून आणि वेळ-प्रसंगी अति-उत्साही, आक्रमक नेत्यांची बंडाळी मोडून मोदींनी आपला पंतप्रधानपदाचा प्रवास सुरु केला. गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनानंतर मोदी तुलनात्मकरित्या आक्रमक झाले. एका बाजूला आपल्या मित्र पक्षांची चाचपणी करत, शाश्वत आणि इतर मित्र अशी गटांमध्ये त्यांची विभागणी करत, दुसऱ्या बाजूला राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, अरुण जेटली, लालकृष्ण अडवाणी या चार पंतप्रधानपदाच्या योग्य लायक असणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांना मागे टाकत मोदी पुढे गेले. त्याचवेळी ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि कॉंग्रेस विरोधी सुराची भावना जागृत होऊ लागली. मोदी आणि भाजप रीतसर या भावनेला खत-पाणी घालू लागले. या दोन मोठ्या पक्षांमध्ये सरळ सरळ लढत होणार असे वाटत असताना अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्लीत आपली चुणूक दाखवून सबंध देशभर एकच हाहाकार उडवून दिला. कितीही नाही म्हटलं तरी बाकी सर्व पक्षांना आपली विचारयंत्रणा बदलायला लावण्याचं काम त्यांनी केलं. देशात प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला तडा देणाऱ्या, उठाव करून या दुरंगी राजकारणाला तिसरा कोन देऊ शकणाऱ्या या पक्षाची गोची त्यांनीच केली. अत्यंत वाचाळ, आततायी, आणि असमंजस भूमिका घेत त्यांनी आपलीच प्रसिद्धी कमी करून घेतली. धडकी भरवणाऱ्या या पक्षाची भीती नंतर नाहीशी होऊन, त्यांना खिजगणतीत तोलू जाऊ लागलं. नागरिकांची नाराजी, आपली एक वेगळी ओळख करण्यासाठी लागणारी एक सावध 'स्पेस', आम आदमी पक्ष गमावून बसला. उत्तरोत्तर फक्त भाजपविरोधी भूमिका घेत त्यांनी सुजाण मतदारांच्या भुवया उंचावल्या. त्याचा फटका केजरिवालांना बसलाच.
तोपर्यंत मोदींनी आपली पूर्ण तयारी करून धडाक्यात सुरुवात केली होती. आपला अत्यंत विश्वासू माणूस समजला जाणाऱ्या अमित शहांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली. आपल्या दिल्लीच्या वाटेवरचा सर्वात मोठा खोडा हा तिथेच आहे हे ताडून मोदींनी शहांची वर्णी लावली. या कामासाठी मोदींना शहा सोडून अजून कोणीच योग्य वाटलं नाही हे अगदी रास्त आहे. अमित शहा हे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात. मोदींचा सगळ्यात जवळचा माणूस, त्यांचा खास 'शार्प-शुटर', संघाचा प्रिय, आद्य भारताच्या राजकारणाचा 'चाणक्य' आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत घातक, वरकरणी सोज्वळ पण तितकाच धूर्त पुढारी आज भरप्रकाशात शोधून सापडणार नाही. मोदींच्या या विजयात शहांचा वाटा नुसता मोठा नसून तो उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोगा आहे. उत्तरप्रदेशमध्ये गेल्यापासून कणा-कणामध्ये विभागलेला भाजप शहांनी सावरला, सगळ्यांना एकत्र आणत, प्रमुख नेत्यांना आपल्या कामाची जाणीव करून देत, आणि प्रचंड प्रमाणात अगदी खालच्या कार्यकर्त्यापर्येंत पोहचून त्यांनी उत्तरप्रदेश अक्षरशः पिंजून काढला. मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवावी हे देखील अमित शहांनी त्यांना सुचवल्याचं बोललं जात आहे. मोदींसारख्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्यासाठी वाराणसी जे हिंदुंच सर्वात पवित्र श्रद्धास्थान आहे, अश्या ठिकाणाहून लोकसभेची निवडणूक लढवण ही बाब राजकारण वजा करून प्रतिष्ठेची किंबहुना सांकेतिक आहे. उत्तर प्रदेशमधील उमेदवारांची यादी आणि भाजपचं मताधिक्य पाहता सबकुछ शहा परिमाणाची नक्कीच जाणीव होते. पण याच शहांना भाजप अध्यक्ष करून मोदी गुजरातचं मुख्यमंत्रीपद त्यांच्यापासून लांब ठेवतील असा होरा आहे!
​शहांसारखा कामाचा नेता मोदी गुजरातमध्ये अडकवून नाही ठेवणार. इतका मोठा विजय मिळाल्यानंतर आता होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी अमित शहा हुकमाचं पान आहे. अश्या राज्यांची जबाबदारी शहा नक्की पार पाडतील आणि भाजपची कक्षा रूंदावतील हा मोदींना विश्वास आहे. ​
 मोदींच्या अतिथंड डोक्याची, आणि त्यांच्या नसानसांत भिनलेल्या संघाच्या दृष्ट्या विचारांची ही खेळी, त्यांच्या वेगळ्या राजकीय चुणीची प्रचीती देते!
भाजपसोडून स्वतःची मोठी, ताकदवान, अत्याधुनिक यंत्रणा मोदींनी कामाला लावली. राजकीय जाणकार, प्रतिष्ठीत महाविद्यालयाची हुशार मुलं, बदलत्या जगाचा आढावा घेणारे अभियंते, अत्यंत बुद्धीजीवी जाहिरातकार आणि मुबलक पैसा यांच्या जीवावर मोदींनी आपला गाडा शब्दशः रेटला. या यंत्रणेच्या जोडीला मोदींमधला व्यावहारिक ज्ञानी, चाणाक्ष इव्हेंट मॅनेजर जागा झाला आणि त्यांच्या युतीने भल्या-भल्यांना धूळ चारली. हीच गोष्ट २००८ साली बराक ओबामांच्या बाबतीत अगदी तंतोतंत घडली होती.
ही संपूर्ण यंत्रणाच ओबामांना अभिप्रेत अशी होती. अगदी मोदींच्या भडक रंगाच्या कपड्यांपासून ते त्यांच्या घोषवाक्यांपर्येंत, प्रचारसभांच्या जागांच्या निवडीपासून ते सभेत घेतलेल्या स्थानिक मुद्द्यांपर्येंत मोदींनी आपली मोहोर उमटवली. नवमतदार, तरुण आणि महिला वर्गाला आकर्षित करणारे विकासाचे मुद्दे, जाहीर सभेत लाखोंच्या जनसमुदायाशी संवाद साधण्यात वाकबगार, तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर आणि अथपासून इतिपर्येंत सगळं सगळं विचार करून अंमलात आणणारे, भुलवणारे मोदी ओबामांप्रमाणेच लोकांचे 'डार्लिंग' झाले. 

