Thursday, 12 March 2015

विध्वंसक रणांगणाच्या उंबरठ्यावर...

ऑगस्ट २०१४ पासून अमेरिकीने 'इसिस' (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया - ISIS) या सध्याच्या सर्वात क्रूर दहशतवादी संघटनांपैकी एक असलेल्या संघटनेवर हवाई हल्ले सुरु केले होते. अमेरिकी हवाई हल्ले, अमेरिकीने इराकमधील कुर्दिश फौजांना दिलेलं आर्थिक तसेच शस्त्रांचं पाठबळ आणि जागतिक बाजारपेठेत तेल दराच्या चढ-उतारामुळे ​'इसिस'च्या हालचाली काहीश्या मंदावल्या होत्या. पण या नव्या वर्षात '​इसिस'कडून मोठ्या प्रमाणावर हिंसक घडामोडी पुन्हा सुरु करण्यात आल्या. 
'​इसिस'च्या आंतर-बाह्य कार्यपद्धतीचे, आर्थिक उत्पन्नाचे आणि त्याच्या दुरोगामी परिणामाचे  हे सविस्तर विश्लेषण. 

थरकाप हा एकचं शब्द पुरेसा असणाऱ्या अत्यंत क्रूर चित्रफिती आणि चांगल्या दर्जाची तितकीच क्रूर छायाचित्र '​इसिस' मुक्तपणे इंटरनेटवर प्रसारित करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हुशारीने केलेला सक्षम आणि पुरेपूर वापर हा '​इसिस'च्या प्रसिद्धीसाठी आणि नवीन दहशतवाद्यांच्या भरतीसाठी मोलाचा ठरला आहे.
किंबहुना तंत्रज्ञानाचा हाच वापर '​इसिस'च्या वाढीचा आणि झटपट यशाचा गाभा राहिला आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीला लाजवेल इतक्या प्रघलबतेने तयार केलेले वार्षिक अपराधांचे रंगीत अहवाल, इराक आणि सिरीयामधील नाकेबंदीच्या चौक्यांवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची शहानिशा करण्यासाठी वापरण्यात येणारे लॅपटॉप, सोशल मिडिया आणि इंटरनेटवर समर्थकांचं असणारं मोठं जाळं यामुळे आज 'इसिस' जगातली माहिती-तंत्रज्ञानाच्या बाबतीत सर्वात पुढारलेली दहशतवादी संघटना आहे. ऑगस्ट २०१४ नंतर ओबामा प्रशासनाने केलेल्या हल्ल्यांना न जुमानता आणि कित्येक प्रमुख लढाऊ दहशतवादी गमावूनसुद्धा '​इसिस'चा उच्छाद सुरू आहे तो या जाळ्याच्या आणि पैशाच्या जोरावर. जगातल्या इतर दहशतवादी संघटनांपेक्षा फटकून वेगळी वागणारी आणि अत्यंत प्रभावी कार्यपद्धती असणारी ही दहशतवादी संघटना म्हणूनच जागतिक शांततेचा विचार केल्यास अतिशय धोकादायक समजली जाते. 
​​
२०१३सालच्या उन्हाळ्यापासून खऱ्या अर्थाने आपली वाटचाल जोमाने सुरु करणाऱ्या या संघटनेची मुळे अमेरिकेने २००३साली इराकवर आक्रमण सुरु केलं तेव्हापासून झाली. तेव्हा अमेरिकेने इराकमधील तुरुंगात डांबलेल्या दहशतवाद्यांपैकी एक अत्यंत कट्टर इस्लामवादी, मध्यमवयीन तरुण पुढे इराकमधील अल-कायदाचा मोहरक्या झाला. त्याचं नाव अबू बकर अल बगदादी. अल-कायदाची पारंपारिक कार्यपद्धती पसंत नसलेला बगदादी तेव्हापासूनच आपली वेगळी चूल मांडणाच्या तयारीत होता. अल-कायदाच्या वाट्याने न जाता निर्दयीपणे आपली कारस्थानं रचणारा बगदादी आपली जमवा-जमव करत होता. अल-कायदाच्या नेतृत्वाशी त्याचे मतभेद सुरूच होते. त्याच सुमारास अल-कायदाचा सर्वेसर्वा, ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातल्या इस्लामाबादेला खेटून असलेल्या अबोटाबादच्या लष्करी सराव केंद्राजवळ असणाऱ्या त्याच्या छुप्या घरात घुसून अमेरिकी 'नेव्ही सील्स'ने कंठस्नान घातले आणि बगदादी अल-कायदापासून वेगळं होण्याचा आपला विचार पक्का करू लागला. ओसामा बिन लादेननंतर अल-कायदाची सूत्र आपल्या हाती घेणारा इजिप्तचा नेत्रतज्ञ अयमान अल जवाहिरी आणि बगदादी यांच्यात विशेष सख्य नाहीये. आणि याच तात्त्विक कारणावरून बगदादी अल-कायदाच्या बाहेर पडला. त्यावेळपर्येंत जगातली सर्वात खतरनाक आणि व्यापक प्रसार असलेली दहशतवादी संघटना अल-कायदाचा नवा स्वामी अयमान अल जवाहिरी, इतर दहशतवादी संघटना आणि अमेरिकी सरकार बगदादीला खिजगणतीत मोजत असताना बगदादी आपल्या नव्या संघटनेचं जाळं घट्ट विणत होता. २०११च्या सुमारास सिरीयामधील वाद विकोपाला गेला आणि तेथील राजवटी-विरोधात लोक रस्त्यावर उतरले. या घटनेच्या काही वर्षांपूर्वी इजिप्त आणि लिबियामध्ये सारख्याच गोष्टी घडत होत्या. इजिप्तमध्ये होस्नी मुबारक यांच्या विरोधात तेथील जनता रस्त्यावर उतरली आणि लिबियामध्ये कर्नल मुअम्मर गद्दाफीविरोधात. या सर्व घटना 'अरब अपरायसिंग' म्हणून ओळखल्या जात असल्या आणि तेथील स्थानिक नागरिकांचा सहभाग प्रामुख्याने दाखवला जात असला तरीपण या बंडाला खतपाणी घातलं ते बराक ओबामा आणि त्यांच्या प्रशासनाने.
