Monday, 17 December 2018

असंगाशी संग आणि सत्तेशी पाट!

मागील आठवड्यात इस्राईलच्या पोलिसांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विरोधात खटला चालवायची शिफारस न्यायव्यवस्थेकडे केली. भ्रष्टाचार, लाचखोरी आणि अफरा-तफरीचे नेतन्याहू यांच्या मागे लागलेले हे चौथे प्रकरण. इस्राईलची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी 'बेझेक'वर मेहेरनजर केल्याचे हे प्रकरण आहे. या बदल्यात 'बेझेक'च्या ऑनलाईन वर्तमानपत्रात नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांच्या बाजूने बातम्या आणि विश्लेषण देण्याचे मान्य झाले होते. हे सोडून अन्य दोन प्रकरणांमध्ये, नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नीने यांनी एका प्रसिद्ध दैनिकाच्या प्रकाशकासोबत आणि एका हॉलीवूडच्या निर्मात्यासोबत सत्तेचा गैरवापर करून आपल्या फायद्याचे सौदे केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या शिफारशीनंतर नेतन्याहू यांच्यावर इस्राईलचे अटॉर्नी जनरल खटला चालवणार का हा प्रश्न असला तरी विरोधकांनी नेतन्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर नेतन्याहू यांच्या राजकीय प्रवासाचा आणि शैलीचा धांडोळा घेणे आवश्यक ठरते.

इस्राईलच्या लष्कराची सेवा, अमेरिकेतील इस्राईलचे राजदूत म्हणून काम पाहिल्यानंतर, मायदेशी परतून 'लिकुड' या उजव्या विचारसरणीच्या पक्षासोबत नेतन्याहू यांनी काम सुरु केले. इस्राईलचे तत्कालीन पंतप्रधान यित्झाक राबिन आणि यासर अराफत यांनी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या उपस्थितीत 'ऑस्लो करारा'वर स्वाक्षरी केली. अराफत यांच्यासोबत गुफ्तागु केली म्हणून 'लिकुड'च्या नेत्यांनी राबीन यांच्याविरोधात हवा तापवली. यात आघाडीला नेतन्याहू होते. अराफत आणि राबिन यांच्यावर कडवट टीका करून त्यांनी जनक्षोभ पेटवला. त्यात राबीन यांची हत्या झाली. या हत्येचे पाप थेट नेतन्याहू यांच्यापर्येंत जाते. पुढे ते १९९६मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले आणि 'ऑस्लो करारा'च्या अंमलबजावणीचा वेग त्यांनी जाणीवपूर्वक कमी केला. नेतन्याहू यांचा राजकीय पिंड हा उजव्या विचारसरणीकडे पूर्णपणे कललेला आहे. राष्ट्रभावना चेतवून, सामान्य प्रजेचे आपणच रक्षक असल्याचे भासवून आणि या भांडवलावर निवडणुका जिंकत ते आता तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून सत्ता भोगत आहेत. जी गत त्यांची, तीच त्यांच्या पत्नीची. ऐशोआराम आणि उंची राहणीमान यामुळे हे दोघे कायम वादात असतात. हजारो सरकारी डॉलरचा वैयक्तिक चैनीसाठी खुर्दा करण्याचे त्यांचे एक-एक प्रकरण मोठे रंजक आहे. सारा नेतन्याहू यांनी तर इस्राईलच्या विख्यात 'मोसाद' या हेर खात्याकडे पार बिल क्लिंटन आणि मोनिका लेव्हीन्स्की या गाजलेल्या प्रकरणाबाबत 'आतली' माहिती मागवत विशेष रस दाखवला होता!

