मागील आठवड्यात अमेरिकी राजकारणी बर्नी सँडर्स यांनी अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या दावेदारीतून माघार जाहीर केली. जवळपास संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले असताना येत्या नोव्हेंबर मध्ये होऊ घातलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या घडामोडी काहीश्या मागे पडलेल्या जाणवत आहेत. मात्र, सँडर्स यांचे या निवडणुकीतले स्थान पाहता त्यांच्या माघारीचे आणि त्याच्या परिणामाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.
अध्यक्षपदाच्या प्राथमिक फेरीत प्रत्येक राजकीय पक्षात पक्षांतर्गत लढतीमध्ये प्रत्येक राज्यातील पक्षाचे सभासद मतदान करून ढोबळपणे त्या पक्षाचे प्रतिनिधी निवडतात. पुढे पक्षाचा अधिकृत उमेदवार या प्रतिनिधी संख्येवर ठरवला जातो. या संख्येचा विचार करता बर्नी सँडर्स आणि जो बायडेन यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र, बायडेन यांनी पक्षातील आपले वजन वापरत वारं आपल्या दिशेने वळवल. गेल्या काही आठवड्यातील राज्यांमधील निवडणुकांमध्ये बायडेन यांची सरशी झाली आणि प्रतिनिधींच्या संख्येत त्यांनी सँडर्सना मागे टाकले. डेमोक्रॅटिक पक्षाकडून सांभाव्य उमेदवारी बायडेन यांना मिळणार हे जवळपास निश्चित झाल्यामुळे जास्त जोर लावण्यात अर्थ नाहीये हे लक्षात घेऊन सँडर्स यांनी आपली माघार जाहीर केली. बर्नी सँडर्स हे अमेरिकेच्या राष्ट्रीय राजकारणात आता एक दबदबा राखणारे व्यक्तिमत्त्व आहे. अमेरिकी अध्यक्षपदाच्या दावेदारीसाठीच्या सलग दोन निवडणुकांमध्ये भल्याभल्या पुढाऱ्यांना त्यांनी धूळ चारत आपली ताकद दाखवून दिली. २०१६मध्ये हिलरी क्लिंटन आणि आता जो बायडेन या मातब्बर राजकारण्यांना त्यांनी दिलेली टक्कर प्रभावी म्हणावी लागेल. वॉशिंग्टनला कायमच अनुकूल असणाऱ्या पारंपरिक अमेरिकी राजकारणाला छेद देत त्यांनी आपला नावलौकिक सिद्ध केला. व्हरमॉंट या छोट्याश्या राज्यामध्ये सिनेटर म्हणून कार्यरत असणारे अपक्ष सँडर्स सुमारे अर्ध्या दशकात डावी विचारसरणी राखणाऱ्या, समाजवादी विचार मानणाऱ्या, नवतरुणांचे प्रतिनिधित्त्व करू लागले. सुरुवातीला डाव्या, बुरसटलेल्या विचारांचा प्रतिनिधी म्हणून हिणवले गेलेल्या सँडर्स यांनी आपली छाप पाडली. ती इतकी की त्यांच्या धोरणांचा आधार आपल्या आश्वासनांच्या यादीत न घेता आज अमेरिकेत राजकारणी सर्वमान्य ठरत नाही. कानाडोळा केलेले अनेक मुद्दे त्यांनी मांडायला सुरुवात केल्याने आज ते मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. सगळ्यांसाठी उत्तम आरोग्ययोजना आणि उत्पन्नातील समानता/असमानता हे त्यांचे मुद्दे सामान्य जनतेला आणि खासकरून तरुणांना भावले. आर्थिक छुपाछुपीचे, चारित्र्यावरचे आरोप नसलेल्या सँडर्स यांनी राजकारणात बूज कशी राखायची हे शिकवतानाच राजकारणाचा विस्कटलेला पोत नीट करण्याचे धाडस दाखवले. डेमोक्रॅटिक पक्षातील बऱ्याच धुराणींना ते पटले नाही आणि त्यांनी सँडर्स यांचा पत्ता कापला. त्यांचा माघारीने अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बायडेन आणि विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट लढत होईल हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