या तिन्ही देशांमध्ये सरकारविरोधी बंडखोरांना आणि तेथील राजवटीला पाहिजे ती रसद पुरवून त्यांचाच पराभव अमेरिकेने केला. सिरीयामध्ये थेट हस्तक्षेप करण्यास अमेरिकेने विरोध दर्शवला. तो विरोध आजपण कायम आहे. सिरीयामधील बंडात बशर अल-असाद आणि त्यांच्या विरोधी गटामधील झालेल्या धुमश्चक्रीमध्ये आत्तापर्येंत २ लाखाहून जास्त नागरिकांचा जीव गेला आहे. याच बंडाचा फायदा ​'इसिस'ने घेतला. सिरीयामधील अल-नुस्रा, खोरसान ग्रुप आणि इतर अल-कायदा समर्थक गटांना सोबतीला घेऊन अलेप्पो आणि दमस्कस या मोठ्या शहरांमध्ये हाहाकार माजवून बगदादीने आपला मोर्चा इराककडे वळवला. लष्करी जाणकार असं सांगतात की ​'इसिस'ची कार्यपद्धती लष्करापेक्षाही सरस आणि शिस्तबद्ध आहे. याच सरसतेच्या जोरावर ​'इसिस'ने उत्तर इराकमधील सुन्नी-बहुल भाग झपाट्याने आपल्या ताब्यात घेतला. बदुश, तल-अफर, शरकत ही गावे काही समजायच्या आत 'इसिस'ने आपल्या खिशात घातली. सिंजर प्रांत आणि सिंजर पर्वत ताब्यात घेत असतानाच तेथील नागरिकांचे हाल केले. जबरदस्त दहशत माजवत सिंजर प्रांतातील नागरिकांना सिंजर पर्वतावर पिटाळून त्यांना अन्न आणि पाणी मिळणार नाही याची तजवीज बगदादीच्या समर्थकांनी केली. सिंजर पर्वतावर अडकलेल्या हजारो नागरिकांची सुटका करण्यासाठी अमेरिकी हेलिकॉप्टर्सची मदत घ्यावी लागली. बगदादनंतर इराकचं क्रमांक दोनचं मोठं शहर असलेल्या मोसुल शहराचा ​'इसिस'ने फक्त ३ दिवसात फडशा पाडला. मोसुल सर्वार्थाने ​'इसिस'साठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरली. मोसुल सेन्ट्रल बँकेतून लुटलेले ४० कोटी अमेरिकी डॉलर आणि काही टन सोनं एवढं भांडवल १० हजारहून अधिक, डोक्यावर भूत बसलेल्या तरुणांना पोसण्यात कामी आले. ऐन बहरात असलेल्या ​'इसिस'ने मोसुल शहर, मोसुल धरण आणि मोसुलची तेल शुद्धीकरण कंपनी आपल्याकडे ३ दिवसांत घेऊन जगाला आपली ताकद आणि इराकी सरकारची, इराकी लष्कराची नामुष्की स्पष्टपणे दाखवून दिली. धरणावर कब्जा करून पाणी आणि तेल शुद्धीकरणाच्या कंपनीवर कब्जा करून तेथील उत्पन्नाचे स्त्रोत असा दुहेरी डाव साधत सामान्य जनतेची मुस्कटदाबी केली. या घटनेमुळे ​'इसिस' खऱ्या अर्थाने जगासमोर आली आणि बगदादी पुरस्कृत जगातील या सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटनेचा वारू चौफेर उधळला! तो वारू इतका उधळला आहे की, त्याची तयारी, त्याचा वेग आणि त्याची आर्थिक ताकद बघून थेट अमेरिकेचे डोळे पांढरे झाले आहेत. अमेरिका इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असताना जगाची झोप उडवणारा एक प्रचंड मोठा अजगर तयार होतो आणि अमेरिकेला त्याचा काडीमात्र पत्ता लागत नाही ही गोष्टचं भल्या-भल्यांच्या पचनी पडली नाही. 
​इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया - ISIS, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेवंट - ISIL, अल-कायदाझ सेप्रेटीत्स ऑफ इराक अँड सिरीया - QSIS अश्या नावांने ही संघटना ओळखली जाऊ लागली. अर्थात ही नावे म्हणजे 'अल-दवलाह अल-इस्लामीयाह फि अल-इराक वा-अल-शम' (DA' IISH) या मूळ अरबी नावाची भाषांतरे आहेत. बारीक निरीक्षण केल्यास असे लक्षात येते की सिरीयामधील हस्तक्षेप टाळण्यासाठी, पण त्याचवेळी ​'इसिस'ला आपला शत्रू ठरवण्यासाठी स्वतः बराक ओबामा आणि त्यांचं प्रशासन ​'इसिस'ला 'आयसील'(ISIL) म्हणून संबोधतात.