​​या संपूर्ण वेळात मोदी खोटं बोलले का? तर नक्कीच बोलले. नुसतं खोटं न बोलता, रेटून खोटं बोलले. त्यांनी इतिहासाचे संदर्भ चुकीचे दिले, गुजरातच्या मागास प्रश्नांना हळूच लपवत, केलेल्या कामांचा चपखल प्रचार, काँग्रेस विरोधी वाऱ्याचा वारेमाप उपयोग, आणि संवेदनशील प्रश्नांना हात घालून, थोडासा वाद ओढवून, त्या प्रश्नांचं पिल्लू सोडून आपला 'टिआरपी' वर राहील याची काळजी मोदींनी घेतली. त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीची, उच्चारलेल्या प्रत्येक वाक्याची आणि ओढवून घेतलेल्या प्रत्येक वादाची संपूर्ण जाणीव त्यांनी आणि त्यांच्या चमूला होती. अश्या घटनांचा परिणाम काय असेल आणि त्याचा फायदा आपल्या पदरात कसा पाडून घेता येईल याची खातरजमा केल्यावरचं हे झालं आहे.  याचाचं अर्थ त्यांनी आपला तोल कुठेही ढासळू नाही दिला. अत्यंत शांतपणे, थंड डोक्याने केलेले राजकीय वार त्यांनी विरोधकांच्या जिव्हारी लावले.
काँग्रेसने पुढे केलेलं राहुल गांधींचं नेतृत्व सपशेल फसलं. त्यांना आपल्या शाब्दिक जाळ्यात ओढून, मोदींनी त्यांनी किरकोळीत बाद केलं. अमेठीमध्ये त्यांची झालेली गत सर्व काही सांगून जाते. प्रियंका गांधींनी तब्बल १४ दिवस सलग अमेठीत तळ ठोकून देऊन या गोष्टीला दुजोरा दिला. सोनिया गांधींची चमक कमी होताना याच निवडणुकीने पहिली. राहुलना पुढे करण्यापेक्षा प्रियंका गांधींना काँग्रेसचा चेहरा करण्यात अधिक शहाणपण आहे ही गोष्ट त्यांच्या फार उशिरा लक्षात आली, पण तोपर्येंत मोदी लाल किल्ल्याच्या तटांना संपूर्ण रसद घेऊन भिडले होते. जाणकार असे सांगतात की पुढल्या खेपेला प्रियंका रायबरेलीमधून निवडणूक लढवतील आणि पक्ष बांधणीचं काम सोनिया सांभाळतील. या गोष्टीला प्रियंका गांधी-वद्रा याचं व्यक्तिमत्वसुद्धा कारणीभूत आहे. त्यांचात बऱ्याच जणांना इंदिरा गांधी दिसतात. त्यांच्यात इंदिरा गांधींची नक्कीच छाप आहे. त्यांची देहबोली, लोकांमध्ये मिसळनं, भाषण-कला, केसांची ठेवण हे त्यांचा प्रभाव दाखवतात. इंदिराजींच्या कॉटनच्या साड्या प्रियंका नेसतात हे स्वतः प्रियांका प्रांजळपणे कबूल करतात. त्यांच्या व्यक्तीमत्वात ती जादू नक्कीच आहे जी राहुलमध्ये अजून दिसली नाही. आणि भारतामध्ये पंतप्रधान हा आपल्या कामामुळे कमी आणि आपल्या व्यक्तिमत्वामुळे, करिष्म्यामुळे  त्या खुर्चीच्या जवळ जातो असं उभा इतिहास सांगतो. पण हे सगळं शक्य होईल जेव्हा काँग्रेस तग धरू शकेल. गेली १० वर्ष सत्तारस प्यायलेल्या काँग्रेसजनांना विरोधी बाकावर कसं बसायचं हे सुद्धा ठाऊक असेल की नाही हा प्रश्नचं आहे. हवे ते करू, सगळं मॅनेज करू अश्या मानसिकतेत असणाऱ्यांना हा मोठा धक्का असणार आहे. त्याचबरोबर मोदींचं हे सरकार जर टिकलं आणि व्यक्ती म्हणून मोदींचा स्वभाव बघितल्यास ते कॉंग्रेसला सुखाने जगू देणार नाहीत.  अत्यंत खुनशी असलेले मोदी विरोधकांची काय अवस्था करतात हे गुजरातमधील कॉंग्रेसपेक्षा अजून कोण चांगलं सांगू शकेल असं वाटत नाही. ते या सगळ्या विरोधकांच्या आणि खास करून रॉबर्ट वाद्रांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावतील असं कित्येक नेते खासगीत कबूल करतात. राजनाथ सिंग यांची एखाद्या खात्याचं मंत्रिपद देऊन मोदींनी बोळवण केल्यास शहा भाजपचे अध्यक्ष होऊ शकतात. सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजीव प्रताप रुडी, मनेका गांधी हे मोदींच्या मंत्रिमंडळात संभाव्य स्थानी निश्चित मानले जात आहेत. निवडक ३-४ पक्षांचं संख्याबळ असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निवडणुकीच्या टप्प्यात तब्बल २५ छोट्या-मोठ्या पक्षांसोबत हातमिळवणी केली. सत्तेसाठी एकवटलेल्या या सर्व पक्षांचं आणि भाजपचं गणित किती दिवस जमतंय याचीच काळजी नरेंद्र मोदींना असेल. राष्ट्रीय राजकारणात दणकून प्रभाव पाडू शकणाऱ्या आणि तितकी ताकद असणाऱ्या जनता दलाची, प्रादेशिक राजकारणाचा विचार करत नितीशकुमारांनी घेतलेल्या निर्णयामुळे दुरावस्था झाली. त्यांच्या लोकप्रियतेत आणि मतदानात नक्कीच घट झाली आहे. बिहारमधील बिघडलेलं हे राजकीय समीकरण ताळ्यावर आणताना, आणि जेडियूला पुन्हा राष्ट्रीय पटलावर आपली जागा जोखताना त्यांची दमछाक होणार आहे. वाटतं तितकं सोपं राजकारण नाहीये हे, किंबहुना प्रादेशिक आणि राष्ट्रीय अश्या दोन भिन्न वाटचालींच्यामध्ये होणारा कोंडमारा, त्यासाठी लागणारा वेळ, पैसा आणि सचोटी सोपी नाहीये. हीच गोष्ट अनेक पक्षांच्या बाबतीत खरी ठरणार आहे. 

