२००८ सालच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्राथमिक फेरीमध्ये, डेमोक्रॅटिक पक्षाकडून बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांच्यात कडवी लढत झाली होती. ही लढत पैशांची, पाठिंब्याची आणि अस्तित्वाची लढत होती ज्यामध्ये बराक ओबामांनी बाजी मारली आणि राष्ट्रपतीपदाला वेसण घातली. पण सकारात्मक सहकार्य करण्यास भर देणाऱ्या ओबामांनी, क्लिंटन कुटुंबाबरोबर झालेल्या वादावर पडदा टाकून हिलरींना आपल्या मंत्रीमंडळात स्थान, आणि पर-राष्ट्र खातं देऊ केलं. क्लिंटन यांनीसुद्धा यांनी त्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जबाबदारी सांभाळली. तेव्हापासून या दोन कुटुंबांमधला वाद 'मिटला' असं वाटावं इतकं सामंज्यस्य दाखवलं गेलं. अमेरिकी आर्थिक अडचणीत असताना बिल क्लिंटन यांनी ओबामांना आपली अनुभवी मदत केली होती. त्याचबरोबर २०१२ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि प्रचारात ओबामा मागे पडत आहेत असं कळताच स्वतः बिल क्लिंटन मैदानात उतरले आणि त्यांनी ओबामांना हवी असलेली उभारी दिली. Sandy वादळाच्या तडाख्यानंतरच्या मदतकार्यात ओबामा आपला प्रचार सोडून गुंतलेले असताना क्लिंटन यांनी जो बायडेन यांच्याबरोबर खिंड लढवली आणि 'बब्बा'(बिल क्लिंटन) यांनी आपला करिष्मा पुन्हा एकदा जगाला दाखवून दिला.
हिलरी यांचं काम चागलं होतं असं सर्व बाजूंनी म्हणता नाही येणार. ओबामा प्रशासनाने सुरवातीपासूनच पडद्यावर काहीशी मवाळ भूमिका घेत सामंज्यस्य दाखवण्याचा प्रकार केला, पण त्याचवेळी पडद्यामागुन त्यांनी अरब देशांना रसद पुरवून तिकडे बंड घडवून आणलं , ज्यालाच 'अरब अप्रायझिंग' म्हणून संबोधलं जातंय. हिलरी यांच्या जमेच्या बाजू म्हणजे त्यांनी ओबामांनी घालून दिलेला रस्ता सामर्थ्यपणे हाताळला. त्यांच्याच कारकिर्दीत अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनचा खात्मा केला, इजिप्तमध्ये होस्नी मुबारक यांच्या विरोधात बंड घडवून त्यांना पायउतार केलं, तीच गोष्ट काहीश्या अजून हिंसक पद्धतीने लिबियामध्ये करून मुअम्मर गद्दाफी यांचा अंत केला. पाकिस्तान विरोधी भूमिका घेत त्यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी आर्थिक मदत कमी केली. भारतात 'FDI' विरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांचं 'मन' वळवलं. अशी काही अजून महत्वपूर्ण कामं क्लिंटन यांनी चोखपणे हाताळली. पण, इराण आणि इस्राईल यांच्यातला वाद, उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातला संघर्ष, चीनला आर्थिक बाबतीत धोबीपछाड करण्यात हिलरी आणि ओबामा प्रशासन कमी पडले. बेंगाझी, लिबिया इथल्या अमेरिकी दुतावासावर झालेला अतिरेकी हल्ला आणि त्यात अमेरिकी राजदूत ख्रिस्तोपर स्टीवन्स यांची हत्या, हा घाव अमेरिकेच्या वर्मी लागला. हिलरी यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे २०१२ सालची राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवली नाही आणि पर-राष्ट्र खातं सोडलं. पण त्यांच्या या एकूण प्रवासाची दिशा पाहिल्यास त्यांना २०१६ सालच्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्याची महत्वाकांक्षा आहे, हे नक्की.