४३ वर्षीय अबू बकर अल-बगदादी स्वतः नेतृत्व करत त्याच्या समर्थकांना लढण्यास प्रोत्साहन देतो. संघटनेत होणारी प्रत्येक बारीक गोष्ट तो जातीने बघतो. फक्त दोन छायाचित्र प्रसिद्ध असलेला, त्याची अत्यंत कमी आणि जुजबी माहिती असलेला बगदादी सध्याच्या घडीचा सर्वात मोठा चिथावणीखोर आणि कट्टर-पंथीय तरुणांमध्ये जबरदस्त आकर्षण असलेला नेता आहे. नेतृत्वाच्या या लढाईत त्याने अल-कायदाच्या अयमान अल जवाहिरी आणि बोको हरामच्या अबू-बकर शेकाऊलापण मागे पाडलं आहे. याच प्रसिद्धीचा फायदा घेऊन २०१४मध्ये एका शुक्रवारी बगदादी एका मशिदीत दुपारच्या नमाजला गेला आणि त्यांनतर जवळपास २० मिनिटांचं भाषण करून त्याने स्वतःला अल्लाहचा दूत म्हणवून घेतानाच स्वतः जगातील सर्व मुसलमानांचा खलिफा असल्याचं घोषित केलं. हे करतानाच त्या संपूर्ण प्रदेशात आपण खलिफा राज्याची स्थापना आणि त्याची मशागत करू हे सांगायला तो विसरला नाही. या सगळ्या चित्रफितीत त्याच्या उजव्या मनगटावर असणारं किमती घड्याळ लक्ष वेधून घेतं होतं. मोसुलच्या लुटालुटीत त्याला ते गवसलं असल्याचं बोललं जात आहे. हे केल्यानंतर ​'इसिस'च्या प्रवक्त्याने ​'इसिस' आता फक्त 'इस्लामिक स्टेट' म्हणून ओळखली जाणार असं जाहीर केलं. यामुळे संघटनेवर असलेली भौगोलिक चौकट अपोआप गळून पडली आणि तिची व्याप्ती वाढवण्यात येण्याची ही खेळी करून संघटनेकडे असलेले प्रांत स्वयंघोषित राज्य करण्यात आले. एवढं सगळं असतानाच या संघटनेची आर्थिक बाजू दुर्लक्षित करून चालणार नाही. जागतिक बाजारपेठेत गेल्या काही महिन्यात झालेली तेलाच्या दराची घसरण याचं कारण जसं अमेरिकेला सापडलेले नवे तेल स्त्रोत आहेत त्याच बरोबर ​'इसिस'ने इराकमधील कमी भावात विकलेलं तेलसुद्धा आहे. गेल्या ६ वर्षातील नीचांकी भाव हे ​'इसिस'ने पैश्यांसाठी केलेल्या कमी भावातील विक्रीमुळे झाले आहेत. वाट्टेल त्या मार्गाने पैसे कमवा हेच ​'इसिस' ध्येय आहे. कमी भावात तेल विक्री, इराकमधील जुन्या, किमती वस्तू विकून मिळणारा पैसा अफाट आहे.

