Friday, 17 April 2015

त्रिकाल सत्य...​​

येमेनमधील रोज विदारक होणाऱ्या अवघड परिस्थितीचा, अश्या परिस्थितीमुळे तयार होऊ पाहणाऱ्या नवीन आखाती समीकरणांचा, तेथील हिंसाचारामुळे बिघडणाऱ्या जागतिक राजकारणाच्या समतोलतेचा आढावा घेणारा आणि बिकट होणाऱ्या त्या प्रदेशाचा भविष्यकालीन अंदाज व्यक्त करणारा लेख.

मध्य-आशियाई खंडात रोज नवीन आव्हानं उभी राहत आहेत. किंबहुना अशी आव्हानं तयार केली जात आहेत. या आव्हानांना तयार करणाऱ्या, विरोध करणाऱ्या गटांमधील संघर्षामुळे संपूर्ण प्रदेशाची उलथापालथ कशी होऊ शकते याचं ताजं उदारहण म्हणजे येमेन. मुबलक गरिबी, जोडीला बेरोजगारी, चांगल्या शिक्षणाची वानवा, राजकीय स्थैर्य नसलेला देश, त्याचे श्रीमंत, धूर्त आणि संधीसाधू शेजारी यांचे मिश्रण केल्यानंतर तयार होणाऱ्या दुर्दैवी देशाचे सर्व परिणाम आज येमेन भोगत आहे. पृथ्वीवरील सर्वाधिक तेल-उत्पादन देणारा ​देश असं बिरुद मिरवणारा आणि त्यातील बहुतौंशी तेल अमेरिकेला विकून अतिश्रीमंत देशांच्या पंक्तीत जाऊन बसलेला सौदी अरेबिया आणि त्याच श्रीमंतीची वाट चोखाळत जगातील इतर विकसनशील देशांना तेल विकून गब्बर झालेला इराण, या दोन महत्वाच्या आखाती देशांमधील ही हिंसक सुंदोपसुंदी आहे. इराण आणि सौदीमध्ये जरी अनुक्रमे फारसी आणि अरेबिक ही सांस्कृतिक लढाई असली तरीपण, शिया-सुन्नी हा वाद त्यापेक्षा कित्येक पटींनी मोठा आहे. इराण हा जगातील सर्वात मोठा शियापंथीय देश आहे.
जगात जवळपास ८०% - ८५% मुसलमान सुन्नीपंथीय असताना सौदी अरेबिया सुन्नी पंथीयांचा सर्वात मोठा आणि श्रीमंत कैवारी समजला जातो. श्रीमंतीला कारण तेल आणि धार्मिकतेला कारण मक्का-मदिना ही दोन मोठी श्रद्धास्थानं. याच भांडवलावर हे दोन देश आज वर्चस्वाच्या लढाईत उतरले आहेत. येमेनमधील परस्पर-विरोधी गटांना दिलेली रसद ही त्यांच्या राजकीय खेळीची दुसरी आवृत्ती आहे. याच्या पहिल्या आवृत्तीची जबाबदारी २०११पासून आजपर्येंत सीरियामध्ये हे दोन देश चोखपणे निभावत आले आहेत. सीरियामध्ये राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना पाठींबा देणारा इराण आणि त्यांच्या विरोधाकांना पाठींबा देणारा सौदी अरेबिया यांमुळे तेथील सामान्य जनजीवन आज घुमसतय. सीरियामधील कत्तल येत्या काही महिन्यात अडीच लाखाचा टप्पा गाठेल. जबरदस्त मोठा इतिहास असलेली सीरियातील शहरं आणि प्रांत या हिंसाचाराचे बळी झाले आहेत. तब्बल शेकडो छोट्या-मोठ्या दहशतवादी संघटना, त्यांचं एकमेकांना असलेलं समर्थन किंवा त्यांचातले अंतर्गत वाद या हिंसाचारात रोज काहीशे मृतदेहांची भर घालत आहेत. बशर अल-असद यांना फोफावत चाललेल्या 'आयसीस'ची चिंता जरूर आहे पण भीती नाही. 'आयसीस'कडून असद त्यांच्या खुर्चीला आणि राजधानी दमस्कसला धक्का पोहोचवणारं विधान नाही केलं गेलंय. 'आयसीस' आपल्या वर्चस्वाच्या भागात लोकांकडून कर गोळा करून त्यांना सरकारी सुविधा पुरवत आहे. सीरियामध्ये समांतर सरकार चालवणाऱ्या 'आयसीस'ने सीरियाच्या नेतृत्वाला थेट धमकी दिली नाहीये. अजूनतरी. असदना भीती आहे ती, 'फ्री-सीरियन-आर्मी' (FSA) आणि अल-नुस्रा या गटांची. हे दोन्ही गट 'आम्हाला बशर अल-असद आणि त्यांची सत्ता मान्य नाही' अशी आरोळी सुरुवातीपासूनचं देत आहेत. त्यांचाशी लढत-लढत आज ४ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. थेट वादामध्ये न उतरता, परस्पर विरोधी गट एकमेकांना भिडत असताना आपले पाय पसरायचे ही मोठी चाणाक्ष खेळी 'आयसीस' सीरियामध्ये खेळत आहे. 'आयसीस'ची जोमाने होणारी वाढ दिसत असतानासुद्धा इराण आणि सौदी अरेबिया, सीरियामधील जन-युद्धाला खतपाणी घालत बसले. ती लढाई आता इतकी स्वाभिमानी झाली आहे की दोन्ही देश आपले हेच पराक्रम येमेनमध्ये दाखवत आहेत. याचे परिणाम सीरियापेक्षा अधिक गडद आणि निर्विवादपणे गंभीर आहेत.