भारताचं राजकारण एका नव्या दिशेला गवसणी घालत आहे. कधी नव्हे ते सगळे दिवे मोदींवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांची बारीकशी कृतीसुद्धा आता सर्वसामानांच्या भिंगातून सुटणार नाही. अनेक दिशांमधून आणि अनेक प्रश्नांबाबत लोकांचे डोळे मोदींकडे लागले आहेत. बेरोजगारी, भ्रष्टाचार, शैक्षणिक अधोगती, परकीय गुंतवणूक, महिलांसाठी समान वागणूक- समान संधी आणि त्यांची सुरक्षा, व्यापाराचा वाजलेला बोजवारा, पर्यटन आणि त्याचं उत्पन्न, शेजारील आणि ​महत्वाच्या देशांसोबत भारताचे असलेले, होऊ घातलेले संबंध हे सगळ त्यांच्यासमोर एकाच वेळी आवासून उभं आहे. मोदी येउन हे सगळं चुटकीसरशी सोडवतील हे वाटून घेण्यात कमालीचा मुर्खपणा आहे. त्यांच्याकडून काँग्रेसपेक्षा थोडी जास्त सुधारणा करण्याची अपेक्षाच वाजवी आहे.
मोदी काम कितपत करतील हे येणारा काळचं ठरवेल. इतक्या आघाड्यांवर आग लागलेली असताना ते कुठल्या गोष्टीला प्राधान्य देतात हे बघणं औत्सुख्याचं ठरणार आहे. त्यांची आश्वासनं पोकळ न निघोत अशीच अपेक्षा एक मोठा वर्ग करून आहे. राजकारण हे असंच असतं. या मुरब्बी लढाईत मोदी एकहाती वरचढ ठरले आहेत . 
ते बोलले त्याप्रमाणे काही अंशी जरी नव्या सरकारने काम केलं तर हाच विजय ते पुढेसुद्धा नेऊ शकतील यात शंका नाही. देशाची सद्यस्तिथी पाहता राजकीय इच्छाशक्तीची गरज अन्य कोणत्याही गरजेपेक्षा जास्त आहे. काळाची हीच तर मागणी आहे. ही अशी संधी जगाच्या पाठीवरच्या फार कमी, अगदी नगण्य राज्यकर्त्यांच्या नशिबी आली आहे. या अश्या कौलाचं विकासात रुपांतर ओबामासुद्धा बहुतौंशी करू शकले नाहीत, मोदींच्या बाबतीत हेच घडण्याची शक्यता जास्त आहे.
राज्यशास्त्रात याच गोष्टीला 'कॅनव्हासिंग बाय पोएट्री, गव्हर्निंग बाय प्रोस' म्हणतात. नाही का???