जगात दोन प्रकारचे देश आहेत. एक अमेरिका पुरस्कृत गट, जो दहशतवादी संघटनांना आपल्या नागरिकांच्या बदली पैसे देण्यास विरोध करतो आणि दुसरे, जे दहशतवादी संघटनांना आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी गपचूप पैसे देतात. या दुसऱ्या पर्यायातून ​'इसिस'कडे बक्कळ पैसे येतात. ज्यांच्याकडून पैसे येत नाहीत त्यांची अमानुष कत्तल करणे, त्यांचे मृतदेह त्यांच्याच नातेवाईकांना विकणे ही ​'इसिस'ने अवलंबलेली सर्वात भयंकर वाट आहे. पैसे आणि तेलासाठी लुटली जाणारी गावं आहेतचं. त्याचबरोबर या लुटीमध्ये निष्पाप महिला आणि मुलींचाही समावेश आहे. चढ्या भावाने जागतिक बाजारपेठेत त्यांची विक्री सुरु आहे. नवीन भरती होणाऱ्या तरुणांसाठी पैसे आणि अत्याधुनिक ऐवज जितके महत्वाचे आहेत तितकंच हे आमिषसुद्धा महत्वाचं आहे. म्हणूनच एकीकडे माणसांची कत्तल सुरु असताना, त्याच्या चित्रफिती आणि छायाचित्र प्रसारित करणे, त्यातून मिळणाऱ्या चिथावणीला बळी पडणारे जगभरातले तरुण - तरुणी यांची संख्या लाक्षणिकरित्या वाढत आहे. यात पुढारलेल्या देशांमधील, सुशिक्षित तरुणांची तसेच तरुणींची संख्या नजरेत भरणारी आहे. टर्कीमार्गे हे तरुण इराकमध्ये ​'इसिस'ला येउन मिळत आहेत. त्यातले काही प्रशिक्षण घेऊन आपापल्या देशांमध्ये परत जात आहेत. जगातल्या इतर छोट्या, काहीश्या ढबघाईला आलेल्या दहशतवादी संघटनांनी ​'इसिस'ला पाठींबा द्यायला राजरोसपणे सुरुवात केली आहे. हे सगळं-सगळं शक्य झालं आहे अबू बकर अल बगदादी या नवीन ओसामा बिन लादेन किंवा 'इनविजिबल शेख'मुळे! इतकी व्यक्तिकेंद्रित संघटना संपवायला वेळ लागत नाही, ती व्यक्ती काळाच्या पडद्याआड झाली की संघटना संपते असं इतिहास सांगतो. पण, ​'इसिस'च्या बाबतीत गोष्ट थोडी वेगळी आहे. ​'इसिस' व्यक्तिकेंद्रित असतानासुद्धा तिचे विचार दूरवर पसरवले जात आहेत. तब्बल ४९ हजार ट्विटर खाती ​'इसिस'च्या विचारांशी सलग्न आहेत. ते बंद पाडणाऱ्या ट्विटरच्या कामगारवर्गाला ठेचून मारू अशी धमकी ​'इसिस'कडून नुकतीच प्रसारित करण्यात आली आहे.

