आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची
निवडणूक सुमारे एक वर्षावर येउन ठेपली आहे. अनेक विषयांवर दुरोगामी प्रभाव पाडू शकणाऱ्या या निवडणुकीचं महत्त्व लक्षात घेऊन तेथील राजकारण्यांमध्ये आता जोरदार धुमश्चक्री सुरु झाली आहे. घटनेने नेमून दिल्याप्रमाणे कमाल ८ वर्ष राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाळ असतो. बराक ओबामांच्या ८ वर्षांच्या कार्यकाळाची सांगता नव्या नेत्याच्या निवडीने होणार आहे. ही निवड अमेरिकी जनता अप्रत्यक्षपणे करते. म्हणजेच, अमेरिकी जनता राज्यांमधून 'हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह'चे सदस्य निवडते, त्याच्या संख्येच्या प्राबल्यावर निर्वाचन समिती आणि त्यातील सदस्य नेमली जातात आणि मग हे सदस्य राष्ट्राध्यक्ष निवडून देतात.
अमेरिकेचा सर्वोच्च नेता आणि उप-नेता निवडायची प्रक्रिया मुख्यत्वे द्विपक्षीय असते. कारण, तेथील पारंपारिक मतदार रिपब्लिकन अथवा डेमोक्रॅटिक पक्षाला प्रामुख्याने आपली पसंती दर्शवतो. याचे अंकगणित मांडताना ५० घटक राज्य असलेल्या अमेरिकेत काही राज्य गेले कित्येक दशकं या प्रमुख दोन पक्षांपैकी एकाला डोळे झाकून मतदान करतात. यामध्ये आजही तसूभर फरक पडला नाहीये. काही राज्य मात्र आपला कौल कोणत्या पक्षाच्या पारड्यात घालतील या आधारे या संपूर्ण निवडणुकीचं गणित मांडलं जातं. 'स्विंग स्टेट्स' असे संबोधले जाणाऱ्या या राज्यांची संख्या सुमारे ८-१२ आहे. न्यू हॅम्पशायर, आयोवा आणि ओहायो या राज्यांचा यात नक्की समावेश असतो. प्राप्त परिस्थिती, रोजगार निर्मिती, आर्थिक धोरण, पक्षाबद्दल असणारी समर्थनाची किंवा विरोधाची लाट आणि उमेदवाराचा वैयक्तिक प्रभाव या राज्यांची संख्या ठरवतो. नेता निवडीसाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या या राज्यांमध्ये म्हणूनच हे दोन पक्ष आणि त्यांचे दोन उमेदवार सर्वात जास्त ताकद, पैसे आणि वेळ खर्च करतात. संपूर्ण अमेरिकेत पुढील वर्षभर प्रचार अधिक गतिमान होत जाईल. अमेरिकेचा ५८वा राष्ट्राध्यक्ष 'व्हाईट हाउस' मध्ये स्थानापन्न होईपर्यंत जगातील सर्व माध्यमं आणि राजकीय जाणकारांच या प्रक्रियेकडे बारीक लक्ष असेल.
