रणकंदन पेटलयं, निकारीच्या लढाईसाठी युद्धभूमी जणू सज्ज झालीये आणि दोन्ही बाजूचे योद्धे आपलं सगळं अवसान, आपला सगळा पैसा, आपली सगळी ताकद आणि आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावून, मातीत घट्ट पाय रोवून उभे आहेत. हे वर्णन आहे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या सध्य-परिस्थितीचं. गेल्या महिन्याच्या तुलनेत सगळ्याच बाबतीत वेग घेतलेल्या या निवडणुकीने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे, आणि नुसता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष नाही तर अख्ख्या जगाचा नेता आता निवडला जाणार या विचाराने सगळी आंतरराष्ट्रीय प्रसार-माध्यमं आता एकाच दिवसाची चातका प्रमाणे वाट बघत आहेत. तो दिवस आहे मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२.
रिपब्लिकन आणि डेमोक्राटिक पक्षांचा उमेदवार जाहीर करण्याचा कार्यक्रम पार पडला आणि उमेदवारांना आता अधिकृतपणे पैसे खर्च करण्याची संधी मिळाली. रिपब्लिकन पक्षाकडून मिट रोम्नी आणि पॉल रायन यांना अनुक्रमे राष्ट्रपती आणि उप-राष्ट्रपती पदास उमेदवारी जाहीर झाली आहे तर डेमोक्राटिक पक्षाकडून विद्यमान राष्ट्रपती बराक ओबामा आणि उप-राष्ट्रपती जो बिडेन यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
या उमेदवारी जाहीर(कन्वेन्शन) करण्याच्या कार्यक्रमात झालेल्या आगपाखाडीने उच्चांक गाठला. करोडो लोकांनी जगभरातून पाहिलेला हा कार्यक्रम निवडणुकीला कलाटणी देतो असं इतिहास सांगतो, यंदाचे हे कार्यक्रमसुद्धा यागोष्टीला अपवाद नाहीत. २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान फ्लोरिडा मध्ये झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमात ख्रिस ख्रिस्ती, कॉन्डोलीझा राईस, एन रोम्नी, मार्को रुबिओ, पॉल रायन, मिट रोम्नी या दिग्गजांची भाषणे झाली. सर्वांचा रोख ओबामांवर होता, असणारच होता. चकाचक झालेल्या या कार्यक्रमात रोम्नी आपणच अमेरिकेचे आणि अमेरिकी जनतेचे कसे तारणहार आहोत हे पटवून देत होते. रोम्नी यांचा पत्नी यांनी केलेलं 'राजकीय' भाषण उल्लेखनीय म्हणावं लागेल. पण टीका करणे आणि नवा मार्ग सुचवणे, किंवा नवीन दिशा दाखवणे यात फरक असतो आणि इथेच रोम्नी मागे पडले. आम्ही अमेरिकी जनतेसाठी चांगली आरोग्यव्यवस्था आणू, रोजगार निर्मिती करू, देशाची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा नीट बसवू असे सांगणारे रायन-रोम्नी हे सगळं करणार म्हणजे नक्की काय करणार हे सांगत नव्हते. त्यामुळेच आधीच 'आयझॅक' वादळामुळे संकटात सापडलेल्या या कार्यक्रमच्या माध्यमातून रोम्नी काही खास, विशेष असा कुठचाही 'मेसेज' पाठवण्यात, लोकांच्या मनामध्ये ठासविण्यात कमी पडले. नेमकी हीच गोष्ट रिपब्लिकन पक्षातील अनेकांना पटली नाही आणि मग गटबाजीचं पुढे जे काय होते तेच झालं. रोम्नी यांच्या विरोधात त्यांचाच पक्षातल्या लोकांनी कुरबुर करायला सुरुवात केली आहे.
