गेले चार महिने रात्रंदिवस एक करून अखंडपणे चालू असलेल्या रणधुमाळीचा शेवट १६ मे रोजी झाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या सगळ्यात जास्त मोठ्या, निर्विवादपणे निर्णायक असणाऱ्या, तितक्याच जहाल व विकसित प्रचाराच्या, अनन्यसाधारण महत्वपूर्ण, प्रचंड खर्चिक आणि निः संशय महत्वाकांक्षी निवडणुकीचा वारू, नरेंद्र मोदी हे त्या पंतप्रधानपदाच्या काटेरी खुर्चीत बसल्यावर शांत झाला.
गेली १० वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस आणि यूपीएच्या घटक पक्षांचा सपाटून पराभव करत भाजपप्रेरित एनडीएने देशभरात धुमाकूळ घालत, महत्वाच्या जागांवर आणि राज्यांमध्ये इतर पक्षांचा फज्जा उडवत हे अशक्य आव्हान शक्य करून दाखवलं. त्यांच्या या विजयाची कारण-मीमांसा येणाऱ्या कैक वर्षांना खाद्य पुरवत राहील हे या निवडणुकीचं विशेष! देशभरात असलेली कॉंग्रेस-विरोधी नाराजी, अत्यंत मौल्यवान, अत्याधुनिक प्रचारतंत्र, कमकुवत असतानासुद्धा विरोधी पक्षाला आलेले सुगीचे दिवस आणि मतदानाचा वाढलेला टक्का, हे या निवडणुकीचं फलित म्हणावं लागेल. वारेमाप प्रसिद्धी, बोकाळलेले नवे आणि जुने पक्ष, लोकसभा जागांच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त असलेले उमेदवार, आणि अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतींनी अख्खा देश ढवळून काढला. गल्लीपासून दिल्लीपर्येंत आणि चांध्यापासून बांध्यापर्येंत या निवडणुकीचाच बिगुल वाजत राहिला. याच काळात अपेक्षेप्रमाणे अनेक अंतरराष्ट्रीय घडामोडींवरची भारताची पकड ढिली झाली. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात आपण आकंठ बुडालेले असताना अनेक महत्वाचे विषय मागे पडले, पण सरतेशेवटी देशात सत्तापालट झाला. सामान्य नागरिकाच्या दृष्टीने विचार केल्यास, हीच बहुसंख्य लोकांची इच्छा होती असं आता म्हणावयास हरकत नाही.
या सगळ्या धामधुमित नरेंद्र मोदींचं नेतृत्व घेऊन, काही प्रमाणात ते मान्य करून भारतीय जनता पक्ष जीवानिशी लढला. त्यांच्या या विजयाला अनेक विषयांची किनार आहे. अनेक पैलू आणि वेळ साधून, अगदी मोक्याच्या क्षणी आखलेल्या अचूक खेळींमुळे हे यश साध्य झालं आहे. आधी लिहिलेल्या एका लेखामध्ये म्हणाल्याप्रमाणे मोदींनी त्यांचा संपूर्ण प्रचार विदेशी पद्धतीने पार पाडला. अमेरिकेत चालणाऱ्या खर्चिक आणि व्यवस्थित आखणी केलेल्या प्रचाराची अनुभूती भारताचे नागरिक यंदा प्रथमचं घेत होते आणि मोदी या सगळ्या लाटेवर स्वार होऊन आपल्या कलेने या प्रचाराचा अक्राळ-विक्राळ हत्ती झुलावताना त्यांना संपूर्ण जगाने पाहिलं. राजीव गांधी आणि काही प्रमाणत अटल बिहारी वाजपेयी या नेत्यांनंतर अंतरराष्ट्रीय प्रसार-माध्यमांनी आणि महत्वाच्या देशांनी दखल घेतले गेलेले मोदी आत्ताच्या घडीचे आपल्याकडील एकमेव नेते. या लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रकियेत मोदींचा वरचष्मा जाणवला. निवडणूक जाहीर होण्याआधी कित्येक महिने मोदींनी तयारी चालवली होती यात शंकाच नाही. या निवडणुकीचा संपूर्ण बाज मोदींनी बसवल्याचं राजकीय निरीक्षक आता आवर्जून सांगत आहेत. भाजप मधल्या नाराज नेत्यांना राजी करून त्यांची एकत्रितपणे मोट बांधून आणि वेळ-प्रसंगी अति-उत्साही, आक्रमक नेत्यांची बंडाळी मोडून मोदींनी आपला पंतप्रधानपदाचा प्रवास सुरु केला. गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनानंतर मोदी तुलनात्मकरित्या आक्रमक झाले. एका बाजूला आपल्या मित्र पक्षांची चाचपणी करत, शाश्वत आणि इतर मित्र अशी गटांमध्ये त्यांची विभागणी करत, दुसऱ्या बाजूला राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, अरुण जेटली, लालकृष्ण अडवाणी या चार पंतप्रधानपदाच्या योग्य लायक असणाऱ्या स्वपक्षीय नेत्यांना मागे टाकत मोदी पुढे गेले. त्याचवेळी ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि कॉंग्रेस विरोधी सुराची भावना जागृत होऊ लागली. मोदी आणि भाजप रीतसर या भावनेला खत-पाणी घालू लागले. या दोन मोठ्या पक्षांमध्ये सरळ सरळ लढत होणार असे वाटत असताना अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दिल्लीत आपली चुणूक दाखवून सबंध देशभर एकच हाहाकार उडवून दिला. कितीही नाही म्हटलं तरी बाकी सर्व पक्षांना आपली विचारयंत्रणा बदलायला लावण्याचं काम त्यांनी केलं. देशात प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला तडा देणाऱ्या, उठाव करून या दुरंगी राजकारणाला तिसरा कोन देऊ शकणाऱ्या या पक्षाची गोची त्यांनीच केली. अत्यंत वाचाळ, आततायी, आणि असमंजस भूमिका घेत त्यांनी आपलीच प्रसिद्धी कमी करून घेतली. धडकी भरवणाऱ्या या पक्षाची भीती नंतर नाहीशी होऊन, त्यांना खिजगणतीत तोलू जाऊ लागलं. नागरिकांची नाराजी, आपली एक वेगळी ओळख करण्यासाठी लागणारी एक सावध 'स्पेस', आम आदमी पक्ष गमावून बसला. उत्तरोत्तर फक्त भाजपविरोधी भूमिका घेत त्यांनी सुजाण मतदारांच्या भुवया उंचावल्या. त्याचा फटका केजरिवालांना बसलाच.
तोपर्यंत मोदींनी आपली पूर्ण तयारी करून धडाक्यात सुरुवात केली होती. आपला अत्यंत विश्वासू माणूस समजला जाणाऱ्या अमित शहांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली. आपल्या दिल्लीच्या वाटेवरचा सर्वात मोठा खोडा हा तिथेच आहे हे ताडून मोदींनी शहांची वर्णी लावली. या कामासाठी मोदींना शहा सोडून अजून कोणीच योग्य वाटलं नाही हे अगदी रास्त आहे. अमित शहा हे कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात. मोदींचा सगळ्यात जवळचा माणूस, त्यांचा खास 'शार्प-शुटर', संघाचा प्रिय, आद्य भारताच्या राजकारणाचा 'चाणक्य' आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत घातक, वरकरणी सोज्वळ पण तितकाच धूर्त पुढारी आज भरप्रकाशात शोधून सापडणार नाही. मोदींच्या या विजयात शहांचा वाटा नुसता मोठा नसून तो उल्लेखनीय आणि वाखाणण्याजोगा आहे. उत्तरप्रदेशमध्ये गेल्यापासून कणा-कणामध्ये विभागलेला भाजप शहांनी सावरला, सगळ्यांना एकत्र आणत, प्रमुख नेत्यांना आपल्या कामाची जाणीव करून देत, आणि प्रचंड प्रमाणात अगदी खालच्या कार्यकर्त्यापर्येंत पोहचून त्यांनी उत्तरप्रदेश अक्षरशः पिंजून काढला. मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवावी हे देखील अमित शहांनी त्यांना सुचवल्याचं बोललं जात आहे. मोदींसारख्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्यासाठी वाराणसी जे हिंदुंच सर्वात पवित्र श्रद्धास्थान आहे, अश्या ठिकाणाहून लोकसभेची निवडणूक लढवण ही बाब राजकारण वजा करून प्रतिष्ठेची किंबहुना सांकेतिक आहे. उत्तर प्रदेशमधील उमेदवारांची यादी आणि भाजपचं मताधिक्य पाहता सबकुछ शहा परिमाणाची नक्कीच जाणीव होते. पण याच शहांना भाजप अध्यक्ष करून मोदी गुजरातचं मुख्यमंत्रीपद त्यांच्यापासून लांब ठेवतील असा होरा आहे!