येमेन हा सगळ्या आखाती देशांमधला गरीब देश समजला जातो. दर्जेदार शिक्षणाचा आणि वैचारिक रोजगारीचा बोऱ्या तिथे कधीच वाजला आहे.
अत्यंत हालाखित ढकलले जाणारे दिवस आणि उपासमारीमुळे येमेन सुरुवातीपासूनचं दहशतवादाचा प्रमुख अड्डा ही आपली ओळख राखून आहे. अल-कायदाला उघडपणे समर्थन देणारा, अत्यंत क्रूर आणि दहशतवादी कारवायांमध्ये बरीच लांबपर्येंत मजल मारलेला वर्ग आजसुद्धा येमेनमध्ये अस्तित्वात आहे. येमेनचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल्लाह अली सालेह याचं समर्थन करणारे 'हौती' बंडखोर आणि त्याला विरोध करणारं विद्यमान अब्द रब्बुह मन्सूर हादी यांच्या सरकारमधीला हा वाद आहे. शियापंथीय इस्लामचा पुरस्कार करणाऱ्या 'हौती' बंडखोरांना पाठींबा देणारा इराण आणि राष्ट्राध्यक्ष हादी, सुन्नी गटात आपलं वजन ओतणारा सौदी अरेबिया हे येमेनमधील विकोपाला गेलेल्या वादाचं मुळ आहे. सौदी या 'हौती' बंडखोरांचा दुस्वास करतो. कुठल्याही परिस्थितीत सौदीला बेभरवशाचं सरकार असलेला शेजारी देश नकोय. विद्यमान राष्ट्राध्यक्ष हादी यांनी हौतींची गळचेपी सुरु केली आणि इथेच वादाची ठिणगी पडली. इराणला सौदीची कुरापत काढायचीचं होती. अब्दुल्लाह अली सालेह ज्यांना २०११साली 'अरब अपरायसिंग'वेळी नारळ मिळाला त्यांनी आणि इराणने निकारीचा प्रयत्न करून 'हौती'गटाला रसद दिली, लष्करी प्रशिक्षण दिलं आणि येमेनच्या मोठ्या प्रांतांवर आणि शहरांवर ताबा मिळवला. वेळ आणि परिस्थिती दोन्ही हाताबाहेर जात आहे असे लक्षात येताच विद्यमान राष्ट्राध्यक्ष हादी येमेन सोडून पळून गेले. सौदीला आपल्या दक्षिणेला शियांचा हा प्रभाव नकोय आणि म्हणूनचं त्यांनी तब्बल १०० लढाऊ विमानं घेऊन येमेनवर हल्ला चढवला. हे करतानाच येमेन-सौदी ताबारेषेवर १५,००० हून अधिक सैनिकांची कुमक दिमतीला ठेवली. 'सुन्नी पंथ आणि मक्का-मदिना संकटात आहेत' अशी छाती बडवून घेत सौदीने, इजिप्त, सुदान, जॉर्डन, मोरोक्को, युएई, कतार, कुवेतमधल्या सुन्नी सरकारांना या आक्रमणात ओढलं. यात फक्त ओमानने सौदीची बाजू घेतली नाही. इराणबद्दलचं असलेलं ओमानचं हे प्रेम, अमेरिकेसोबत झालेल्या अणुकरारामध्ये दिसल्याचं बोललं जात आहे. ओमानने इराणच्याबाजूने अमेरिकेशी सकारात्मक संवाद साधला.
​​
या युद्धाच्या परिणामांचा विचार करता, येमेनमध्ये कमी उरलेल्या तेलसाठ्यांसाठी आता जोरदार मारामारी सुरु आहे. त्याचबरोबर येमेनवर जो ताबा साधेल तो देश लाल समुद्र आणि आदेन च्यामध्ये असलेल्या बब अल-मंदब या सागरी रस्त्याचा ताबा घेणार.
जगातला बहुतौंशी तेल पुरवठा याच सागरी रस्त्यात्तून होतो!  'सन्ना' या राजधानीच्या शहरामध्ये आणि राजकीय महत्त्व असलेल्या प्रांतांच्या ताब्यासाठी हा खटाटोप आहे. राष्ट्राध्यक्ष हादी हे परत येमेनमध्ये कसे येतील हे हेरून सौदी आणि समर्थक देश हल्ले करत आहेत. हे करूनसुद्धा 'हौती' बंडखोरांचा जोर कमी झाला नाहीये. याचीच अटकळ बांधून सौदी आणि समर्थक देश आता लष्करी पायदळ येमेनमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहेत. सौदीने सुन्नीबहुल असलेल्या पाकिस्तानला मदतीचा हात पुढे मागितला आहे. पाकिस्तानने कायमचं सौदीला आपलं लष्करी भांडवल दिलं आहे. पण, यावेळी पाकिस्तान ती मदत टाळत आहे. नवाझ शरीफना दिलेल्या राजकीय विजनवासाची परतफेड सौदीला हवी आहे, तर सौदीला मदत करून पाकिस्तानला आपला शेजारी असलेल्या इराणला दुखवायचं नाहीये. पाकिस्तानात अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणवर सुरु आहे, अश्या या अवघडलेल्या वेळी दूरवर परिणाम होणाऱ्या या युद्धात म्हणूनचं पाकिस्तान सावधपणे कानोसा घेऊन उतरेल. अमेरिका सौदीला मार्गदर्शकाच्या भूमिकेतून मदत करतोय. बिघडलेल्या परिस्थितीत अमेरिकेने आपले मार्गदर्शक माघारी बोलावले आहेत. या सगळ्या रणधुमाळीत येमेनमधील दहशतवादाला पायबंद घालायच्या वॉशिंग्टनच्या प्रयत्नांना सुरुंग लागला आहे. 

