Wednesday, 17 October 2018

सत्तालालसेवर सुधारणांचे आवरण

सौदी अरेबियाच्या अभ्यासकांच्या यादीमध्ये जमाल खाशोगी हे एक अग्रणी नाव. नेमके निरीक्षण आणि अचूक भाकीत करण्यात हातखंडा असलेले खाशोगी तथ्यपूर्ण आणि तपशीलवार लिहीतात, बोलतात. सौदी राजघराण्याच्या प्रभावळीत उठबैस असल्याने त्यांनी महत्त्वाची पदे सांभाळली. कठोर लिखाण केल्यामुळे त्यांना अनेकदा सौदी राजघराण्याची नाराजीदेखील ओढवून घेतली. २०१६ नंतर सौदीत राजे सलमान यांचे पुत्र मोहम्मद बिन सलमान यांचा प्रस्थ वाढत गेले आणि खाशोगींच्या लिखाणाला धार चढली. बिन सलमान यांची राजवट आवश्यक तितके स्वातंत्र्य देऊ शकत नसल्याने त्यांनी अमेरिकेचा आसरा घेतला. गेल्या आठवड्यात ते तुर्कस्तानातील सौदीच्या वाणिज्य दूतावासात काही कामानिमित्त गेले आणि त्यांनंतर ते बेपत्ता आहेत. वरकरणी सोप्या वाटणाऱ्या या घटनेला अनेक अंतर्गत पदर आहेत. बिन सलमान यांची एकाधिकारशाहीकडे सुरु असणारी वाटचाल हा त्यातला महत्वाचा कंगोरा.

२०१५मध्ये सौदीचे संरक्षणमंत्रीपद हाती घेतल्यापासून बिन सलमान यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढीला लागली आहे. पश्चिम आशियावरील नेतृत्वाच्या स्वप्नाने पछाडलेले बिन सलमान आपले सामर्थ्य हव्या त्या मार्गाने प्रस्थापित करू पाहत आहेत. गेल्या तीन वर्षांतील घटनाक्रम त्यांची राजकीय भूक दाखवून देतो आहे. २०१४च्या तुलनेत तेलाचे कमी झालेले भाव डोक्यात ठेऊन त्यांनी २०३०पर्येंत सौदी अर्थव्यवस्थेची तेलावरील मदार कमी करायचे धोरण आखले आहे. परकीय गुंतवणुक आणि जागतिक विश्वासार्हतेच्या वाढीसाठी परंपरानिष्ठ समाजला नवा आणि आधुनिक विचार देण्याचा आव ते आणत आहेत. हे करत असतानाच मात्र, आपल्या विरोधकांना थेट संपवण्याचा एक-कलमी कार्यक्रम बिन सलमान यांनी हाती घेतला आहे. जमाल खाशोगी हे त्यातील ताजे नाव. तुर्कस्तानातील वाणिज्य दूतावासात खाशोगींना पाचारण करून त्यांना जीवे मारल्याचे आता समोर येत आहे. या संपूर्णे घटनेचा एक एक तपशील आता पुढे येत आहे. तो पाहता बिन सलमान आपल्या विरोधात येणाऱ्याला बाजूला फेकण्यात कुठलीही मजल मारू शकतात हे स्पष्टपणे दिसते. जमाल खाशोगींचा काटा काढून त्यांनी एकाच खळबळ माजवून दिली आहे. तूर्तास, खाशोगींचा काहीच पत्ता नाहीये. १९७८मध्ये लेबेनॉनमधील धर्मगुरू मुसा अल-सदर यांना लिबियाचे हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांनी लिबियात भेटीचे निमंत्रण दिले. भेटीनंतर अल-सदर यांना आजतागायत कोणी पाहिले नाही. बिन सलमान यांनी हेच केले असल्याचे आता समोर येत आहे. या सगळ्याबाबत सौदीने कानावर हात ठेवले आहेत. मात्र, दूतावासातील कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे, अंतर्गत कॅमेरे बंद असणे याने संशयाची सुई रियाधकडे फिरते आहे. संपूर्ण आवाका बघता हा प्रकार बिन सलमान यांना जड जाईल असे दिसत आहे.