शहांसारखा कामाचा नेता मोदी गुजरातमध्ये अडकवून नाही ठेवणार. इतका मोठा विजय मिळाल्यानंतर आता होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी अमित शहा हुकमाचं पान आहे. अश्या राज्यांची जबाबदारी शहा नक्की पार पाडतील आणि भाजपची कक्षा रूंदावतील हा मोदींना विश्वास आहे.
मोदींच्या अतिथंड डोक्याची, आणि त्यांच्या नसानसांत भिनलेल्या संघाच्या दृष्ट्या विचारांची ही खेळी, त्यांच्या वेगळ्या राजकीय चुणीची प्रचीती देते!
भाजपसोडून स्वतःची मोठी, ताकदवान, अत्याधुनिक यंत्रणा मोदींनी कामाला लावली. राजकीय जाणकार, प्रतिष्ठीत महाविद्यालयाची हुशार मुलं, बदलत्या जगाचा आढावा घेणारे अभियंते, अत्यंत बुद्धीजीवी जाहिरातकार आणि मुबलक पैसा यांच्या जीवावर मोदींनी आपला गाडा शब्दशः रेटला. या यंत्रणेच्या जोडीला मोदींमधला व्यावहारिक ज्ञानी, चाणाक्ष इव्हेंट मॅनेजर जागा झाला आणि त्यांच्या युतीने भल्या-भल्यांना धूळ चारली. हीच गोष्ट २००८ साली बराक ओबामांच्या बाबतीत अगदी तंतोतंत घडली होती.
ही संपूर्ण यंत्रणाच ओबामांना अभिप्रेत अशी होती. अगदी मोदींच्या भडक रंगाच्या कपड्यांपासून ते त्यांच्या घोषवाक्यांपर्येंत, प्रचारसभांच्या जागांच्या निवडीपासून ते सभेत घेतलेल्या स्थानिक मुद्द्यांपर्येंत मोदींनी आपली मोहोर उमटवली. नवमतदार, तरुण आणि महिला वर्गाला आकर्षित करणारे विकासाचे मुद्दे, जाहीर सभेत लाखोंच्या जनसमुदायाशी संवाद साधण्यात वाकबगार, तंत्रज्ञानाचा पूरेपूर वापर आणि अथपासून इतिपर्येंत सगळं सगळं विचार करून अंमलात आणणारे, भुलवणारे मोदी ओबामांप्रमाणेच लोकांचे 'डार्लिंग' झाले.
या संपूर्ण वेळात मोदी खोटं बोलले का? तर नक्कीच बोलले. नुसतं खोटं न बोलता, रेटून खोटं बोलले. त्यांनी इतिहासाचे संदर्भ चुकीचे दिले, गुजरातच्या मागास प्रश्नांना हळूच लपवत, केलेल्या कामांचा चपखल प्रचार, काँग्रेस विरोधी वाऱ्याचा वारेमाप उपयोग, आणि संवेदनशील प्रश्नांना हात घालून, थोडासा वाद ओढवून, त्या प्रश्नांचं पिल्लू सोडून आपला 'टिआरपी' वर राहील याची काळजी मोदींनी घेतली. त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीची, उच्चारलेल्या प्रत्येक वाक्याची आणि ओढवून घेतलेल्या प्रत्येक वादाची संपूर्ण जाणीव त्यांनी आणि त्यांच्या चमूला होती. अश्या घटनांचा परिणाम काय असेल आणि त्याचा फायदा आपल्या पदरात कसा पाडून घेता येईल याची खातरजमा केल्यावरचं हे झालं आहे. याचाचं अर्थ त्यांनी आपला तोल कुठेही ढासळू नाही दिला. अत्यंत शांतपणे, थंड डोक्याने केलेले राजकीय वार त्यांनी विरोधकांच्या जिव्हारी लावले.