                                                                                                                                                                      वज़ीर 

Thursday, 6 March 2014

तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया..!

(शुक्रवार१ मार्च, २०१३, दुपारी १.४० ते ५.०० वाजेपर्येंत)

मनाच्या एका कोपऱ्यात दिल्लीला बंदिस्त केलं. डिस्कवरी, 'टिएलसी' आणि तत्सम खाद्यवाहिन्या या दिल्ली नेहमीच दाखवतात . आमच्या ट्रीपच्या बेतात दिल्लीसुद्धा होती पण अगदी शेवटच्या क्षणी दिल्ली यादीतून बाहेर गेली. असो. श्रीनगरच्या विमानात बसलो. सडकून भूक लागली होती. दिल्लीपर्येंत आम्ही सगळ्यांनी 'सीसीडी' ची कॉफी घश्या खाली घातली होती. त्यानंतर अखंड आमरण प्रवास चालू केल्याप्रमाणे आम्ही एका विमानातून दुसऱ्या विमानात आलो होतो. दिल्लीचं ते विमानतळ आणि त्याचा थाट बघून पोटात अजूनचं मोठा खड्डा पडला होता. श्रीनगरच्या विमानात घुसलो आपापल्या जागा पकडल्या आणि जरा निवांत झालो. माझ्या दप्तरातून केक काढला. शनिवार, अंड्याचा केक  वगैरे काही न बघता शुन्य मिनिटांत फक्त पिशव्या राहिल्या. आता जरा जीवात जीव आला. एव्हाना विमान चालू झालं होतं. आजूबाजूला, आसपास बहुसंख्य काश्मिरी बसले होते. त्यांच्या एकंदर पेहरावावरून आणि भाषेवरून आम्ही ते दोन मिनिटांत ताडलं. मंडईत जाऊन यावं इतक्या साध्या कपड्यात आणि तितक्याच सहजतेने हे सगळे प्रवासी गाडीत बसले होते. आम्ही मात्र आमच्या बघायच्या कार्यक्रमातपण इतके नटून नाही जाणार अश्या रुबाबात प्रवास चालू केला होता. बर्फाला तोड देता येईल इतके चकचकित गाल दाढी केल्यामुळे झाले होते. डझनभर कपडे, दाढीचं समान, अत्तरांचा खच अश्या तयारीत आम्ही निघालो होतो. जमलं असतं तर लग्न तिकडे झालं असतं इतपत तयारी होती. विमानात अजून काही लहान मुलंपण होती. त्यांची अखंड किर-किर चालूचं होती. पण ती मुलं तितकीचं गोड, सोज्वळ आणि सुंदर होती. त्यांचे गोंडस, गुलाबी गाल काश्मीरच्या निस्सीम सुंदरतेचं दर्शन घडवत होते. 

