परवा सौदी अरेबिया सरकारने (राजघराण्याने) ४७ कैद्यांना मृत्यूदंड ठोठावला त्यात शियापंथीय मौलवी शेख निम्र अल-निम्र यांचा समावेश होता. अल-निम्र यांच्या फाशीचे पडसाद मध्यपूर्व आशियात उमटले नसते तरच नवल होतं. गेले २ वर्ष सौदी अरेबिया आणि इराण या दोन मातब्बर देशांमधील धूसफुसणारा ताजा वाद या फाशीच्या घटनेमुळे विकोपाला गेला आहे. ही घटना जरी या वादाचे कारण दिसत असले तरी या उद्रेकाला चहुबाजूने कारणीभूत असणारे अनेक पैलू आहेत. इराण आणि सौदी हे गेली कित्येक दशकं एकमेकांचा दुस्वास करत आले आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या निधनानंतर सुरु झालेला शिया-सुन्नी हा पंथभेद त्यांच्यात आज देखील सुरु आहे. इराण-सौदी वाद हे त्याचं वर्तमान उदारहण.
|
Image credit - Google |
संपूर्ण मध्यपूर्व आशियात सौदी हा सर्वात मोठा सुन्नीबहुल देश आहे. मक्का आणि मदिना ही दोन पवित्र तीर्थस्थळं सौदीत आहेत. तर दुसरीकडे इराण हा जगातील सर्वात मोठा शियाबहुल देश. १९७९च्या इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर अमेरिकेच्या गोटात जात सौदीने १९८० सालच्या इराण-इराक युद्धात महत्वाची भूमिका बजावली होती. काही न काही कारणांमुळे ताणले गेलेल्या संबंधांवर मग १९९८ इराणी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद खतामी आणि सौदी राजे अब्दुल्लाह यांनी फुंकर मारली. पण हे सख्य काही काळंच टिकलं आणि मोहम्मद अहमदजीनेदाद यांनी इराणची गादी ताब्यात घेताच पुन्हा हे संबंध कटू झाले. आपापल्या पंथाचे आपण कैवारी आहोत असे समजत हे दोन देश एकमेकांना पाण्यात पाहतात. पंथभेदाच्या जोडीला अरबी आणि फारसी ही सांस्कृतिक आणि वैचारिक दुफळी देखील त्यांच्यात आहेच.
निम्र अल-निम्र यांना फाशी दिल्याची बातमी बाहेर पडताच इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठ्या निदर्शनं सुरु करण्यात आली. शेख अल-निम्र यांच्यावर सौदीने दहशतवादी असल्याचा ठपका ठेवला होता तर ते फक्त सौदी राजघराणं आणि त्यांच्या निर्णयांविरोधात होते अशी बाजू इराण मांडत होता. थेट लोकभावनेला हात घातलेल्या घटनेने या निदर्शनाला हिंसक वळण लावलं. जमावाने तेहरानमधील सौदी दूतावास पेटवून दिला. या पेटवा-पेटवीला सुरुवात होताच हेजबोल्लह, लेबेनॉन आदि शिया विचारसरणीच्या संघटनांनी आणि देशांनी या घटनेचा तीव्र निषेध केला. वातावरण तापत असतानाचं सौदिनेदेखील इराणसोबतचे संबंध संपल्याचे जाहीर केले. हे करतानाच सौदी परराष्ट्रमंत्री आदेल बिन अहमद अल-जुबेयर यांनी इराणी राजदूतांना आणि अधिकाऱ्यांना ४८ तासात सौदी भूमी सोडण्याचे आदेश दिले. घटनेची तीव्रता लक्षात येताच बहारीन, कुवेत, सुदान,संयुक्त अरब अमिराती या सुन्नीबहुल देशांनी इराणसोबतचे द्विपक्षीय संबंध तोडताना सौदीची तळी उचलून धरली आहे. गेल्या २-४ वर्षातल्या घडामोडी पाहिल्यास इराण-सौदीमध्ये जोरदार जुंपणार हे अगदी उघड होते. वर्चस्वाच्या लढाईत उतरलेल्या इराण-सौदीने गेल्या वर्षात येमेनमध्ये लढाई सुरु केली आहे.