​​इराकमधील तिक्रीत हे सद्दाम हुसेनचं जन्मगाव ​'इसिस'च्या ताब्यात आहे. ​'इसिस'ची एक फळी आता इराकची राजधानी बगदाद तसेच दक्षिण इराकवर लक्ष केंद्रित करून पुढे मार्गक्रमण करत आहे. आता ​'इसिस'कडून खोरसाबाद, ३०००वर्ष जुनी निम्रोड, २००० वर्ष जुनी हत्रा या ऐतिहासिक महत्व असलेल्या आणि संयुक्त राष्ट्र जागतिक वारसा मान्यताप्राप्त इमारती आणि शहरं नष्ट करण्यात येत आहेत. येत्या काही दिवसात रोमवर हल्ला चढवू अशी वल्गना ​'इसिस'ने केली आहे. संपूर्ण सखोल अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते की ​'इसिस'चं पुढचं लक्ष्य लिबिया आहे. लिबिया रोज १४लाख पिंप तेल बाजारात आणत आहे. अख्ख्या आफ्रिका खंडात तेल उत्पादनात लिबिया अग्रेसर आहे. लिबिया सरकारचा ९६% महसुल तेलावर अवलंबून आहे. ४८ बिलियन पिंप तेल लिबियाच्या जमिनीत असल्याचं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. मुअम्मर गद्दाफीच्या हत्येनंतर लिबियामध्ये यादवी माजली आहे. जवळपास ४ लाख लोकांनी कामाच्या शोधत आपली घरं सोडली आहेत. त्यात भरीसभर म्हणून तेलाची किंमत कमी झाली आहे. याचाच फायदा साधण्यासाठी अमेरिकेने परस्पर विरोधी दोन्ही गटांना गोंजारायला, मुबलक रसद देऊन एकमेकांशी झुंजायला लावण्याचा धूर्त डाव सुरु केला आहे. याच लिबियामध्ये २०१२साली अमेरिकी राजदूत जे. ख्रिसतोफर स्टीवन्स यांची बेनगाझी शहराच्या अमेरिकी दुतावासात हत्या करण्यात आली. त्यावेळी हिलरी क्लिंटन यांच्याकडून झालेली चूक त्यांच्या येत्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत महागात पडणार आहे.