या उलट पैसे गोळा करण्यात मागे असलेल्या ओबामा आणि डेमोक्राटिक पक्षाचा कार्यक्रम योजनाबद्ध वाटला. जुलियन कॅस्ट्रो, मिशेल ओबामा, जिल बिडेन, जो बिडेन, बिल क्लिंटन, बराक ओबामा अशा वक्त्यांची भाषणे झाली. जुलियन कॅस्ट्रो भाषण करत असताना बर्याच लोकांना २००४ सालचे, आवेशपूर्ण भाषण करणारे ओबामा आठवले. कॅस्ट्रो यांनी अमेरिकी राजकारणात यापुढे भर-भक्कम मजल मारल्यास नवल वाटायला नको. त्यांच्याकडे २०१६ किंवा २०२० चा डेमोक्राटिक पक्षाचा उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे. मिशेल ओबामा याचं भाषण वास्तवाला धरून होतं असं म्हणावं लागेल, कारण त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता त्यांनी जनतेची नस अचूकपणे पकडली होती यात वाद नाही. त्यांनी नेहमीप्रमाणेच ओबामांची बाजू लावून धरली आणि आपण 'व्हाईट हाऊस' मध्ये जाऊनसुद्धा सामान्य जनतेशी कसे जुळलेले आहोत हे पटवून दिलं. जो बिडेन याचं भाषण नेहमीप्रमाणेच साजेसं म्हणावं लागेल. एक गोष्टीचा इथे उल्लेख करावासा वाटतो की रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमात उच्चभ्रू, उच्च-मध्यमवर्गीय लोकांचा जास्त सहभाग होतं आणि त्याउलट डेमोक्राटिक पक्षाच्या कार्यक्रमात सर्व-सामान्य मध्यमवर्गीय लोकांचा जास्त भरणा होता, आणि हेच, अगदी हेच गणित हेरून ओबामा अन त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचाराचा प्रकाशझोत 'मिडल क्लास' साठी वळवला आणि रोम्नी गटाला फक्त उच्चभ्रू वर्गाचे प्रतिनिधी असा शिक्का मारून त्यांची गोची केली. त्यामुळे आधीच 'अर्थव्यवस्था' याच मुद्द्यावर अडलेल्या निवडणुकीत ओबामा गटाने त्यातसुद्धा आपला चाणाक्षपणा दाखवून दिला. ओबामांच भाषणसुद्धा आवेशपूर्ण झालं. त्यांनी मतदारांना साद घालत आपली बाजू मांडली. या कार्यक्रमाचा परोमोच्च बिंदू असलेलं त्यांचं भाषण काय परिणाम करू शकेल याची पूर्ण जाणीव असलेल्या ओबामांनी आपल्या छोटे-खाणी भाषणामध्ये अचूकता साधण्याचा प्रयत्न केला.
बराक ओबामांनंतर या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या बिल क्लिंटन यांचं भाषण 'ए क्लास' म्हणावं लागेल. राजकीय विश्लेषक आणि पंडितांच्या निष्कर्षानुसार या दोन्ही पक्षांच्या कार्यक्रमामध्ये झालेल्या शेकडो भाषणांमध्ये बिल क्लिंटन यांचं भाषण सगळ्यात अप्रतिम झालं. ज्या काही भाषणांमुळे निवडणुकीस कलाटणी मिळू शकते अशा भाषणांमध्ये बिल क्लिंटन यांचं यावेळेसच भाषण सर्वात अव्वल स्थानी आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ओबामांचा जर विजय झाला तर 'हाच तो क्षण' या सदरात मोडेल असं भाषण क्लिंटन यांनी केलं. त्यांचं भाषण पाहणं म्हणजे उसेन बोल्टला पळताना पाहणं किंवा लिओनेल मेस्सीला फुटबॉल खेळताना पाहण्यासारखं आहे, आपल्याला माहित असतं की आपण इतिहास घडताना पाहतोय, त्यांनी जे केलं पाहिजे अगदी तेच त्यांनी केलं. क्लिंटन यांची भाषण-शैली, त्यांचं ओघवतं वक्तृत्व, त्यांची देहबोली, त्यांचा प्रसिद्ध 'क्लिंटन थंब', कडवट टीकेला सामोरे जाऊन सोप्या पण, सूचक शब्दांमध्ये विरोधकांना निरुत्तर करणे आणि हे करत असताना आपल्या 'पेटंट' स्मितहास्याने आपलं राजबिंड रूप खुलवणे या बाबतीत क्लिंटन अग्रेसर आहेत. फक्त अमेरिकी जनता नव्हे, तर संपूर्ण जगचं, क्लिंटन यांच्या रूपावर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांच्या गारुडावर किती आणि का फिदा आहे याचा प्रत्यय यावेळीसुद्धा आला.