काँग्रेसने पुढे केलेलं राहुल गांधींचं नेतृत्व सपशेल फसलं. त्यांना आपल्या शाब्दिक जाळ्यात ओढून, मोदींनी त्यांनी किरकोळीत बाद केलं. अमेठीमध्ये त्यांची झालेली गत सर्व काही सांगून जाते. प्रियंका गांधींनी तब्बल १४ दिवस सलग अमेठीत तळ ठोकून देऊन या गोष्टीला दुजोरा दिला. सोनिया गांधींची चमक कमी होताना याच निवडणुकीने पहिली. राहुलना पुढे करण्यापेक्षा प्रियंका गांधींना काँग्रेसचा चेहरा करण्यात अधिक शहाणपण आहे ही गोष्ट त्यांच्या फार उशिरा लक्षात आली, पण तोपर्येंत मोदी लाल किल्ल्याच्या तटांना संपूर्ण रसद घेऊन भिडले होते. जाणकार असे सांगतात की पुढल्या खेपेला प्रियंका रायबरेलीमधून निवडणूक लढवतील आणि पक्ष बांधणीचं काम सोनिया सांभाळतील. या गोष्टीला प्रियंका गांधी-वद्रा याचं व्यक्तिमत्वसुद्धा कारणीभूत आहे. त्यांचात बऱ्याच जणांना इंदिरा गांधी दिसतात. त्यांच्यात इंदिरा गांधींची नक्कीच छाप आहे. त्यांची देहबोली, लोकांमध्ये मिसळनं, भाषण-कला, केसांची ठेवण हे त्यांचा प्रभाव दाखवतात. इंदिराजींच्या कॉटनच्या साड्या प्रियंका नेसतात हे स्वतः प्रियांका प्रांजळपणे कबूल करतात. त्यांच्या व्यक्तीमत्वात ती जादू नक्कीच आहे जी राहुलमध्ये अजून दिसली नाही. आणि भारतामध्ये पंतप्रधान हा आपल्या कामामुळे कमी आणि आपल्या व्यक्तिमत्वामुळे, करिष्म्यामुळे त्या खुर्चीच्या जवळ जातो असं उभा इतिहास सांगतो. पण हे सगळं शक्य होईल जेव्हा काँग्रेस तग धरू शकेल. गेली १० वर्ष सत्तारस प्यायलेल्या काँग्रेसजनांना विरोधी बाकावर कसं बसायचं हे सुद्धा ठाऊक असेल की नाही हा प्रश्नचं आहे. हवे ते करू, सगळं मॅनेज करू अश्या मानसिकतेत असणाऱ्यांना हा मोठा धक्का असणार आहे. त्याचबरोबर मोदींचं हे सरकार जर टिकलं आणि व्यक्ती म्हणून मोदींचा स्वभाव बघितल्यास ते कॉंग्रेसला सुखाने जगू देणार नाहीत. अत्यंत खुनशी असलेले मोदी विरोधकांची काय अवस्था करतात हे गुजरातमधील कॉंग्रेसपेक्षा अजून कोण चांगलं सांगू शकेल असं वाटत नाही. ते या सगळ्या विरोधकांच्या आणि खास करून रॉबर्ट वाद्रांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावतील असं कित्येक नेते खासगीत कबूल करतात. राजनाथ सिंग यांची एखाद्या खात्याचं मंत्रिपद देऊन मोदींनी बोळवण केल्यास शहा भाजपचे अध्यक्ष होऊ शकतात. सुषमा स्वराज, अरुण जेटली, राजीव प्रताप रुडी, मनेका गांधी हे मोदींच्या मंत्रिमंडळात संभाव्य स्थानी निश्चित मानले जात आहेत. निवडक ३-४ पक्षांचं संख्याबळ असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निवडणुकीच्या टप्प्यात तब्बल २५ छोट्या-मोठ्या पक्षांसोबत हातमिळवणी