Sunday, 11 November 2012

हज़ारों ख्वाहिशें ऐसी...



बराक ओबामा या व्यक्तिमत्वातच एक विलक्षण गूढ आहे. २००४ पर्येंत अमेरिकेच्या राष्ट्रीय पातळीवर फारसा माहित नसलेला नेता एकदम २००८ सालच्या राष्ट्रपतीपदासाठी आपली उमेदवारी जाहीर करतो काय आणि राष्ट्राध्यक्ष होतो काय. त्यांच्या आयुष्याचा जर संपूर्ण प्रवास पाहिला तर तो प्रवास थक्क करणारा आहे इतकच आपण बोलू शकतो. 







पण, २००८ ची निवडणूक जिंकून इतिहास घडवणाऱ्या ओबामांना २०१०च्या मध्यावधी निवडणुकांमध्ये सपाटून मार खावा लागला. ओबामा काय करणार, कोणती धोरणं राबवणार याचा अंदाज कोणालाच नव्हता आणि ओबामांना अमेरिकेच्या ताकदीविषयी काही माहिती तरी आहे का अशी शंका बहुतेक लोक घेऊ लागले. आणि अगदी त्याच नंतर ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात जाऊन मारून ओबामांनी मोठा पराक्रम केला आणि त्यांच्या कार्यकाळातली सर्वात मोठी कामगिरी पूर्ण केली. तसं पाहिला गेलं तर अमेरिकेत राष्ट्रपती फक्त पहिली ३वर्ष काम करतो, कारण चौथं वर्ष हे निवडणूक आणि त्याच्या तयारीत जातं  पण आर्थिक मंदी आणि बेरोजगारी यांनी जगातल्या सर्वात सामर्थ्यशाली माणसाला जेरीस आणलं आणि मिट रोम्नी नावाचं एक संकट ओबमांपुढे उभं राहिलं. राष्ट्रप्रेम जागृत करून, लोकांच्या भावनेला हात घालून भाषणे करणे नेहमीच सोपे असते आणि तेच रोम्नी यांनी केलं. त्यांची बेताल भाषा आणि त्यच्या जोडीला अफाट पैसा यामुळे त्यांचा गाडा पुढे रेटत गेला आणि बघता-बघता त्यांनी ओबामांना कडवं आव्हान दिलं. 




ओबामांनी त्यांची राष्ट्रपतीपदाची दुसरी आणि शेवटची निवडणूक जिंकली आणि पुन्हा एकदा इतिहास घडवला. मिट रोम्नींचा सपाटून पराभव करताना ओबामांनी ३३२ जागा आणि ओहायो, फ्लोरिडा यांचासारखी महत्वाची राज्येसुद्धा आपल्या खिशात घातली. ह्या निवडणुकीमध्ये रोम्नींना २०६ जागा जिंकता आल्या.

ओबामा यांनी कायमच इतिहास आपल्या बाजूने वळवला आहे. ओबामा हे इतिहासात अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून गणले जाणार आहेत. त्याच बरोबर राष्ट्रपतीपदाची निवडणूक पुन्हा जिंकणारे कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणूनसुद्धा त्यांनी इतिहास घडवला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती आहेत ज्यांनी निवडणुकीच्या दिवशी मतदान न करता आधी मतदान केलं(early voting). बेरोजगारीचा दर हा ओबामांच्या कार्यकाळात सलग ४२ महिने ७.५% च्या वर राहिला, आणि १९३६ नंतर म्हणजेच राष्ट्राध्यक्ष फ्रान्क्लीन रोस्वेल्ट यांच्या नंतर ७.२% पेक्षा जास्त बेरोजगारीचा दर असताना पुन्हा निवडणूक जिंकलेले ओबामा हे पहिले राष्ट्राध्यक्ष. त्याचबरोबर ६ नोव्हेंबर ही तारीख, इतिहासात याआधी ६ वेळा निवडणुका या ६ नोव्हेंबरला झाल्या आणि सहाही वेळा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आले पण सातव्या म्हणजेच या वेळी रिपब्लिकन पक्षाच्या मिट रोम्निना हरवून ओबामांनी इतिहासाला कलाटणी दिली.ही निवडणूक इतिहासात सर्वात खर्चिक निवडणूक म्हणूनसुद्धा गणली जाणार आहे. जवळपास ६ बिलियन डॉलरचा(सुमारे ३०००० कोटी रुपये) या निवडणुकीत चुराडा झाला. 'फोर मोअर इयर्स' हा त्यांचा ट्विटर मेसेज जवळपास ३२ लाख लोकांनी पुन्हा पाठवला.


