Saturday, 19 December 2015

अमेरिका आघाडीचा स्वार्थी दुटप्पीपणा...

                 शार्ली हेब्दो', ऍम्सटरडॅम - पॅरिस रेल्वे आणि परवा 'आयसीस'ने पॅरिसमध्ये केलेला गोळीबार हे २०१५ मधील फ्रान्सवर करण्यात आलेले मोठे हल्ले आहेत. 'आयसीस'वरील हल्ल्यांमध्ये फ्रान्स नेहमीच आघाडीवर राहिला आहे आणि 'आयसीस'ने देखील सुरुवातीपासून फ्रान्सला धडा शिकवण्याची वल्गना केली आहे. अगदी परवाच्या हल्ल्यानंतर देखील फ्रान्सला त्रास देत राहू हे 'आयसीस'ने ठासून सांगितले आहे. हा हल्ला, जो 'आयसीस'ची भिन्न कार्यपद्धत अधोरेखित करतो. एका प्रदेशात न अडकता आपले खंदे समर्थक तयार आणि प्रशिक्षित करून, त्यांना आपापल्या देशांमध्ये माघारी धाडून आणि त्यांच्याकडून हल्ला करून घेण्यात कमालीचा सोपेपणा आहे.
अशी कार्यपद्धत वापरताना भौगोलिक सीमा गळून पडतात आणि म्हणूनच फ्रान्समध्ये हल्ला होणार हे माहित असतानासुद्धा त्याची नक्की माहिती आणि आवाका आधी लक्षात आला नाही. 

सिरीयामधला जनक्षोभ आणि त्याला खतपाणी घालून सिरियाचे राष्ट्रप्रमुख बशर अल-असद, त्यांचे सोबती रशिया, इराण आणि त्यांचा विरोधी गट अमेरिका, सौदी आणि जॉर्डन यांनी हे दिवस स्वतःवर ओढवून घेतले आहेत. चर्चेसाठी हात आखडते घेऊन नाकं मुरडणारे हे दोन्ही देश सुमारे ४ लाख बळी, २लाखांवर निर्वासित युरोपकडे वळल्यानंतर आणि ४ वर्षांच्या विध्वंसानंतर आता चर्चेसाठी ऑस्ट्रियामध्ये भेटले. सिरीयाचे प्रतिनिधी सोडून इतर १२ देशांच्या दूतांनी सिरीयाच्या भवितव्यावर चर्चा केली. वाटाघाटींची कब्बडी खेळत येत्या दीड वर्षात निवडणुकीच्या माध्यमाने सिरीया आणि असद यांच्या नेतृत्वाचा प्रश्न सोडवला जाईल असा कयास बांधत सर्वांनी निरोप घेतला. एखाद्या देशाविषयी इतर बंडखोर देशांनी ठरवायचे सर्व निर्णय आणि त्याजोगे गपगुमानपणे येणारी नामुष्की सिरियाच्या नशिबी आली आहे. ताज्या वर्तमानातलं हे एक ज्वलंत आणि जिवंत उदाहरण. तरी बरं सिरीयामध्ये भरमसाठ तेल नाही. नाहीतर या देशांनी तेलासाठी आज आहे त्यापेक्षा जास्त क्रौर्यसीमा गाठली असती. या सगळ्या वेळात 'आयसीस' आपले हात-पाय पसरत होती. अमेरिकी आघाडीचे शास्त्र वेचून 'आयसीस' फोफावली हे तर उघड आहे. आधी मदत नंतर विरोध अशी अमेरिकेची 'आयसीस'बद्दलची भूमिका राहिली आहे. मध्यंतरी अमेरिकेने कुर्दिश फौजांना 'आयसीस' विरुद्ध तयार करण्याचा कार्यक्रम सिरीयामध्ये हाती घेतला होता.
पण, नियोजनाभावी ५० कोटी अमेरिकी डॉलरच्या या कार्यक्रमला नारळ देण्यात आला. यातील बहुतांशी शस्त्र 'आयसीस'ला विकली गेल्याचं बोललं जातं. अमेरिकेची ही धरसोड वृत्ती, असद प्रेम, टारटस बंदराचं रशियाला असलेलं महत्त्व आणि युरोपकडे बेकायदा होणारं स्थलांतरावरून रशियाने सिरीयामधील 'आयसीस'च्या ठिकाणांवर हवाई हल्ला सुरु केला. फ्रान्स तयारचं होता आणि म्हणूनच तो 'आयसीस'च्या निशायाण्यावर आला आहे.  

