माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आयसनहॉवर यांच्या भारत भेटीला पन्नासहून अधिक वर्ष लोटून गेली. त्यानंतर रिचर्ड निक्सन, जिमी कार्टर, बिल क्लिंटन, जॉर्ज. डब्लू बुश धाकटे यांनी भारताला भेट दिली.
२०१० साली नोव्हेंबर महिन्यात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी भारताला भेट दिली आणि त्यानंतर सुमारे ५ वर्षांनी परत बराक ओबामा पुढील आठवड्यात ३ दिवसांच्या भारत भेटीवर सपत्निक येत आहेत. जगातल्या सर्वात जुन्या लोकशाहीचा स्वामी, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणा म्हणून हजर राहतो ही एक अत्यंत मोठी घटना म्हणून इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवली जाणार आहे. येणाऱ्या कैक वर्षांमध्ये इतका महत्वपूर्ण राजकीय क्षण अनुभवायला मिळणं दुर्लभ आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या एका भेटीसाठी जगातले कित्येक देश डोळे लावून बसले आहेत. काट्यावर-काटा ठेवून चालणाऱ्या, अत्यंत शिस्तबद्ध, कमालीच्या कडक सुरक्षा योजना असणाऱ्या आणि थक्क करून ठेवणाऱ्या, जबरदस्त खर्चिक अश्या या भेटीला म्हणूनच अनन्यसाधारण महत्व आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष भेट देतात त्या राष्ट्राला एका झटक्यात जगभरातल्या वर्तमानपत्रांच्या आणि इतर माध्यमांच्या मथळ्यावर आणायची ताकद या भेटीत असते. भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि बराक ओबामांचे संबंध तसे बरेच चांगले. डॉ. सिंग हे राजकारणी वजा निष्णात अर्थतज्ञ आहेत हे ओबामा ओळखून होते. जागतिक राजकारणाच्या व्यासपीठावर ओबामांनी कायमचं मनमोहन सिंग यांना आदराचं आणि ज्येष्ठतेचं स्थान दिलं. ओबामांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या दोन खडतर वर्षांनंतर त्यांनी काही देशांचे दौरे हाती घेतले. त्यात भारताचा क्रमांक पहिल्या १० मध्ये होता. त्यानंतर मनमोहन सिंग यांचा अमेरिका दौरा आणि या दोन नेत्यांमधील वार्तालाप सुरूच राहिला. उणे-अधिक एक-दोन प्रकरणं वगळता भारत-अमेरिका संबंध तसे व्यवस्थित पार पडले. मागील वर्षी भारतात लोकसभेची निवडणूक झाली आणि गेली १० वर्ष विरोधी पक्ष म्हणून माहित असलेला भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमत घेऊन सत्तेवर आला. इंदिरा गांधींनंतर, जवळपास ३० वर्षांनी मिळालेलं प्रचंड बहुमत आणि त्याची अफाट शक्ती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवसापासूनचं भारतचे अंतरराष्ट्रीय संबंध नव्याने जोपासायला, अधिक वृद्धिंगत करायला सुरुवात केली. त्याचमुळे बराक ओबामांची भारताला दुसऱ्यांदा भेट हे गेल्या ७ महिन्यातल्या मोदींच्या जागतिक नेत्यांबरोबरच्या राजकीय मुत्सद्देगिरीला लागलेलं सर्वात गोमटं फळ म्हणावं लागेल. ओबामा आणि मोदींची मैत्री काही जास्त चांगली नाही, पण मोदींचा कामाचा आवाका, त्यांच्या कामाचा झपाटा आणि मोदींना मिळत असलेल्या अमाप प्रसिद्धीचा उपयोग ओबामा करू पाहत आहेत.
फक्त प्रजासत्ताक दिनाला प्रमुख अतिथी म्हणून ओबामांची ही भेट गणली न जाता, आपण या भेटीचं राजकीय महत्त्व अधोरेखित केलं पाहिजे. भारतच्या स्वातंत्र्यापासून प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहणारे ओबामा पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत. या भेटीमुळे मोदींची राजकीय कारकीर्द आणखी उजळून निघणार यात शंका नाही. पण, त्याचबरोबर या भेटीच्या आडून मोदी स्वपक्षीय आणि विरोधी पक्षातल्या आपल्या विरोधकांना धोबीपछाड देणार. नवी, झटपट कार्यपद्धती दाखवणाऱ्या मोदींचा आशिया खंडात असलेला दबदबा या भेटीमुळे पुन्हा एकदा विचारात घ्यावा लागेल आणि देशांतर्गत प्रश्नांनी हैराण झालेल्या सार्क राष्ट्रसमूहात मोदींची प्रतिमा आणखी उंचावेल. मोदींनादेखील हेच हवे आहे. राज्यांच्या, देशाच्या चौकटी तोडून एक जबरदस्त ताकद असलेला नेता हीच आपली ओळख मोदींना ठासून सांगायची आहे. त्यामुळेच ओबामांची ही भेट मोदींच्या राजकीय जीवनात फार मोलाची आहे.