Seal of The President of The United States Image credit - Google |
यंदा रिपब्लिकन पक्षाकडून तब्बल १७ तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून ५ जणांनी राष्ट्राध्यक्ष पदासाठी आपली इच्छा दर्शवली आहे. मोठ्या मजेशीर असणाऱ्या प्राथमिक फेरीत हे पुढारी स्वपक्षीयांबरोबर
लढून त्यातील एकाचे नाव उमेदवारीसाठी पुढे करतात. अफगाणिस्तान आणि इराक अशी २ मोठी युद्ध सुरु करून आणि १९२९ नंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक मंदीत देश सोडून धाकटे जॉर्ज बुश यांनी आपला ८ वर्षांचा कार्यकाळ संपवला होता. ओबामांनी दिलेली आश्वासनं आणि त्यावरची त्यांची कामगिरी हा चर्चेचा मुद्दा आहे. साधारणपणे ४०-५० टक्के अमेरिकी नागरिक ओबामांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. याचाच अर्थ ओबामांच्या डेमोक्रॅटिक आणि त्यांचा विरोधक रिपब्लिकन पक्षाला ५०-५०% जिंकण्याची संधी आहे. जिंकण्याची ही टक्केवारी येत्या एक वर्षात अनेक घटकांमुळे आश्चर्यचकितरित्या बदलू शकते. २०१२ सालच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक खर्चिक असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. म्हणूनच या दोन पक्षांमधील कुठला नेता जास्त निधी गोळा करतो ही बाब त्याच्या निवडीला अधिक धार देते. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प, बेन कारसन, जेब बुश, मार्को रुबिओ यांचे नाव चर्चेत आहे. भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल पहिल्या १० जणांमध्ये देखील नाहीयेत. जेब बुश यांच्या निधीची गोळाबेरीज दिवसेंदिवस घटत आहे. यांपैकी डोनाल्ड ट्रम्प निवडणुकपूर्व सर्वेक्षणात आघाडीवर आहेत. कौटुंबिक बांधकाम व्यवसाय आणि वडिलोपार्जित अफाट संपत्तीच्या जोरावर ट्रम्प आपला गाडा हाकत आहेत. माध्यम केंद्री आणि आचरत विधानं करण्यात ट्रम्प ख्यातनाम आहेत.
त्यांच्या सैल जिभेचे चटके वॉशिंग्टनमध्ये अनेकांना मिळाले आहेत. प्रत्येक चार मिनिटांना आपल्या संपत्तीचा हिशेब आणि श्रीमंतीची प्रसिद्धी ते जाहीरपणे बोलताना देखील करत असतात. गेल्या काही वर्षांपूर्वी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करून त्यांनी रोष ओढवून घेतला होता. पण कोणाला काय वाटेल याची जास्त फिकीर न बाळगता, चेहऱ्यावर श्रीमंतीचा गर्व आणि बेपर्वाई न लपवता ते या आखाड्यात उतरले आहेत. डोळे दिपवणारी त्यांची संपत्ती आणि कान तृप्त करणारी त्यांची भूमिका, विधानांमुळे स्वपक्षीय नेते हैराण झाले आहेत. परराष्ट्रीय धोरण, अर्थकारणासारख्या महत्वाच्या विषयांवरची त्यांची मतं ही नुसती आतातयी नसून बालिश आहेत. डोनाल्ड ट्रम्प हा म्हणूनच एक स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्लिंटन आणि बर्नी सॅनडर्स आघाडीवर आहेत. परवाच झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या वाद्सभेत आपल्या अनुभवाच्या जोरावर हिलरींनी सपशेल बाजी मारली. सॅनडर्स देखील सामान्य प्रश्नांना हात घालत आपल्या सभांना गर्दी जमवत आहेत पण हिलरीं इतका पैसा आणि त्याजोगे येणारी यंत्रणा त्यांच्याकडे अजिबात नाहीये. हिलरी आणि जेब बुश यांमुळे अमेरिकेची सत्ता पुन्हा क्लिंटन व बुश घराण्यात जाणार असा घराणेशाहीचा आरोप बाकी साम्यवादी नेते करत आहेत. क्लिंटन या डेमोक्रॅटिक पक्षाच्या ट्रम्प आहेत अशी कुजबुज वॉशिंग्टन मध्ये हमखास ऐकू येते. बेनगाजी प्रकरण आणि मंत्री असताना खासगी ई-मेलच्या वापरामुळे त्यांच्यावर आजही टीका होत आहे.
Republican election symbol - Elephant Democratic election symbol - Donkey (Jackass) Image credit - Google |
२००हून अधिक वर्षाच्या अमेरिकेच्या इतिहासात एकही महिला राष्ट्राध्यक्षा नाही हाच पत्ता यंदा त्या पुढे रेटत आहेत. विजयी वादसभेनंतर त्यांनी अमेरिकेचे विद्यमान उप-राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा २०१६साठीचा उमेदवारीचा पत्ता बेमालूमपणे कापला आहे. बायडेन यांना आता या रणधुमाळीत उतरायला फार उशीर झाला आहे असे नक्की दिसते. दोन्ही पक्षातील उमेदवार आणि त्यांचं प्राबल्य पाहता त्यांच्यात हिलरींची बाजू उजवी आहे.