अरेबियन द्वीपकल्पातली अल-कायदा (AQAP) ही येमेनमधील अत्यंत धोकादायक, अल-कायदाला समर्थन देणारी दहशतवादी संघटना आहे. अल-कायदाची जगभरात जी मोठी वाढ झाली त्यात माथेफिरू सौदी तरुणांची संख्या लक्षणीय होती. पॅरिसमध्ये नुकत्याच झालेल्या 'शार्ली हेब्दो' या मासिकाच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी AQAPने घेतली होती. त्यामुळे AQAP ही अमेरिकी लष्कराच्या निशाण्यावर होती. गुआंटामो बे या कुप्रसिद्ध तुरुंगात राहिलेल्या १२५ कैद्यांपैकी २/३ कैदी येमेनी नागरिक आहेत. कोणाचाच ताबा नसलेला येमेन आणि आयती चालून आलेली वेळ साधून या संघटनेने सरकारी कचेऱ्या, लष्करी मुख्यालयं आणि प्रमुख कारागृहांवर हल्ले सुरु करून कित्येक अल-कायदाच्या दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका केली आहे. AQAPची आगेकूच आणि डबघाईला गेलेली, पुन्हा डोकं वर काढणारी अल-कायदा यामुळे रण पेटलंय. याच कामगिरीचं बक्षीस म्हणून AQAPचा नेता नसीर अल-वूहायशीला अल-कायदाचं क्रमांक दोनचं पद बहाल करण्यात आलं आहे. १९९० पासून २००१र्येंत ओसामा बिन लादेनच्या खास लोकांपैकी एक असलेल्या वूहायशीची अयमान अल जवाहिरीशी चांगली गट्टी आहे.  