आणि ओबामांसाठी ही भेट तर त्याहून अधिक महत्वाची! त्यांच्या राष्ट्राध्यक्ष कारकिर्दीची फक्त २ वर्ष राहिली आहेत. या दोन वर्षात त्यांना खूप काही करून दाखवायचं आहे. त्यांच्या आजवरच्या कामगिरीचा विचार केल्यास त्याचं पर-राष्ट्रीय धोरण ही त्यांची जमेची बाजू असतानासुद्धा डोकेदुखी ठरली आहे. इराकमधील सैन्य मागे घेऊन कुठे ते मोकळे होत असताना 'इसीस' ने तिकडे दहशत माजवायला सुरुवात केली. सिरीयाबद्दल त्यांच्यावर टीका अजूनसुद्धा होतंच आहे. अफगाणिस्तानात संपूर्णपणे लोकशाही स्थापित करू असं म्हणणारी अमेरिका तसं करू शकली नाही. ओबामासुद्धा डिसेंबर २०१४ पर्येंत अमेरिकी सैन्य परत मायदेशी कसं येईल याची तजवीज करत बसले आणि अफगाणिस्तानमधून पाय काढताना 'चांगले तालिबानी-वाईट तालिबानी' असा भेद करून आपलं दुखणं त्यांच्या माथी मारून मोकळे झाले. सध्य-परिस्थिती पाहता इराक आणि अफगाणिस्तानमध्ये अंतर्गत भांडणाचे लोण येत्या काही महिन्यात त्या संपूर्ण प्रदेशाचं जगणं मुश्किल करेल हे आत्ता स्पष्टपणे दिसत आहे. अमेरिकेला, उत्तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये तेलसाठे सापडले आहेत. आज अमेरिका सौदी-अरेबियाच्या इतकंच तेल रोज बाजारात आणत आहे. तेलाचं वाढलेलं उत्पादन, देशो-देशांच्या ढेपाळलेल्या अर्थव्यवस्था, आणि कमी होत असलेली तेलाची मागणी या प्रमुख, साध्या त्रीसुतीमुळे आज तेलाचे भाव गेल्या सहा वर्षांमधल्या नीचांकी पातळीवर घसरले आहेत. या सगळ्या गोळा-बरेजेमुळे अमेरिकेची तेलाची वण-वण संपली आहे आणि तेलासाठी आलेलं पश्चिम-आशियाई देशांवरचं खोटं प्रेमसुद्धा. या सगळ्या घडामोडीत कधी गरज भासल्यास अफगाणिस्तानमधील परिस्थिती सावरायला भारताची गरज लागू शकते. हे करत असतानाच चीनचं आव्हान कमी करायला किंबहुना चीन विरोधात आशियाई खंडातचं एक स्पर्धक निर्माण करायला अमेरिकेने ठरवले आहे. भारत यासाठी एक योग्य पर्याय आहे. या सगळ्या डावात आपलं कितपत फसतं जातं हे येणारा काळचं ठरवेल.
काही महिन्यांपूर्वी रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतीन भारतात येउन गेले आणि बऱ्याच करारांवर या दोन्ही देशांनी सह्या केल्या. पुतीन आणि मोदींची वाढत असलेली ही सलगी अमेरिकेला नकोय. ओबामांना काही केल्या भारतासारखे देश रशियाच्या गोटात पाठवायचे नाहीयेत. याला दोन प्रमुख कारणं आहेत. एक भारताची असलेली प्रचंड मोठी बाजारपेठ आणि दोन रशियाची किंबहुना खासकरून पुतीन यांची कोंडी. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून युक्रेनमध्ये केलेली घूसखोरी, अमेरिकेतून विस्फोटक अश्या माहितीचं घबाड घेऊन निघालेल्या एडवर्ड स्नोडेनला राजरोसपणे आपल्या कळपात घेतलेल्या पुतीनवर अमेरिकेत आणि अमेरिकी राजकारणात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. त्याचबरोबर नुकत्याच तापलेल्या देवयानी खोब्रागडे प्रकरणामुळे अमेरिका-भारतातले संबंध ताणले गेले होते. त्या सर्व गोष्टींवर फुंकर घालण्याचं काम ओबामा या भारत भेटीत करतील.