ट्रम्प पलीकडून त्यांना किती लढत देतील हे बघणं मजेशीर असणार आहे. त्यांची ही चुरस पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यावर अजून रंगतदार होईल यात वाद नाही. हिलरींनी इराक युद्धावेळी घेतलेली भूमिका आज १२ वर्षांनी देखील त्यांची पाठ सोडायला तयार नाही. जटील प्रश्न आणि अमेरिकेची सुरक्षा यावर हिलरी आणि ट्रम्प यांची एकसारखी युद्धखोर भूमिका आहे. हिलरींचा रागीट स्वभाव आणि बिल क्लिंटन यांच्या काळात त्यांची 'व्हाईट हाउस' मधील सेवकांना, सुरक्षा कर्मचार्यांना दिलेल्या हीन वागणुकीचे किस्से आता वॉशिंग्टनमध्ये पेरले जात आहेत. ओबामांनंतर अमेरिकेचं सारथ्य करणाऱ्या एकही नेत्यात ओबामांइतका करिष्मा, मुद्द्यांना रेटायची हातोटी, जगभरातील राष्ट्रप्रमुखांशी संबंध ठेवायचा वकब दिसत नाही. खमका
आणि तगडा उमेदवार सुद्धा 'ओव्हल ऑफिस'चा ताबा घेतल्यानंतर निष्प्रभ होतो हे मागील राष्ट्राध्यक्षांच्या
कार्यकाळाने दाखवून दिले आहे. ज्यू लॉबी, शस्त्रास्त्र पुरवणारे, तेल लॉबी असे अनेक पैलू विचारात घेऊन अमेरिकेचे सामर्थ्य टिकवताना अनेकांच्या नाकी नऊ आले आहेत. ही सगळी तारेवरची कसरत होऊ घातलेले उमेदवार कशी करणार हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय राजकीय जाणकार मांडत आहेत.
जागतिक शांतता, व्यापारीकरण, तापमानवाढ, आखतातला हैदोस, सिरीया प्रश्न आणि पुतीन यांची भूमिका, चीन, उत्तर कोरियाची लष्करी आगेकूच हे सर्व भयंकर प्रश्न हे उमेदवार कसे प्रभावीपणे हाताळणार यावर तुमच्या-आमच्या जगण्याचा आणि प्रगतीचा आलेख अवलंबून आहे. बलाढ्य अमेरिकेचा वारू हे कितपत पुढे नेतील हे येणारा काळ ठरवेलच. पण थेट जगाच्या उंबऱ्यावर चहुबाजूने अनेक आव्हानं आणि अनेक भयावह प्रश्न आवासून उभे असताना सगळ्या विश्वाची मक्तेदारी आपल्यावर खांद्यावर घेऊ पाहणाऱ्या आणि घेतलेल्या मक्तेदारीची धरसोड करत, मूळ प्रश्न अधिक चिघळू देत, विस्तव धुमसत ठेवणाऱ्या या जागतिक महासत्तेची आणि सारासार विचार न करता असा सावळा गोंधळ सुरु ठेवणाऱ्या तिच्या सध्याच्या पुढाऱ्यांची ही म्हणूनच होऊ घातलेली शोकांतिका आहे. बाकी काय...
(L-R) Hillary Clinton (D), Donald Trump (R) Image credit - Google |
Image credit - Google |
- वज़ीर
या लेखाचा सारांश शुक्रवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०१५च्या 'सकाळ' मध्ये चालू घडामोडी सदरात (पान ७) छापण्यात आला.
https://issuu.com/lokmudra/docs/lokmudra_feb_2016_19f5a6f7be4639
अभ्यास पूर्ण लेख. आवडला.
ReplyDeleteनमस्कार सौरभ!
ReplyDeleteआपल्याला माझा लेख आवडला हे वाचून आनंद झाला. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. संपर्कात राहुयात!
राम राम!