राजपुत्र मोहम्मद बिन नाएफ यांना बाजूला सारत ताब्यात घेतलेले युवराजपद, काहीतरी अचाट करून दाखवण्यासाठी घातलेला येमेन युद्धाचा डाव आणि त्यात आलेले सपशेल अपयश, भ्रष्टाचार विरोधाचा झेंडा दाखवत बड्या सौदी राजपुत्रांना, माजी मंत्र्यांना अटक करीत त्यांच्या संपत्तीवर आणलेली टाच, कतारला कोंडीत गाठण्यासाठी अरब देशांची बांधलेली मोट, आणि देशांतर्गत विरोधकांना आणि टीकाकारांना जेलबंद अथवा 'गायब' करण्याची कला बिन सलमान यांनी अवगत केली आहे. राजे सलमान यांच्या आडून अप्रत्यक्षपणे सौदी अरेबियाची गाडी हाकणारे बिन सलमान आपला प्रवास कोणत्या दिशेला जाणार आहे याची प्रचिती गेली तीन वर्ष देत आहेत. त्यांच्या या प्रवासात बहारीन, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त या धर्मभावांनी दिलेली धर्ममान्यता आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यारूपाने थेट वॉशिंग्टनमधून राजमान्यता मिळाली आहे. सौदीसारख्या देशात त्यामुळे निर्दयपणे सत्ता राबवण्यासाठी लागणारा सर्व दारुगोळा त्यांच्यापाशी आहे. तो या जमाल खाशोगी प्रकरणात वापरून बिन सलमान यांनी काय ते संकेत स्वच्छपणे दिले आहेत. गेल्याच आठवड्यात 'इंटरपोल'चे प्रमुख चीनमध्ये जाऊन असेच 'गायब' झाले होते. नंतर त्यांनी चीनमधूनच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, टीकाकारांना 'शांत' करणाऱ्यांच्या पंक्तीत रशियाच्या व्लादिमिर पुतीन, चीनच्या शी जिनपिंग यांच्यासोबत आता बिन सलमान जाऊन  बसले आहेत.

एका बाजूने सामान्य सौदी समाजमनात आणि त्यांच्या राहणीमानात मूलभूत बदल घडवण्याच्या मुलाम्याच्या आड मात्र बिन सलमान आपला खरा चेहरा दाखवत आहेत हे आता अधिकच उघड होत आहे. हाती लागलेले सर्व पुरावे जाहीर करीत तुर्कस्तान आणि अमेरिका बिन सलमान यांना आता जाब विचारणार का हा तूर्तास प्रश्न आहे. कतारला वाळीत टाकण्याच्या प्रकरणात सौदी आणि तुर्कस्तान एकमेकांविरोधात उभे आहेत. त्यामुळे, सौदीची अडचण करायची चालून आलेली ही आयती संधी तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप एर्दोगन घालवणार नाहीत अस म्हणायला वाव आहे. पण, एर्दोगन हे चाणाक्ष आणि संधीसाधू समजले जातात. सीरियाच्या युद्धाच्या सुरुवातीला सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधाची भाषा करणारे एर्दोगन आता आठ वर्षांनंतर असद गटाभोवती घुटमळताना दिसतात. तसेच, तुर्कस्तानमध्ये देशांतर्गत पत्रकारांना आणि टीकाकारांना गप्प करण्यात एर्दोगन यांची राजवट बिन सलमान यांच्या तोडीस तोड आहे. त्यामुळे ते कोणत्या नैतिकतेच्या आधारावर बिन सलमान यांना जाब विचारणार हा प्रश्न उरतोच. राजकारण एरवी कायमच नैतिकतेच्या पलीकडे सुरु होत असताना, एर्दोगन आपल्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी जमाल खाशोगी प्रकरणाचा अचूक वापर करीत सौदीच्या बिन सलमान यांच्याकडून बरीच माया जमवतील असा कयास आहे. दुसरीकडे, बिन सलमान आणि ट्रम्प हे दोघेही तसे एकमेकांचे विशेष स्नेही. ट्रम्प बिन सलमान यांच्यासारखी निर्विवाद सत्तेची आस राखतात तर बिन सलमान यांना ट्रम्प यांच्याकडे असलेले अमर्याद सामर्थ्य खुणावते. या दोघांनाही लोकशाहीचे आणि पत्रकारांचे विशेष कौतुक नाही, असलाच तर दुःस्वास आहे. त्यामुळे, जुजबी लक्ष घालण्यापलीकडे ट्रम्प या प्रकरणात जास्त काही करतील असा विश्वास नाही, त्याला शंकेची किनार नक्की आहे. सौदीला शस्त्र विकून मुबलक फायदा आहे तोपर्येंत अमेरिका याकडे दुर्लक्ष करेल. अमेरिकेच्या अशाच धोरणामुळे अनेक हुकूमशहा तयार झालेले आपण पाहिले आहेत. मात्र, बिन सलमानमात्र यातून सही सलामत वाचल्यास, ते कोणत्या टीकाकाराला आपला पुढचा बळी बनवतील याचा नेम नाही. त्याला आता जागेचे बंधनही नाही. म्हणूनच सगळे पुरावे विरोधात जात हे प्रकरण अंगाशी येत असताना, अमेरिका, तुर्कस्तान, आगडोंब उसळलेले समाजमाध्यम यांना झुलवत बिन सलमान हे प्रकरण कसे 'दाबतात' हे बघण जिकिरीच आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विचार करता त्यांच्या या कसबावरच त्यांच्या पुढील राजकारणाचा आणि कार्यशैलीचा रोख समजणार आहे.