Sunday, 30 September 2012

गणेशोत्सवाचं आणखी एक वर्ष...

गणेशोत्सवाचं आणखी एक वर्ष...

मुक्काम पोस्ट: कुठचही सार्वजनिक गणपती मित्र मंडळ, महारष्ट्र राज्य.
साल २०१२-१३ चा गणेशोत्सव.

गणेशोत्सव आता अगदी तोंडावर येऊन ठेपलेला असतो... कारण गणपती प्रतिष्ठापनेला आता फक्त एक आठवडा बाकी असतो...मंडळात कार्यकर्त्यांची फौज कामाचा पाढा वाचून वाचून काम करत असते...बैठकांना आता अगदी जोर येत असतो...रात्रीचे कट्टे आता जरा जास्त वेळ गाजत असतात...आपण 'हे' करू 'ते' करू याच्या उजळण्या मग रात्र-रात्रभर चालतात...मंडळाचा आर्थिक गट मग गेल्या वर्षीचा हिशेब शोधण्यात आपले दिवस घालवत असतो...मग त्या हिशेबाची फेरतपासणी होते...चिठ्ठ्या-चपाठ्यांचा खच गोळा होतो...पावती-पुस्तक पुढून- मागून चाळली जातात...तपशील मांडला जातो...यंदाच्या खर्चाची ढोबळ रक्कम ठरवली जाते...त्यासाठी मग कोणाकडून किती वर्गणी घ्यायची याची चाचपणी होते...असं करत करत मंडळाचा गतवर्षीचा अहवाल छापला जातो...त्यात कार्यकर्त्यांची, वर्गणीधारांची नावे अनुक्रमाने छापली जातात...बाप्पाचे सुबक फोटोसुद्धा छापले जातात...आणि मग हीच फौज वर्गणी मागण्यासाठी रस्ते, जिने, उंबरे, दुकाने, आणि आपापल्या चपला झिजवते...काही कार्यकर्ते गणपती मूर्तीचं रंगकाम बघून येतात..अशा वेळी सुद्धा संपूर्ण अंगभर वेग-वेगळे रंग लागलेल्या रंगारी माणसाला काही बारकावे सांगितले जातात...तीच गोष्ट मंदिर रंगवणाऱ्याच्या बाबतीतसुद्धा घडते असते...एक-एक दिवस पुढे जात असतो...एव्हाना वर्गणी बर्यापैकी जमा झाली असते..कोणी किती वाढून दिली, कोणी किती रुपये कमी दिले याची मौखीख बातमी सगळे एकमेकांना देत असतात...पावती-पुस्तके संपत असतात...'कार्बन पेपर' अजून पाहिजे असतात...नवीन कार्यकर्ते ही सगळी पद्धत अचंबित चेहऱ्याने बघत असतात...एक दोन 'बोल बच्चन' मुकाटपणे वर्गणी मिळवून द्यायचं काम करत असतात...काही जण मग 'फ्लेक्स' तयारीसाठी धावतात...मंदिर आता चकाचक झालेलं असतं...रंगीत मांडव पडलेला असतो...एखादा राजा यावा व त्याचं स्वागत करावं तसं झुपकेदार झालरीचा मांडव मंडळाची शान वाढवत असतो...पोरं-टोरं मांडवाच्या खांबाभोवती गोल गोल फेर्या मारत असतात...त्यांची अखंड किल-किल चालूच असते...उन्हं उतरली की कार्यकर्ते ढोल-ताशे-झेंडे-टोल ऊरावर घेऊन एखादं मोकळं पटांगण घेऊन आपला 'आव्वाज' चालू करतात...गेला महिना-दोन-महिना हाच कार्यक्रम चालू असतो...ढोलाच्या चामड्यावर टिपरी पडून पडून मनगट सुजत असतं...बोटाची कातडी निघत असते...पण अंगातली रग आणि त्याला भरीस-भर वातावरण हा उत्साह टिकवून ठेवत असतो...काहींची वर्गणी अजून यायची असते...रात्री कट्ट्यावर मग त्याच्या आयला अमक्याच्या मायला केल्याशिवाय कार्यकर्त्यांचा पोट भरत नाही...स्थापनेचा आदला दिवस उजाडतो...मंडळात लगीनघाई चालू होते...उरली-सुरली कामे केली जातात...सगळी कामं संपूनसुद्धा आजची रात्र जागून काढावी लागणार हे एव्हाना पटलं असतं...मग रात्री आपापल्या घरी जेवण उरकून कार्यकर्ते जमतात...गणपतीचा गाडा सजवला जातो...ढोल सोडून, गोंद लावून पुन्हा आवळले जातात...मग एखादा बाप्या माणूस येऊन त्यांच्या 'टायमाला' काय काय मजा असायची हे उगाच सांगत असतो...त्याच्या हो-ला-हो करत कार्यकर्ते आपला काम सुमडीत उरकत असतात...मध्यरात्र तर केव्हाच उलटून गेली असते...मग कांदा चिरला जातो...इतका वेळ धुळीत माखलेले हात, तोंड भेळ खात असतात...हा ब्रेक झाला की मग 'फायनल टच' दिला जातो...टोल-गाडी रंगवली जाते...ताशाच्या पिना आवळल्या जातात...इतका वेळ गार वार्याची, झोपेची परवा न करणारे कार्यकर्ते आता थकलेले असतात...थंडी मी म्हणत असते..निद्रादेवी आपल्या पाशात एकेकाला ओढत असते...हा-हा म्हणता एक एक जण पडी टाकतो...पण शांत झोप येत नसते...मग गपचूप गाड्या काढून १०/१२ कार्यकर्ते एखादा चहाचा गाडा शोधतात...वन-बाय-टू कड्डक(मेंढी) चहा सांगितला जातो...सोबत क्रीमरोल, बिस्कीट असतातच...झोप तात्पुरती उडाली असते...आता पुन्हा घरी येऊन काही तासच झोपायचं असतं...मग घरचा गणपती बसवला जातो...मंडळात लग-बग अगदी शिगेला पोहचते...बाप्पा आणला जातो...तो गाड्यावर बसवला जातो...दिवा पेटवला जातो...धूप पेटवले जातात...ढोल-ताशावाले पांढर्या पारंपारिक वेषात जमलेले असतात...ढोल बांधले जातात...आणि ताशाची तार चालू होते...एक-एका ठोक्यागणिक एक-एक जण आपल्या घराबाहेर पडतो...मिरवणुकीला रंग चढलेला असतो...तिन्हीसांज झालेली असते...रात्री ९ च्या सुमारास मंडळाचा गणपती स्थानापन्न झालेला असतो...१० दिवसांच्या धुमशानाला अधिकृतपणे सुरुवात झालेली असते...एक एक दिवस कधी निघून जातो याचा कोणालाच थांग-पत्ता लागत नसतो...रोज आरती, विधिवत पूजा झाल्यावर कार्यक्रम घेतले जातात...लहान-मुलांचे खेळ घेतले जातात...अनंत-चतुर्दशीच्या आदल्या दिवशी सत्य-नारायणाची महापूजा घातली जाते...त्याच दिवशी बक्षीस समारंभ असतो...ते मिळाल्यावर लहानग्यांच्या चेहर्यावरचा आनंद काही वेगळाच असतो...म्हणता म्हणता विसर्जनाचा दिवस येतो...आदल्या रात्री पुन्हा तोच कार्यक्रम झालेला असतो...गाडा तयार असतो...भेळ खाऊन झाली असते...चहा प्यायलेला असतो...ढोल आवळले असतात...दुपार-सरल्यावर गर्दी जमा होते...पोरं-टोरं मांडवाच्या खांबाभोवती गोल गोल फेर्या मारतचं असतात...त्यांची अखंड किल-किल चालूच असते...आरती केली जाते...गणपती गाड्यावर ठेवला जातो...पुन्हा ताशाची तार चालू होते...टोलची ढण-ढण चालू झालेली असते...झेंडा उडवला जात असतो...कार्यकर्ते जीवाच्या आकांताने ढोल कुटत असतात...बेंबीच्या देठापासून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष चालू असतो...मिरवणूक साग्र-संगीतात पार पडत असते...फुलं उधळली जातात...नाचणारे जीव खाऊन नाचत असतात...बायकांनी फुगड्यांचा फेर धरलेला असतो...शांततेत चालू असलेल्या मिरवणुकीत ४/५ 'टाकेश' करायचा तो राडा करतातच...मिरवणूक आस्ते-कदम पुढे जात असते...आरती करून बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातो...