सीटबेल्ट आवळले आणि विमान झेपावलं. हळू-हळू पुन्हा पुढे सरकू लागलं. मागच्या विमानाच्या तुलनेत हे विमान शांत होतं. को-कॅप्टन आणि इतर मंडळी जरा कमी बडबड करत होते. आधीच्या विमानातले कॅप्टन आणि को-कॅप्टन यांनी गुजरात, राजस्थान, दिल्लीची इतकी माहिती दिली होती की फक्त आता ती राज्ये विकायची बाकी होती. त्यामानाने ह्या विमानात सुख होतं. असाच काही वेळ बसलो आणि एकदम दूर क्षितिजावर बर्फाळलेल्या डोंगरांचं टोक दिसलं. एक सणसणीत संवेदना डोक्यात गेली. आत्तापर्येंत फक्त ऐकलेलं, क्वचित टीव्हीवर पाहिलेला तो बर्फ खुणावू लागला होता. तो नझाराचं अप्रतिम होता बाकी काही नाही. एक नंबर. श्रीनगर जवळ पोहोचत असल्याची वर्दी विमानातून मिळाली आणि आम्ही सगळे खिडक्यांना पुन्हा एकदा चिकटलो. आमचा हऱ्या तर धडाधड फोटो काढतचं सुटला. थोडी मेमरी असुदे बाकी ट्रीपसाठी असं मन्या त्याला बोलला. सोबत आम्हीपण शिव्या देऊन घेतल्या. मित्रांसोबत ट्रिपला दुसऱ्या राज्यात गेल्याचा हा फायदा असतो भरपूर शिव्या घालता येतात!

एव्हाना विमानाने पूर्णपणे काश्मीरमध्ये प्रवेश केला होता. आमच्यासारखे काही निवडक नवखे खिडकीपाशी ठाण मांडून बसले होते. बाकी सगळे प्रवासी या सगळ्या गोष्टींना अंगवळणी पडल्यासारखे ढिम्म नजरेतून बघत होते. संपूर्ण दृश्य आता आवाक्यात आलं होतं. लांबच-लांब दाट ढगांची चादर पांघरली होती आणि गोधडीला वरून ठिगळं लावावीत अश्या पद्धतीने ते बर्फाचे टोक दिसत होते. विलक्षण अनुभव होता तो. विमान पुढे सरकताना मधेच ढग गायब झाले आणि हजारो वर्ष खड्या पारश्यासारखे पहारा देत उभे असलेले, संयत वाटणारे, भरमसाठ बर्फ अंगावर घेतलेले डोंगर आमच्या स्वागताला थांबले होते. हे सगळं इतकं क्षणार्धात घडलं की त्यामुळे आम्ही असं हे अशक्य काही बघून हरखलो, सपशेल हरखलो! काचा बाहेरून गार पडल्या होत्या. त्या गारठ्याने या काचांच्या माध्यमातून आमच्या देहामध्ये चंचूप्रवेश केला. जवळच दिसणारी विमानतळाची धावपट्टी आणि त्या बाजूचं निसर्गसौंदर्य बघून आम्ही तृप्त झालो. त्या सुंदरतेवरून नजर हटत नव्हती. अचानक लांब कुठेतरी आल्याचा, शहरापासून लांब, प्रदूषणापासून लांब, निवांत ठिकाणी आल्याचं समाधान  सुखावत होतं. मन प्रसन्न झालं.
विमानातून बाहेर पडलो. २ डिग्री सेल्सिअस एसी खोलीत आल्यासारखं वाटलं. विमानतळ तसं बेताचंच. सुरक्षा रामभरोसे. माणसांची अखंड धावपळ चालू होती. १५ मिनिटांत सामान घेऊन बाहेर पडलो. गाड्यांजवळ आलो आणि आमच्या ड्रायव्हरला शोधू लागलो. एक घोळका दिसला. त्यांना 'आप में से मोहम्मद कौन है?' असं विचारल्याबरोबर ६-८ जण पुढे आले! आमचा चालक शोधला. सैफ अली खानला लाजवेल इतपत छान दिसायला. तितकाच गुलछबू. तवेरात बसलो. शुक्रवार होता. संध्याकाळी ५ची वेळ झाली होती. नमाजची बांग ऐकू आली. वेगळा प्रदेश मस्त वाटला. आमच्या हाउसबोटवर गेलो. समान टाकलं आणि निघालो श्रीनगरच्या बागा बघायला!

'काश्मीर की कली' मधला शम्मी कपूर आठवू लागला आणि रफीसाहेब मनापासून गाऊ लागले,

'तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया…'

                                                                                                                             वज़ीर 

Tuesday, 18 February 2014

ती रात्रचं वैऱ्याची होती...

