(शुक्रवार, १ मार्च, २०१३, सकाळी ११ ते १.१० वाजेपर्येंत)
पुण्यात विमानात बसलो आणि दिल्लीच्या तख्ताकडे कूच केली. शांत, संथ आणि किंचित हळू वाटणाऱ्या अशा गतीने विमान पुढे सरकत होतं. लहानपणी हवेत तरंगणाऱ्या परीची गोष्ट आठवली. आम्ही सगळे तोच अनुभव तर घेत नव्हतो ना? काय वाटलं कोणास ठाऊक एकदम वळून मी मित्रांकडे पाहिलं, सगळे विमानाच्या खिडकीतून बाहेर बघण्यात रमून गेले होते. एखाद्या लहान मुलाला नवीन खेळणं दिल्यावर तो ज्या आत्मीयतेने ते खेळणं बघत असतो तीच गोष्ट काही प्रमाणत आम्हा ६ लोकांबरोबर घडत होती. बाकीचं पूर्ण विमान आणि त्यातले प्रवासी दादर - सीएसटी लोकल प्रवास करावा असे आरामात बसले होते, किंवा तसे भासवत होते!!!
पुण्यात विमानात बसलो आणि दिल्लीच्या तख्ताकडे कूच केली. शांत, संथ आणि किंचित हळू वाटणाऱ्या अशा गतीने विमान पुढे सरकत होतं. लहानपणी हवेत तरंगणाऱ्या परीची गोष्ट आठवली. आम्ही सगळे तोच अनुभव तर घेत नव्हतो ना? काय वाटलं कोणास ठाऊक एकदम वळून मी मित्रांकडे पाहिलं, सगळे विमानाच्या खिडकीतून बाहेर बघण्यात रमून गेले होते. एखाद्या लहान मुलाला नवीन खेळणं दिल्यावर तो ज्या आत्मीयतेने ते खेळणं बघत असतो तीच गोष्ट काही प्रमाणत आम्हा ६ लोकांबरोबर घडत होती. बाकीचं पूर्ण विमान आणि त्यातले प्रवासी दादर - सीएसटी लोकल प्रवास करावा असे आरामात बसले होते, किंवा तसे भासवत होते!!!
वैमानिक सांगत होता आता आपण २०,००० फुटांवरून चाललो आहोत, तापमान, हवेची गती, प्रेशर इत्यादी, इत्यादी. एव्हाना महाराष्ट्र सोडला होता, गुजरात ओलांडलं होतं, वरून काहीच समजत नव्हतं. असं करत करत उदयपुरवरून चाललो असल्याचं वैमानिक म्हणाला, काहीच कारण नसताना वाळवंटाची वाट तुडवल्याची समजूत करून घेत होतो. खालचं काहीच दिसत नव्हतं, दिसणारही नव्हतं.
अंतिम टप्पा नजरेत येणार होता. दिल्ली खुणावत होती. राजस्थान मागे पडलं होतं. मी म्हणणारं ते वाळवंट विमानाने काही मिनिटांमध्ये पार केलं होतं. एक विलक्षण संवेदना नसा-नसांत भिनत होती. एक नवं पण कित्येक पटींनी जास्त जुने संबंध असलेलं राज्य खुणावत होतं, ते तख्त खुणावत होतं, याच तख्तासाठी कित्येक संसार उघड्यावर आले, कित्येक जण हुतात्मे झाले, पण दिल्लीपर्येंत मजल गाठणाऱ्या मराठ्यांनी दिल्ली कधीच काबीज केली नाही, आजतागायत…
तेच सिंहासन खुणावत होतं…त्याच्याजवळ चाललो होतो...
विमान उंचावरून डाव्या बाजूला खाली आलं, आणि दिल्लीचं पाहिलं दृश्य दिसलं. हिरवी दिल्ली. नितळ हिरवी. परमेश्वरासाठी हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा चौकोनात भरून ठेवाव्यात इतकं विहंगम. दिल्लीत इतकं पाणी आहे? हा टिपिकल पुणेरी प्रश्न पडला. लांब-लांबपर्येंत हिरवे पट्टे. नजरेत भरणारं दृश्य. विमान आणखी खाली येऊ लागलं, खाली येताना जणू मध्ये येणारे ढग चुकवू लागलं. पुन्हा एकदा दिल्ली, शाहरुख खान, रेहमान आणि स्वदेसची थिम ऐकू येऊ लागली. ज्या माणसाच्या काळजाला ती थिम थेट भिडलीये, त्याला ती थिम विमानात बसल्यावर नाही आठवली तर त्याने त्या विमानातून उडी मारून सरळ जीव द्यावा. पण, हे सुख काही काळच टिकलं. कारण नैसर्गिक दिल्लीतून शहरी दिल्लीकडे विमान जाऊ लागलं. पत्त्याची घरंच जणू..तुफान दाटी. माणसांची दाटी, गाड्यांची दाटी, घरांची दाटी. इतकी दाटी पाहून थक्क झालो. पुण्यातल्या बालाजीनगरची किंवा आंबेगाव सेक्टर १६ची आठवण झाली. ही आपल्या देशाची राजधानी आहे? कुचकट पुणेरी बाणा जागा झाला. रस्ते दिसू लागले, साचेबद्ध. चारचाकी गाड्यांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या, त्यासुद्धा एकमेकांना चिकटून-चिकटून थांबलेल्या. खऱ्या अर्थाने महानगर. तितकीच लोकसंख्या आणि तितकंच प्रदूषण.
विमानतळ नजरेच्या टप्प्यात आलं. इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ. खरं सांगतो नाद खुळा. विमानतळावर शेकड्याने विमाने उभी होती. काही इथली आणि भरपूर बाहेरील देशांमधली. चकचकीत काळ्या धावपट्ट्या. त्यात काही खासगी चार्टर विमानं. कोणत्या नेत्याचं कोणतं विमान असा हळूच शोध घेऊ लागलो. दिल्ली खऱ्याअर्थाने राजधानी. अतिउच्च ताळ-मेळ. सगळं कसं सुरळीत चाललं होतं. साचणीबद्ध. केंद्र सरकार.
आता पुणे मागे आणि दिल्लीत उतरलो. Safe landing. श्रीनगरच्या विमानाला २० मिनिटे होती. पटापट पळालो. काय विमानतळ आहे..आहाहा. असं वाटतंच नव्हतं आम्ही भारतात आहोत. उत्तम सोय-सुविधा, तत्पर सेवा, वेळेचं अन पैश्याचं महत्व, ही या विमानतळाची खासियत!!
श्रीनगरच्या विमानात बसलो. आता त्या गोष्टीचा सराव झाला होता. निर्ढावलो होतो. हात-पाय ऐस-पैस सोडून बसलो. पण, दिल्लीने मनात घर केलं होतं. परत खास दिल्ली बघायला येऊ ही खुणगाठ मनाशी बांधून सीट-बेल्ट बांधू लागलो…
रेहमान पुन्हा मनात डोकावू लागला...
'ये दिल्ली है मेरे यार, बस इश्क, मोहब्बत, प्यार…!'
- वज़ीर
- वज़ीर
No comments:
Post a Comment