काहीश्या मागे पडलेल्या असद समर्थकांना रशिया, इराण आणि हेजबोल्लाह यांच्या या मदतीमुळे स्फुरण चढलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आपला डाव साधत शक्तीशाली होत आहेत हे पाहून ओबामांनी ५० रणनितीकार सिरियात पाठवले. इराकमधील सिंजर प्रांत आता 'आयसीस'कडून अमेरिकी मदतीच्या जीवावर परत घेतल्याचे कुर्दिश फौजांनी जाहीर केले आहे. 'आयसीस'च्या ताब्यात असताना झालेली सिंजर प्रांतातल्या याझिदी मुला-माणसांचं शिरकाण आणि मुली-महिलांच्या अब्रूच्या केलेल्या धिंडीमुळे आजही मन विदारक होतं. सिरीयामधील रक्का शहर ते इराकमधील मोसुल शहराला जोडणारा महामार्ग सिंजरमधून जातो. सिंजरचा ताबा हे 'आयसीस'विरोधी गटाचं मोठं यश आहे. पण, अमेरिकीची कुरीशी फौजांना मदत टर्की आणि तेथील नवीन स्थापन झालेल्या सरकारला कितपत पचनी पडते यात शंका आहे. फ्रान्स आणि रशिया आता चिडून 'आयसीस'वर हवाई हल्ले करत आहेत. सर्व देशांच्या लष्कराला रणांगणात उतरवायची 'आयसीस'ची खेळी दिसत आहे. ओबामांचं अध्यक्षपदाचं एक वर्ष राहिलं आहे. त्यांनी युद्धखोर भूमिका बऱ्यापैकी टाळली आहे मात्र आता 'आयसीस'वर कारवाई करणं त्यांना क्रमप्राप्त आहे. पेंटागॉनने 'जिहादी जॉन'चा काढलेला काटा हा अभिनंदनीय असला तरी 'आयसीस'चा पसारा मोठा आणि भौगोलिक दृष्ट्या व्यापक आहे हे विसरून चालणार नाही. तिची कार्यपद्धती पाहता, युरोपमध्ये निर्वासितांचा टक्का लक्षात घेता सबंध युरोप जणू एखाद्या 'टाईम बॉम्ब'वर बसला आहे. भूगोलाचा विचार करता अमेरिका या घटकांपासून दूर असली तरी आम्ही तिकडेही आमचा इंगा दाखवू असे 'आयसीस'चे प्रवक्ते बिनदिक्कतपणे सांगत आहेत.
'आयसीस'च्या साधन-सामुग्रीवर घाव घालताना तिच्या विचारांची पकड ढिली करून नेस्तनाबूत करण्यात जय प्राप्त झाल्यास अमेरिकी आघाडीची ही मोहीम तडीस जाईल असे स्पष्टपणे दिसते. मात्र, थेट मंगळावर अचूकपणे यान उतरवणाऱ्या अमेरिकेचे मुबलक शस्त्रास्त्र नेमके 'आयसीस'च्या प्रदेशात कसे पडतात हा प्रश्न आता अमेरिकी सुजाण नागरिक विचारू लागले आहेत. पॅरिसवर हल्ला झाल्यानंतर थयथयाट करणाऱ्या अमेरिकी आघाडीला आणि माध्यमांना त्याच्या एक दिवसापूर्वी बैरुत, लेबेनॉनमध्ये शिया पंथावर झालेल्या स्फोटाचे आणि रोज मरणाशी सामना करणाऱ्या मध्य-आशियाई जनतेचे काही वाटत नाही का हा सूर आता राजकीय जाणकार लावत आहेत. दहशतवाद्यांना शस्त्र पुरवणारे जेव्हा आपल्या मायदेशी सरकारवर दबाव आणतात किंबहुना सरकार चालवतात तेव्हा सामरिक विचार करणारे फार कमी लोक पुढे येउन आपली स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका मांडून तिची अंमलबजावणी करतात असे इतिहास सांगतो.
अमेरिका, रशिया, चीन आणि फ्रान्ससारखे देश यातून काही आत्मचिंतन करणार की दरवेळी अश्या हल्ल्यांनंतर छाती बडवून घेत दहशतवाद्यांना पुन्हा शस्त्रास्त्र पुरवत आपला आहे तो कित्ता पुढे गिरवणार हे येत्या काही महिन्यांत दिसेलंच. त्यांच्या या निर्णयानंतरचं मात्र हे देश खरंच जगात शांतता नांदवतात की नुसत्या फाजील गप्पा मारतात हे कळेल. 


                                                                                                                                                                                          वज़ीर

या लेखाचा सारांश मंगळवार, दिनांक ०८ डिसेंबर २०१५च्या 'सकाळ' मध्ये चालू घडामोडी सदरात (पान ७) छापण्यात आला.