आकाराने इराकच दुसऱ्या क्रमांकाच मोठ शहर असलेले मोसुल तब्बल तीन वर्षांनंतर 'आयसिस'च्या ताब्यातून इराकी फौजांनी सोडविले. सुमारे नऊ महिने सुरु असलेल्या या लढाईला मागील आठवड्यात यश आले. २०१४च्या जून महिन्यात 'आयसिस'ने या शहराचा ताबा घेतला होता. तेव्हापासून या दहशतवादी गटाने तेथील सामान्य नागरिकांवर जुलमी राजवट राबवत त्यांना कैद्याची वागणूक दिली होती. या राजवटीला कंटाळून अनेकांनी घरदार सोडले, लाखोंचे जीव गेले. सामान्य नागरिकांच्या आडून इराकी फौजांचे हल्ले 'आयसिस' परतवून लावत होती. याच नागरिकांच्या जीवाचा विचार केल्यामुळे 'आयसिस'चा मोसुलमध्ये पराभव करायला इतका उशीर लागला. लढाईच्या शेवटच्या टप्प्यात तर 'आयसिस'च्या महिला आत्मघातकी दहशतवाद्यांनी देखील बॉम्बस्फोट केले. मोसुल ताब्यात घेतल्यापासूनच 'आयसिस'चा वारू चौफेर उधळला होता. तेच हातून गेल्यामुळे या दहशतवादी गटाचे कंबरडे मोडल्याचे मानले जात आहे.
२०१४च्या जुलै महिन्यात मोसुलच्या अल-नूरी मशिदीतून आपल्या समर्थकांना संबोधित करताना अबू बकर अल-बगदादीने स्वतःला त्याच्या सर्व धर्मबांधवांचा 'खलिफा' म्हणून स्वयंघोषित केले होते. 'लिलत अल-क़द्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याच्या २७व्या दिवशी प्रेषित मोहम्मदांना कुराणचा साक्षात्कार झाला. मोसुलच्या लढाईच्या शेवटच्या टप्प्यात 'आयसिस'ने याच दिवशी ही मशीद उडवून लावली. यावरून 'आयसिस'ची शुद्ध धार्मिकपणाची व्याख्या किती फोल आहे हे समजते. फक्त सर्वोच्च नेत्यांमुळेच नव्हे तर सद्दाम हुसेनच्या 'बाथ' पक्षातील सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या जिहादी विचारांनी 'आयसिस' इतकी वर्षे जिवंत ठेवली. अबू मोहम्मद अल अदनानी, अल-शिशानी, अल-मसरी या 'आयसिस'च्या महत्त्वाच्या नेत्यांसोबतच 'बाथ' पक्षातील म्होरक्यांच्या खात्म्यामुळे आता या गटाच्या दुसऱ्या फळीत पोकळी निर्माण झाली आहे. सामान्य दहशतवादी अशावेळी दुसऱ्या जिहादी संघटनांचा आधार घेत त्यांच्या मांडवात दाखल होत असल्याचे इतकी वर्षे सिद्ध झाले आहे. यातील बरेच दहशतवादी निर्वासितांच्या लोंढ्यात युरोपच्या वाटेला लागल्याने हा धोका आणखी वाढला आहे. एकेकाळी अमेरिकेतील इंडियना राज्याइतका मोठा प्रदेश आपल्या ताब्यात असणाऱ्या 'आयसिस'च्या हातातील प्रदेश आता झपाट्याने आकुंचन पावत आहे. याचा 'आयसिस'च्या पुढील वाटचालीवर कितपत परिणाम होतो यावर जागतिक शांततेचा बाज अवलंबून आहे.
