अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उणे-पुरे चार महिने बाकी राहिले असताना हा जिकिरीचा सामना आता रंगतदार अवस्थेत येऊन ठेपला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना १५४२ तर हिलरी क्लिंटन यांना २८११ प्रतिनिधींचा पाठिंबा लाभला आहे. याच पाठिंब्याच्या जोरावर डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी अनधिकृतपणे निश्चित मानली जात आहे. आपापल्या पक्षातल्या इतर नेत्यांना मागे टाकत त्यांना मिळालेल हे यश यंदाच्या निवडणुकीचा विचार करता लक्षणीय म्हणाव लागेल. रिपब्लिकन पक्षातून इतर सर्व नेत्यांनी माघार घेतल्यामुळे ट्रम्प यांनी उमेदवारीवर एकहाती मांड ठोकली आहे तर डेमोक्रॅटिक पक्षात उमेदवारीसाठी प्रतिनिधींचे पुरेसे पाठबळ नसतानादेखील बर्नी सँडर्स माघार घ्यायला तयार नाहीत.
२०० वर्षांच्या अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एका मोठ्या पक्षाकडून महिलेला अध्यक्षीयपदाची उमेदवारी मिळाली आहे.
असे करून हिलरींनी आपले नाव इतिहासात कोरून ठेवतानाच २००८साली बराक ओबामांविरोधात झालेला आपला पराभव पुसून काढला आहे. त्यांना आता खुद्द बराक ओबामा, जो बायडन, जॉन केरी, एलिझाबेथ वॉरेन यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ट्रम्प यांच्याशी बरोबरी करता हिलरी अधिक कणखर नेत्या म्हणून समोर येतात. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची पत्नी आणि नंतर सिनेटर असताना वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी घेतलेली भूमिका त्यांचा राजकीय हटवादीपणा दर्शवतो. हिलरींचा विजय झाल्यास पुढील चार वर्ष रिपब्लिकन नेत्यांकडे कपाळावर हात मारून घेण्याशिवाय गत्यंतर नसेल असे दिसते. हिलरींची एकूण कामाची पद्धत, बेनगाजी प्रकरण आणि परराष्ट्र खात सांभाळत असताना वापरलेल्या वैयक्तिक 'ई-मेल'मुळे त्यांच्यावर सडकून टीका करायला वाव आहे. वैयक्तिक 'ई-मेल' प्रकरणामुळे तर हिलरींवर त्यांच्याच खात्यातून टीका होत आहे. श्रीमंत वर्गाशी त्यांचे असलेले संबंध आणि अश्या अनेक गोष्टींमुळे त्यांना एखाद्या प्रस्थापित रिपब्लिकन नेत्याकरवी हरवणे जास्त अवघड नसल्याचे वॉशिंग्टनमध्ये मानले जाते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे आपण ही संधी घालवल्याची भावना निष्ठावंत आणि पुराणमतवादी रिपब्लिकन नेते बोलून दाखवत आहेत. जेब बुश यांना बाजूला करण्याच्या नादात सर्व रिपब्लिकन इच्छुकांनी ट्रम्प यांच्याकडे दुर्लक्ष करून मोठी चूक केली असल्याचे ते जाहीर कबूल करतात. त्यामुळेच, रिपब्लिकन पक्षातील बडे नेतेच ट्रम्प विरोधाची भाषा बोलत असताना स्वतः ट्रम्प रिपब्लिकन पक्षाला कितपत एकत्रित करून अध्यक्षपदाच्या खुर्चीला वेसण घालतात हे बघण मजेशीर ठरणार आहे.
Image credit - Google |
या सगळ्या धामधूमीत बर्नी सँडर्सना झालेलं मतदान, तरुणांनी उचलून धरलेले त्यांचे समाजवादी विचार आणि त्यांना मिळालेली अफाट लोकप्रियता दुर्लक्षित करून चालणार नाही. वॉशिंग्टनच्या पारंपरिक राजकारणाला अमेरिकी जनता वैतागल्याचा हा ठसठशीत दाखला आहे.
