Wednesday, 19 June 2013

नव्या बाटलीत जुनीच दारू ???

अंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की काही देश हे जगासाठी डोकेदुखी ठरावेत यासाठीच निर्माण झाले आहेत. या देशांच्या यादीत इराणचा क्रमांक नक्कीच वर आहे. तेलाचं राजकारण आणि त्याच्यामुळे होणारे वाद या मध्ये इराण कायमच आघाडीवर राहिला आहे. बाकी इराणचा इतिहास काही काळ बाजूला ठेऊन सद्यस्तिथिचा विचार केल्यास इराण, त्याचे राज्यकर्ते आणि त्यांची वर्तमान धोरणं जगाला खूप काही भोगायला लावू शकतात हे नक्की आहे. 


इराणचे राज्यकर्ते नेहमीच लोकशाही आणि धर्माचा प्रचार करणाऱ्यांच्या कात्रीत सापडतात. त्याला मोहम्मद अहमदजीनेदाद हे अपवाद नव्हते आणि आता निवडून आलेले हसन रोहानी पण नाहीत. जगातले काही पेच हे सुसंवादानेच सुटू शकतात हे वास्तव आहे. या वास्तवाची जाण हल्लीच्या काही निवडक राज्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते. बराक ओबामा हे त्यातलं अग्रस्थानी असलेलं नाव. हसन रोहानी हे काहीप्रमाणात त्याच विचाराचे. राष्ट्रप्रेम आणि त्याचं अवडंबर यात एक अस्पष्ट रेघ असते. या रेषेची पुरती जाण असणारे नेते म्हणजे रोहानी. म्हणूनच जगाशी किंबहुना अमेरिकेशी चर्चेचा मार्ग सोयीस्कर आहे  या विचाराच्या रोहानींना इराणची राष्ट्रपतीपदाची निवडणूक एक आव्हानच ठरली. जवळपास सगळे कट्टरपंथी, इराणचे सर्वेसर्वा खामेनी आणि स्वतः मावळते राष्ट्राध्यक्ष अहमदजीनेदाद यांचा रोहानी यांना विरोध होता.  जागतिक राजकारणाच्या पटलावर अहमदजीनेदाद यांचं नाव एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेच. पण, त्यांना देशांतर्गत विरोधपण तितकाच होता. थेट राष्ट्रपतीपदाचाच जुगाड करणाऱ्या अहमदजीनेदाद यांना समंजस इराणी जनतेनेच दूर केलंच होतं आणि त्यात भरीस- भर म्हणून न्यायालयाने अहमदजीनेदाद यांना यंदाची निवडणूक लढवण्यास बंदी घातली. याच अहमदजीनेदाद यांनी गेली काही वर्ष अमेरिकेच्या नाकात दम केला होता. जगभरातून टीकास्त्र आणि तुफान विरोध होत असतानासुद्धा, तो विरोध म्हणजे पाठींबा आहे अशा थाटात अहमदजीनेदाद आपलं अणूशस्त्र धोरणाचं घोडं पुढे रेटत होते. 
रोहानी यांचा विजय आणि त्यानंतर इराणी युवकवर्गाने केलेला जल्लोष खूप काही सांगून जातो. हाच युवकवर्ग पाच वर्षांपूर्वी २००९ झालेल्या राजकीय चिखलामुळे रस्त्यावर उतरला होता. पण, वाळवंटात तेल कुठे लागेल आणि तिथले राज्यकर्ते कसे रंग बदलतील याचा नेम नाही. त्यामुळेच काही राजकीय विश्लेषक रोहानी यांच्या पावलांकडे सावधगिरीच्या नजरेने पाहत आहेत. पर-राष्ट्रीय धोरणासाठी लागणारी सावधगिरी आणि वाऱ्याच्या दिशेने गोष्टी हाताळायचं कसब रोहानी यांच्याकडे ठासून भरलंय. २००३  ते २००५ च्या दरम्यान इराणकडून अमेरिकेशी बोलणी करण्यासाठी रोहानीच आघाडीवर होते. आपल्यातला कट्टर इस्लामवादी आणि त्याच्या जोडीला कायद्याचं ञान या रोहानिंच्या जमेच्या बाजू आहेत. इराण आपला अण्वस्त्र कार्यक्रम चालूच ठेवणार हा निर्धार रोहानी यांनी केलाच आहे, पण इराण वाटाघाटी करण्यासाठीच्या काही अटी शिथिल करेल असा समंजसपणा रोहानी यांनी दाखवला आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की इराणचं पर-राष्ट्रीय धोरण आणि अण्वस्त्र कार्यक्रम हे अजून तरी आयतुल्ला अली खामेनी जे की इराणचे सर्वेसर्वा आहेत हेच ठरवतात.


अमेरिकेने लादलेले आर्थिक निर्बंध आणि इराणी जनतेची त्यातून होणारी पिळवणूक या मुख्य गोष्टींची किनार रोहानी यांच्या समंजसपणाला आहे याचा विसर नको.  रोहानी यांच्याकडून काही जादू घडेल अशी अपेक्षा बाळगण्यात मूर्खपणा आहे, पण त्यांचं एकंदर व्यक्तिमत्व आणि त्यांचे शिस्तप्रिय विचार पाहून रोहानी, अहमदजीनेदाद यांच्यापेक्षा कमी जहाल मार्ग स्वीकारतील असा कयास आहे.  त्यामुळेच रोहानींचा शांततापूर्ण अणू कार्यक्रम खोमेनींच्या जहालवादी कार्यशैलीवर कशी मात करेल हे बघणं औत्सुख्याचं ठरणार आहे. पण, तूर्तास तरी रोहानी जगाबरोबर शांततेचे संबंध प्रस्तापिथ करण्यावर भर देतील असा भाबडा आशावाद बाळगणे आणि त्यासाठी निकारीचे प्रयत्न करणे यातच सगळ्यांचं भलं आहे. हाच शहाणपणा त्यांचे विरोधक दाखवतील अशी अपेक्षा आहे. नाहीतर अशा सुडाच्या राजकारणाला बळी पडलेल्या सामान्य इराणी जनतेसाठी सगळंच अवघड आहे... 

                                                                                                                                                                              - वज़ीर     

No comments:

Post a Comment