इतिहास असं सांगतो की निवडणुकीच्या दरम्यान ऑक्टोबर महिन्यात अशी काही गोष्ट घडते किंवा घडवली जाते की ज्याने निवडणुकीचं गणितच बदलून जातं . ह्यालाच 'ऑक्टोबर सरप्राईज' म्हणून संबोधलं  जातं. या वेळी ऑक्टोबर महिन्याअखेर पर्येंत काहीच विशेष न घडलेल्या अमेरिकेत 'स्यांडी' वादळ आलं आणि निवडणुकीचा नूरच बदलून गेला. ओबामांनी आपला प्रचार सोडून 'फेमा' बरोबर काम केलं आणि वादळाचा तडाखा बसलेल्या ठिकाणी मदत केली. त्यांनी पटकन घेतलेल्या अचूक निर्णयांची नंतर स्तुती ख्रिस ख्रिस्ती, आणि कॉलिन पॉवेल या रिपब्लिकन पक्षाच्या बड्या नेत्यांनीसुद्धा केली. याचा ओबामा यांना फायदाच झाला. 

मतांची आकडेवारी पाहता ओबामांना कृष्णवर्णीय, स्पानिश, हिस्पानिक, एशियायी जनतेने भरभरून मतदान केलं आहे. त्याचबरोबर महिला, तरुण मतदार यांनी आपली मतं ओबामांच्या पारड्यात टाकली. त्यांना मतदान करणारा मोठा वर्ग हा मध्यम-वर्ग आहे. रोम्निना रिपब्लिकन पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या वर्गाने मतदान केलं त्याच बरोबर ओबामा यांचा तिरस्कार करणारा एक कट्टर वर्ग आहे, त्यांनी आणि उच्चभ्रू लोकांनी रोम्नींना मतदान केलं आहे. ओबामा, ओहायो हे एक महत्वाचं राज्य जिंकू शकले कारण त्यांनी अमेरिकी गाड्या उत्पादन करणारे कारखाने वाचवले. अशा कारखान्यांमध्ये काम करणारे लोक ओहायो राज्यात जास्त आहेत. ह्याच निवडणुकीत ओबामांनी रोम्नी यांनी त्यांच्या जन्मभूमीत म्हणजेच मिशिगन आणि कर्मभूमीत 'Massachusetts' मध्ये धूळ चारली.

बिकट वेळीसुद्धा ओबामा निवडून आले या गोष्टीला बरेच पैलू आहेत. एक त्यांचाकडे निवडणुकीचं काम हाताळणारी चोख यंत्रणा आहे. अमेरिकी निवडणुकीत घरो-घरी प्रचारावर कमी भर आहे, सोशल मिडियाचा प्रचारात वापर करून घेण्यात ओबामा अग्रेसर आहेत असं राजकीय विश्लेषक म्हणतात. त्याच बरोबर त्यांचे विचार साधे आणि सोपे आहेत. त्यांचा कारभार पारदर्शी आहे. गेल्या ४ वर्षात त्यांनी एकसुद्धा बेताल वक्तव्य केलं नाही.  कुठल्याही आणि कसल्याही प्रकरणात त्यांचं नाव नाहीये. जागतिक आर्थिक महासत्ता आणि जगातलं सर्वात सामर्थ्यशाली लष्कर असताना त्याचा स्वामी युद्धाची खुमखुमी दाखवत नाही ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सामान्य जनतेशी आपली नाळ जोडून आहेत.

इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे बिल क्लिंटन यांनी ओबामांचा केलेला प्रचार. साधारण दीड महिन्याआधी, रिपब्लिकन पक्षाचे हल्ले थोपवत ओबामा आपला मार्ग चाचपडत असताना क्लिंटन हे ओबामांच्या मदतीसाठी धावले आणि ओबामा यांनी सरशी घेतली. वादळानंतरच्या मदतकार्यात ओबामा गुंतलेले असताना त्याची खिंड उप-राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांनी लढवली. पण, इतिहास असा सांगतो की क्लिंटन एखादी गोष्ट फायद्याशिवाय करत नाहीत. २००८ साली हिलरी क्लिंटन यांनासुद्धा डेमोक्राटिक पक्षाकडून निवडणूक लढवायची होती पण संधी ओबामांना मिळाली आणि क्लिंटन आणि ओबामा यांच्यामध्ये मोठा वाद झाला. पण आपल्या मंत्रीमंडळातलं सर्वात महत्वाचं खातं म्हणजेच पर-राष्ट्रीय धोरण खातं ओबामांनी हिलरी क्लिंटन यांना दिलं. बिल क्लिंटन यांनी ओबामांचा प्रचार केला यासाठी तीन महत्वाची कारण असू शकतात. एक, जर ओबामा निवडून आले तर २०१६ सालच्या निवडणुक हिलरी यांच्यासाठी सोपी असेल. दोन, ओबामांचा २००८ आणि २०१२ संपूर्ण प्रचार आणि त्यांच्या प्रचाराची यंत्रणा पाहता बर्याच लोकांना १९९२ सालच्या बिल क्लिंटन यांच्या प्रचाराची आठवण झाली. अगदी तसाच तरुण-वर्ग, महिला-वर्ग ओबामांच्या मागे उभा राहिला. क्लिंटन यांना आपलं हे गारुड कुठेही कमी होऊ द्यायचं नाहीये, खासकरून मोनिका लेविन्स्की प्रकरण त्यांना पुसून काढायचं, किंवा तिसरं म्हणजे त्यांना सक्रिय राजकारणाच्या चौकटीबाहेर राहून देशासाठी काहीतरी करून दाखवायचं.

भारताकडून मनमोहन सिंह आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ओबामांना अभिनंदनाचे फोन केले. त्याचा वेग पाहता त्यांना ओबामा आणि त्यांचा विजय आनंददायी आहे. रोम्नी यांनी आपला पराभव स्वीकारल्या-स्वीकारल्या भारताने ओबामांचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय राजकारणात ओबामा मनमोहन सिंह यांचा खूप आदर राखतात. एक ज्येष्ठ आणि अनुभवी सहकारी म्हणून ते डॉ.सिंह यांच्याकडे पाहतात. भारताच्या दृष्टीने ओबामा रोम्नी यांच्या पेक्षा कित्येक पटींनी विश्वासू आहेत. अर्थात अमेरिकेचं आंतरराष्ट्रीय राजकारण हे कायमच त्यांचच हित पाहत पुढे चालू आलं आहे. ओबामा आणि एकूणच अमेरिकेच्या दृष्टीने भारत एक बाजारपेठ आहे, इतकच. काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान आपापसात सोडवून घेतील, अमेरिका त्यामध्ये पडणार नाही ही गोष्ट आधीच सांगून ओबामांनी सोयीस्करपणे या प्रश्नातून अंग काढून घेतलं आहे. 