जगातल्या सर्वात शक्तिशाली माणसाच्या भेटीसाठी योजना आणि त्यांची आखणी ही देखील तितकीच शक्तिशाली असते. आणि थाटमाट तर विचारू नका! ओबामा येणार म्हणून ७ दिवसात राजधानी दिल्लीत पंधरा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष, त्यांची राजकीय व्यापकता आणि त्यांच्या जीवाचं मोल या भांडवलावर ७-९ पदरी सुरक्षा व्यवस्था ओबामांना देण्यात येईल. ओबामा दिल्ली विमानतळावर पाऊल ठेवण्याअगोदर त्यांचे सिक्रेट सर्व्हिस अधिकारी आणि सुरक्षारक्षक विमानतळाची संपूर्ण टेहळणी करून सज्ज असतील. ओबामांच 'एयर फोर्स वन' धावपट्टीवर उतरण्याआधी किमान १ तास एकही विमान त्या हवाई क्षेत्रात उडणार नाही याची काटेकोरपणे काळजी घेतली जाईल. ओबामा प्रवास करणार ती लिमुझीन 'बिस्ट' त्यांच्या आधी विमानतळावर सज्ज असेल. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जातात तिकडे अश्या हुबेहूब दिसणाऱ्या २ गाड्या असतात. राष्ट्राध्याक्ष्यांवरील हल्ल्याची संवेदना ५० टक्क्याने कमी करण्यासाठी २ गाड्या एकाच ताफ्यात वापरल्या जातात. जगातली सर्वात सुरक्षित समजली जाणारी ही गाडी आणि त्यात असलेल्या उत्तम उपाययोजना हा एक स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. सिक्रेट सर्व्हिस अधिकारी स्थानिक पोलिसांना बरोबर घेऊन, ओबामा ज्या रस्त्याने फिरणार ते रस्ते, त्याच्या लगतच्या इमारती, कार्यालयं, शाळा, रुग्णालय कसून तपासतील. मोक्याच्या ठिकाणी, उंच इमारतींच्या गच्चीवर स्नायपर बंदूक घेऊन सुरक्षारक्षक नेमले जातील. या दरम्यान ओबामा, स्थानिक पोलिस, आणि सरकारच्या कोणत्याही पातळीवर येणारी कोणतीही आणि कुठल्याही स्वरूपातील धमकी ही एक धोका मानली जाईल आणि त्या धमकीची पूर्ण शाहनिशा करून ती बाजूला करण्यात येईल. ओबामा राहतील ते हॉटेल काही दिवस अगोदरपासूनच बाकी नागरिकांसाठी बंद करण्यात येईल. ओबामांसाठी एक संपूर्ण मजला ताब्यात घेण्यात येईल. तिथे होणारी प्रत्येक हालचाल टिपली जाईल. ओबामा काय खाणार, कुठे राहणार याची जीवापाड काळजी घेतली जाईल. मोजक्या लोकांशिवाय या संपूर्ण वेळात ओबामांची सावलीही दिसणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. प्रत्येक खोली स्फोटकांसाठी,
गुप्त माहिती मिळवणाऱ्या विद्युत उपकरणांसाठी, रासायनिक पदार्थांसाठी इंच-इंच तपासली जाईल. ओबामा लष्कराची जवळ-जवळ एक तुकडीचं घेऊन प्रवास करतील. त्यांच्या ताफ्यात अत्यंत अत्याधुनिक शस्त्रधारी सुरक्षारक्षक, निष्णात डॉक्टर असतील. ते ज्या मार्गावरून प्रवास करणार तो मार्ग सोडून आणखी किमान २ वेगळे मार्ग आपत्कालीन पर्याय म्हणून आधी तयार करून ठेवण्यात येतील. वाईट वेळ आल्यास एक मोक्याचं 'कमांड सेंटर' आणि एक रुग्णालय सर्व पर्यायांसहित सज्ज ठेवण्यात येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ओबामा झोपतील त्या खोलीच्या बाजूच्या खोलीत, ओबामा असतील तिकडे ५० मीटरहून कमी अंतराच्या परिघात एक गणवेशधारी सुरक्षारक्षक 'न्युक्लियर फुटबॉल' घेऊन त्यांच्या दिमतीला उभा असेल. त्या बॉलच्या साह्याने ओबामा काही मिनिटांच्या आत जगात कुठेही अमेरिकी अणूस्फोटकांचा मारा करू शकतील. हे सर्व-सर्व त्या एका माणसासाठी. 'लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे!!'
