डिसेंबर २०१७च्या शेवटच्या आठवड्यात इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शन सुरु झाली. या आंदोलनाला हिंसक वळण लागून त्यात २१ जण मरण पावले तर सुमारे हजारभर लोकांना सरकारने ताब्यात घेतले आहे. २००९साली झालेल्या निदर्शनानंतरचे इराणमधील हे सर्वात मोठे निदर्शन मानले जात आहे. महागाई, भ्रष्टाचार आणि इस्लामी राजवटीला कंटाळून हे आंदोलन छेडण्यात आले असल्याचे जरी प्रथमदर्शनी दिसत असले, तरी या आंदोलनाची छुपी कारणे आणि त्याजोगे साधणाऱ्या राजकारणाचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.
इराणमध्ये दोन सत्ताकेंद्र काम करतात. एक अध्यक्ष आणि दुसरे त्यांचे सर्वोच्च नेते अली खामेनी. स्थानिक विषय, परराष्ट्र धोरण आणि इतर समित्यांवर जरी अध्यक्ष्यांचा दबदबा असला तरी खामेनी यांचा शब्द अंतिम मानला जातो. धार्मिक संस्था, महत्त्वाच्या आर्थिक समित्या, इराणची 'रेव्होल्यूशनरी गार्ड' फौज ही खामेनींच्या शब्दावर चालते. खामेनींचा कंपू हा कट्टरवादी आणि तिरसट समजला जातो. २००९साली इराणच्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष मोहम्मद अहमदीनेजाद यांनी बनवाबनवी केल्याचा आरोप करीत त्याविरोधात आंदोलन चिघळले होते. अहमदीनेजाद हे खामेनींच्या गटातले. त्यांनी कट्टरवादाचा पंथ स्वीकारून इराणचा अणूकार्यक्रम अवैधरित्या राबवला आणि पाश्चात्य देशांकडून आर्थिक निर्बंध ओढवून घेतले. त्यांना मागे सारत, अणूकार्यक्रम आवरू पाहणारे, पाश्चात्य देशांशी समझोता करून निर्बंध उठवू पाहणारे, रोजगारनिर्मितीचे आश्वासन देणारे आणि कट्टरवादी गटात न मोडणारे हसन रोहानी २०१३साली निवडून आले. निवडून आल्यानंतर त्यांनी कट्टरवादी गटाला हाताळत काही आश्वासने पाळली. मात्र, २०१५साली अमेरिका आणि पाश्चात्य देशांशी करार करून आणि आर्थिक निर्बंध हटवून देखील त्यांना इराणची विसकटलेली आर्थिक घडी नीट बसवता आली नाही. उठवलेले आर्थिक निर्बंध आणि मुक्त बाजारपेठेत तेल विकून आलेला पैसा खामेनी गटाने सीरिया, इराक, येमेन आणि लेबेनॉनमधील लढाईत वळवला. त्यामुळे इराणमध्ये भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी बोकाळली आहे. इराणमधील सुमार ४५% जनता ३०वर्षांच्या आतली आहे. त्यांच्या मागण्या काळाला धरून आणि सुसंगत आहे. घरात खायचे हाल सुरु असताना खामेनी गट पश्चिम आशियात लष्कराच्या नसत्या भाकऱ्या भाजतोय हा त्यांचा राग आहे. ही गोष्ट रोहानी आणि मध्यममार्गीय गटाला मंजूर दिसते. त्यामुळेच रोहानींनी इराणचे यंदाचे बजेट लोकांपुढे आणले. बजेट प्रथमच पारदर्शकतेने दाखवले गेले. त्यात कट्टरवादी धार्मिक संस्थांना मुबलक पैसे मिळणार असल्याचे दिसल्यावर मध्यमवर्गीय आणि तरुण वर्गाचे पित्त खवळले आहे. रोहानींनी कट्टरवादी कंपू देशाला कुठल्या मार्गाला नेत आहे हे दाखवले. तर, कट्टरवादी गट रोहानी आपल्या निवडणूकीय आश्वासनांची पूर्तता नाही करू शकले म्हणून शंख करीत आहे. त्यांनी टाकलेल्या या काडीमुळे हे आंदोलन झाल्याचे बोलले जात आहे. ते सुरु झाले मशाद या इराणच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरापासून. मशाद रोहानींचे विरोधक इब्राहिम रईसी यांचा बालेकिल्ला. सर्वोच्च नेते असलेल्या अली खामेनींची त्यांच्यानंतर गादी कोण सांभाळणार यासाठी रोहानी आणि रईसी यांच्यात चुरस आहे. त्यामुळे या आंदोलनाला सत्तासंघर्षाचीसुद्धा किनार आहे या लक्षात घेतले पाहिजे.