जॉन फोर्ब्स केरी. १९८५ सालपासून Massachusetts चे सिनेटर असलेले केरी हे अमेरिकेतले एक वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. बराक ओबामांच्या निकटवर्ती गोटातले समजले जाणार्या केरी यांच्याकडे अमेरिकेच्या पर-राष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्षपद आहे. या विषयातला दांडगा अनुभव आणि राजकीय मुत्सद्देगिरी याच्या जोरावर त्यांना सिनेटकडून या पदासाठी हिरवा कंदील मिळेल यात शंका नाही. त्यांनी जवळपास १३ वर्ष अमेरिकी नौदलात काम केलं आहे आणि अमेरिकेच्या महत्वपूर्ण विएतनाम लढाईत त्यांचा सहभाग होता. पहिली काही वर्षे त्यांच्यासाठी अवधड होती कारण त्यांचं नाव इराणगेट-काँट्रागेट मध्ये होतं. बुश यांनी २००३ साली इराकवर हल्ल्याची योजना केल्यानंतर त्यासाठी केरी यांनी पाठींबा दर्शवला होता आणि त्या युद्धाची झळ जाणवू लागल्यानंतर या युद्धाला कडाडून विरोध केला. हाच त्यांचा २००४ सालच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठीचा प्रमुख मुद्दा होता. पण, चाणाक्ष नसलेल्या अमेरिकी जनतेनी बुश यांच्या पारड्यात मतं घालून केरी यांना पराभूत केल. केरी यांची ओबामांशी खूप जवळीक आहे. इतिहासाची पाने चाळल्यास असं लक्षात येते की २००४ साली डेमोक्रॅटिक नॅशनल कन्वेन्शन मध्ये ओबामांनी भाषण केलं होतं जे की खूप गाजलं होतं, हीच ती वेळ होती ज्यावेळपासून ओबामांना लोक राष्ट्रीय आणि आंतर-राष्ट्रीय स्तरावर ओळखू लागले.
केरी यांची कौटुंबिक पार्श्वभूमी चांगली आहे. एका श्रीमंत कुटुंबात जन्मास आलेल्या केरी यांना शिकारीचा, गिटार वाजविण्याचा, आईस हॉकी खेळण्याचा छंद आहे. केरी हे अमेरिकेतले सर्वात श्रीमंत सिनेटर आहेत. केरी यांच्याकडे अमेरिकी सिनेटच्या ४ समित्यांच सदस्यपद आहे, ज्यामध्ये अमेरिकी अर्थकारण समितीसुद्धा आहे. केरी यांनी २००४ नंतर PAC(Political Action Committee) ची स्थापना केली. २०११ च्या लिबिया मधल्या अंतर्गत लढाईच्या वेळी लिबियामध्ये हवाई वाहतुकीवर बंदी घालावी अशी मागणी करणारे केरी पहिले काँग्रेस सदस्य आहेत. त्यांची मागणी आणि त्याला इतर सहकाऱ्यांकडून मिळालेला पाठींबा याचा विचार करून संयुक्त राष्ट्रसंघाने ती मागणी मान्य केली होती.
भारतच्या दृष्टीने केरी यांची या पदावरची निवड चिंताजनक आहे. कारण केरी यांनी बहुतेक वेळा पाकिस्तानच्या बाजूने आपलं वजन खर्ची केलं आहे. बिन लादेनला मारल्यानंतर पाकिस्तानात जाणारे पहिले अमेरिकी राजकारणी केरी आहेत. ह्या घटनेनंतर, कमी केलेली आर्थिक मदत अमेरिकेकडून पुन्हा चालू करण्यात आली तीसुद्धा केरी यांच्या सांगण्यावरूनच! केरी आणि पाकिस्तानच्या राजकारणी, लष्कर आणि सरकारी अधिकाऱ्यांचे संबंध चांगेल आहेत. केरी पाकिस्तानच्या वादग्रस्त आय-एस-आयच्या अधिकारांच्या चांगल्या परिचयाचे आहेत.
केरी यांना लिबियामधल्या घटनेची चौकशी करायची आहे, ज्यात अमेरिकी संरक्षण खात्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्याचमुळे केरी यांची ही कामगिरी कशी असेल यावर खूप काही अवलंबून आहे.
म्हणूनच गेल्या तीसहून अधिक वर्षांमध्ये ज्यांनी 'पर-राष्ट्रधोरण' हा विषय असलेल्या वाद्साभेच्या तयारीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांमागे आपल्या अनुभवाची शिदोरी भक्कमपणे उभी केली, तेच केरी अमेरिकेचा सध्याचं सगळ्यात ज्वलंत खातं कसं हाताळतात हे बघणं जिकीरीचं आहे. ह्या कामात ६ फूट ४ इंच उंच केरी यांच्या बुद्धीचा,सचोटीचा कस लागणार यात वाद नाही, पण ओबामांची कामाची शैली जपत, आपल्या मुत्सद्देगिरीने आपल्या मित्रांना आणि आणि विरोधकांना समान अंतरावर ठेवत, केरी अमेरिकेचा निव्वळ फायदा करून घेणार का, आणि चीनच्या आव्हानाला तोंड देत अमेरिका 'महासत्ता' हे आपलं बिरुद मिरवणार का, याच गोष्टी केरी आणि ओबामांच्या प्राधान्यक्रमावर असणार, हे नक्की !!
- वज़ीर
- वज़ीर