'आयसिस'च्या विरोधातील सर्वात प्रभावी घटक म्हणून कुर्दिश गटाकडे पहिले जाते. 'आयसिस'ला चेपण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडून या गटाने आपल्या स्वतंत्र कुर्दिस्तानच्या मागणीला अधिक धार चढवली आहे. त्यांच्या मागणीकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करणे पश्चिम आशियाची अस्थिरता लक्षात घेता परवडण्यासारखे नाही. इस्लामच्या सुन्नी शाखेचे प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या 'आयसिस'मुळे सामान्य सुन्नी नागरिकांचेच सर्वाधिक जीवित आणि आर्थिक नुकसान झाले आहे. स्थानिक फौजांना युद्धनीतीचे पाठबळ देत आणि हवाई हल्ल्यांची मदत करत जटिल प्रश्न सोडवले जाऊ शकतात हे अमेरिकेच्या मोसुलबाबतच्या भूमिकेने दाखवून दिले आहे. असे करतानाच अमेरिकेचे कमी सैनिक या संघर्षात कामी आल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या या बदललेल्या युद्धतंत्राचा उपयोग 'आयसिस'ची स्वयंघोषित राजधानी असलेल्या सीरियातील रक्का शहरावरच्या आक्रमणात देखील होऊ शकतो. शहरीपट्ट्यातील संघर्षात, सामान्य नागरिकांच्या जीवाची काळजी घेत, अवलंबलेले हे युद्धतंत्र कमी नुकसानकारक ठरत आहे. मोसुल, फल्लुजाह, रमादी हे 'आयसिस'च्या ताब्यातून काढून घेत इराकी फौजांनी मोठी शर्थ गाजवली आहे. ही शहर पुन्हा वसवायचे काम आणि राजकीय इच्छाशक्ती आता इराकी नेतृत्वाला दाखवावी लागेल. २००३च्या अमेरिकी आक्रमणापासून २०१७पर्येंत, म्हणजेच सुमारे एका पिढीची खुंटलेल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीला नव्याने चालना देऊन पीडित नागरिकांचे पुनर्वसन करणे हैदर अल-अबादी यांच्या सरकारसाठी क्रमप्राप्त आहे. सामुदायिक भेदभाव न करता धरलेली प्रगतीची कासच अस्थिर आणि विभागलेल्या इराकला स्थिरतेकडे नेऊ शकते.
'आयसिस'वर मिळवलेल्या या विजयाचे गोडवे गात असताना, या एका शहरासाठी झालेल्या संघर्षात सामान्य जनतेच्या उडालेल्या कत्तलीला, वाताहतीला मोजमाप नाही हे याचे भान ठेवावे लागेल. हवाई हल्ल्यात जमीनदोस्त झालेले मोसुल शहर आणि बेचिराख झालेल समाजमन उभारी घेईपर्येंत अस्वस्थेतेचे प्रतिध्वनी उमटवत राहतील. इराकचे माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांचे दोन पुत्र उदय आणि कुसय यांना २००३साली मोसुलमध्येच ठार करण्यात आले होते. २००४ साली अश्याच अस्थिर इराकमध्ये विकोपाला गेलेल्या शिया-सुन्नी संघर्षात अबू मुसाब अल-जरकावीने 'आयसिस'च्या प्राथमिक स्वरूपाला प्रारूप दिले होते. २००६मध्ये त्याचा काटा काढल्यानंतर देखील त्याच्या विचारांची धग अबू बकर अल-बगदादीने पेटवत ठेवली. जिहादची हाळी देणाऱ्या या विचारांचे समूळ उच्चाटन हाच तोडगा सर्वंकष शांततेला हातभार लावतो. अन्यथा हिंसक विचारांची बीज खोलवर रुजलेली असताना त्यांना कालांतराने, कधी नव्या स्वरूपात, नवी पालवी फुटते असे इतिहास सांगतो. तशी शक्यता आत्तादेखील खोडून काढता येत नाही. शियाबहुल इराकमधील शिया सरकार, सुन्नीबहुल मोसूलची जनता आणि स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी लावून धरलेला कुर्दिश गट असे 'आयसिस'नंतरच्या मोसुलचे वाटेकरी आहेत. त्यामुळेच, 'आयसिस'चा मोसूलमध्ये पराभव करून झालेला आनंद हा अल्पजीवी ठरणार नाही वा असे दहशतवादी गट पुन्हा जोर धरू पाहतील असे वातावरण तयार होणार नाही याची काळजी या संबंधित घटकांना घ्यावी लागेल.
मोसुलच काय तर इराकची राजधानी बगदाददेखील सुरक्षित नसल्याचे वारंवार होणारे बॉम्बस्फोट दाखवून देत आहेत. 'आयसिस'च्या कार्यपद्धधतीला लावलेला चाप त्या गटाला विस्तृत आणि व्यापक हल्ले करण्यापासून परावृत्त करेल असे दिसते. मात्र, असंघटित अथवा कमी संख्याबळाने केलेले हल्ले हे 'आयसिस'ने बदलून टाकलेल्या दहशतवादाच्या व्याख्येचे प्रमाण आहे. असे एकट्या-दुकट्याने करण्यात येणारे हल्ले ही 'आयसिस'ची मनोवृत्ती राहिली आहे. मोसूल सारखे मोठे शहर ताब्यातून जाऊन देखील ती त्यामुळेच डोके वर काढत राहील अशी भीती आहे.
- वज़ीर
- वज़ीर
हा लेख, मंगळवार दिनांक १८ जुलै २०१७ रोजी 'सकाळ'च्या संपादकीय पानावर छापण्यात आला.