काही दिवसांपूर्वी ओरलँडोत झालेल्या गोळीबारानंतर प्रतिक्रिया देताना या हिलरी आणि ट्रम्प यांनी परिपक्वता न दाखवता त्याचे प्राचारिक भांडवल केले. ट्विटर आणि इतर माध्यमांतून एकमेकांवर सुरू केलेली वैयक्तिक चिखलफेक या संपूर्ण निवडणुकीचा बाज ढासळवू पाहते आहे. येत्या काही दिवसात हे दोघे अमेरिकी उपाध्यक्षपदासाठीचे आपापले उमेदवार जाहीर करतील. त्यानंतर सवंगपणे चर्चा होणाऱ्या या दोघांच्या भविष्यकालीन धोरणांकडे अख्ख जग डोळे लावून बसल आहे. याच धोरणांच्या आडून, अमेरिकेचे सामर्थ्य जगावर लादायला त्यांना मदत होणार आहे. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकांचा ताजा इतिहास पाहता हिलरी आणि ट्रम्प हे दोघेही सर्वात नावडते उमेदवार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. जागतिक पातळीवरच्या एकमेव महासत्तेचे सारथ्य या दोघांपैकी एकाच्या हातात येणार असल्याचे निश्चित असताना हे वास्तव त्रासदायक ठरेल अशी दाट शक्यता आहे. अमेरिकी जनतेला म्हणूनच दोन नकोश्यांपैकी एकाला किंवा बऱ्या आणि वाईटापैकी एकाला निवडायचे आहे. हेच यंदाच्या निवडणुकीचे कटू मर्म आहे.
Image credit - Google |
२००० सालच्या निवडणुकीत अल गोर यांच्या समोर जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा टिकाव नाही लागणार अश्या समजुतीत असणाऱ्यांच बुश निवडून आल्यामुळे हस झाल होत. किंवा यंदा रिपब्लिकन पक्षातील इतर नेत्यांनी ट्रम्प यांना खिजगणतीत धरून वाटचाल केल्यामुळे पश्चातापाची वेळ आली, अशी वेळ आपल्यावर नको म्हणून हिलरींनी खबरदारी घेण त्यांच्या दृष्टीने फायद्याचे आहे. सद्यस्थिती पाहता ट्रम्प हे एखादा विषय काढून हिलरींना त्यात खेचत आहेत. त्यामुळे सावधपणे आपली धोरण मांडताना या दोघांच्या राजकीय धूर्तपणाचा कस लागणार आहे. एका ताज्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार हिलरींनी ट्रम्प यांच्यावर सुमारे १२%नी आघाडी घेतली आहे. येत्या ४ महिन्यात हे अंकगणित बऱ्याच कारणांमुळे वर-खाली होत राहील. असे असतानादेखील समोर येणाऱ्या प्रत्येक सर्वेक्षणात हिलरींची होणारी सरशी ट्रम्प यांना अडचणीत आणू शकते. प्राथमिक फेरी पार पाडल्यानंतर 'व्हाईट हाऊस'च्या रोखाने जाणाऱ्या प्रचाराची व्याप्ती आणि व्याख्या वेगळी असते, त्या अनुषंगाने ट्रम्प यांनी आपल्या प्रचाराचा पोत बदलण्याची सक्त गरज आहे. येत्या काळात त्यांच्यातली ही खडाखडी अधिक खुमासदार होईल.
तूर्तास सारासार विचार करता, सँडर्स, ट्रम्प किंवा हिलरी हे अमेरिकेच्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे आणि सामान्य जनमानसाची परिस्थिती दर्शवणाऱ्या नांदीचे उदारहणअसल्याचे स्पष्टपणे दिसते. हा बदल एकूणच जगावर सकारात्मकरित्या कितपत परिणाम करतो हे बघणं औत्सुख्याचं ठरणार आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्यांच्यातील वाद अधिक उत्साहवर्धक होईल यात शंका नाही. मात्र, या दोघांच राजकीय आकलन आणि धोरण पाहता, संवेदनशील स्थितीच आणि प्रचाराच्या समयसूचकतेच भान राखत, पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेऊन हे दोघे लोकांच्या प्रश्नांचा माग घेतील ही माफक अपेक्षा करणे हेच सध्या आपल्या हातात आहे.
- वज़ीर
हा लेख मंगळवार, २५ फेब्रुवारी २०१६ रोजी 'सकाळ'च्या संपादकीय पानावर (पान ६) छापण्यात आला.
Image credit - Google |
- वज़ीर
हा लेख मंगळवार, २५ फेब्रुवारी २०१६ रोजी 'सकाळ'च्या संपादकीय पानावर (पान ६) छापण्यात आला.
No comments:
Post a Comment