(रविवार३ मार्च, २०१३ दुपारी १.०० पासून ते सोमवार४ मार्च, २०१३ पहाटे ३.०० वाजेपर्येन्त)

​गुलमर्ग पाहिलं. गुलमर्ग अनुभवलं. लांबचं-लांब नजर संपेपर्येंत, खचाखच बर्फ भरला होता. क्षितिजाच्या पार टोकावरून, ओथंबून, उर भरून टाकणाऱ्या, सगळं निळं आकाश आपल्या कवेत घेणाऱ्या, घोंगावत वाहणाऱ्या वाऱ्याचा स्वच्छंदीपणा न बिघडवणाऱ्या, अंगावर येणाऱ्या आणि किंचित भीतीदायक वाटणाऱ्या बर्फाच्या त्या ढिगाऱ्यावरून सुर्य, निसर्गाच्या या महाकाय मयसभेत आपलं निस्तेज पण तितकचं  सुखावणारं किरणांचं जाळं फेकत होता. बाराचा सुमार तर केव्हाच टळून गेला होता. या लक्ख पांढऱ्या प्रदेशात चिमुकल्यांचा आनंद घेत, बर्फात खेळणाऱ्या आमच्यासारख्या हजारोंचा वेळ भुरकन उडून जात होता. आमची निघायची वेळ झाली होती. पाचपर्येंत बोटहाउसवर जाऊन, भरलेलं सामान उचलून त्याच गाडीने जम्मूकडे कूच करायचं होतं. संध्याकाळी सातच्या आत जम्मूला जाणारा तो जवाहर बोगदा ओलांडून पलीकडच्या रस्त्याला लागायचं होतं. उद्या सकाळी वैष्णोदेवीचं दर्शन घ्यायचं होतं. एकमेकांना बर्फ मारत, 'इकडे-तिकडे' बघत, बर्फातून वाट तुडवत, मध्येच बुटात गेलेला बर्फ काढत शेवटी गाडीपाशी पोहोचलो. गाडीचा चालक आणि आमचा वाटेकरी गाडी सोडून फरार. अवघ्या ५ मिनिटांमध्येच समजलं की गाड्या पुढच्या २-३ तास हालणार नाहीत. एव्हाना २ वाजून गेले होते. पोटात कावळ्यांनी ओरडून-ओरडून त्या अतिथंड वातावरणात आंदोलन सुरु केलं होतं. गाड्या न हलण्याचं कारण समजलं. जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला गुलमर्गमध्ये आले होते. त्यांचा ताफा गेल्याशिवाय गाडी एक इंचपण हलणार नाही असं सांगून सर्व चालक संघटनेनी आपलं अंग काढून घेतलं. जर आज श्रीनगर नाही सोडलं तर समोर दिसणारी थंडी, पुढचे फिसकटणारे सगळे बेत, होणारा जास्त खर्च हे सगळं पुढ्यात बघून, आम्हा ६ जणांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. २ तास गुलमर्गला जाऊन येऊ म्हणता-म्हणता अख्खा दिवस गेला होता. आता त्या जागेचं सगळं प्रेम वगैरे ओसरलं होतं, सगळं कौतुक संपलं होतं, कॅमेरे आत गेले होते, डोळ्यांवरचे गॉगल बाजूला ठेवले गेले होते, शर्टांच्या-स्वेटरच्या बाह्या वर सरसावल्या होत्या. चालक-वाटेकरी आले. काहीवेळ गाडीत बसून घालवला. तुम्हाला सांगतो डोकंचं खराब झालं होतं. आता चलबिचल वाढली होती. सगळे गाडीतून खाली उतरलो. अंदाज घेतला. काहीच हालचाल नाही दिसली. बाकीच्या गाड्यांमधून सगळे उतारू खाली उतरले. थोड्या वेळात सगळं पब्लिक रस्त्यावर उतरलं. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोकं घोळका करून थांबू लागले.  काहीच हाती लागत नाही हे बघून समभाषिक उतारू एकत्र जमू लागले. आम्हीपण आमचा एक मराठी गट जमवला. मनसोक्त शिव्या दिल्या. जरा बरं वाटलं!
​​
​मुख्यमंत्री साहेबांचा ताफा गेला. त्यांच्या मागे आमच्या गाड्या निघाल्या. १२-१६ किलोमीटरचा अवघड,वळणा-वळणांचा, निसरडा, भरपूर दऱ्या असलेला घाट उतरून खाली आलो. गम-बूट परत केले. आमचा तवेराचा चालक मोहम्मद सिगारेट फुकत बसला होता. पटापट गाडीत बसलो आणि अब्दुल्लांच्या नावाने बोटं मोडत बोटहाउसच्या दिशेने निघालो. ७ वाजून गेले होते. जवाहर बोगदा आता जम्मूकडे जाण्यासाठी बंद झाला असणार हे एव्हाना कळून चुकलं होतं. ८च्या सुमारास बोटहाउसवर पोहोचलो. भराभर सामान उचललं. चाचा डबा घेऊन तयारच होता. चिकन ६५ आणि चिकन बिर्याणी सांगितली होती. त्यांचे पैसे दिले आणि मोहम्मदच्या सांगण्यावरून निघालो. 'आपली सेटिंग आहे, थोडासा जुगाड करून पटकन बोगद्याच्या पलीकडे जाऊ' असे त्याने गुलमर्गवरून परत येताना सांगितले होते. चाचा लोकांचा निरोप घेऊन निघालो. गेले २ दिवस, हाडं गोठवणाऱ्या पाण्यावरच्या ज्या तरंगत्या घरात आम्ही राहत होतो त्या घराची, संध्याकाळच्या इतर दिव्यांच्या अंधुक प्रकाशातली प्रतिकृती मनात साठवून गाडीत बसलो आणि मिशन जम्मू सुरु झालं. मोहम्मदने गाडी दामटायला सुरुवात केली. जवाहर बोगदा खुणावू लागला होता. अंधार दाटून आला होता. माणसाचा एखादा बेत फसल्यावर माणूस जसा हताशपणे बघत बसतो तशी आमची अवस्था झाली होती. मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात घरची आठवण दाटून आली होती आणि म्हणूनच की काय गाडीचा आवाज सोडला तर बाकी सगळे आवाज बंद झाले होते. थंडीने त्या रात्रीचे रंग दाखवायला सुरुवात तर केव्हाच केली होती. सगळ्या काचा वर करून आम्ही शांत बसलो होतो. फक्त मोहम्मदच्या बाजूची काच पूर्णपणे लागत नव्हती. त्या बारीक फटीतून येणारी वाऱ्याची गार झुळूक अंगावर शहारे आणत होती. त्या ओसाड रस्त्यावरून शहराच्या बाहेर झटकन पडलो. साधारण १ तासानंतर पोलिसांचा नाका लागला. अस्सल काश्मिरीत काहीतरी संभाषण झालं, आणि एकंदर पोलीसी खाक्या बघून असं लक्षात आलं की आज जम्मूला जाता नाही येणार. पायचं गळून गेले. आता काय करायचं? पोलिसांची हुज्जत घालण्याचा प्रश्नच नव्हता. गाडीने यू-टर्न घेतला. एका कोपऱ्यात गाडी दाबली आणि सगळ्यांनी एकदम आपली तोंडं उघडली. बराच काथ्याकूट झाला. शेवटी मोहम्मद बोलला. त्याला जवाहर बोगद्याकडे जाणारा दुसरा रस्ता माहित होता. रस्ता खराब होता असं तो म्हणत होता. तडक निघालो. वेळ पडली तर पुण्यात नातेवाईक वारले आहेत, लवकर जायचं आहे अशी थाप मारायची आणि सटकायचं असं ठरवलं. मन्या, हॅरी आणि आवी पोलिसांशी बोलतील असं ठरलं. पाउण तासानंतर त्या नाक्यावर पोहोचलो. गाड्यांची बरीच मोठी रंग आमच्या आधीपासून लागली होती. आम्ही काय ते समजून घेतलं पण एक प्रयत्न करू असं ठरलं. नाक्या जवळ गाडी घेतली आणि लक्षात आलं की ते पोलिस नसून आर्मीची माणसं होती. दोघंचं होती. सोबतीला एक ट्रक आणि फक्त दोन मोठ्या रायफल्स. बास! त्यांच्याजवळ गाडी घेतली, सोडा म्हणालो, थाप मारली, विनवणी केली. काहीच नाही. त्यातला एक साधा शिपाई होता, त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर त्याचा वरिष्ठ साहेब अंगावर गुरखला. बंदुकीवर हात ठेऊन शिव्या घालू लागला. काय ते समजून आम्ही मागे फिरलो. 'गाडी बाजुको लगाओ, कल सुबह देखेंगे' असं म्हणून तो थांबला. आम्ही तवेरा रांगेत पहिली उभी केली, रस्त्याच्याकडेला. ११ वाजून गेले होते. थंडी मी म्हणत होती. गाडी बंद केली, गाडीतले सगळे दिवे बंद केले. भुकेने कळस गाठला होता. निमुटपणे कुठलाही आवाज न करता डबे काढले. गुमान खायला सुरुवात केली. चिकन ६५ च्या कोंबडीला बहुदा पोलिओ झाला असावा किंवा चाचाने फक्त हाडं दिली असावी असं वाटलं. बिर्याणी कसली, शुक्रवार पेठेतल्या एखाद्या लग्नातला व्हेज. पुलाव आणि त्यात ७-८ चिकन चे तुकडे घालावे अशी बिर्याणी होती. 'संकटं एकटी कधीच येत नाहीत, नेहमी चार-चौघांना सोबत घेऊन येतात' याचा प्रत्यय आला. 