या सगळ्या प्रकारामुळे आता नेतन्याहू यांच्या बाबतचा लोकांचा संभ्रम वाढत चालला आहे. आपल्या उमेदीच्या काळात अरब देशांच्या विरोधाची भाषा करून गादीवर बसलेले नेतन्याहू आता थेट ओमान, बहारीन, संयुक्त राष्ट्र अमिराती, सौदीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी दोस्ताना पुढे नेतात. १९९०च्या दशकात या अरब देशांना झोडायची भाषा करणारे नेतन्याहू आज अरब कंपूला सोबत घेऊन इराणला चेपायचे इशारे देत आहेत. या त्यांच्या खेळीत त्यांनी खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांना सामील करून घेतले आहे. बराक ओबामांच्या कार्यकालात नेतन्याहू आणि ओबामांचे 'व्हाईट हाऊस'मध्ये उडालेल्या खटक्यांचे किस्से आजही राजकीय कट्ट्यावर चवीने चघळले जातात. ओबामांना इराणसोबतचा अणुकरार न करू द्यायचा चंग बांधलेल्या नेतन्याहू यांचा प्रयत्न ओबामांनी हाणून पाडला होता. तो इराण विरोधाचा राहिलेला हिशेब नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्याकरवी चुकता करून घेत अमेरिकेला अणुकरारातून माघार घ्यायला लावले. ट्रम्प यांचे जामात जॅरेड खुशनर या आपल्या यहूदी धर्मभावला मध्यस्थी घालून अमेरिकेचा इस्राईलमधील दूतावास वादग्रस्त जेरुसलेम शहरात हलवला. त्यामुळे इस्राईलच्या दरबारात ट्रम्प यांना मानाचे स्थान आहे. ट्रम्प यांच्यासोबत व्लादिमिर पुतीन यांच्याशी नेतन्याहू यांची खास दोस्ती आहे. उभय नेत्यांमध्ये गेल्या वर्षात अनेकदा भेटी आणि दूरध्वनीवरून संभाषण झाले आहेत. पुतीन आणि नेतन्याहू या दोघांनाही लष्करी पार्श्वभूमी असून दोघांच्या राजकीय दृष्टीकोनात साम्य आढळते. सीरियाच्या युद्धात परस्परविरोधी गटात असणारे पुतीन-नेतन्याहू मोक्याच्या प्रसंगी आपला कडवटपणा विसरून आपले हित बघतात. अमेरिकेने पश्चिम-आशियातील राजकारणातून काढून घेतलेली सक्रियता या दोघांच्या पथ्यावर पडू पाहत आहेत. त्या प्रदेशात अमेरिकेचा दबदबा असलेल्या, अंतर्गत विरोध-समर्थन असलेल्या देशांशी सलोख्याचे संबंध राखत, शस्त्र आणि प्रगत तंत्रज्ञान विकायचा मोठा सपाटा यांनी लावला आहे.

सुमारे ५०% जनता नेतन्याहू नेतृत्व अजून सक्षम आहे असे समजते. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच नसल्याचे सांगत, नेतन्याहू यांनी या आरोपांचे खंडन करीत हे थोतांड असल्याचा कांगावा केला आहे. त्यांचीच री ओढत तिकडे वॉशिंग्टनमध्ये रोज उठता-बसता ट्रम्प त्यांच्यावरील प्रचारकाळात रशियाशी केलेल्या चुंबाचुंबीचा खटला 'कसा गाढवपणा आहे' असा शेरा मारतात. या सगळ्या प्रकरणांमध्ये खोलवर पाणी मुरले आहे यात वाद नाही. आरोपांच्या या भूताला बाटलीत बंद करताना नेतन्याहू यांचा कस लागणार असे दिसते. राजकीय परिस्थिती प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे नेण्यात त्यांचा मोठा लौकिक आहे. 'लिकुड' पक्षाचे ताकदवान अध्यक्षपद आज त्यांच्याकडे आहे. इस्राईलच्या सांप्रत राजकारणातील एक तगडा आणि अत्यंत धूर्त गडी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा राजकीय पट हा कायमच अशा ओरखड्यांनी भरून राहिला आहे. इस्राईलच्या सामान्य नागरिकांच्या राष्ट्रवादाला हात घालून नेतान्याहू आपली 'सोय' लावतात हे तर उभा इतिहास सांगतो. काही एक मर्यादेनंतर राजकीय नेते सत्तेसाठी काय वाट्टेल ते करण्याच्या तयारीत असतात. अशावेळी मग लोकशाहीची झुल पांघरून, एककल्ली कारभाराकडे त्यांचा गाडा वळतो. त्याची लक्षण नेतन्याहू यांच्या सार्वजनिक वर्तनात दिसू लागली आहेत. घरच्या आघाडीवर जरा बेबनाव होताच सीरियात पाहिजे तेव्हा वायुहल्ला करणे हा गेल्या काही वर्षांतला त्यांचा आवडता उद्योग राहिला आहे. परवाच्या पोलिसी शिफारसीनंतर लगेच दोन दिवसांनी इस्राईलच्या लष्कराने हेजबोल्लाहच्या कथित भुयारांवर हल्ला केल्याची घोषणा करीत त्यांनी राष्ट्रभावनेची हाळी देऊन राजकारणातील जुने पण तितकेच प्रभावी तंत्र वापरले आहे. त्यामुळेच, वेळ आणि प्रसंग आपल्या विरोधात जात असताना ते कोणती कास धरणार हे आता स्पष्ट आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक आत्ताच घेऊन ते जनतेचे लक्ष यावरून विचलित करायचा पर्याय वापरू शकतात. पण, ओरखड्यांचे रूपांतर तडयात होईल अशा वेगात गोष्टी त्यांच्याबाबत घडत आहेत. गरमागरम, बहुतांशी लोकांना भुरळ पाडणारे मुद्दे एका हद्दीनंतर आपली चव घालवून बसतात असा सामान्य सामाजिक प्रवाद आहे. नेतन्याहू यांच्या बाबतीत असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या आघाडीचे घटक पक्षांचे जरी तूर्तास नेतन्याहू यांना समर्थन असले तरी पुढील काळाचा अंदाज घेत ते ताक फुंकूनच पितील असा कयास आहे. नेतन्याहू यांच्यासाठी म्हणूनच कितीही नाही म्हटल तरी ही रात्र वैऱ्याची आहे.

No comments:

Post a Comment