घरच्या आघाडीवरची ही खदखद इराणच्या पश्चिम आशियातील इराणच्या वाढलेल्या वर्चस्वाला धक्का लावू शकते. हे आंदोलन पेटताच डोनाल्ड ट्रम्प आणि इस्राईलच्या बेंजामिन नेतान्याहू यांनी इराण सरकार किती लोकांची मुस्कटदाबी करीत आहे अश्या आशयाच्या पुड्या सोडल्या आहेत. अमेरिका आंदोलकांच्या पाठीशी आहे असे त्यांनी नमूद केले असले तरी त्यांना या आंदोलकांचे व इराणचे किंचित घेणेदेणे नाही हे उघड आहे. आंदोलनाच्या या वहाणेने अणूकरार आणि इराणमधील मध्यममार्गीय गटाचा विंचू मारण्याचा त्यांचा विचार आहे हे स्पष्टपणे दिसते. इराणमधील अंतर्गत बेबनाव वाढवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे बराक ओबामांच्या कार्यकाळात इराणशी केलेला अणूकरार रद्द करू शकतात. त्यांनी सुरुवातीपासूनच इराणला असे धारेवर धरले आहे. ट्रम्प यांच्या या धमकीमुळेच इतर देश इराणमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कचरतायेत. आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अवघडलेपण रोहानींच्या मार्गात उभ राहू पाहतय. त्यामुळेच, शमवलेले हे आंदोलन परत पेटणार नाही याची काळजी रोहानी गटाला घ्यावी लागेल. अणूकरार वाचवताना, आंदोलनानंतर सोशल माध्यमांवरची बंदी उठवताना, आर्थिक गाडा रुळावर आणताना, रोहानींना स्थिरतेचा संदेश लवकरात लवकर द्यावा लागेल. तसे न केल्यास अंतर्गत आणि परकीय विरोधक त्यांची खुर्ची धोक्यात आणू शकतात.
जागतिक पातळीवर सारासार विचार न करता निर्णय रेटणाऱ्या राजकारण्यांची संख्या वाढत असताना, नेमस्तपणे, सर्वांगाने विचार करून निर्णय घेणाऱ्या राजकारण्यांची स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अश्या दोन्ही आघाड्यांवर अडचण होऊ लागली आहे. इराणमधील कट्टरवादी पुढारी, डोनाल्ड ट्रम्प, सौदी आणि इस्राईलच्या रूपात उभे ठाकलेले विरोधक अशा कात्रीत रोहानी सापडल्याचे दिसत आहे. ट्रम्प, सौदी आणि इस्राईल तर इराणचा घास घ्यायची वाटच बघत आहेत. त्यात, चर्चेने मार्ग सोडवणाऱ्या रोहानींची राजकीय शिकार झाल्यास आणि इराण अंतर्गत कारणांनी धगधगत राहिल्यास त्यासारखे दुसरे सुख नाही अशा विचारात हा विरोधी गट आहे. या दोन्ही बाजूंचा अंदाज घेत, आपले धोरण राबवताना आणि सामान्य जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करताना रोहानींच्या वाटेत विघ्न येण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. इराणमधील हे ताजे, छोटेखानी निदर्शन हेच अधोरेखित करते. मात्र, रोहानी आपला वेळ घेऊन काम करण्यात, आपल्या चालींचा पत्ता न लागू देण्यात आणि विरोधकांना चितपट करण्यात तरबेज मानले जातात. या संकटात त्यांनी दाखवलेला संयम त्यांच्या या स्वभावाला अनुसरूनच आहे. संयतपणे धोरण राबविणारा राजकारणी नेता तावून-सुलाखून निघणाऱ्या परिस्थितीतून तयार होत असतो. अध्यक्ष हसन रोहानींसाठी अशाच कसोटीचा हा काळ आहे.
- वज़ीर
हा लेख, बुधवार १० जानेवारी २०१८ रोजी 'सकाळ'च्या संपादकीय (पान ६) पानावर छापण्यात आला.