पहाटे गणपती बघून कार्यकर्ते घरी परततात...मांडव रिकामा असतो...फुलं असताव्यस्त पडलेली असतात...उदबत्त्या, दिवे, समया विझल्या असतात...माळा बंद झाल्या असतात...कार्यकर्ते दमले असतात...पाय दुखत असतात...मन उदास असतं...बाप्पा गावी गेले असतात...आता बाप्पा मंदिरात एकटाच असतो...थोडा वेगळा वाटणारा शांत-शांतपणा त्यालापण सुखावणारा असतो...किल-किल नसते...रोज तीच-तीच गाणी ऐकून १० दिवस तोसुद्धा कंटाळला असतो...गोड गोड खाऊन त्याला सुद्धा आता नकोसं झालं असतं...उदबत्ती-धुपाचा धूर त्याच्या तर नाकात बसलेला असतो...अंगावर जाड-जुड हार नसतात...इतकाच काय जान्व्ह पण नसतं...दागिने पण नसतात...आता आपापल्या घरी कार्यकर्ते तोंडावर चादर घेऊन, आणि इतके दिवस अंगावर उपरणं असलेला बाप्पा तेच उपरणं तोंडावर घेऊन गर्दीपासून लांब, शांततेत पहुडलेले असतात...

गणेशोत्सवाचं आणखी एक वर्ष संपलेलं असतं...
                                                                                                          वज़ीर

1 comment:

  1. Khup sundar lihilays Nikhil !! Sadhya ganeshotsav nasatana sudha sagla sohala dolyasamolr ubha rahila ha blog wachun....mastta !!

    ReplyDelete