भयाण शांतता पसरली होती, रस्त्यावर बिनदिक्कतपणे रांगेत लागलेल्या गाड्या आणि त्यात झोपलेलं चालक-प्रवासी सोडले तर आजूबाजूला एक चिटपाखरूपण नव्हतं. काळरात्र ह्याहून वेगळी नसावी. हात धुवायला बाहेर पडलो आणि बाहेर थंडीने हैदोस मांडला होता. हातावर पाणी पडलं आणि भूल दिल्यावर संपूर्ण हाताची संवेदना संपावी तशीच वेळ हातावर आली. 'नो सेन्सेशन'. मरण आठवलं आणि गाडीत येउन बसलो. बिर्याणीबरोबर असलेली
​​
दह्याची कोशिंबीर डबाभरून राहिली होती ती रस्त्याच्याकडेला ओतून दिली. मुकाट्याने गाडीत बसलो. जरा तरतरी आली होती. मोहम्मदने त्या शिपायाला ३० रुपये दिले. शिपाई रात्री १.३० नंतर, त्याचा साहेब झोपला की गाडी सोडतो म्हणाला. हरीनाम जपत गप्प पडून राहिलो. मी झोपलो. अचानक आवाज ऐकून उठलो. शिपायाने गाडी सोडली होती. रस्त्यावर त्या दह्या​च्या कोशिंबी​रिचं आईस-क्रिम झालेलं मन्याने आवर्जून दाखवलं. बाकी पोरांनी गलका सुरु केला. पण हा आनंद काही काळचं टिकला. ३ किलोमीटरवर बोगदा होता. त्यालालागून गाड्यांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.  दुसऱ्या बाजूने गाड्या जम्मूकडून श्रीनगरमध्ये येत होत्या. आमच्याबाजूच्या काही आगाऊ चालकांनी गाड्या आत घातल्या आणि दुसऱ्या क्षणाला जवानांनी २-५ गाड्यांच्या काचा 'ठाळ-ठुळ' करून फोडल्या.  ​तुम्हाला सांगतो शून्य मिनिटांत सगळ्या गाड्या परतीच्या प्रवासाला निघाल्या​.