केली. सत्तेसाठी एकवटलेल्या या सर्व पक्षांचं आणि भाजपचं गणित किती दिवस जमतंय याचीच काळजी नरेंद्र मोदींना असेल. राष्ट्रीय राजकारणात दणकून प्रभाव पाडू शकणाऱ्या आणि तितकी ताकद असणाऱ्या जनता दलाची, प्रादेशिक राजकारणाचा विचार करत नितीशकुमारांनी घेतलेल्या निर्णयामुळे दुरावस्था झाली. त्यांच्या लोकप्रियतेत आणि मतदानात नक्कीच घट झाली आहे. बिहारमधील बिघडलेलं हे राजकीय समीकरण ताळ्यावर आणताना, आणि जेडियूला पुन्हा राष्ट्रीय पटलावर आपली जागा जोखताना त्यांची दमछाक होणार आहे. वाटतं तितकं सोपं राजकारण नाहीये हे, किंबहुना प्रादेशिक आणि राष्ट्रीय अश्या दोन भिन्न वाटचालींच्यामध्ये होणारा कोंडमारा, त्यासाठी लागणारा वेळ, पैसा आणि सचोटी सोपी नाहीये. हीच गोष्ट अनेक पक्षांच्या बाबतीत खरी ठरणार आहे.
भारताचं राजकारण एका नव्या दिशेला गवसणी घालत आहे. कधी नव्हे ते सगळे दिवे मोदींवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांची बारीकशी कृतीसुद्धा आता सर्वसामानांच्या भिंगातून सुटणार नाही. अनेक दिशांमधून आणि अनेक प्रश्नांबाबत लोकांचे डोळे मोदींकडे लागले आहेत. बेरोजगारी, भ्रष्टाचार, शैक्षणिक अधोगती, परकीय गुंतवणूक, महिलांसाठी समान वागणूक- समान संधी आणि त्यांची सुरक्षा, व्यापाराचा वाजलेला बोजवारा, पर्यटन आणि त्याचं उत्पन्न, शेजारील आणि महत्वाच्या देशांसोबत भारताचे असलेले, होऊ घातलेले संबंध हे सगळ त्यांच्यासमोर एकाच वेळी आवासून उभं आहे. मोदी येउन हे सगळं चुटकीसरशी सोडवतील हे वाटून घेण्यात कमालीचा मुर्खपणा आहे. त्यांच्याकडून काँग्रेसपेक्षा थोडी जास्त सुधारणा करण्याची अपेक्षाच वाजवी आहे.
मोदी काम कितपत करतील हे येणारा काळचं ठरवेल. इतक्या आघाड्यांवर आग लागलेली असताना ते कुठल्या गोष्टीला प्राधान्य देतात हे बघणं औत्सुख्याचं ठरणार आहे. त्यांची आश्वासनं पोकळ न निघोत अशीच अपेक्षा एक मोठा वर्ग करून आहे. राजकारण हे असंच असतं. या मुरब्बी लढाईत मोदी एकहाती वरचढ ठरले आहेत .
ते बोलले त्याप्रमाणे काही अंशी जरी नव्या सरकारने काम केलं तर हाच विजय ते पुढेसुद्धा नेऊ शकतील यात शंका नाही. देशाची सद्यस्तिथी पाहता राजकीय इच्छाशक्तीची गरज अन्य कोणत्याही गरजेपेक्षा जास्त आहे. काळाची हीच तर मागणी आहे. ही अशी संधी जगाच्या पाठीवरच्या फार कमी, अगदी नगण्य राज्यकर्त्यांच्या नशिबी आली आहे. या अश्या कौलाचं विकासात रुपांतर ओबामासुद्धा बहुतौंशी करू शकले नाहीत, मोदींच्या बाबतीत हेच घडण्याची शक्यता जास्त आहे.
राज्यशास्त्रात याच गोष्टीला 'कॅनव्हासिंग बाय पोएट्री, गव्हर्निंग बाय प्रोस' म्हणतात. नाही का???
- वज़ीर