|
Image credit - Google |
शियापंथीय इस्लामचा पुरस्कार करणाऱ्या 'हुती' बंडखोरांना पाठींबा देणारा इराण आणि येमेनी राष्ट्राध्यक्ष हादी, सुन्नी गटात आपलं वजन ओतणारा सौदी अरेबिया हे येमेनमधील त्रांगडं आहे. येमेनमधील परस्पर-विरोधी गटांना दिलेली रसद ही इराण-सौदीच्या राजकीय खेळीची दुसरी आवृत्ती आहे. याच्या पहिल्या आवृत्तीची जबाबदारी २०११पासून आजपर्येंत सीरियामध्ये हे दोन देश चोखपणे निभावत आले आहेत. सीरियामध्ये शिया असलेल्या राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना पाठींबा देणारा इराण आणि त्यांच्या विरोधाकांना पाठींबा आणि प्रामुख्याने सुन्नीपंथाचा पुरस्कार करणाऱ्या 'आयसीस'ला मदत करणाऱ्या सौदीमुळे तेथील सामान्य जनजीवन आज घुमसतय. जबरदस्त मोठा इतिहास असलेली सीरियातील शहरं आणि प्रांत या हिंसाचाराचे बळी झाले आहेत. तब्बल शेकडो छोट्या-मोठ्या दहशतवादी संघटना सीरियामध्ये कार्यरत असताना, त्यांचं एकमेकांना असलेलं समर्थन किंवा त्यांचातले अंतर्गत वाद या हिंसाचारात रोज काहीशे मृतदेहांची भर घालत आहेत. थेट वादामध्ये न उतरता, परस्पर विरोधी गट एकमेकांना भिडत असताना आपले पाय पसरायचे ही मोठी चाणाक्ष खेळी 'आयसीस' सीरियामध्ये खेळत आहे. 'आयसीस'ची जोमाने होणारी ही वाढ दिसत असतानासुद्धा इराण आणि सौदी अरेबिया, सीरियामधील जनयुद्धाला खतपाणी घालत बसले. ती लढाई आता इतकी स्वाभिमानी झाली आहे की दोन्ही देश आपले हेच पराक्रम येमेनमध्ये दाखवत आहेत. त्यांच्यातल्या या वाढणाऱ्या हिंसक सुंदोपसुंदीमुळे मध्यपूर्व आशियाई पट्ट्यात मोठ्या प्रमाणत उलथापालथ झालेली आपण पाहतो आहे.
'आयसीस' या जहाल दहशतवादी संघटनेच्या निर्मितीत सौदीचा मोठा वाटा असल्याचे आरोप इराण करत आहे. या आरोपात बऱ्याच अंशी तथ्य देखील आहे. सीरियाचे प्रमुख असद यांना खाली खेचू पाहणाऱ्या 'आयसीस'चा काटा काढण्याची वाट इराण बघत आहे. याच कारणासाठी इराणने रशियाशी मैत्री वाढवायला सुरुवात केली आहे. आखतात शिरकाव करू पाहणाऱ्या आणि गेल्या काही महिन्यांत ताकदवान होणाऱ्या व्लादिमिर पुतीन यांना ही मैत्री मान्य आहे. पुतीन यांचा तेहरान दौरा, असद यांच्याशी दोस्ती आणि सीरियाच्या टारटस बंदराचं महत्त्व म्हणूनच रशियाचा जिव्हाळ्याचा विषय आहेत. इराणसोबत अणुकरार करून त्यावरील आर्थिक निर्बंध उठवताना, द्विपक्षीय संबंध थोडे मित्रत्वाकडे झुकवताना अमेरिकेने सौदीला चुचकारले आहे.