आम्हीपण निघालो. पुन्हा तोच रस्ता धरला. पुन्हा जवळपास ५०-६० किलोमीटर कापायचे होते. रात्री २ वाजता मोहम्मदने चाचाला फोन केला आणि आम्ही परत येत असल्याची वर्दी दिली. आता सगळेच पर्याय संपले होते. त्या किर्र अंधारात आम्हाला आमचं मरण आठवलं. दुतर्फा ओसाड जमीन असणाऱ्या त्या एकांतवासातल्या रस्त्यावरून आम्ही गर्दीत भरकटल्यासारखे निघालो होतो. आता जणू सगळ्यांनी तोंडाला कुलूप लावलं होतं. मोहम्मदच्या बाजूला काचेवर लावलेलं कापड तेवढं फडफड करत होतं. त्याचा आवाज ती शांतता कापत, गार, बोचऱ्या वाऱ्यासकट आत शिरत होता. थंडी आणि भीती एकवटून आळीपाळीने आमच्या गाडीवर हल्ला करत होत्या. झोप मी म्हणत होती. झालं ते झालं, आता यातून कसं निस्तरायचं ते उद्या ठरवू, आता जाऊन निवांत पडू इतकंच डोक्यात होतं. दिवसभर बर्फात बागडून, नंतर चीड-चीड करून, जीवाच्या आकांताने गाडीतून केलेली ही पळपळ अंगावर आली होती. जरा विश्रांती हवी होती. भयाण रात्र होती. इथे आपलं काही बरं-वाईट झालं तर घरच्यांना समजायला ४ दिवस लागतील इतकी खोचक शाश्वती ती परिस्थिती दर सेकंदाला पटवून देत होती. आणि मेलो तरी बेहत्तर, चुकून जगलो आणि घरच्यांना हे जर समजलं तर १००% तुडवणार हे प्रत्येकालाच माहित होतं. 'कोणी सांगितलं  होतं अश्या ठिकाणी जाऊन काशी करायला' हे तर पेटंट वाक्य सगळे ऐकणार होतो. बहुदा!

त्या काळरात्रीत मोहम्मद आम्हाला परमेश्वरासारखा भेटला. पहाटे ३ वाजता परत बोटहाउस वर आलो. चाचा उभाच होता. त्या तश्या वेळीपण त्यांचं आदरातिथ्य भावलं. मनापासून भावलं. बोटीत घुसलो. 'कल सुबह १० बजे तक आता हून' हे मोहम्मदचं वाक्य कानी पडलं. आपापले बेड पकडले आणि निद्रादेवीच्या आधीन गेलो. 

तो दिवस अजून आम्हा सगळ्यांच्या खणखणीत लक्षात आहे. आमच्या संपूर्ण ट्रिपचा नूरच तिथून बदलून गेला. आत्तापर्येन्त मजा, सुख, धमाल दाखवणाऱ्या त्या काश्मीर खोऱ्याने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली होती. राग, भीती, साहस आणि प्रत्येक संवेदना जागवणाऱ्या थराराच्या अनेक कंगोऱ्यांची प्रचीती त्या रात्रीने दिली होती. ती रात्रचं वैऱ्याची होती...

क्रमश:
                                                                                                                                                               
                                                                                                                                                                            वज़ीर