चर्चेला सुरुवात होताच हिंसक घडामोडींना लक्षणीयरित्या चाल मिळते ही गोष्ट पश्चिम आशियाचा अभ्यास करताना प्रकर्षाने जाणवते. सध्यादेखील हीच स्थिती अनुभवायला मिळत आहे. व्हिएन्ना येथे सीरियन प्रश्नावर चर्चेचा घाट सुरु असताना, सीरियातील 'अल-कायदा' समर्थक दहशतवादी संघटना 'जब्हत अल-नुस्रा' तिथे आपल स्वतंत्र अमीरात स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या धडकू लागल्यामुळे सीरियातील पेच वेगळ्या दिशेला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २०११मध्ये ओसामा बिन लादेनला ठार केल्यांनतर पिछाडीवर फेकली गेलेली 'अल-कायदा' नव्या संधीच्या शोधात चाचपडत असल्याचे अनेक दाखले अभ्यासकांनी मांडले आहेत. मात्र, ड्रोन हल्ल्यांमध्ये आणि नव्या दिमतीच्या रोडावलेल्या संख्येमुळे पाकिस्तानात अडकलेल्या 'अल-कायदा'च्या नेतृत्वाला एका मर्यादेच्या बाहेर आपली ताकद अजमावता आली नाही. दरम्यान सीरियात सुरु झालेल्या भडक्यात आपले हात धुवून घ्यावे या उद्देशाने 'अल-कायदा'ने 'जब्हत अल-नुस्रा'ला आपल्या पंखाखाली घेतले. अयमान अल-जवाहिरी या सध्याच्या 'अल-कायदा'च्या प्रमुखाने आपले अनेक विश्वासू साथीदार गेल्या ३ वर्षात सीरियात धाडले आहेत. शिस्तबद्ध आखणी केलेल्या योजनेप्रमाणे 'अल-नुस्रा'ने आपली संपूर्ण यंत्रणा सावध पावले टाकत प्रस्थापित केली आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांना विरोध करत, चंचूप्रवेशाने या संघटनेने आज सुमारे ४ वर्ष तग धरला आहे. आक्रमक रणनीती, उघड कत्तल, अतिशय कडक पद्धतीने केली गेलेली 'शरिया' कायद्याची अंमलबजावणी आणि प्रसिद्धीसाठी हपापलेल्या व्यवस्थेमुळे 'आयसीस'ने मित्रांपेक्षा आपल्या शत्रूंची संख्या वाढवून घेतली आहे. मात्र, अत्यंत थंड डोक्याने आणि इतर असद विरोधकांना सोबत घेत केलेली हाणामारी आज 'अल-नुस्रा'च्या पथ्यावर पडली आहे. हा तुलनात्मक थंडपणाच 'आयसीस' आणि 'अल-नुस्रा'मधील मुलभुत फरक आहे आणि यामुळेच सीरीयातील प्रश्नात 'अल-नुस्रा'ने आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. या युद्धात कोणतीही बाजू वरचढ ठरत नाहीये, मात्र 'अल कायदा'ची कार्यपद्धती पाहता, त्यांना निपटवून काढण अवघड काम असल्याचे दिसते.
अमीरात स्थापन करण्याचे भूत, 'अल-कायदा'च्या जाणकार आणि वरिष्ठ म्होरक्यांची उपस्थिती, मुबलक सामुग्री आणि स्थानिक पाठींबा या घटकांमुळे सीरियातील युद्ध चिघळण्याच्या अवस्थेत आहे. अमेरिका, सौदी अरेबिया, रशिया, इराण असे तगडे देश या युद्धाशी जोडले गेले असताना युद्धाच्या व्याप्तीला आपसूकच आंतरराष्ट्रीय परिमाण लाभले आहे. गेली पाच वर्ष आपापल्या समर्थक गटांना रसद पुरवताना हा विस्तव या सगळ्या देशांनी पेटवत ठेवला आहे. त्यातून माघार घेणे त्यांना आता आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या शक्य नाही. म्हणूनच, चर्चेच्या फैरी झडत आहेत. मात्र, युद्धाचा जोर आणि युद्धात गुंतलेल्या अनेक घटकांमुळे या चर्चेला खीळ बसत आहे. अमीरात स्थापन केल्यास एखादा प्रदेश ताब्यात घेणे, शरिया कायदा लागू करणे आणि पैश्यांसाठी कर-आकारणी करणे या गोष्टी 'अल-नुस्रा'ला सुरु कराव्या लागतील. 