|
Image credit - Google |
सौदीला अमेरिका-इराण जवळीक नको आहे. जवळपास ३५ अमेरिकी डॉलर प्रती बॅरल या २००८ साल इतक्या गडगडलेल्या तेल भावाला इराणचे तेल बाजारात येउन अजून ओहोटी नको म्हणून सौदी प्रयत्नशील आहे. तेलाच्या कमी होणारी किंमत आणि मागणी या अरब राष्ट्राची इथून पुढे सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे. या सगळ्या गोंधळात सौदी किंबहुना तिचे नवे राजे सलमान बिन अब्दुल अजीज इब्न सौद यांची आक्रमक भूमिका महत्वाची आणि बदलत्या राजकीय नात्यांची दिशा दाखवणारी आहे. सौदी राजघराण्यातदेखील सर्वकाही आलबेल नाहीये. सध्याचे सौदी राजपुत्र मोहम्मद बिन नाएफ यांना डावलून राजे सलमान यांनी आपला पुत्र मोहम्मद बिन सलमानला संरक्षण खातं दिलं आहे. एकाधिकारशाहीत संरक्षणमंत्रीच नंतर खुर्चीवर हक्क सांगतो हे इतिहासजाणून आहे. सौदीची वाटचाल त्याच दिशेने गेल्यास आश्चर्यवाटायला नको. इराण-सौदी वादात रशिया मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे. असे करून रशिया आखतात आपलं स्थान पुन्हा बळकट करेल असा होरा राजकीय विश्लेषक मांडत आहेत. इराण-सौदीने सामंजस्याची भूमिका घ्यावी असे सांगणाऱ्या 'व्हाईट हाउस'ची भूमिका देखील बघणं कुतूहलाचा आता विषय आहे. संपूर्ण आखतात रोज विदारक होणाऱ्या अवघड परिस्थितीचा आणि अस्थिरतेचा आलेख यामुळे वर जातो आहे. मंचावर लढणारे अरब आणि पडद्यामागून रसद पुरवणाऱ्या, चिथावणी देणाऱ्या अमेरिका, रशियामधील शीतयुद्धाचा हा छुपा डाव या अरब देशांच्या लक्षात येईतो खूप उशीर झाला असेल. निस्वार्थीपणे जगणाऱ्या तेथील सामान्य जनतेच्या आयुष्याचा आणि जागतिक शांततेचा बाज मात्र यामुळे असमतोल होतोय हे सत्य अधिक क्लेशदायक आहे. या गुंतागुंतीत म्हणूनच मध्यपूर्व आशियात काही नव्या राजकीय समीकरणांच्या जन्माचा हा काळ सुरु असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
सौदी आता पाकिस्तानसकट सर्व सुन्नी देशांच्या मदतीची अपेक्षा करत आहे. इराणमधील सौदी दुतूवासाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नाव शेख अल-निम्र यांना समर्पित करून इराणने हा घाव आपल्या काळजावर बसला आहे असा स्पष्ट इशारा सौदीला दिला आहे.
|
Image credit - Google |
एका इराणी राज्यकर्त्याने तर इराणमधील सर्व सौदी कैद्यांची कत्तल करावी अशी जाहीर मागणी केली आहे. शह-काटशहाचं हे राजकारण पुढे काही वेळ चालत राहणार याबद्दल दुमत नाही. मात्र, सौदी अरेबिया आणि इराणमधील हा ताजा भडका हा नुसता संघर्ष नसून तेथील प्रजेच्या अस्तित्वाच्या, त्याला अनुसरून हिंसक कुरघोडी करू पाहणाऱ्या पुरस्कृत दहशतवादाच्या, त्याचं मूळ असणाऱ्या तेलाच्या आणि विस्मयकारकरित्या वेगाने बदलणाऱ्या मध्यपूर्व-आशियाई प्रदेशाच्या नेतृत्वाचा खटाटोप आहे हे पूर्णसत्य म्हणावं लागेल...
- वज़ीर
हा लेख गुरुवार दिनांक ०७ जानेवारी २०१६च्या 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये चालू घडामोडी सदरात (पान १५) छापण्यात आला.