याचा परिणाम काही दिवसांमध्येचं दिसला. सर्वेक्षणात ओबामांनी रोम्नी यांना मागे टाकून सरशी घेतली. ही सरशी ओहिओ, मिशिगन, व्हर्जिनिया, फ्लोरिडा, आयोवा, आणि कोलोराडो महत्वाच्या राज्यांमध्ये आहे, ज्यांनाच 'स्विंग स्टेट्स' म्हणून संबोधलं जातं. तसेच ओबामांनी ऑगस्ट मध्ये रोम्नी यांना मागे टाकून जास्त पैसा गोळा केला.
निवडणुकीचं हे गणित थोडं ओबामांकडे झुकत असतानाच अल-कायदा पुरस्कृत कट्टर गटांनी ११ सप्टेंबरचा दिवस बरोब्बर साधून, 'इस्लाम-विरोधी' चित्रपटाचा निषेध म्हणून लिबिया मधल्या, बेंगाझी शहरातल्या अमेरिकी दुतावासावर हल्ला करून अमेरिकी राजदूत जे.ख्रिस्तोपर स्टीवन्स यांची हत्या केली आणि ओबामांवर टीकेची एकच आग ओकली गेली. त्यांनी लगेच दोन सुसज्ज युद्धनौका लिबियाच्या दिशेने पाठवून दिल्या, आणि तात्पुरती मलम-पट्टी केली. पण काय घटना घडली आहे हे कळायच्या आतच रोम्नी यांनी ओबामा प्रशासनावर कडवट टीका केली आणि राजकारण तापवायचा प्रयत्न केला, पण जस-जसा घटनेचा तपशील उलगडत गेला तसं रोम्नी यांनी आपणच केलेली वक्तव्य त्यांच्या अंगलट येऊ लागली. स्व-पक्षीय लोकच रोम्निना घरचा आहेर देऊ लागल्यावर ओबामा गटाचा जीव जरा भांड्यात पडला. पण अमेरिका-विरोध निषेधाचं लोण जवळपास सगळीकडेच पसरलं आणि इतके दिवस अर्थव्यवस्था-अर्थव्यवस्था च्या चिपळ्या घेतलेली निवडणूक एकदम राष्ट्रीय सुरक्षा, पर-राष्ट्रीय धोरण यांभोवती गुंफू लागली. ओबामांचा हा सर्वात शक्तिशाली मुद्दा, तर रोम्नी या विषयात अगदीच नवीन(अशी टीका खुद्द ओबमांनीच कन्वेन्शन मध्ये केली होती). त्यामुळे रोम्नी-रायन यांच्या पायाखालीची जमीनच जणू सरकली, आणि आपल्या प्रतिकूल परिस्तिथीमध्ये विरोधकांवर त्यांचाच डाव उलथवून लावून जनतेच्या नाड्या आपल्या हातात ठेवणे हे कवित्व ओबामांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.
पण वाटते तितकी निवडणूक अजूनसुद्धा सोपी नाही कारण, अस्थिरतेचे काळे ढग दाटले आहेत...निवडणूक बहु-आयामी, बहुरंगी, बहुढंगी होत आहे... येत्या ३ ऑक्टोबर रोजी रोम्नी-ओबामांमध्ये पहिली महाचर्चा(डिबेट) आहे...अश्या अजून दोन महाचर्चा ऑक्टोबर महिन्यात आहेत...या महाचर्चेमध्ये दोघांच्या सचोटीचा, प्रामाणिकपणाचा, आणि बुद्धीचा कस लागेल यात वाद नाही...ह्याच महाचर्चा निर्णायक ठरतात असं इतिहास सांगतो...रोम्नी गटाचा, ओबामा गटाचा, सर्व प्रसार-मध्यमं, सरतेशेवटी सर्व अमेरिकी जनतेचा आणि जगाचा ऊर भरून आलाय... कारण अमेरिकेच्या इतिहासाचं ताजं-ताजं पान आता लिहिलं जातंय...वणवा पेट घेतोय...आता फक्त त्या दोघांचा सावधपणाच त्यांचं भवितव्य ठरवू शकतो...आणि म्हणूनच त्यांचं अंतर्मन त्यांना सांगत असेल...सावधान...गड्यांनो...रात्र वैऱ्याची आहे...
ह्या लेखाचा सारांश दिनांक ४ ऑक्टोबर, २०१२ च्या 'सकाळ' च्या संपादकीय पानावर (पान ४) छापण्यात आला.
http://goo.gl/SH9Csi
- वज़ीर
No comments:
Post a Comment