त्यांचे डेमोक्राटिक पक्षातले हितशत्रू आणि विरोधी पक्षातले राजकारणी स्टीवन्स यांचं भूत अलगदपणे हिलरींच्या मानगुटावर बसवणार यात शंका नाही. अमेरिकेमध्ये होत असलेलं गळचेपीचं राजकारण हा एका स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. तूर्तास तरी हे सगळं ​'इसिस'च्या पत्थ्यावर पडणार आहे. ​'इसिस'ची क्रूरता दिवसें-दिवस वाढत आहे. अमेरिकी नागरिक, अमेरिकी पत्रकार, जपानी पत्रकार, इजिप्तमधील २१ ख्रिसचन यांची उघड कत्तल या संघटनेनी केली आहे. येणाऱ्या काही महिन्यात त्यांचा हा रोख इतर देशांच्या नागरिकांवर जाणार हे नक्की आहे. आफ्रिका खंडाच्या डोक्यावर आणि पश्चिम आशियाई प्रांताच्या डाव्याबाजूला असलेल्या इटलीच्या दक्षिण टोकाला हा त्रास तर जाणवतोचं आहे. रोज काहीशे बेकायदा नागरिक इटलीकडे स्थलांतर करत आहेत. येत्या काही वर्षात याच बेकायदा नागरिकांचा त्रास संपूर्ण युरोप खंडाला होणार आहे. ​

​'इसिस'ची वाढत चाललेली मुजोरी आता अमेरिकेला नको झालीये. अमेरिका लगेच त्यांच्यावर कारवाई करेल हे समजून घेण्यात कमालीचा मूर्खपणा आहे. ओबामांनी त्यासंदर्भात हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी अमेरिकी काँग्रेसकडे हल्ल्याची कायदेशीर परवानगी मागितली आहे. (Authorization to Use Military Force - AUMF) असे दोन AUMF अमेरिकी काँग्रेसने पास केल्यानंतर इराक आणि अफगाणिस्तानचं युद्ध अमेरिका लढली. आत्ता ओबामांनी मागितलेली परवानगी किमान ३ वर्षांसाठी आहे आणि कमाल कार्यकाळ त्याच्यात नमूद केला नाहीये. ओबामांची २ वर्ष राहिली असताना अश्या निर्णयाचे परिणाम घातक होऊ शकतात. अमेरिकी राजकारणाच्या चालू घडामोडी पाहता ओबामांनंतर हिलरी क्लिंटन किंवा जेब बुश यांच्याकडे अमेरिकेची धुरा सोपवली जाईल अशी अटकळ बांधण्यात आहे. त्यांचे वैयक्तिक हितसंबंध आणि त्यांचे निर्णय कोणत्या बाजूने झुकणार यावर या होऊ घातलेल्या युद्धाचे परिणाम जगाला भोगावे लागतील. दुसरीकडे रशियाची युक्रेनमधील लुडबुड सातत्यपणे सुरूच आहे, चीन अमेरिकेला खिंडीत गाठण्याचा निकारीचा प्रयत्न करतोच आहे, अफगाणिस्तानमध्ये तालिबान पुन्हा डोकं वर काढत आहे, आफ्रिकेत बोको हराम नावची दहशतवादी संघटना एक-एका दिवसात २५०० माणसं मारून अख्खी गावं बेचिराख आहेत.

अश्या या ज्वलंतपणे धूसफूसणाऱ्या, अस्वस्थ पेचप्रसंगावेळी हे जग म्हणूनच एका विध्वंसक रणांगणाच्या उंबरठ्यावर उभं आहे...

                                                                                                                                              वज़ीर 


या लेखाचा सारांश दिनांक १३ मार्च, २०१५ (शुक्रवार) रोजी दैनिक 'महाराष्ट्र टाईम्स'च्या चालू घडामोडींच्या पानावर(पान १५) छापण्यात आला.
http://epaperbeta.timesofindia.com/NasData/PUBLICATIONS/MAHARASHTRATIMES/PUNE/2015/03/13/PagePrint/13_03_2015_015_9e2ca0ed038f807a398ee10e2284854b.pdf

No comments:

Post a Comment