अरेबियन द्वीपकल्पातली अल-कायदाचे आणि 'हौती' बंडखोरांचा ३६चा आकडा आहे. AQAP आणि 'आयसीस आयसीस'चं सुद्धा वाकडं आहे. त्यांचात आता अंतर्गत वाद पेटणार आहे. या सगळ्यांचा समान शत्रू, समान ल. सा. वि अमेरिका आहे. पण त्यांना त्यांच्यात झुंजवत, कट्टर-पंथीयांची बदनामी करत, इस्राईलला गोंजारत, वेळ धुमसत ठेवायचा अमेरिकेचा डाव आहे जो या देशांच्या लक्षात अजून आला नाहीये.
इराकमध्ये इराणला मदत करायची आणि येमेनमध्ये इराणविरोधात डोकं लावायचं यालाचं अमेरिकी कावा म्हणतात. येमेन पेटलेला असताना म्हणूनच इराण पुरस्कृत 'हौती', सौदी पुरस्कृत फौजा  AQAP, तालिबान, 'आयसीस'च्या वाढीला पोषक वातावरण तयार करत आहेत. इतके दिवस अमेरिका हे काम करत होती. त्याचा भर आता इराण आणि सौदी अरेबियाने प्रतिष्ठेच्या चिपळ्या वाजवत आपल्या खांद्यावर घेतला आहे. हाच नाद सौदीला मोठी दुखणी मागे लावतो हे उभा इतिहास सांगतो. अल-कायदा हे असंच एक दुखणं आहे. या सगळ्या प्रकरणात सौदी एकतर पुन्हा एकदा या सर्व आखाती देशांमध्ये आपलं स्थान उंचावेल नाहीतर सौदी राजघराण्याची लक्तरं वेशीवर टांगली जातील. सौदीचे नवे राजे सलमान यांनी गप्प बसण्यापेक्षा युद्धाची वाट जवळ केली आहे. सौदी राजघराण्याचा इतिहास पाहता त्यांनी कायमचं मोठं धाडस केलं आहे. अमेरिकेलासुद्धा हे वाटतं तितकं सोपं जाणारं हे प्रकरण नाहीये. तालिबान, अल-कायदा आणि 'आयसीस' या संघटना कालपण त्रासदायक होत्या, आजसुद्धा त्यांचा त्रास सुरूच आहे आणि वेळ पाहता उद्यापण त्यांची डोकेदुखी जगाला ताप देणार हे त्रिकाल सत्य आहे. काही समजायच्या आत जगाच्या मानगुटावर बसून थैमान माजवणाऱ्या या तिन्ही संघटनांचा, दूरवर पसरलेल्या त्यांच्या घट्ट विचारसरणीचा किंबहुना या त्रिकाल सत्याचा म्हणूनच तूर्तास तरी इतियाध्याय नाहीये...
  
                                                                                                                                             वज़ीर