कडक थंडीच्या दाट धुक्यातून दिसणारा दिल्लीचा शानदार राजपथ, त्यात क्षितिजावर धुक्यात लपेटून गेलेल्या 'इंडिया गेट'च्या महाकाय प्रतिमेपुढून लाल किल्ल्याकडे येणारे, एकसारखे दिसणारे, एकसंध गतीने आपल्या नालांचा टाप-टाप आवाज करणारे, काळे रुबाबदार घोडे आणि त्यावर चटकदार लाल रंगाचा गणवेश परिधान करून बसलेले भारताच्या राष्ट्रपतींचे तितकेच रुबाबदार आणि तडफदार विशेष सुरक्षारक्षक, त्यांच्या बरोब्बर मधोमध चालणारी प्रणव मुखर्जींची काळी गाडी आणि त्यात विराजमान प्रणब मुखर्जी आणि बराक ओबामा! भारतातल्या सर्व माध्यमांचे डोळे या एका क्षणासाठी आसुसले असतील. जगातल्या सर्वात सामर्थ्यशाली लष्कराचा सेनापती भारताच्या सैन्याची मानवंदना घेतो ही बाबंच एक विशेष घटना म्हणून या पुढे गणली जाईल.
या तीन दिवसांच्या भेटीत ओबामा काय करतील याचा तपशील प्रत्येक माध्यम आपापल्या परीने देईल. त्यांची भेट झाल्यावर सुद्धा पुढचे काही दिवस हा 'ओबामाज्वर' तसाच राहील. ओबामा कुठले कपडे परिधान करतील, मिशेल ओबामांचे कपडे कोणत्या फॅशन डिझायनरचे असतील याचे तपशील पुढे येतील. ओबामांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीसाठी कुठले खाद्य पदार्थ असतील, त्यात ढोकला-फाफडा असेल हे अगदी चवीने सांगितलं जाईल. ओबामा कोणाला काय भेटवस्तू देणार, ओबामांना कोण काय भेटवस्तू देणार, ते कुठल्या प्राण्याचं मांस खाणार, त्याची काय किंमत असणार हे सगळं भारतीय माध्यमं रंगवून सांगतील. त्यापलीकडे जाऊन ते अजून काही सांगणार नाहीत. इथेच तर सगळी गोची आहे.
ओबामांची ही अधिकृत शेवटची भेट ठरेल पण या भेटीची छाप येणाऱ्या कित्येक वर्षांवर नक्की असणार आहे. सरतेशेवटी एक गोष्ट इथे खास नमूद करण्याजोगी आहे. उभा इतिहास असं सांगतो की अमेरिकी राष्ट्राध्यक्ष एखाद्या देशाचा दौरा करतात तो निव्वळ त्यांच्या आणि अमेरिकेच्या फायद्यासाठी. ओबामादेखील या भेटीत तेच करणार. भारतीय बाजारपेठ कशी अजून आपल्या आवाक्यात येईल याचा पूर्ण प्रयत्न ओबामा करणार. भारत आणि अमेरिकेमध्ये असणारा १०० मिलियन डॉलरचा व्यापार ५०० मिलियन डॉलरपर्येंत न्यायचा प्रयत्न ते करणार. भारत अमेरिकेकडून अधिक शस्त्र खरेदी कशी करेल याची तजवीज ते जातीने करतील, महासत्तेची मोठी जाहिरात करतील. वेळ-प्रसंग बघून अमेरिकतल्या भारतीयांच्या आणि तेथील भारतीय उद्योगांच्या अडचणींमध्ये आपण वैयक्तिकपणे लक्ष घालू असं सांगून ओबामा भारतीय स्वप्नांची बोळवण करतील. पाकिस्तान प्रेम उतू जात असतानासुद्धा, पाकिस्तानने दहशतवाद संपवला पाहिजे, २६/११च्या सूत्रधारांवर कडक कारवाई झाली पाहिजे हे भारतीयांचं देशप्रेम उर भरून जावं म्हणून बोलण्यासाठी का असेना निक्षून सांगितलं जाईल, भारत आणि अमेरिका हे कसे जुने आणि नैसर्गिक मित्र आहेत आणि जगाच्या या अस्थिर प्रसंगाला आपण कसे एकत्रितपणे सामोरे गेलो पाहिजे याचे उपदेश ओबामा नक्की देतील. पण, इतकं सगळं दाखवून आणि बोलून हाती काहीच लागणार नाही हे ते धूर्तपणे सांभाळून घेतील यात किंचीतशीसुद्धा शंका नाही. अमेरिकेने उथळ गोष्टींचा केलेल्या या मोठ्या, भुलवून टाकणाऱ्या भपकाऱ्याला फक्त दोन समर्पक शब्द आहेत, ते म्हणजे - 'अमेरिकन ड्रीम'. बरोबर ना???
- वज़ीर
या लेखाचा सारांश दिनांक २१ जानेवारी, २०१५ (बुधवार) रोजी दैनिक 'सकाळ'च्या चालू घडामोडींच्या पानावर(पान ७) छापण्यात आला.