बायडेन यांच्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षात झटणारे अदृश्य हात अजून तरी पडद्याच्या पुढे आले नाहीयेत. सँडर्स यांच्या माघारीनंतर बायडेन यांच्या मागे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आणि मतदार झाडून उभे राहिले आहेत असे चित्र आत्ता तरी दिसत नाहीये. त्यासाठी बायडेन यांना मूळ अमेरिकी, आफ्रिकी-अमेरिकी, हिस्पॅनिक मतदार, तरुणांना डोळ्यासमोर ठेऊन प्रचार राबवावा लागेल. सँडर्स यांनी उभारलेल्या धोरणांच्या पायावर, त्यांना अधिक विस्तारत कळस चढवावा लागेल. कोरोना प्रादुर्भावाची अमेरिकेतील तीव्रता पाहता आरोग्यव्यवस्था, तिची सर्वसमावेशकता आणि अशा परिस्थतीला सामोरे जाण्याची सज्जता या गोष्टी प्रचारात ऐरणीवर येतील. फक्त अमेरिकेतच नाही तर जगभरातील सत्ताकेंद्र या ब्यादेतून वाचतात की डगमगतात हे आता पाहायचे आहे. रुग्ण आणि मृतांची संख्या पाहता ट्रम्प यांना त्यांची बाजू मांडणे अवघड जाणार आहे असे स्पष्टपणे दिसते. प्राथमिक माहिती अहवालांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याची बाब आता पुढे येत आहे. त्यामुळे त्यांना कोरोना अडचणीचे दिवस आणेल अशी नक्कीच परिस्थिती आहे. याच मुद्द्याला धरून बायडेन यांना आपले वेगळेपण दाखवून द्यावे लागेल. काही धोरण न मांडता फक्त ट्रम्प यांना पायउतार करा ही त्यांची प्रचारशैली आता तग धरू शकणार नाही. कोरोनानंतरच्या निवडणुकीसाठी परिस्थिती चिवटपणे हाताळणारा नेता जनता उचलून धरणार. त्यामुळे शब्दांच्या सोबत कृतीची जोड हे दोघे कितपत देतात हे बघणे जिकिरीचे ठरेल. तसेच, कोरोना संकट आणि त्यामुळे वाढलेली बेरोजगारी, गडद होणारे आर्थिक सावट सोडता, ट्रम्प लोकप्रिय राहिले आहेत. हे संकट आटोक्यात येताच ट्रम्प यांचा चमू आपला 'आवाज' करण्यास सुरुवात करेल. त्यांच्या या प्रभावी ठरलेल्या प्रचारतंत्राला वळसा घालत बायडेन यांना जोर लावावा लागेल. ते निवडून आल्यास ओबामांच्याच नेमस्त मध्यममार्गाची पुढची आवृत्ती बघायला मिळेल असे जाणकार वर्तवत आहेत. या दोघांचे वय आणि एकूण धडाडी पाहता या दोघांना उपाध्यक्षपदासाठी तुलनेने तरुण सहकारी सोबत घ्यावा लागेल. बायडेन आपल्यासोबत महिला सहकारी निवडतील असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. विद्यमान उपाध्यक्ष माईक पेन्स यांना ट्रम्प नारळ देतील अशी अटकळ बांधली जात आहे.
सद्यपरिस्थिती पाहता नोव्हेंबरची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच, टपालाच्या माध्यमातून मतदान घ्यावे असे काहींचे म्हणणे आहे. ही यंत्रणा कुचकामी असल्याचा शेरा मारून ट्रम्प यांनी नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. पण, १८४५पासून ही निवडणूक ठरलेल्या वेळीच होते. त्यास अमेरीकी कायद्याची मान्यता आहे. त्यात बदल करायचा असल्यास संसदेत तो कायदा दुरुस्त करून अध्यक्ष या नात्याने ट्रम्प यांची मान्यता त्यास लागेल. तसेच, नव्या अध्यक्ष्याने दर चार वर्षांनी २० जानेवारीला आणि नव्या संसदेने ३ जानेवारीला आपले कामकाज सुरु करावे असा संविधानात संकेत आहे.
सँडर्स यांच्या माघारीमुळे डेमोक्रॅटिक मतदार फुटणार नाही याची काळजी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बड्या नेत्यांना घ्यावी लागेल. येत्या काळात हे काम बराक ओबामा करतील असा कयास आहे. २०१६च्या सँडर्स यांच्या माघारीनंतर डेमोक्रॅटिक मतदार एकवटले नव्हते कारण सँडर्स यांच्या समर्थकांना ते पुन्हा लढतील अशी आशा होती. ती पूर्ण करीत त्यांनी यंदा आपले नशीब आजमावले. २०२२च्या निवडणुकीपर्येंत सँडर्स आपले सहस्रचंद्रदर्शन पूर्ण करतील. त्यामुळेच, त्यांची समाजकारणात सक्रिय राहण्याची शक्यता फिकी पडणे रास्त आहे. त्यांच्या या मोठ्या समर्थक वर्गाची हवा कोणता पुढारी आपल्या शिडात भरतो हे पुढच्या अंकगणितासाठी निर्णायक ठरेल. सँडर्स यांच्या डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या समाजवा दी मतदारांना साद घालत बायडेन स्वतःचा प्रचार कोणत्या मार्गावर नेणार हे पण आता बघायचे आहे. मात्र, त्यांचा एकंदर कल पाहता कितीही केले तरी बायडेन मध्यममार्गच स्विकारतील असे दिसते. त्यामुळे, सँडर्स यांना मानणारा मतदार ट्रम्प यांच्या पारड्यात आपले वजन ओततो की बायडेन यांच्याकडून प्रस्थापित राजकारणाला तडा देणाऱ्या अपारंपारिक राजकीय व्यवस्थेच्या संजीवनीची अपेक्षा करतो हे बघणे रंजक ठरेल.