ओबामांना आता आपली धोरणं राबवायची आहेत. त्यासाठी ते आता कंबर कसतील. २०१४ अखेर पर्येंत अमेरिकी सैन्य मागे येईल असं ओबामा सांगतात. लादेन जरी नसेल तरी दहशतवाद संपला नाहीये हे ओबामासुद्धा जाणून आहेत. सिरिया आणि त्याचे परिणाम ओबामा सावरतील असं भाकीत राजकीय पंडित  करत आहेत. अमेरिकेचा वचक कायम राखत, ओबामा इराण आणि इस्राईल यांचा प्रश्न युद्ध न करता सोडवू शकतील अशीसुद्धा अपेक्षा राजकीय विश्लेषक करत आहेत. कारण दहशतवादाचा उगम त्याच भागातून आहे. अमेरिकेला तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण करणार असा ओबामा सांगत आहेत. तसं काही प्रमाणात जरी झालं तरी मध्य-आशियाई राजकारण काही नवीन वळण घेईल का, हा प्रश्न महत्वाचा असेल. अमेरिकेतले शस्त्र परवाने, अंमली पदार्थ, जागतिक तापमानवाढ, त्याचे परिणाम आणि त्यावरचे उपाय यांवरची ओबामांची भूमिका खूप काही ठरवून जाईल. 'व्हाईट हाउस' मध्ये ओबामांच स्वागत अजून खालावलेली अर्थव्यवस्था करेल. सगळ्यात जास्त काम त्यांना ह्याच विषयावर करायचय, त्याच बरोबरीने चीनला पायबंद कसा घातला जाईल याचा विचार अमेरिकेचं भवितव्य ठरवेल. ओबामांकडून स्थलांतर, विसा आणि इतर गोष्टींबद्दल भरघोस कामगिरी अपेक्षित आहे. 'आउट-सोर्सिंग' बाबत ते काय भूमिका घेतात हा भारताच्या दृष्टीने चिंताजनक विषय आहे. भारत, अमेरिका आणि इराण वादापासून स्वतःला दूर ठेऊ इच्छितो कारण भारताचं तेल जास्त प्रमाणात इराणमधूनच येतं. त्यामुळेच नवी दिल्लीला हा वाद सामोपचाराने सोडवला जावा असच वाटत असणार. ओबामांचा विरोधी पक्ष म्हणजेच रिपब्लिकन पक्ष सध्यातरी फक्त जुन्या, बहुतेक गोर्या आणि श्रीमंत लोकांचा पक्ष इतकीच ओळख ठेऊन आहे. त्यांना आत्मचिंतनाची खूप गरज आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये त्यांची पार हवा निघून गेलीये.

थोडक्यात काय ओबामांसमोरचं ताट आव्हानांनी पूर्णपणे भरलं आहे. तरीसुद्धा २०१४च्या मध्यावधी निवडणुकीपर्येंत त्यांना फारसं काही करता येण्यासारखं नाहीये. त्यांनी आपली कामाची शैली नक्कीच बदलली आहे. अगदी कालच त्यांनी अर्थव्यवस्था आणि श्रीमंतांची करप्रणाली या गोष्टींना उद्देशून केलेलं वक्तव्य त्यांच्या पुढील कामगिरीची झलक देऊन गेलं आहे. आता कुठचही दडपण नसेलेले ओबामा कसं काम करतात हे बघणं मजेशीर असणार आहे. त्यांचा इतिहास पाहता ओबामा हाती आलेली संधी गमावतात असं दिसून येतं. जे त्यांनी २००८ साली निवडून आल्यावर केलं , किंवा २०१२च्या पहिल्या वादसभेत त्यांचा ज्या पद्धतीने पराभव झाला त्यावरून हे अगदी स्पष्ट होतं. पण, जाणकार सांगतात की ओबामांमधला नेता आता खऱ्या अर्थाने बाहेर येईल व ते आता अधिक निर्भीडपणे काम करतील. पण, तोपर्येंत एम्पायर स्टेट बिल्डींग असंख्य निळ्या दिव्यांनी उजळून जाणार आहे.


सारासार विचार करता पुढे येणारा काळच काय ते सांगून जाईल, ओबामा २.० आणि त्यांची कामगिरी बघण्यास सगळे आतुर आहेत. आधीच आपल्या पहिल्या विजयानंतर भल्या-भल्यांना अवाक करणाऱ्या ओबामांनी आपल्या दुसऱ्या विजयानंतर आपल्या भोवतीचं गूढ अजूनच विलक्षण, अदभूत करून एकच राळ उडवून दिली आहे, हे नक्की. पण, तूर्तास तरी अमेरिकी जनता, ओबामांचे पाठीराखे आणि त्यांचे कट्टर मतदार  तुफान जल्लोष करत आहेत आणि त्यांच्या तोंडी एकच वाक्य आहे...'फोर मोअर इयर्स..!!!' 

                                                                                                                      वज़ीर