Sunday, 4 June 2017

President Trump fires FBI Director James Comey - possible repercussions

चंचल कारभाराचा पुन्हा प्रत्यय

     गेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'एफबीआय'चे (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) संचालक जेम्स कोमी यांचे एकाएकी निलंबन केले. परराष्ट्रमंत्री असताना हिलरी क्लिंटन यांनी 'ई-मेल' पाठवण्यासाठी वापर केलेला खासगी 'सर्व्हर' आणि २०१६च्या अध्यक्षीय निवडणूकीत ट्रम्प यांच्या सहकाऱ्यांनी रशियाची घेतलेली कथित मदत या दोन मोठ्या आणि प्रतिष्ठित खटल्यांचा तपास कोमी करत होते. रशियाशी संबंधित असलेल्या खटल्यात त्यांना ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांबद्दल पुरावे हाती लागल्यामुळे आणि हा खटला राजकीयदृष्ट्या नुकसान करणारा असल्यामुळे ट्रम्प यांनी कोमींचे निलंबन केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 'कोमी 'एफबीआय' सांभाळण्यासाठी सक्षम आणि लायक नव्हते' असे ट्रम्प यांनी निलंबनपत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर तीन वेळा झालेल्या भेटीत कोमींनी 'आपला तपास होणार नसल्याची ग्वाही' दिल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले आहे. 
(L-R) U.S President Donald Trump with the then
FBI Director James Comey
Image credit - Google
निलंबनाच्या काही दिवसआधी कोमींनी चौकशी समितीसमोर ट्रम्प यांना अनुकूल भूमिका घेतली नाही तसेच या प्रकरणाचा खोलवर तपास करण्यासाठी अधिक व्यापक यंत्रणेची मागणी केली. साहजिकच, त्यांची अशी भूमिका ट्रम्प यांनी रुचली नाही आणि कोमींची हकालपट्टी करण्यात आली. मात्र, थेट मुळावर घाव घालून प्रकरण संपवण्याच्या बेतात असलेल्या ट्रम्प यांचा हा प्रयत्न फसल्याची चिन्ह आहेत. 'हिलरींच्या तपासातील गुप्त माहिती जाहीर केल्यामुळे', 'पदाचा गैरवापर केल्यामुळे', 'सक्षम नसल्यामुळे', 'रशियाशी ओढून-ताणून संबंध जोडल्यामुळे' कोमींना जावे लागले अशी वेगवेगळी भूमिका आणि स्पष्टीकरण ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्यामुळे या 
प्रकरणाचा गुंता अजून वाढला आहे.


ट्रम्प यांना साजेशी भूमिका न घेतल्यामुळे सॅली येट्स आणि प्रीत भरारा यांच्यानंतर ट्रम्प सरकारकडून कामावर कुऱ्हाड पडलेले जेम्स कोमी हे तिसरे अधिकारी. निवडणूकीच्या काळात अमेरिकेतील रशियन राजदूतासोबतची मैत्री ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकल फ्लिन यांनी लपवली होती. तसेच अशी मैत्री असल्याचे त्यांनी सातत्याने नाकारले होते. मात्र, प्रसारमाध्यमांना याचा सुगावा लागला. फ्लिन यांच्या सर्व कारभाराची माहिती ट्रम्प यांना होती हे जाहीर होताच, गत्यंतर नसल्यामुळे, ट्रम्प यांनी फ्लिन यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ट्रम्प सरकारच्या गोपनीय गोष्टी आणि माहितीला पाय फुटत असल्याची तक्रार ट्रम्प कोमींकडे करत होते. तसेच निवडणूकीच्या काळात तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामांनी आपल्या घरातील संपर्कयंत्रणेवर पाळत ठेवल्याचे आरोप ट्रम्प यांनी केले होते. 
James Comey
Image credit - Google
कोमींनी असल्या कुठल्याही गोष्टी नाही झाल्याचे जाहीर करतानाच ट्रम्प यांचे आरोप खोडून काढले. त्यामुळेच, २०१६च्या  निवडणूकीच्या काळात हिलरींची चौकशी करणाऱ्या कोमींचे कौतुक करणारे ट्रम्प, स्वतःच्या अंगलट प्रकरण येताच त्यांना बाजूला सारतील अशी कुणकुण होतीच. ट्रम्प यांनी तसेच केले. नवा संचालक आणून ट्रम्प हे डोकेदुखी ठरलेले रशियाचे प्रकरण दाबू पाहतील अशी शक्यता आहे. अमेरिकेतील अंतर्गत गुप्तचर आणि तपास यंत्रणा असलेल्या 'एफबीआय'चे महत्त्व वादातीत आहे. तिचा पसारा आणि आवाका अफाट आहे. तब्बल ३५ हजार झटणारे अधिकारी आणि कामाच्या विस्तीर्ण व्याप्तीमुळे 'एफबीआय'चे प्रस्थ मोठे आहे. तिच्या संचालकाला हात घालणे तशी सोपी गोष्ट नाही. याआधी, २४ वर्षांपूर्वी तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पदाचा गैरवापर आणि खासगी कामासाठी सरकारी यंत्रणा वापरल्याचा ठपका ठेवत 'एफबीआय' संचालक विल्यम शेसन्सना नारळ दिला होता. ट्रम्प ज्या गोष्टी झाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते त्याचाशी संबंधित अधिकाऱ्यांची गच्छंती आणि त्याजोगे येणारी दुखणी ट्रम्प यांना चांगलीच शेकू शकतात. 

डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला जेमतेम चार महिने पूर्ण होत असताना बाहेर येऊ लागलेली अशी प्रकरण त्यांच्या कठीण भविष्यकाळाचे संकेत देत आहेत. एखादी भानगड हाताळताना लागणारा बेरकीपणा आणि सहकाऱ्यांमधला समन्वय, याचा अभाव ट्रम्प प्रशासनाकडून जेम्स कोमी प्रकरणात स्पष्टपणे दिसला. 'एफबीआय'मध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा नेहमीच होते. कोमींना पदावरून हटवून ट्रम्प यांनी अशा चर्चेला नवा फाटा फोडला आहे. असे करतानाच, 'एफबीआय'च्या अधिकाऱ्यांना आपल्याविरुद्ध वाट वाकडी न करण्याचा सूचक इशारा देखील दिल्याचे राजकीय जाणकार सांगतात.
U.S Ex-President Richard Nixon
Image credit - Google
या एका निर्णयाने ट्रम्प यांनी प्रशासनात भीती पसरवत, वॉशिंग्टनच्या राजकीय वर्तुळात अनेकांना धक्का दिला आहे. असे असले तरीही रशियाचे हे भूत ट्रम्प यांचा इतक्या सहजासहजी पिच्छा सोडेल असे तूर्तास तरी दिसत नाही. सुरुवातीला क्षुल्लक गोष्ट म्हणून हिणवल्या गेलेल्या 'वॉटरगेट' प्रकरणाचा पूर्ण आवाका लक्षात यायला तब्बल २६ महिने लोटले होते. थेट 'व्हाईट हाउस'पर्येंत धग गेलेल्या 'वॉटरगेट'मुळे १९७४च्या ऑगस्टमध्ये अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला होता. आपल्या सहकाऱ्यांचे आणि रशियाचे गुफ्तगू ट्रम्प दडपू पाहत असल्याची शंका या प्रकरणात आल्यामुळे, अनेकांना यात १९७२-१९७४ मध्ये गाजलेल्या 'वॉटरगेट'चा वास येऊ लागला आहे. एक सुगावा दुसऱ्या सुगाव्याला असेच निमंत्रण देत देत 'वॉटरगेट'चे भांडे फुटले होते. राजकारण्यांच्या बदकर्मापेक्षा त्यांनी केलेल्या लपवाछपवीबाबतच कान अधिक टवकारले जातात. रशिया ट्रम्प यांच्या नाकीनऊ आणेल असे दिसत आहे. त्यात, शंका-कुशंकांना वाव ठेवत, विरोधकांच्या बाबतीत संभ्रम निर्माण करणे ही पुतीन यांची जुनी सवय आहे. तूर्तास तरी यातील कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. हे प्रकरण कितपत तग धरणार हे येणारा काळ ठरवेलच. मात्र, असा गूढ संभ्रम निर्माण करून व्लादिमिर पुतीन यांनी आपल्या कूटनीतीत आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत भर नक्कीच घातली आहे.

                                                                      - वज़ीर 

हा लेख मंगळवार, १६ मे २०१७च्या 'सकाळ'च्या संपादकीय पानावर (पान ६) छापण्यात आला.

No comments:

Post a Comment