'आयसीस'ने आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशात हीच पद्धत लागू करून आपली जरब बसवली आहे. 'अल-नुस्रा'चा अमीरात स्थापनेचा प्रयोग यशस्वी झाल्यास 'अल-कायदा' आपला जोर पुन्हा वाढवू शकते. थेट सीरीयातच पाठींबा मिळाल्यास त्यांच्या आत्मविश्वासाला अधिक धार चढेल. इस्राईलचा शेजार आणि भूमध्य सागराच्या पलीकडे असणारा युरोप खंड या गोष्टी 'अल-कायदा'साठी अनुकूल वातावरण तयार करू शकतात. या वातावरणाचा लाभ आपल्या पदरात पाडण्याच्या दृष्टीनेच या संघटनेचे जुने-जाणते म्होरके ज्यांच्या शिरावर हजारो अमेरिकी डॉलरचे बक्षीस आहे, ते आता पाकिस्तान-अफगाणिस्तान पट्टा सोडून सीरियात ठाण मांडत आहेत. 'अल-कायदा'ची सीरियात वाढलेली हालचाल येमेनमधील 'अल-कायदा'ला स्फुरण चढवून तिकडचे चित्रदेखील बदलवू शकते. या सगळ्या गोंधळात 'आयसीस'च्या अडचणी वाढल्या आहेत. 'आयसीस'च्या ताब्यातील इराकमधला सुमारे ४०% प्रदेश इराकी लष्कराच्या पुन्हा ताब्यात आला आहे. आकुंचन पावणारा प्रदेश आणि अवैध तेलविक्रीला लावलेल्या चापामुळे 'आयसीस'ची आर्थिक बाजू ढेपाळली आहे. दहशतवाद्यांचे कमी झालेले पगार, अंतर्गत कुरबुरी आणि चोहोबाजूने शत्रुत्व 'आयसीस'ची अवस्था दर्शवते. असे अल्प-संतुष्ट, माथेफिरू तरुण 'अल-नुस्रा'च्या मांडवात दाखल होऊ शकतात. या सगळ्यामुळे इतकी पडझड होऊनदेखील सीरिया हे या युद्धाच्या केंद्रस्थानी आहे. पश्चिम आशियाची सगळी राजकीय समीकरण सीरियाच्या अनुषंगाने कल घेत आहेत. अमेरिका आणि इतर मोठ्या देशांना 'अल-नुस्रा'च्या वाढलेल्या हालचालीचा आवाका लक्षात घेत त्यावर योग्य तो तोडगा काढणे क्रमप्राप्त आहे. या अश्या घटनांना वेळीच आवरण्यात शहाणपण आहे. सीरियातील राजकीय पोकळी या सर्व दहशतवादी संघटनांचे काम सोपे करत आहे. यातील काही संघटनांनी 'अल-नुस्रा'च्या अमीरातीला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळेच असद विरोधक एकत्र होऊन त्याचं नेतृत्व 'अल-नुस्रा'कडे आल्यास त्यांना आवरण अवघड होईल. त्यातून 'अल-नुस्रा' आणि 'आयसीस' यांच्यात सुरु असलेली हिंसक सुंदोपसुंदी अजून ज्वलंत टप्पा गाठेल.
सध्या, भडकलेल्या सीरियात या सर्व दहशतवादी संघटना आपापली ताकद आणि महत्त्व वाढवू पाहत आहेत. त्यांच्यातली दुफळी फक्त सीरियाच नाही तर संपूर्ण पश्चिम आशियातील रान पेटवेल असे स्पष्टपणे दिसते. या स्थानिक अस्थिर वातावरणाचा सरळ-सरळ रोख त्यांच्या जगभर पसरलेल्या समर्थक गटांवर आहे. हेच समर्थक आता जगात इतरत्र डोकेदुखी ठरताना आपण पाहतो आहे. युरोप खंडाच्या तर थेट उंबऱ्यात हे आव्हान उभ ठाकल आहे. या सर्व घटनांचे उपद्रव मूल्य लक्षात घेता त्याचे परिणाम हे शांततेच्या चर्चेला, वैचारिक बैठकांना आणि मुत्सद्देगिरीला सुरुंग लावत आहेत. मात्र, अत्यंत संवेदनशील असलेल्या पश्चिम आशियाई प्रदेशावर आणि सामान्य जनमानसावर या सगळ्या घटकांनी फिरवलेल्या वरवंट्यामुळे होणारी जखम जागतिक शांततेचा विचार करता न भरून निघणारी असून, ही धोक्याची घंटा समजण्याची वेळ आणि आवश्यकता आहे.
- वज़ीर
हा लेख सोमवार, ३० मे २०१६च्या 'सकाळ'च्या संपादकीय पानावर (पान ६) छापण्यात आला.
No comments:
Post a Comment